विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अक्षय्यतृतिया - वैशाख महिन्यांतील शुद्ध तृतीयेस ''अक्षय्यतृतीया'' नांव पडण्याचें कारण 'मदनरत्न' नामक संस्कृत ग्रंथांत श्रीकृष्णाचे तोंडून धर्मराजास असें सांगविलें आहे कीं:-
अस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया॥
उद्दिश्य दैवत पितृन्क्रियते मनुष्यै-
स्तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव॥
''हे युधिष्ठिरा, ह्या वैशाख शुद्ध तृतीयेस केलेलें हवन किंवा दान चिरकालपर्यंत टिकणारें आहे, आणि म्हणूनच ह्या तिथीस ''अक्षय्यतृतीया'' म्हणण्यांत येते देवता व पितर ह्यांस उद्देशून ह्या तृतीयेस केलेलें सर्व कर्म चिरंतन होतें.
ह्या वैशाख तृतीयेस महत्त्व येण्याचें कारण हा कृतयुगाचा (कांहींच्या मतें त्रेतायुगाचा) आरंभ समजला जातो व त्या दृष्टीनें कालविभागाचा कोणताहि प्रारंभदिन नेहमींच भारतीयांच्या दृष्टीनें अत्यंत पवित्र व मंगलकारक मानला गेला आहे. मदनरत्न ग्रंथांत श्रीकृष्णांनीं युधिष्ठिरास ह्या दिवसाचें महात्म्य विस्तरश: सांगितलें आहे.
ह्या अक्षय्यतृतीयेचे दिवशीं पवित्र गंगादि नदीच्या जलांत स्नान करून श्री विष्ण्वादि देवांची पूजा करावी. त्याचप्रमाणें जप, होम, स्वाध्याय, पितृतर्पण, दान वगैरे गोष्टी ह्या दिवशीं मनुष्यप्राण्यास मंगलकारक आहेत. या दिवशीं युगांदि श्राद्ध अपिंडक करावें, श्राद्ध न केलें तर तिलतर्पण तरी करावें असें सांगितलें आहे. देवतापितरांच्या उद्देशानें उदककुंभ दान करावें. ह्याबद्दल अशी कथा येणेप्रमाणें सांगतात.
पूर्वी एक निर्धन व्यापारी होऊन गेला. तो मधुर बोलणारा, सत्य वचनी, देवब्राह्मणांचा आदरसत्कार करणारा त्याचप्रमाणें पुण्यकारक अशा संतांच्या कथा ऐकण्याची आवड असलेला होता. दारिद्र्यामुळें तो कुटुंबपोषण करतांना अत्यंत व्याकुळ होई. त्यानें एकदा असें वचन ऐकलें कीं रोहिणी नक्षत्रानें युक्त अशा तृतीयेच्या दिवशीं जर बुधसंयोग होत असेल तर कोणतेंहि पुण्यकर्म करण्यास तो उत्तम पर्वकाल होय, व ह्या मंगल दिवशीं कोलेलें पुण्यकर्म चिरंतन होतें. ह्याप्रमाणें ऐकून त्यानें गंगा नदी काठीं जाऊन देवता व पितर ह्याचें तर्पण केलें व घरीं येऊन थंड पाण्यानें व निरनिराळ्या धान्यानीं त्याच प्रमाणें नाना प्रकारचीं खाद्यपेयें यांनीं पूर्ण असे कुंभ त्यानें शुद्धात:करणानें स्त्री नको नको म्हणत असतां योग्य व सत्पात्र अशा बृह्मवृंदांस दान केले, व मृत्यूपर्यंत सर्व जगाची नश्वरता लक्षांत घेऊन नेहमीं धर्माचरणीं रत झाला.
ह्यानंतर वासुदेव स्मरण करीत तो मृत झाल्यावर पुढल्या जन्मीं कुशावती नामक नगरीचा तो क्षत्रिय राजा झाला. व त्यानें धर्माचरणानें मिळवलेलें ऐश्वर्य अक्षय झाल्यामुळें अनेक मोठमोठे यज्ञ करून गाई, सुवर्ण आणि मोठमोठ्या दक्षिणा ॠत्विजांस दिल्या. त्याचप्रमाणें मुके, आंधळें, पांगळे अशा दीन दुबळ्या मनुष्यांस धन दान करीत त्यानें अनेक प्रकारचें वैभव भोगलें परंतु त्याच्या पुण्यकर्माचा क्षयच झाला नांहीं. भविष्योत्तर पुराणांतहि अक्षयतृतीयाव्रत कथा आहे.
ह्याकरितां अक्षय तृतीयेच्या दिवशी उन्हापासून प्राणिमात्रांचें संरक्षण करणार्या सर्व वस्तू म्हणजे, जोडा, छत्री, गाय, जमीन, सुवर्ण, वस्त्रें वगैरेंचे दान जास्त श्रेयस्कर होय. अशा रीतीने ग्रीष्मॠतूस हितकर असे शीतोदककुंभ ह्यांचे पूजन व दान हा या दिवशींचा विशेष प्रघात आहे.
परशुरामजयंतीचा हाच दिवस होय. जमदग्नि ॠषींनां रेणुकेपासून रात्रीच्या प्रथम प्रहरांत परशुरामस्वरूपी परमेश्वराची प्राप्ति झाली. या दिवशीं प्रदोषकालीं परशुरामाची पूजा करून अर्ध्य देतात.
हल्लीं अक्षय तृतीया हा दिवस स्त्रियांनां फार महत्त्वाचा असतो. चैत्र महिन्यांतील वसंतोत्सवानिमित्त होणारे हळदी कुंकवाचे समारंभ या दिवसापर्यंत करावे असें आहे. तेव्हा हा समारंभ न झाल्यास अखेरच्या दिवशीं करतात तेव्हां सहाजिक गांवांत या दिवशीं समारंभाची गर्दी असते.