विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अक्षक्षेत्र - अक्षक्षेत्र म्हणजे ज्यांतील एक कोण अक्षांशतुल्य आहे. असा काटकोन त्रिकोण. यांतील कर्णरेषेस अक्षकर्ण म्हणतात. सूर्य क्षितिजावर असतां आपण पूर्वबिंदुकडून खगोलाकडे पाहिल्यास त्यांतील वृत्तें आपणांस सरल रेषांप्रमाणें दिसून त्या सरल रेषांचीं आपणांस अनेक अक्षक्षेत्रें बनवितां येतात. याबद्दल विवेचन भास्कराचार्यांनीं त्रिप्रश्नाधिकारांत केलें आहे.
ज्या वेळीं दिवस रात्री सारखी असतात, अर्थात् सूर्य विषुववृत्तावर असतो, त्या दिवशीं सूर्य याम्योत्तरवृत्तावर आला असतां व त्यामुळें नतांश अक्षांशतुल्य असतां द्वादशांगुल शंकूपासून एक अक्षक्षेत्र उत्पन्न होतें. हें पुढील आकृतींत (अमक) दाखविलें आहे. तेव्हां जी भुजरूप दक्षिणोत्तर शंकुछाया पडते तिला पलभा म्हणतात, व या अक्षक्षेत्राच्या कर्णास अक्षकर्ण म्हणतात.
सूर्य थेट पूर्वेस वर्षांतून दोन दिवस काय तो उगवतो; इतर दिवशी तो पूर्व बिंदूच्या उत्तरेस किंवा दक्षिणेस उगवत असतो. याचें क्षितिजावरील उदयस्थान व पूर्व बिंदु यांच्या अंतरांशांच्या भुजज्येस अग्रा म्हणतात. सूर्य उन्मंडलावर येतो तेव्हां त्याच्या स्थानापासून क्षितिजाच्या पातळीवर लंब काढिला असतां त्या लंबास उन्मंडलशंकू, व तो शंकु व उदयकालिक स्थान यांमधील अग्रखंडास अग्राग्रखंड म्हणतात; व अग्रेच्या अवशिष्ट भागास अग्रादिखंड म्हणतात. सूर्य ज्या वर्तुलांत दैनिक प्रदक्षिणा करितो त्यास अहोरात्रवृत्त म्हणतात. त्या वृत्ताचे व विषुववृत्ताचे उन्मंडलामुळे दोन दोन तुल्य विभाग होतात. उदयापासून उन्मंडलापर्यंत पोंहोचतोवर सूर्यास अहोरात्रवृत्ताचे जे अंश आक्रमावे लागतात, त्यांच्या त्या वृत्तावरील अर्थात् द्युज्याकर्णीय भुजज्येस कुज्या (कु म्हणजे पृथ्वी) किंवा क्षितिज्या म्हणतात; व अहोरात्रवृत्ताच्या व्यासार्धापेक्षां म्हणजे द्युज्येपेक्षां त्रिज्या ज्या मानांने मोठी त्या मानानें कुज्येस रूप दिलें असतां तिलाच चरज्या म्हणतात; व चरज्येच्या चापास चरांश म्हणतात.
सूर्य उन्मंडल सोडून वर गेल्यावर व समवृत्तास पोहोंचण्यापूर्वी त्याचें एखादें स्थान घेऊन त्याजपासून क्षितिजाच्या पातळीवर लंब काढिल्यास त्या शंकूच्या व उदयस्थानाच्या मधील सरलरेषात्मक अंतरास (ही रेषा वाढविली असतां समवृत्ताच्या पातळीस लंब रूप असते.) शंकुतल म्हणतात; व अग्रेच्या अवशिष्ट भागास भुज किंवा बाहु म्हणतात. (सूर्य दक्षिणगोलस्थ असल्यास अग्रा व शकुंतल यांच्या योगानें भुज तयार होतो.) सूर्य समवृत्तीं येतांच तत्स्थानापासून क्षितिजाच्या पातळीवर लंब काढिला असतां त्या लंबास समशंकु म्हणतात.
उ ख द अ:-याम्योत्तवृत्त. द म उ:- क्षितिजाचा व्यास. ध्रु, न:- उत्तर व दक्षिण ध्रुव. त य:-विषुववृत्ताचा व्यास. व ल:-अहोरात्रवृत्ताचा व्यास. ध्रु म न:-उन्मंडलाची पातळी.
म ट:-अग्रा (म्हणजे उदयकालिक सूर्याची दिगंश ज्या)
क च:-उन्मंडलशंकु म्हणजे उन्मंडलस्थ सूर्यापासून क्षितिजाच्या पातळीवर काढिलेला लंब.
अ क्ष क्षे त्रें.
(श्री. कृ. कोल्हटकर भारतीय ज्योतिर्गणित. शं. वा. दीक्षित-भारतीय ज्योति:शास्त्र. त्रिप्रश्नाधिकार)