विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अज्ञान - अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव किंवा एखाद्या गोष्टीचें ज्ञान नसणें. नीतिशास्त्र व कायदेशास्त्र यांत याला फार महत्त्व आहे. पण तें अलीकडे प्राप्त झालें आहे. ऐतिहासिक दृष्टया हें प्रस्थापित झालें आहे कीं, समाज किंवा सामुदायिक राहणी ही पूर्वस्थिति असून पृथक वैयक्तिक राहणी ही नंतरची स्थिति आहे; आणि या प्राथमिक अवस्थेंत एका व्यक्तिच्या अपराधाबद्दल सर्व कुटुंब किंवा जमात जबाबदार धरली जात असे. म्हणजे ज्यांनां दोषास्पद कृत्याची कांहींही माहिती नाहीं अशांनांहि शिक्षा भोगावी लागे. अशी स्थिती ग्रीक, रोमन वगैरे सर्व प्राचीन यूरोपीन देशांत आरंभी आढळते. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रांत दोषास्पदता व अज्ञान यांचा परस्पर संबंध स्पष्टपणें दाखविण्याचा प्रयत्न साक्रेच्टीस यानें केला. त्यानें असें तत्त्व प्रतिपादिलें कीं, सद्गुण म्हणजे ज्ञान किंवा दुर्गुण म्हणजे अज्ञान (व्हर्च्यु इझ नॉलेज, ऍंड व्हइस इझ इग्नरन्स). ही व्याख्या अतिशयोक्तिपूर्ण आहे, असें पुढें आरिस्टाटलनें दाखविलें. मनुष्याच्या हातून सत्कृत्य घडण्यास सत्कृत्य म्हणजे काय येवढें ज्ञान असून भागत नाहीं, तर त्याप्रमाणें वागण्याची इच्छाहि असावी लागते. नीतिशास्त्राची प्रगति होत गेल्यावर एका व्यक्तिच्या अपराधाबद्दल सर्व कुटुंबाला शिक्षा करण्याची रीत नष्ट झालीच; व शिवाय जाणून बुजून दुष्कृत्य केल्यास मनुष्य खरा अपराधी समजावा. अजाणत: म्हणजे अज्ञानानें एखादी गोष्ट हातून झाल्यावर त्याला शिक्षा नसावी असेंहि तत्त्व प्रस्थापित झालें.
कायदेशास्त्रांत या बाबतींत आणखीहि प्रगति झाली. ''कायद्याचें अज्ञान क्षम्य नसून परिस्थितीचें अज्ञान क्षम्य आहे. '' हें तत्त्व सर्वमान्य झालें आहे. तसेंच अज्ञान ठरवितांना बौध्दिक अपात्रतेकडे लक्ष देतात; आणि अल्पवयी किंवा मेंदू बिघडलेल्या इसमांच्या हातून घडलेल्या गुन्हा क्षम्य समजतात.
अ ज्ञा न उ र्फ अ ल्प व यी प णा (मायनॉरिटी) - कायदेशास्त्रांत, 'अज्ञानी इसम' म्हणजे वयांत न आलेला किंवा अल्पवयी असल्यामुळें ज्याला कायदा बंधनकारक होत नाहीं असा इसम, असा अर्थ आहे मनुष्य वयांत आला कसें केव्हां समजावें याबद्दल निरनिराळया देशांत निरनिराळा कायदा आढळतो, आणि स्त्री व पुरुष यांची वयांत येण्याची कालमर्यादा निरनिराळी आढळतें. या बाबतींत प्राचीन काळांतील कायदा हल्लींच्या कायद्याहून निराळा आहे. हिंदु्थानांत धर्मभेदामुळें हिंदु, मुसुलमान, पारशी, व ख्रिस्ती असे चार समाजांतील चार प्रकार निरनिराळे आहेत. हिंदुंचा प्राचीन कायदा मनुस्मृत्यादि ग्रंथांत नमूद आहे. त्यांत सोळा वर्षे पुरी होईपर्यंत अज्ञानपणा समजावा असें आहे. हल्लीं हिंदी सज्ञानाचा कायदा ( इंडियन मेजॉरिटी अँक्ट ) सर्व धर्मींयांनां लागू केला असून त्याप्रमाणें सामान्यतः अठरा वर्षें पुरी होईपर्यंत अज्ञान समजतात. पण जर एखाद्याची ईस्टेट कोर्ट ऑफ वार्ड्स किंवा कोर्टानें नेमलेल्या पालकाच्या (गार्डियन) ताब्यांत असेल तर एकवीस वर्षे पुरी झाल्यावर तो कायद्यांत आला असें समजतात. दिवाणी बाबतींत सामान्यत: हा कायदा लागू असला तरी विवाह, विवाहदेणगी, घटस्फोट व दत्तक या चार बाबतींत हिंदुंना जुना कायदाच म्हणजे सोळावर्षे मर्यादेचा लागू आहे व सदरहु चार बाबतींतील सोळाव्या वर्षांनंतर केलेले करार बंधनकारक होतात. हिंदुस्थानांतील पारशी व ख्रिस्ती यांनां सर्व बाबतींत इंडियन मेजारिटी अँक्ट लागू आहे. मुसुलमानानांहि सामान्यत: तोच लागू आहे; पण विवाह, विवाहदेणगी, घटस्फोट या बाबतींत स्त्रीला चवदा व पुरुषाला सोळा अशी सज्ञानत्वाची मर्यादा आहे.
यूरोपांतील प्राचीन रोमन कायद्यांत अज्ञानपणाच्या तीन अवस्था होत्या; एक सात वर्षांपर्यंत. दुसरी पुरूषाची चवदा वर्षे व स्त्रीची बारा वर्षांपर्यंत व तिसरी पंचवीस वर्षांपर्यंत. पहिल्या अवस्थेंतील माणसाला कोणतेहि करारमदार करतां येत नसत, पण दुसऱ्या अवस्थेंत टयुटर (पालका) च्या संमतीनें करतां येत असत, हल्ली इंग्लंडमध्ये सरसकट स्त्री पुरुष सर्वांच्या बाबतींत एकवीस वर्षे पुरी होईपर्यंत अज्ञानपणा दिवाणी कायद्यांत समजतात, फौजदारी कायद्यांत सात वर्षांपर्यंत गुन्हा करण्याइतके ज्ञान आहे असे पुराव्याने सिध्द करावे लागते, चवदा वर्षानंतर मात्र प्रत्येक इसम स्वतःच्या गुन्ह्याबद्दल पूर्ण जबाबदार समजला जातो.