विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अज्ञानदास - शिवकालीन शाहीर, यानें अफझल खानाचा वध या ऐतिहासिक प्रसंगावर दोन पोवाडे रचिले आहेत, हे पोवाडे खुद्द जिजाबाईने रचण्यास सांगून ते शिवाजीकडून ऐकविले व कवीच्या रचनाचातुर्याबद्दल एक घोडा व एक शेर सोन्याचा तोडा त्यास बक्षिस मिळाला, हे दोन्ही पोवाडे छापून प्रसिध्द झाले आहेत, (ऍकवर्थ व शालिग्राम कृत पोवाडे)-हल्ली प्रसिध्द असलेल्या सर्व पोवाडयांपैकी अज्ञान (किंवा अग्निन) दासाचा पोवाडा सर्वात जुना आहे. याची रचना एकतारीवर म्हणतां येईल अशी साधी आहे. शिवाय ह्या पोवाडयांत वर्णिंलेल्या प्रसंगानंतर लवकरच रचिलेला व शिवाजी आणि त्याचे मावळे सरदार यांनी खुद्द ऐकिलेला तेव्हां हा बराच विश्वसनीय म्हणण्यास हरकत नाही.
हा पोवाडा वाचून त्यावेळचे चित्र डोळयापुढें चांगले उभें राहतें. सामदासाचे प्रकार होऊन देखील अफजलखान ऐकत नाहीं असें पाहून शिवाजीने सर्व निरवानिरव केली. आपलें उत्तरकार्य काशीस व गयेस जाऊन करण्यास ब्राह्मणास सांगितले, दानें दिलीं, दाढी कमी केली व खानाच्या भेटीस निघतांना लोकांनी ‘सिवबा सील करा अंगाला’ असे विनविलें तेव्हां चिलखत अंगांत घातले व
डावे हाती बिचवा ल्याला । वाघनस्त्र सरजाच्या पंजाला ॥
फिरंग पट्टा जिऊ म्हाल्याप दिला । शिवाजी सरजा बंद सोडूनी चालिला॥
निघतांना सर्वांचे मुजरे घेतलेः-
माझा रामराम दादानु । गडच्या गडकर्या बोलिला ॥
जतन भाईनु करा । आमच्या संभाजी राजाला ।
या प्रमाणें सर्व गडकऱ्यांना विनंति केली. तसेच आईस भेटीस न येण्यास विनंति केली होती, पण जिजाई पुत्रप्रेमानें तें न ऐकता पालखीत बसून धांव आली. त्यावेळी
शिवबा बोले जिजाऊसवे । बये वचन माझें ऐकावें ।
माझी असोसी खानाला । बये जातो भेटण्याला
जिजाबाईनें खान बेईमान आहे. तेव्हां जाऊं नये असें पुष्कळ सांगून पाहिलें, पण शिवाजीचे निर्धाराचे शब्द ऐकून
जिजाऊ बोले महाराजाला । शिवबा बुध्दीनें काम करावें ।
उसनें संभाजीचें घ्यावे ॥ जिजाऊ घेती अलाबला ।
शिवबा चढती दौलत तुला । घे यशाचा विडा ॥
शिवबा स्मरे महादेवाला ॥ गळां घातली मिठी ।
मातेच्या चरणाशीं लागला ॥ ध्यानीं आठवूनी -
भगवंताला । शिवाजीराजा सदरे गेला॥
या पुढें अफजलखानाची भेट व वध हा प्रकार विदितच आहे.
या पोवाडयावरून दुसरें असें कळते की, शिवाजीच्या ताब्यांत त्यावेळी ४०-५० किल्ले होते. ‘महाराज’, छत्रपति हीं उपपदें त्याच्या नांवाला लाविलीं जात असत. ‘शिवाजीच्या तळयांत पाणी पिती सर्व जीवू’ या वर्णनावरून त्याचें लोकप्रिय राज्य व्यक्त होते. याखेरीज महाराष्ट्राची तत्कालीन परिस्थिति, खानाचा सरंजाम व स्वारी इत्यादि गोष्टीवर प्रकाश पडतो.
(संदर्भ ग्रंथ.-मराठी रियासत, पूर्वार्ध. महाराष्ट्रसार-स्वतः ऍकवर्थ व शालीग्राम यांनीं प्रसिध्द केलेले पोवोडे.)