विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आ. अ र्थ नि श्च य - २ वर्णमालेंतील दुसरें अक्षर शब्दांनां हा उपसर्ग लागला असतां त्याचा (संस्कृतांत) अर्थः (१) अ पचयः जसें.-ओष्णम् (- जरा उष्ण, आ आणि उष्ण पासून)(२) विस्तारः जसें आभोग (-पर्याप्ति आ आणि भोग-सुख).(३)उपक्रमविषयक मर्यादाः जसें आसमुद्रात् (समुद्रापासून), आजन्मतः (जन्मल्यापासून),(४) समाप्तिविषयक मर्यादाः जसें आफलोदाय (फल मिळेपर्यंत), आसमुद्र (समुद्रापर्यंत) (५) अंतर्भूत करणारी मर्यादाः जसें आक्रमण (पूर्ण संचार); आसकलात् ब्रह्म (सर्व वस्तूंचा समावेश ब्रह्मांत होतो), (६)अतिरिक्त शब्द म्हणूनः जसें आभास, आघ्गण, आघात, आल्हाद. यांचा अर्थ भास, घ्गाण, घात, व ल्हाद हाच होतो. (७) हा उपसर्ग शब्दार्थ व विनियोग विस्तृत करितो, संकुचित करतो, उलट करितो, नाहींतर बदलून टाकतो; जसें आग्रह (आ आणि ग्रह = घेणें यापासून)-एकदा घेतल्यावर (मत किंवा कार्य) कायम ठेवणें, आचार (आ आणि चर = चालणें पासून)-चालणे (धर्माप्रमाणे), आगमन (आ आणि गमन- जाणें पासून)- येणें, आमोद (आ आणि मोद=आनंद)-सुवास, आकृति (आ आणि कृति = कृत्य)-रूप.
२ आकारादि अक्षर उचारतेवेळी किंवा पदार्थ खातेवेळीं मुखाचा जो प्रसृत आकार होतो त्यास आ असें म्हणतात; जसे आ करणें-पसरणें-वासणें.
३ एखादी गोष्ट ऐकिली नसल्यास किंवा ऐकिली नाहीं असें दाखवावयाचें असल्यास ती पुन्हां सांगण्याचा इशारा देण्याकरितां म्हणून जो तोंडांतून आवाज निघतो त्याचा आं असा उच्चार होतो.
अ क्ष रा कृ ति वि का स - आ या स्वराच्या चिन्हाच्या विकासासंबंधात लक्षंत ठेवण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे इतर स्वरांच्या स्वतंत्र व व्यंजनसंयोगी चिन्हांस निरनिराळी रुपें असतांना आ या स्वराच्या बाबतीत मात्र इतर अक्षरांप्रमाणें अ या स्वराक्षरासच आ या स्वराचें व्यंजनसंयोगी चिन्हा लावून तें अक्षर लिहिण्याची अगदीं पूर्वापारपासून वहिवाट आहे. अर्थात् आ या अक्षराचा विकास म्हणजे अ या अक्षराचा विकास अधिक आ या स्वराच्या व्यंजनसंयोगी चिन्हाचा विकास होय. यांपैकीं पहिला विकासक्रम अ या सदराखाली अगोदर येऊन गेला असल्यामुळें फक्त विकासक्रमाचा येथें विचार करावयाचा आहे. नागरी लिपीच्या जुन्यांत जुन्या उपलब्ध लेखांत म्हणजे ख्रि. पू. तिसऱ्या शतकांतील अशोकाच्या लेखांत आ या स्वराचें व्यंजनसंयोगी चिन्ह हे व्यंजनाक्षराच्या उजव्या बाजूस सामान्यतः डोक्याशीं पण क्वचित् मध्यावरहि, काढलेली एक लहान आडवी रेषा होती. या स्वराच्या सदरहू चिन्हांत फरक करावयाची गरज भासण्यास मुख्यत्वेंकरून ज या अक्षराचे रूप कारण झालें असावें असें दिसतें. कारण या अक्षरास उजव्या अंगास खाली, वर व मध्यें या तीनहि ठिकाणी आडव्या रेषा असल्यामुळें आ या स्वराचे चिन्हा जोडतांना स्पष्ट व्यक्तीसाठी आडवी रेषा वर किंवा खाली मुरडण्यांत येऊं लागली. ज या अक्षरासंबंधांतील अडचण ज्या ज्या अक्षरांच्या रूपांत उजव्या बाजूस आडवी रेषा होती त्यांनां कमी अधिक प्रमाणांत लागू होती. म्हणून उपर्युक्त मुरडलेले चिन्ह इतर व्यंजनांच्या बाबतींतहि उपयोगांत येऊं लागले. परंतु वर मुरडलेल्या चिन्हाचें इकाराच्या चिन्हाशीं सादृश्य असल्यामुळें शेवटीं खालीं मुरडलेले चिन्हच प्रचारांत येऊन त्याचा पुढें विकास होऊन आकाराचा हल्लींचा काना तयार झाला. स्त्रि. पू. दुसऱ्या शतकाइतक्या प्राचीन भट्टिप्रोलूच्या लेखांत व्यंजनास जोडलेलें आकाराचें चिन्हा अगदीं नियमानें खालीं मुरडलेलें सांपडतें. हा एक अपवाद सोडून दिला तर आकाराचें वर मुरडलेलें चिन्हा ख्रि. पू. पहिल्या शतकाच्या सुमारास (मथुरेचा महाक्षत्रप शोडसच्या वेळचा जैन लेख पहा) आणि खालीं मुरडलेलें चिन्ह इसवी सनाच्या दुसर्या शतकाच्या सुमारास (गिरनारच्या शिलेवरील रुद्रदाम्याचा व अमरावतीचा लेख पहा) प्रथम दृष्टीस पडते. चौथ्या शतकांतील पल्लववंशी शिवस्कंदबर्म्याच्या दानपत्रांत तर या खाली मुरडलेल्या चिन्हाचा सररहा उपयोग केलेला आढळतो. तथापि आ या स्वराक्षरास व त्याच्या व्यंजनसंयोगी चिन्हास हल्लींच्या सारखें स्पष्ट रूप दहाव्या शतकापर्यंत आलेलें दिसत नाहीं (छिंदवशी लल्लचा देवलचा लेख पहा). प्राचीन कालच्या कांही लेखांत आ बनविण्याकरिता अ या अक्षरास हल्लींच्या उकारासारखेहि चिन्ह जोडलेले सांपडतें.
(मोल्स्वर्थ व कँडी-मराठी इंग्रजी कोश; वा.शि.आपटे-संस्कृत इंग्रजी कोश; ओझा-भारतीय प्राचीनलिपिमाला).