विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आंकडी - मुलांच्या मेंदूतील मज्जानियामकस्थानें पूर्णत्वदशेस पोंचली नसल्यामुळे पृष्ठरज्जूंतील मज्जास्थानांस अगदींच थोडया कारणानें उत्तेजन मिळून आंचके येतात यास आंकडी, आचके, झटके, इन्फंटाइल, कन्व्हलशन्स इ.नांवे आहेत (१) गोंवर, हिंवताप, देवी, फुप्फुसदाह वगैरे रोग मुलांनां झालें असतां प्रथम मोठया माणसाप्रमाणें थंडी वाजून येण्याच्या ऐवजी मुलांना झटके येऊं लागतात; (२) मस्तिष्कदाह अगर मस्तिष्कावरणदाह व मेंदूचे इतर रोग आणि कर्णदाह; (३) अतिसार किंवा अतिसार व छर्दी यामुळें फार ग्लानि आली असता; (४) डांग्या खोकल्यामुळे उबळ येऊन मेंदूंत अशुध्द रक्तसंचय होणें व याच कारणामुळें फुप्फुसदाह रोगात मुलाचा अंतकाळ समीप आला असतां; (५) त्याचप्रमाणें अस्थिमार्दव रोगानें पीडलेल्या मुलांनां प्रकृतीत जरा बिघाड झाला (उदाहरणार्थः-दंतोद्भव, अजीर्ण, जंत इ.) कीं त्यास झटके येतात; (६) फेंपरें हा रोग बालपणी कधी कधी सुरू होतो तेव्हा झटके येतात. या सहा कारणापैंकी शेवटच्या दोहोंसच फेंपरें हें नाव देतां येईल. बाकीच्या कारणांमध्ये रोग वेगळाच असून झटके येणे हें फक्त त्याचें बाह्य लक्षण असतें.
स्व रू प व ल क्ष णें - बाह्यतः हे आंचके फेंपऱ्याप्रमाणेंच असतात. प्रथम क्षणभर सर्वांग ताठतें व त्यांत मूल उजव्या अगर डाव्या बाजूस अगर पापणीखालीं बुबुलें फिरवितें. डोळयाची बाहुली विस्तृत होते; मान व डोकें मागें पडतें व हातपाय खूप ताठतात; नंतर तोंड काळेनिळें होतें; विशेषतः ओठ काळे होतात. नंतर ओठ व पापण्या प्रथम हलूं लागून नंतर सर्वांगास जोरानें झटके येतात. काहीं मिनिटेपर्यंत हें चालून मग मूल शुद्धीवर येतें व मग पुनः कांहीं एक होत नाही; किंवा असे झ्टके वारंवार येतात व दोन झटक्यांमधील वेळात मूल बेशुद्धीमध्यें निपचीत पडून राहतें. झटका सोम्य असल्यास पुढील लक्षणें होतात. मूल जरा नजर फिरवितें व छाती हलेनाशी होऊन जरा ओठ काळे होतात किंवा श्वसननलिकामुखसंकोचन होतें; अथवा हात ताठतात व आंगठे तळव्याकडे वळतात. मूळ कायमचें तिरळें पाहूं लागतें किंवा थोडा वेळ टिकणारा अर्धांगवायू मुलास होतो. किंवा मानसिक व्यंग रहातें. जोराचा झटका येऊन मूल दगावतें असेंहि पुष्कळदा होतें.
नि दा न - रोग ओळखण्यास मुळींच कठिण नसतो. वरील सांथीचे व इतर रोग झाले आहेत किंवा काय हें पाहण्यासाठीं रोग्याचा ताप, श्वासाचा वेग, अंगावर कांही फोड अगर पुरळ येणें, यांकडे लक्ष दिले पाहिजे. फुप्फुसें वरचेवर तपासलीं पाहिजेत. मेंदूचा रोग हें कारण असल्यास ओकारी, डोकें दुखणे, पोट खपाटीस जाणें ही लक्षणें बहुधा असून झटके एकाच अर्धांगास येतात. शिवाय अस्थिमार्दव रोगाची लक्षणें दृष्टीस पडतात ती अशीः-उराडें उंच निघून बरगडयांच्या जाड अग्नांची जणूकाय अक्षमाला झालेली दिसते. लांब अस्थींची (हातांपायांच्या) टोकें मोठी झालेली दिसतात; माथ्यावरील टाळूचीं भोंके बुजलेली नसतात; दांत उगवण्यास उशीर लागतो. अशा मुलांना वर सांगितल्यापैकीं एखाद्या क्षुल्लक कारणामुळें झटके येत असतात असें चौकशीअंती कळून येतें.
उ प चा र - झटके येत असताना मुलास एकदम गरम पाण्यांत बसवावें; एखादें रेचक मुलास द्यावें म्हणजे पोटांतील व नळांतल पीडा दूर होते. वाताचा जोर फार असल्यास व झटके सतत असून अगदींच थांबत नसल्यास क्लोरोफॉर्मचे थेंब रुमालावर टाकून ते मुलास हुंगवावेत. म्हणजे झटके थांबतील अगर निदान कमी होतील. कदाचित् ते पुनः सुरू झाल्यास पुनः थोडा क्लोरोफॉर्म हुंगवावा. मूल शुद्धीवर नीटसें आल्यास त्यास ५ ते १० ग्रेन पोटॅशियम ब्रोमाईड हें औषध मुलाच्या वयमानाचें व झटक्याच्या जोराचें तारतम्य पाहून नुसतें अगर ३ ते ५ क्लोरल या औषधाशीं मिश्र करून पाण्यांत विरघळवून द्यावे, अगर हें औषध गुदद्वारांत पिचकारीनें सोडावे. पुनः झटके येऊं नयेत यासाठीं त्यांस प्रोत्साहक जी वरील कारणें सांगितली आहेत त्यापैकी कोण्त्या कारणामुळे पीडा होत आहे हें ठरवून मूळ रोगावर योग्य उपचार करावे. देवी, गोवरासारखे ताप, मेंदू रोग, डांग्या खोकला ही कारणें दिसून आल्यास त्यांवरील उपचार योजावे. कारण या कारणांनीं येणारे झटके वर सांगितलेल्या तात्पुरत्या इलाजांनी थांबणार नाहीत. अस्थिमार्दवरोगामुळे झटके येतात असें वाटल्यास मुलास घालण्यांत येणारे दूध व अन्न यांत इष्ट तो बदल त्या रोगवर्णनांत सांगितल्याप्रमाणें करावा. शिवाय मुबलक उजेड व स्वच्छ हवा जरूर पाहिजे. कॉडलिव्हर तेल पोटात घेतल्यानें हाडांस मजबुती येते. झटके न येण्यासाठी फक्त रोज नुसतें पोटॅशियम ब्रोमाईड २ ते ३ ग्रेन द्यावे. फेंपरें या रोगानें झटके येत असल्यास त्यासहि हें औषध चांगले आहे.