विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आक्टरलोनी - सर डेव्हिड (१७५८-१८२५) - हा ब्रिटिश सेनापति बोस्टर येथें १२ फेब्रुवारी १७५८ रोजी जन्मला, आणि केडेट म्हणून (१७७७त) हिंदुस्थानांत आला. यानें कोईल, अलीगड आणि दिल्ली येथील लढायांतून लॉर्ड लेकच्या हाताखाली काम केलें. पुढें १८०३ मध्यें दिल्ली येथे त्याला रेसिडेंट नेमण्यांत आलें. १८१४ मध्ये मेजर-जनरल असतांना होळकराच्या हल्ल्यापासून त्यानें त्या शहराचा मोठया शौर्यानें बचाव केला. नेपाळयुद्ध (१८१४-१८१५) सुरू झालें तेव्हां एका पथकावर त्याला सेनापति म्हणून नेमण्यांत आलें होतें व १८१५ मध्यें त्याच्या कामगिरीबद्दल त्यास बॅरोनेट करण्यांत आलें. पुढें काटमांडूवर चाल करून जाणऱ्या सर्व सेनेचें आधिपत्य त्याला जेव्हां देण्यांत आलें, तेव्हां आपल्या हुषारीनें गुरखे लोकांचे सर्व डावपेंच हाणून पाडून, या युध्दांत त्यानें विजय मिळविला व १८१६ मध्यें सेगवली येथें तह घडून आणला. या मर्दुमकीबद्दल ऑक्टरलोनीला जी.सी.बी.केलें. हिंदी सैन्यांत हा मान मिळविणारा पहिला अधिकारी ऑक्टरलोनीच होय. पेंढारीयुध्दांत (१८१७-१८१८) त्याच्याकडे राजपुताना-पथक दिलें होतें. त्यानें अमीरखानाशीं स्वतंत्र करार करून त्याला इतर पेंढाऱ्यांपासून विभक्त केलें. नंतर आपलें सैन्य शत्रूच्या दोन मुख्य तुकडयांमधून नेऊन कांही चकमक न उडवितां लढाईचा शेवट केला. १८१८ मध्यें राजपुतान्यांत त्याला रेसिडेंट नेमिलें. जेव्हां दुर्जनसालनें भरतपूरचा बालराजा बलवंतसिंग याच्या विरुद्ध बंडाळी माजविली (१८२५) तेव्हां ऑक्टरलोनीनें स्वतःच्या जबाबदारीवर राजाला मदत करण्याचा जाहीरनामा काढून तसा आपल्या सैन्याला हुकूम दिला. त्या वेळचा गव्हर्नर जनरल लॉर्ड अॅम्हर्स्ट याला ऑक्टरलोनीचें करणें पसंत पडलें नाहीं. तेव्हां ऑक्टरलोनीला अतीशय अपमान वाटून त्यानें राजीनामा दिला व तो दिल्लीस गेला. आपल्या इतक्या दिवसांच्या इमानेंइतबारें केलेल्या नोकरीची गव्हर्नर जनरलला कांहींच किंमत वाटूं नयें याचा त्याला खेद होऊन त्याला लवकर मृत्यु आला असें म्हणतात. १५ जुलै १८२५ रोजी मिरत येथें त्याचा अंत झाला. कलकत्ता येथें ऑक्टरलोनीचें स्मारक म्हणून एक स्तंभ उभारलेला आहे.