विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आखाडे - उर्फ तालमीच्या जागा. यांनां संस्कृत नांव मल्लगृहें आणि फारसी नांव तालीमखाने असें आहे. यांची प्रसिद्धि
हिंदू लोकांत फार प्राचीन कालापासून आहे. पांडवापैकीं मल्लविद्येंत प्रवीण असलेल्या भीमानें द्रौपदीचा अपमान करणाऱ्या कीचकास व इतर दुर्योधनादि अनेक प्रतिस्पर्ध्यांस मल्लयुध्द करूनच ठार मारलें अशीं हकीकम महाभारतांत आहे. त्याचप्रमाणें हरिवंश पुराणांत श्रीकृष्णच्या मल्लयुद्धांचा व इतर अनेक पुराणांतहि अशा मल्लयुद्धाचा उल्लेख आलेला आहे. येणेंप्रमाणे मल्लविद्येची आवक हिंदू लोकांत फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.
धा र वा ड क डी ल आ खा डेः - धारवाड जिल्ह्यांतहि आखाडयांनां बरेच महत्त्व आहे. धारवाड जिल्ह्याच्या पूर्व भागांत प्रत्येक मोठया खेडयांत एक तरी तालीम असतेच. मोठाल्या गांवांत एकाहून अधिक तालमी असतात. या जिल्ह्याच्या पश्चिम भागांत तालमींचे प्रमाण जरा कमी आहे ही तालमीची जागा सात फूट उंचीची बांधलेली असते. तिच्या भिंतींना चुना देऊन त्यावर तांबडे पट्टे ओढतात व त्यांमध्ये शिकारीचीं, कुस्त्यांची वगैरे चित्रे काढलेलीं असतात. या इमारतीला खिडक्या मात्र मुळींच ठेवींत नाहींत. फक्त एक लांकडी दरवाजा असतो. भिंतीच्या बाजूला दोन अडीच फूट उंचीचा एक रुंद ओटा बांधलेला असतो व त्यावर लोक गाणीं म्हणत व विडया पुंकीत बसतात.
तालमीच्या खोलीच्या पुढें मोकळी जागा असते तींत कुस्त्या खेळण्याकरितां जागा तयार केलेली असते. तालमीच्या घरांत कुस्ती खेळण्याच्या जागेला लागून दुसऱ्या दोन तीन खोल्या असतात. त्यांत एका ठिकाणीं मल्लखांब व दुसऱ्या ठिकाणीं जोरजोडी, बैठका वगैरे मेहनत करतात. शिवाय हिंदूंच्या तालमीत मारूतीची मूर्ति आणि मुसुलमानांच्या तालमींत अल्लाचा पंजा पूजेकरितां ठेविलेला असतो. हिंदू लोक शनिवारी आणि मुसुलमान लोक गुरुवारी या देवाची पूजा करितात. शिवाय तालमीमध्यें कुस्ती खेळणाऱ्यांच्या अंगाला लावण्याकरिता कावं ठेवलेली असते. गांवच्या तालमीमध्यें ब्राह्मण, वाणी, जैन, लिंगायत, मराठे, मुसलमान वगैरे सर्व जातींनां परवानगी असते. मात्र अस्पृश्य जातीच्या तालमी निराळया असतात. तालमीमध्यें १० ते ३० वयापर्यंतचें इसम येतात. तालमींत जाणारे लोक दूध पितात व हरभऱ्याची भिजलेली डाळ किंवा तुपांत भिजविलेल्या खारका किंवा जिलबी वगैरे खुराक खातात. तालमीचा शोक असणारे लोक बहुधा २५ वर्षांच्या वयापर्यंत लग्न करीत नाहींत. कुस्तीमध्यें नांवाजलेले पहिलवान लग्न झाल्यावरहि बायकोला घेऊन फारसे रहात नाहींत. मात्र कुस्तीमध्यें एक दोनदां हार आल्यावर कुस्तीचा नाद सोडून पूर्णपणें संसारांत पडतात.
कुस्त्यांचे सामने वर्षातून एकदां दसऱ्याच्या सुमारास मोठया प्रमाणावर होतात. त्याच्या आधीं एक महिनाभर सामनेवाले लोक मुद्दाम पौष्टिक पदार्थ खाऊन विशेष मेहनत करितात. कुस्ती जिंकणाऱ्यास हातातलें कडे किंवा पागोटें किंवा कबजा बक्षींस म्हणून देतात. सामन्याच्या दिवशीं देवापुढें एक दोन बकरीं मारून त्यांचे हातपाय देवतेच्या पुढें दगडाखाली पुरून ठेवितात आणि त्यांचे मांस मुसलमान मराठे वगैरे तालमीतले लोक खातात. तालमींतले ब्राह्मण, जैन, लिंगायत वगैरे शाकाहारी लोक मांसाऐवजी फळें व पेढे, जिलबी वगैरे गोड पदार्थ खातात. मेहनत करतांना व कुस्ती खेळतांना लंगोट व चड्डी घालतात. बहुतेक तालीमबाज लोक आपले कपडे तांबडया मातीनें रंगवितात. तालीम करण्याची वेळ पहाटें ४ ते ६ व रात्री ८ ते ते १० पर्यंत असतें. तालमीमध्ये जोर व बैठका मारणें हे मेहनतीचे मुख्य प्रकार असून जोडी करणें, वजनें उचलणें व कुस्ती खेळणें या गोष्टी असतात.
वेश्यांच्या मुली आणि धंदेवाले पहिलवान सार्वजनिक आखाडयामध्यें न जातां तालीम करितात. वेश्यांच्या मुली सर्कशीमध्ये शारीरिक कसरतीची कामें करितात. कुस्ती मात्र खेळत नाहींत. अशा वेळी गळयापासून घोटयापर्यंत घालावयाचा पोषाख अंगाबरोबर घट्ट बसेल अशा प्रकारचा केलेला असतो व त्यावरूनच कमरेंभोंवती व खांद्यावरून एक लहानसें वस्त्र गुंडाळलें असतें. मुली पुरुषाप्रमाणेंच तालीम करितात परंतु कुस्त्या करीत नाहीत.
पे श वा ईं ती ल कु स्त्यां चे आ खा डेः - यांची कल्पना खालील त्या वेळच्या एका पत्रांतील मजकुरावरून येईल.
''श्रीमंतांच्या वाडयांत पंचमांस जेठी यांच्या लढाया जाहल्या. कर्नाटकांतून पेशजी तीन जेठी आले होते. अडीच महिने रतीब खाऊन बनून गेले. काल कुस्ती झाली. त्यास तिघा जेठयांपैकीं दोघे जेठी यांस येथील शहरांतील तालमेच्या आखाडयांतील गडयांनी चीत केलें एकास मखवा गौळी यानें व एकास कल्ल्या गौळी यानें याप्रमाणें दोघांनी दोघांस चीत केले. एक जेटी कर्नाटकाचा त्याची व आबाजी सुतार यांची कुस्ती जाली. आबाजीस त्यानें चीत केलें. आणखी तालमीचे आखाडयांतील गडयागडयांच्या कुस्त्या जाहल्या. आणखी कर्नाटकाचे पहिलवानास रतीब दिला आहे. मासपक्ष जाहल्यावर आणखी लढाई होईल'' ११ दिसें.१७८६ (ऐतिहासिक-लेखसंग्रह भा.८ पा.४१५९).
मेवाडच्या विक्रमजिताला (१५३५) तालमीचा शोक असे (टॉडचे राजस्थान भाग पहिला पृ.३२१), तो आपला वेळ तालीमबाजांच्या संगतींत घालवी. थोरल्या माधवराव पेशव्यांनांहि तालमीचा फार नाद होता. कारण त्यांनी आपल्या मातुश्रीला धाडलेल्या एका पत्रांत येणेंप्रमाणें उल्लेख आला आहेः- ''वडिलीं तुह्यांजवळ आज्ञा केली कीं, तालीम न करणे म्हणून वारंवार तुम्हांजवळ आज्ञा झाली. त्यास मला वडिलांचे आज्ञेपेक्षा तालीम अधिक कीं काय? तालीम सोडिली. नमस्कार मात्र घालीत असतो.''(ऐ.ले.सं.पत्र नं.७२१; ३१ मे १७६७).