विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आगरवाल - मुंबई, मद्रास खेरीज करून सर्व प्रांतांतून यांची वसति जास्त आढळते, विशेषतः पंजाबांत व संयुक्त-प्रांतांत आगरवाल लोकांची वसति जास्त आहे. १९११ च्या खानेसुमारींत यांची संख्या १०,१९,६९८ (पैकीं ५,४७, ४१२ पुरुष व ४,७२,२८६ स्त्रिया) भरली. यांत हिंदू, शीख, जैन, बौद्ध व मुसुलमानधर्मी आहेत. हिंदूंची संख्या सर्वांत जास्त (९,३१,७३३) असून त्याखालोखाल जैन आगरवाल भरतात.
चालीरीती - दसऱ्याच्या दिवशीं हे घोडयाची व शस्त्रास्त्रांची पूजा करितात. भाटिया मारवाडयांच्याप्रमाणें हे दिवाळींत वहीपूजन न करितां दसऱ्याला करितात; यावरून कांहींचें असें म्हणणें पडतें कीं यांचे पूर्वज स्वतःस क्षत्रिय समजत असावेत.
बहुतेक हिंदू आगरवाल विष्णूची उपासना करितात. शिवाजी व शिवशक्तींची उपासना करणारे कांहीं आहेत; तरी पण यांच्यांत पशुहत्या व मद्यमांसभक्षण नाहींच म्हटल्यास चालेल. जैन आगरवालांविषयीं तर विचार करावयासच नको. कारण ते पूर्ण अहिंसाव्रत पाळणारें. तेव्हां या समान चालीरीतींमुळे जैन व शैववैष्णव आगरवालांमध्ये शरीरसंबंध होण्यास हरकत येत नाहीं. जेव्हां नवरा बायको एका धर्माचीं नसतात तेव्हां बहुधा बायको नवऱ्याचा धर्म विधिपूर्वक स्वीकारते व माहेरीं असतांना वेगळें करून खांतें. यांची ज्ञातिदेवता लक्ष्मी असून, पिंपळाच्या झाडालाहि फार मानण्यांत येतें. बायका नागाचीहि पूजा करितात. इतर हिंदूंप्रमाणें श्राद्धपक्षें करण्याची यांच्यांत चाल आहे.
आ सा म म धी ल आ ग र वा ल.- आसाम प्रांतांत ह्या जातीची लोकसंख्या ५३६० (सन १९११) आहे. उत्तर हिंदुस्थानांतील ह्या जातीचे लोक श्रीमंत व्यापारी असून मनूनें केलेल्या वैश्यवर्णांतील आपण आहों असें ते म्हणतात. 'कया' ह्या व्यापक शब्दानें ह्या जातीचे सर्व लोक दर्शविले जातात.
पु णें जि ल्ह्यां ती ल आ ग र वा ल. - या जातीची वसति पुणें जिल्ह्यांतील हवेली, मावळ, शिरूर, पुरंदर व खुद्द पुणें शहर इतक्या ठिकाणीं आहे. ते स्वतांस आगरसेन नांवाच्या ॠषीचे वंशज मानतात. या ॠषीच्या सतरा मुलांची शेषाच्या सतरा मुली ज्या नागकन्या त्यांच्याबरोबर लग्नें झालीं. त्यांच्यांत सतरा गोत्रें आहेत, त्यांपैकीं बासल, एरण, कासल, गार्ग, गोएल, मंगल व मितल हीं मुख्य आहेत. यांच्यांत सगोत्रविवाह होत नाहींत. ते मूळ आग्रा येथून आले व मारवाडांत कांहीं दिवस राहून सुमारें दीडशें वर्षांपूर्वी पुण्यास आले. त्यांच्यांत सच्चे आगरवाले, दश व विशआगरवाले आणि मराठा आगरवाले हे पोटभेद आहेत. मराठे आगरवाले ही सच्च्या आगरवाल्यांची अनौरस संतति होय. सच्चे, दश व विश आगरवाले यांचा परस्पर रोटीबेटी-व्यवहार होत नाहीं. पण त्यांचा धार्मिक आचार व चालीरीती यांत फारसा फरक नाहीं. त्यांच्यांत गणपतलाल, गिरधारीलाल, कन्हाईलाल, नारायणदास, विठ्ठलदास इत्यादि पुरुषनामें, व भागीरथी, गंगा, जम्रा, लक्ष्मी, राई वगैरे स्त्रीनामें सामान्यतः आढळतात. ते मारवाडी वाण्यासारखे दिसतात व मध्यम बांध्याचे व नीटस असतात. यांच्या बायका देखण्या असतात. ते घरांत मारवाडी भाषा बोलतात, पण बहुतेक हिंदुस्थानी व गुजराथी मिळून बनलेली भाषा बोलतात. ते पक्के शाकाहारी असून कांदे, लसून, गाजर व मसूर हे जिन्नस ते खात नाहींत. ते दक्षिणी ब्राह्मणांप्रमाणें पोशाख करतात व जानवें किंवा तुळशीची माळ गळयांत घालतात. ते शेंडी, कल्ले व कधीं कधीं दाढीहि ठेवतात बायका चोळया, व जोडे घालतात. व डोक्यापासून पायापर्यंत शुभ्र वस्त्र आंगाभोवतीं घेतात. त्या डोक्यांत बोर, कानांत झुबें, नाकांत नथ, आणि मंगळसूत्र, बाजूबंद, बिचवे, कडीं वगैरे दागिने घालतात. पुरुष हाताच्या बोटांत अंगठयां खेरीज दुसरे काहीं दागिने घालीत नाहींत. त्यांच्या जेवणांत तांदूळ, डाळी, भाजीपाला, गहूं, लोणी, मसाला वगैरे जिन्नस असतात. ते मेहनती, गरीब, व्यवस्थित व कंजुष असतात. हे लोक उदमी, व्यापारी, वाणी, सावकार, धान्य व कापडाचे दुकानदार, हलवाई, शेतकरी व जमीनदार असतात. हे धार्मिक वृत्तीचे असून मुख्यतः बालाजीचे उपासक आहेत. त्यांचे पौरोहित्य मारवाडी ब्राह्मण व त्यांच्या अभावीं देशस्थ ब्राह्मण करतात. ते पंढरपूर, मथुरा, नाशिक, काशीवृंदावन व रामेश्वर येथील यात्रा करतात. ते एकादशी, महाशिवरात्र, रामनवमी, गोकुळअष्टमी, वगैरे उपोषणें करतात; आणि होळी, दसरा, दिवाळी वगैरे सण पाळतात. रामानंद किंवा वल्लभाचार्य पंथाच्या लोकांनां गुरु करून त्यांनां ते मोठा मान देतात. मूल जन्माला आल्यावर पांचव्या दिवशीं ते सटवाईची पूजा करतात. मूल महिन्याचें झाल्यावर त्याचें नांव ठेवतात. मुलगा आठनऊ वर्षांचा झाला म्हणजे त्याला गुरूकडे नेतात व गुरु त्याच्या गळयांत तुळशीची माळ बांधतो व कानांत मंत्र सांगतो. मुलींचीं दहा ते बारा वर्षांच्या दरम्यान व मुलांचीं पंधरा ते वीस वर्षांच्या दरम्यान लग्नें होतात. या जातींत विधवाविवाहाल मोकळीक नाहीं. ते मृतांनां जाळतात.
[ सं द र्भ ग्रं थ - रिस्ले-ट्राइब्स अँड कास्ट्स ऑफ बेंगाल. क्रुक-ट्राइब्स अँड कास्ट्स ऑफ नॉर्थ वेस्टर्न प्रॉव्हिन्सेस अँड औध. ग्रौसे-मथुरा.ए.रि.ए. (बनिया). बाँ.गॅ.व्हॉ.१८, भाग १. सेन्सस ऑफ इंडिया १९११. ]