विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास - हा स्वीडन देशांतल्या लागडो गांवीं तारीख १३ आगष्ट १८१४ रोजीं जन्मला. उप्साला विश्वविद्यालयांत त्यांचें शिक्षण झालें. खगोलशास्त्राची प्रत्यक्ष माहिती मिळविण्याकरितां हा सन १८४२ सालीं स्टॉकहोम येथील वेधशाळेंत गेला. पुढें त्याला भूचुंबक शास्त्राची आवड उत्पन्न झाली; त्यामुळें त्यानें स्वीडन देशांतील निरनिराळया भागांची पहाणी करून त्या देशांतील भिन्नभिन्न भागांचा (चुंबकीय) कल आणि बल हीं निश्चित केलीं. युजन नांवाच्या स्वीडिश जहाजानें १८५१ ते १९५३ सालापर्यंत पृथ्वीप्रदक्षणा करून पृत्वीवरच्या निरनिराळ्या भागांचें भूचुंबकत्व निश्चित करितां येईल अशी माहिती मिळविली, तिचा उपयोग करून घेण्याचें काम स्टॉकहोम येथील शास्त्रीय अकॅडेमींनें त्याजकडे सोंपविलें. हें काम त्याच्या मृत्यूच्या अगोदर कांहीं दिवसपर्यंत चालून संपलें. सन १८५८ सालीं त्याला उप्साला येथें पदार्थविज्ञानशास्त्राचा अध्यापक नेमण्यांत आलें. पुढें तारीख २१ जून १८४४ रोजीं तो त्याच ठिकाणीं मरण पावला.
त्या चे ले ख व शो धः - त्याच्या एंकदर लेखनांत उष्णतेच्या वहनाविषयीं जें लिहिलें आहे तें पुष्कळ महत्त्वाचें आहे. विच्छिन्नकिरणशाखेवर त्यानें उपयुक्त माहितीं मिळविली. सन १८५३ सालीं त्यानें असें दाखवून दिले कीं, जर एखाद्या धातूच्या दोन विद्युदध्रुवांतून ठिणगी उत्पन्न केली आणि ती ठिणगीं विच्छिन्नकिरणदर्शक यंत्रांतून पहिली तर आपणांस दोन प्रकारचे पट्टे एकत्र दिसतात; त्यांपैकीं एक पट्टा त्या धातूचा असतो आणि दुसरा पट्टा ज्या वायूंत ठिणगी उत्पन्न झालेली असते त्या वायूचा असतों. त्याचा दुसरा शोध म्हणजे त्यानें यूलरच्या सिद्धान्ताचा उपयोग करून असें दाखवून दिलें कीं, एखाद्या तप्तवायूंतून ज्या प्रकारची प्रकाशकिरणें निघतात त्याच प्रकारचीं किरणें त्या वायूकडून शोषिली जातात. त्यानें हा जो शोध लावला त्या शोधाकडे कित्येक वर्षें पर्यंत दुर्लक्ष झालें. परंतु प्रकाशकिरणांच्या सहाय्यानें एखाद्या पदार्थांतील मूलद्रव्यें ओळखण्याच्या विद्येचें मूल या शोधांत आहे. सन १८६१ सालापासून सूर्याच्या विच्छिन्नकिरणपटाकडे त्यानें विशेष लक्ष पुरविलें व सन १८६२ सालीं त्यानें असें सिद्ध केलें कीं, सूर्यावर उज्जा (हायड्रोजन) नांवाचें मूलद्रव्य आहे. सन १८६८ सालीं त्यानें सूर्याच्या विच्छिन्नकिरणपटाचा एक नकाशा तयार केला. शास्त्रज्ञांनीं पुष्कळ वर्षेंपर्यंत या नकाशाचा प्रमाणंग्रथांप्रमाणें उपयोग केला आहे. या एकाच गोष्टीवरून त्या नकाशाची योग्यता लक्ष्यांत येईल. सन १८६७ सालीं यानेंच प्रथमतः उत्तरध्रुवस्थ अरुणतेजोमंडलांच्या प्रकाशाचें विच्छदेन केलें. परंतु या विच्छिन्नकिरणपटांत दिसणारी एक विशिष्ट पीतरेषा आणि राशींचक्रांत दिसणारी पीतरेषा या एकच आहेत असें समजण्यांत मात्र त्यानें चूक केली आहे.