विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आगीमाशी - जंगलामध्यें सहा प्रकारच्या डसणाऱ्या माशा आहेत त्यांतील ही एक जात आहे हिला वैद्यशास्त्रांत स्थानिक मक्षिका असें नांव दिलें आहे. हिनें दंश केला असतां तो दंश कृष्णवर्ण होऊन स्त्रवतो, पिकतो आणि सुजतो. तेणेंकरून दाह, मूर्च्छा, ज्वर व दंशावर पुळया येणें ही लक्षणें होतात. ही मक्षिका प्राण हरण करणारी आहे. दंश होतांच दंशास तुंबडी लावून रक्त काढावें असा तज्ज्ञ लोक त्यावर इलाज सांगतात.
२ आग्या मोहोळाची जी माशी असते, तिलाहि आगी माशी म्हणतात. ही माशी डसली असतां त्या दंशावर गांधी येऊन कांहीं वेळ आग होते. यावर पांढऱ्या कांद्याचा रस लावतात.