विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आग्जबर्ग - समुद्रसपाटीपासून १०५० फूट उंच असलेल्या पठारावर वसलेलें जर्मनीचें, बव्हेरियाच्या, राज्यांतील स्वाबिआ जिल्ह्यांचे मुख्य शहर. हें म्यूनिकच्या वायव्येच्या किंचित् पश्चिमेस ३९ मैलावर दोन लहान नद्यांच्या मध्यें आहे. ऑग्सबर्ग हें म्यूनिक, रेजन्सबर्ग, उल्म व इंगोलस्टाड या शहराशीं लोहमार्गांनीं जोडलेले आहे. इ.स. १७०३ मध्यें या शहराची तटबंदी पाडून टाकली व त्या ठिकाणीं सहल करण्याकरितां मार्ग काढले. शहरांत मॅक्झिमिलिय नांवाची जी नामांकित रुंद सडक आहे, तिच्यावर शिल्पकलेच्या दृष्टीनें उत्कृष्ट अशीं पुष्कळ घरें आहेत. त्यापैकीं फुग्गर हाउस नांवाची जी इमारत आहे तिच्या सर्व दर्शनी भागावर ओल्या गिलाव्यांत कोरून काढलेलीं सुंदर चित्रें आहेत. या शिवाय विद्येच्या पुनरुज्जीवनाच्या काळांत बांधलेलें नगर भवन, हल्ली जेथें सरकारी कचेऱ्या आहेत तो बिशपांचा वाडा, दहाव्या शतकांतील रोमन कॅथेलिक क्याथीड्रल, यांत्रिक व औद्योगिक कलांची संस्था सेंट कॅथेरीनच्या पुरातन मठांत असलेला संग्रह, अजबखाना, वेधशाळा, वनस्पतिबाग बहिऱ्या मुक्यांची शाळा, अनाथगृह, नाटकगृह, दोन लक्ष पुस्तकें असलेलें म्युनिसिपालिटीचें ग्रंथसंग्रहालय, हुंडीबाजार वगैरे कांहीं स्थलें पहाण्यासारखीं आहेत. ऑग्जबर्ग, हें दक्षिण जर्मनींतील विणकामाच्या धंद्याचें मुख्य ठिकाण आहे. १०,००० लोक या धंद्यांतच कामावर असतात. ओपणें रंगविणें, कागदाचे कारखाने, रेशमींवस्त्रें, खिशांतील घड्याळें व गणितविषयोपयोगी उपकरणीं बनविणें. जवाहिरी धंदा, इंजिनें तयार करणें, ओतकामाचे कारखाने धंद्यांत या शहराची प्रसिद्धि आहे.
हें जर्मनींतील अॅसेटिलिन वायु तयार करण्याच्या धंद्याचें केंद्रस्थान आहे. येथें मुद्रणालयें, शिळाछापांचे धंदे व ग्रंथप्रकाशन यांचीहि बरीच वाढ झालेली आहे. 'ऑग्जबर्ग गॅझेट' हें यूरोपखंडांतील नामांकित वर्तमानपत्रांपैकीं एक आहे.
रोमन बादशहा ऑगस्टस यानें ख्रिस्ती शकापूर्वीं सुमारें १४ व्या वर्षी या ठिकाणीं रोमन लोकांची वसाहत केली असल्यामुळें त्या बादशहावरून या शहराचें ऑग्सबर्ग हें नांव पडलें. पांचव्या शतकांत याला हूण लोकांनीं लुटलें. यानंतर तें फ्रेंच राजांच्या सत्तेखालीं आलें. शार्लेमॅनचें बव्हेरियाचा ३रा डयूक तासीलो यांच्याशीं जें युद्ध झालें, त्यांत जवळजवळ हें सर्व शहर उध्वस्त झालें होतें. साम्राज्य मोडल्यातर हें शहर स्वाबियाच्या डयूकच्या हातीं आलें. तेव्हांपासून या शहराच्या व्यापाराचा उत्कर्ष होऊं लागला व लवकरच तें इटलि व उत्तरयूरोप यांच्याशीं व्यापार करण्याचें केंद्रस्थान झालें; परंतु १५ व्या व १६ व्या शतकांतील भौगोलिक शोधांमुळे येथील व्यापारास थोडे धक्का बसला. इ.स. १२७६ पासून १८०६ पर्यंत हें साम्राज्यांतर्गत स्वतंत्र शहर होतें व त्यानंतर तें बव्हेरियाच्या राज्यास जोडलें गेलें.