विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आग्नीध्र - श्रौतकर्मांतील एका ॠत्विजाचें नांव. याच ॠग्वेदांत उल्लेख 'अग्निध' 'अग्निमिंध' या रुपांत आहे. तैत्तिरीय संहितेंतहि वरील रूपांतच याचा उल्लेख आहे. अथर्ववेदांत ( २०.२,२, ) मात्र आग्नीध्र असें स्पष्ट रूप आढळतें. ब्राह्मण वाङ्मयापासून सूत्रांत वगैरे आग्नीध्र असा स्पष्ट उल्लेख येतो. या ॠत्विजाकडे कोणकोणत्या यागांत कोणकोणतें कर्म असतें याचें विवेचन विभाग २ वेदविद्या पष्ठ ११८ येथें आलें आहे.
आग्नीध्र - प्रियव्रत राजास, बर्हिष्मतीच्या ठायीं झालेल्या दहा पुत्रांतील ज्येष्ठ पुत्र. क्षारसमुद्रानें वेष्टित जें जुंबूद्वीप, त्याचा हा अधिपति होता. यानें, पूर्वचित्ति नामक अप्सरेशीं दहा कोटि वर्षेंपर्यंत यथेच्छ समागम करून तिजपासून नाभि, किंपुरुष, हरि, इलावृत्त, रम्यका, हिरण्यम, कुरु भद्राश्व, आणि केतुमाल असे नऊ पुत्र उत्पन्न केले होते. कांहीं काळानें ती अप्सरा दिव्यलोकीं निघून गेली असतां, हा तिच्या विरहानें अत्यंत उदास झाला. नंतर त्यानें आपल्या द्वीपाचे नऊ भाग ( वर्ष अशा संज्ञेचे) करून तेथील आधिपत्य एकेक पुत्रास दिलें व अरण्यांत तपार्थ गमन केलें. ( भाग ५ स्कंध अ. १-२ ).