विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आग्रा-विभाग - संयुक्तप्रांतांतील एक विभाग. उत्तर रेखांश २६.२२ ते २८.२ आणि पूर्व अक्षांक्ष ७७०.१७, ते ८०, १. याचे दरम्यान असून क्षेत्रफळ ८३८४ चौ.मै. आहे. हा संयुक्तप्रांताच्या पश्चिम भागांत असून गंगा व यमुनाया नद्यांमधील सर्व दुआब या भागांत मोडतो.
म र्या दा. - उत्तरेस अलीगड जिल्हा आणि पंजाबांतील गुरगांव जिल्हा. पूर्वेस गंगा नदी. दक्षिणेस ग्वाल्हेर, धोलपूर संस्थानें व अलाहाबाद विभाग. पश्चिमसीमा भरतपूर संस्थानास लागून गेलेली आहे. कमिशनर आग्रा शहरीं राहतो.
क्षे त्र फ ळ, लो क सं ख्या व गै रे - लोकसंख्या (१९२१) ४१,८२,८२५. इ.स. १८७७-७८ हा प्रांत दुष्काळग्रस्त होता व इ.स. १८८१-९१ या सालांत या प्रातांस पुरापासून फार नुकसान पोहोचले, इ.स. १९०१ मध्यें हिंदुलोकांची वस्ती शेंकडा ९० होतीं व मुसलमान लोक शेंकडा ९ होते. जैन २८२०५, ख्रिश्चन १०८०५, 'आर्य' १७७३६. या प्रांतांत पांच जिल्हे आहेत. यांत ८२ शहरें व ८०४३ खेडीं आहेत. जिल्ह्यांची लोकसंख्या १९२१ सेन्सस व क्षेत्रफळ वगैरेंची माहिती पुढीलप्रमाणें:-
जिल्हा | क्षेत्रफळ | लोकसंख्या | वसूल |
मथुरा | १४४५ | ६,१९,१३८ | १७५७००० |
आग्रा | १८४५ | ९,२४,१५५ | १९७५००० |
अलिगड | १६८५ | १०,६१७४५ | |
मैनपूरी | १६७५ | ७,४८,०२७ | १४४५००० |
इठा | १७३४ | ८,२९,७६० | १३७६००० |
मो ठीं श ह रें. - आग्रा, मथुरा, वृंदावन आणि मैनपुरी हीं व्यापाराचीं मुख्य ठिकाणें आहेत. मथुरा, आणि वृंदावन ही वैष्णवपंथी धर्माचीं केंद्रस्थानें आहेत. मुसलमानी स्वाऱ्या सुरू होण्यापूर्वी कनोज हें पुष्कळ घराण्यांचें राजधानीचें शहर होतें. आग्रा शहर सोळा व सतराव्या शतकाच्या पहिल्या भागांत मोंगलांची राजधानी होतें. उत्तम इमारतीच्या रूपानें त्यांची वैभवकालाची स्मृति तेथें कायम आहे.
इ ति हा स – अकबराने मोंगल राज्याचे जे बारा सुभे पाडले होते त्यांतील आग्राप्रांत एके काली एक होता. या प्रांताला हें नांव हें शहर एके कालीं सुभा साम्रज्याची राजाधनी होतें यावरून पडलें. ऐनिइ अकबरीमध्यें या सुभ्याची माहिती येणें प्रमाणें सांपडते- पलवल (गुरुगांव जिल्हा) पासून घाटामपूर (कानपूर जिल्हा) पर्यंत याची लांबी १७५ कोस व रूंदी कनोज पासून चंदेरी पर्यंत १०० कोस होती. अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत हा सुभा मोंगल बादशाहीचा भाग होता पण वास्तवीक पाहतां रजपूत, जाट, मराठे व पठाण हेच यांचे शंभर वर्षेंपर्यंत राजे होते.
ब्रिटिश अमदांनिंत या प्रांता पुर्वेंकडील भाग बंगाल इलाख्यात प्रथम सामील केला गेला होता. पण राज्यकारभार चालविण्यास अडचण भासूं लागल्यांमुळें या भागांपुरती दिवाणी, पौजदारी, न्यायकचेरी व वसुलखातें हीं खातीं १८३१ मध्यें निर्माण करण्यांत आलीं. यावर कलकत्ता येथील न्यायाधिशाची कांहीं एक हुकमत चालत नसे. थोडया वर्षांनीं सध्याचा सयुंक्त प्रांत ( औध सोडून ) व बुंदेलखंड हा एक स्वतंत्र गव्हर्नराच्या ताब्यांतील इलाखा मानण्याचें ठरलें. परंतु ही योजना कधीं अमलांत आली नाहीं पण एक लेफ्टनंट गव्हर्नर नेमण्यांत आला. नार्थ वेस्टर्न प्राव्हिन्सेस व औध हें नांव बदलून 'आग्रा व अयोध्येचा संयुक्तप्रांत' असें ह्मणण्याचा प्रघात पडला. संयुक्त प्रांतास आतां गव्हर्नर आणि द्विदल राज्यपद्धति आहेत.