विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आग्रा शहर या जिल्ह्याचें राज्यकारभाराचें मुख्य ठिकाण. हें यमुना नदीच्या उजव्या तीरावर उत्तर अ.२७० १०, व पूर्व रे. ७८०३ वर आहे. कलकत्याहून हें रेल्वेमार्गानें ८४३ मैल दूर आहे व मुंबईपासून ८३९ मैलांवर आहे. संयुक्त प्रांतांत हें दुसऱ्या नंबरचें महत्त्वाचें शहर आहे इ.स. १९०१ मध्यें लोकसंख्या १८८०२२ होती. त्यांपैकी हिंदुची संख्या १२१२४९ व मुसुलमानांची ५७७६० होती १९२१ मध्यें लोकसंख्या १८५५३२ होती.
इ ति हा स. - याचें पूर्वींचें नांव यमप्रस्थ होतें असें अर्वाचीन कोशकार म्हणतात. इ.स. १५०५ मध्यें येथें एक भूकंपाचा धक्का बसला होता. अकबर बादशहाच्धा पूर्वीं आग्रा शहर लोदी बादशहाची राजधानी होती. इ.स. १५२६ मध्यें इब्राहिम लोदीचा पराभव झाल्यावर बाबरानें येथे वस्ती केली, व फत्तेपूर शिक्री येथें रजपुतांचा पराभव करून राज्यांची मुळें खोल रुजविल्यावर हें त्याचें नेहमींचे राहण्याचें ठिकाण झालें. तो इ.स. १५३० मध्यें वारला पण त्याचें शव काबूल येथे पाठविण्यांत आल्यामुळें येथें त्याची कबर वगैरे नाहीं.
दिल्लीशहर अस्वच्छ वाटल्यामुळे आग्रा येथें यमुनेच्या पूर्व तीरावर अकबरानें प्रथम नवें शहर वसविलें. शिवाय आग्रा हें राज्याच्या मध्यठिकाणीं असल्यामुळें चहूंकडे देखरेख ठेवण्यास दिल्लीपेक्षां ज्यास्त सोइस्कर होतें. आग्रा येथून पूर्वेंस, उत्तरेस व दक्षिणेस तीन मोठाले रस्ते जात असत. यमुनेच्या पश्चिमकिनाऱ्यावरील जागा मोकळी व जास्त सोयीची वाटल्यामुळें अकबरानें तेथें नवीन इमारती बांधिल्या. तेथील लाल दगडांचा तट स. १५६६ त अकबरानें बांधला. आग्ऱ्याचें पहिलें नांव अकबराबाद असें होतें. जहांगीर यांस आगऱ्याची उष्णता दुःसह वाटून तो आपला वेळ बहुधा लाहोर व काश्मीर या ठिकाणीं काढीत असे. शहाजहानानें आग्रा सोडून दिल्लीची नवीन रचना केली. तथापि. ताज महाल बांधून आग्ऱ्याचें नांव त्यानें अजरामर करून ठेविलें आहे. शिवाय त्यानें मोतीमशीद, जुम्मामशीद व दिवाण-इखासमहाल अशा तीन भव्य इमारती बांधिल्या. औरंगजेब बहुधा लष्कर घेऊन एकसारखा फिरतीवर असे, म्हणून स्वतंत्र राजधानीची त्यास जरूर पडली नाहीं. मंडेल्स्लोनें (स.१६३८) आग्ऱ्याचें वर्णन दिलें आहे. त्यावेळेस शहरांत प्रवाशासाठीं ८० धर्मशाळा असून त्या बहुतेक तीन मजली होत्या. बादशहापाशीं अपार संपत्ति असून तिजवर विशेष सक्तीचा पहारा होता. ही संपत्ति निदान तीस कोटि पौंड म्हणजे साडेचार अब्ज रुपये असावी असा मंडेल्स्लोचा अंदाज आहे. आग्ऱ्याची लोकसंख्या ६ लाख होती.
अबरंगजेबानें राजदानी आग्रा शहराहून दिल्लीस नेली. पानिपतच्या मोहिमेपूर्वी अहंमदशहाची जी हिंदुस्थानांत स्वारी झाली त्यावेळीं त्यानें आग्रा शहर लुटून फस्त केलें होतें असें १७५७ च्या एप्रिलमधील मराठयांच्या एका पत्रांवरून दिसतें (रा. खं. १, ६३, १११). मोगलांच्या उतरत्या काळांत जाट लोकांनीं आग्ऱ्यावर पुष्कळ हल्ले केले. इ.स. १७६१ मध्यें सुरजमल जाटानें हे हस्तगत केले. इ.स. १७७० मध्यें मराठयांनीं जाटांनां तेथून हुसकावून दिलें व चार वर्षांनीं तें शहर नजफखानानें घेऊन तो तेथें बादशहाप्रमाणें राहिला. पुढें शिंद्यांनीं तें शहर घेऊन इ. स. १८०३ पर्यंत आपल्या हातांत ठेवलें. नंतर लार्डलेकनें तें घेतल्यावर इ.स. १८३५ मध्यें जेव्हा आग्रा इलाखा निराळा करण्यांत आला तेव्हा तें पुनः मुख्य ठिकाण झालें. इ. स. १८५७ च्या बंडांत हे एक बंडवाल्याचें मुख्य ठिकाण होतें.
प्रे क्ष णी य स्थ ळें. - येथील किल्ला, जुम्मा मशीद, ताजमहाल, इतिमा उद्दवला याची कबर व चिनीका रोझा व तसेंच सिंकदरा येथील अकबराची कबर ह्या मुख्य, प्रेक्षणीय, सुंदर व टुमदार इमारती आहेत. येथे प्रवाश्यांच्या सोयीसाठीं बरींच हॉटेलें, एक धर्मशाळा व एक डाकबंगला आहे. एक डोळयाचें व दुसरें बाळंतिणीकरितां हॉस्पिटल, शिवाय दोन इतर हॉस्पिटलें येथें आहेत. ताजमहालची माहिती पुढें स्वतंत्र येणार असल्यानें ती येथें दिली नाही.
इ.स. १८६३ मध्यें आग्रा शहरास म्युनसिपालिटी मिळाली. इ.स. १९०३-४ मध्यें एकंदर उत्पन्न ५.३ लाख होत व खर्च ४.८ लाख होता. हें एक फौजेचें ठिकाण आहे.
व्या पा र व उ द्यो ग धं दे – पूर्वीं हें शहर व्यापाराची मोठी पेठ होतें. येथून रजपुतान्यांत व मध्यहिंदुस्थानांत साखर व तंबाखु पुष्कळ जात असे व तिकडून मीठ व कापूस व तूप येत असे. सध्यां हे ईस्ट इंडिया ग्रेट इंडियन पेनिशुला व राजपुताना-माळवा या रेल्वेंचे जंक्शन आहे. बाहेरुन येणारा माल येथून जवळच्या शहरांतून पोहोंचविला जातो. पूर्वी येथें सोन्याची व रुप्याची तार ओढणें, कशिद्याचें. काम, चिटें बनविणें, संगमरवरी दगडांवरील नकशीकाम वगैरे पुष्कळ कलाकौशल्य असे. परंतु युरोपीयन मालाच्या आवडीमुळें हेधंदे सध्यां बसत चालले आहेत.इ.स.१९०३ मध्यें येथें ६ कापसाचें कारखाने होते. त्यांत ९५९ मनुष्यें काम करीत होतीं. तसेंच ३ सुताच्या कापडाच्या गिरण्या असून त्यांत १५६२ मनुष्यांनां काम मिळत होतें. हल्लीं २ हाडाच्या, ७ कापडाच्या, १ तेलाची, व २ दळणाच्या गिरण्या असून लोखंडाचा, कातड्याचा, सतरंज्याचा, ब्रशांचा असे कांहीं कारखानेहि आहेत. आग्र्याच्या जेलमधील सत्रंज्या प्रसिद्ध आहेत. येथें चार बँकांचे व्यवहार चालतात.
शि क्ष ण सं स्था. - सयुक्तप्रांतांत आग्रा शहर हें विद्येचें केंद्र आहे. इ. स. १८२३ मध्यें येथें सरकारी कॉलेज सुरु झालें. इ. स. १८८३ मध्यें ते तेथील एका मंडळाच्या ताब्यांत देण्यांत आलें. इ. स. १८४१ त रोमन कॅथॉलिक कॉलेज उघडण्यांत आलें. इ. स. १८५० मध्यें सेंटजॉन कॉलेज निघालें. ५-६ हायस्कुलें व इतर दुय्यम इंग्रजी शाळा असून म्युनसीपालिटीचा एका शाळा आहे. व २२ शाळांनां तिच्या कडून मदत मिळते. यांशिवाय एक मास्तरांकरिता नार्मलस्कूल व दुसरें एक मेडिकलस्कूल आहे. या शहरांत २० छापखाने आहेत व त्यात तीन मासिकें, एक पंधरवड्यास निघणारें पत्र, पांच दर आठवड्यास निघणारीं वर्तमानपत्रें व एक दैनिक ही छापून निघतात.
आग्रा हें अकबराचा इतिहासकार अबुलफझल व त्याचा भाऊ सुप्रसिद्ध कवि फैजी यांचे जन्मस्थान आहे. मीर टकी, शेख बलि महमद व इतर पुष्कळ फारसी ग्रंथकार येथें १९ व्या शतकांत होऊन गेले.