विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आग्राकॅनाल (कालवा) - दिल्ली शहराच्या खालच्या अंगाला ११ मैलावर घेतलेला यमुना नदीचा कालवा. हा उत्तर हिंदुस्थानांतील पाटबंधाऱ्याच्या कामांत एक महत्त्वाच आहे. पूर्वीं दुष्कळांत ज्या प्रदेशाला फार नुकसान पोंहोचत असे अशा प्रदेशाचें यानें संरक्षण होतो. इ.स. १९०४ मध्यें मुख्य भागाची लांबी १०० मैल होती. पाणी वाटून देणाऱ्या भागांची लांबी ६३३ मैल, व ड्रेनेजकरितां १९१ मैल होती. हा कालवा इ.स. १८७४ मध्यें तयार झाला व इ.स. १८७५ च्या वसंतॠतूंत त्याचा उपयोग होऊं लागला. इ.स. १९०४ पर्यंत या कामासाठीं १०२ लाख रुपये खर्च झाला. या कालव्याखालीं ५९७००० एकर जमीन भिजूं शकेल. ती येणेंप्रमाणें-दिल्ली ८००० एकर; गुरगांव जिल्हा २१०००० एकर; मथुरा २२८००० व आग्रा जिल्हा १५१००० एकर इ.स. १९०३.०४ मध्यें २६०००० एकर जमीन या कालव्याच्या पाण्यावर कसली जात होती. इ.स. १९०३-०४ मध्यें एकदर उत्पन्न ८० ४ लाख व खर्च वजा जातां निवळ उत्पन्न ५.६ लाख होतें; म्हणजे एकंदर भांडवलावर शेंकडा ५॥ व्याज पडलें. या काळव्याच्या १२६ मैंलाच्या भागांत बोटींतून मालाची ने आण करणें शक्य होतें. परंतु तो धंदा किफायतीचा होईना. इ.स. १९०३-०४ मध्यें फक्त १४२२१ टन माल या नदींतून नेण्यांत आला. इ.स. १९०४मध्यें ही ने आण बंद करण्यांत आली, कारण त्यापासून कालव्याचा मुख्य उद्देश जो जमीनीला पाणी पुरविणें त्यांत व्यत्यय येऊं लागला.