विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आघाडा - यास संस्कृतांत आपामार्ग, शेरी, अधः-शाल्य वगैरे अनेक नावें त्याच्या आकारावरून व गुणावरून प्राप्त झालेलीं आहेत. इंग्रजींत यास 'रफ चॅफ ट्री' असे म्हणतात. हें वर्षायु झुडुप तणासारखे जंगलात उत्पन्न होतें. याची उंची ४ पासून ६ फूटपर्यंत असतें. पावसाळ्यांत ही झाडें फार होतात. व तीं बहुधा हिंदुस्थानांतील सर्व भागात आढळतात. याच्या दांडयावंर रेषा व फार बारीक लव असतें. पानें लांबट वर्तुळाकृति असून मागची बाजू काहींशी खरबरीत असून तिजवर फार बारीक लव असते व पुढील बाजू नरम असते. आघाड्याच्या तुऱ्यात अतीशय बारीक, नरम व कांटेदार बीं सापडतें. हें झाड औषधी कामात उपयोगी पडतें. ह्याच्या तीन जाती आहेत; पांढरा, तांबडा, व पाणआघाडा. तीनहि जातींत औषधी गुणानें पांढरा आघाडा श्रेष्ठ समजला जातो. जुन्या वैद्यकाच्या दृष्टींने ह्याच्या क्षारांत अपामार्गत्त्व म्हणजे स्वच्छ करण्याचा गुण आहे.
अ पा मा र्ग क्षा र क र ण्या ची चो री - आघाडयाचीं झाडे आणून वाळवावीं. नंतर त्यांचीं राख करून मातीच्या मडक्यांत घालावीं. त्यांत राखेच्या चौपट पाणी घालून ती चांगली कालवावी. नंतर एक रात्र तें मिश्रण तसेंच भिजत ठेवून सकाळीं त्यावरील निवळ पाणी लोखंडाच्या कढईत काढून खाली जाळ लावावा. त्यातील पाणी सगळें आटल्यावर कढईंच्या बुडाला क्षार रहील तो काढून घ्यावा.
गुण - आघाडयांत महत्त्वाचे औषधी गुण आहेत. ह्या झाडाचीं ( मूळ, देंठ, पानें, बीं व फुलें हीं सर्व ) अंगें निरनिराळया अनुपानानें देऊन नाना तऱ्हेच्या व्याधींवर हें झाड उपयोगिलें जातें. उंदराच्या व कुत्र्याच्या विषावर, कर्ण रोग व दंतरोग, डोळयाचे, रोग रातांधळें, पित्त, कफ, उपदंश वगैरे विकारावर हें झाड गुणकारी आहे. जलोदर रोगावर ह्या वनस्पतीचा पुष्कळ उपयोग होतो. या वनस्पतीच्या अंगीं जुलाब होण्याचेहि गुण आहेत. विंचवाच्या दंशावर आघाड्याची मुळी अगर तुरे पाण्यांत वाटून लावावें. उंदराच्या विषावर आघाडयाच्या कोवळ्या तुऱ्याचा रस मधाबरोबर ७ दिवस द्यावा, कुत्र्याच्या विषावर आघाडयाचें मूळ १ तोळा कुटून मधाबरोबर द्यावें; कोरफडीचें पान व सैंधव दंशावर बांधावें म्हणजे ३ दिवसांत विष उतरेल. रातांधळयावर संध्याकाळीं भोजनानंतर. आघाडयाच्या मुळया सुमारें १ तोळा खाण्यास देऊन झोंप घ्यावयास सांगावें. या प्रमाणें ३ दिवस करावें. कफावर-आघाडयाची झाडें मुळासकट आणून त्यांची राख करून ती राख एक पासून २ वालपर्यंत मधांतून द्यावी म्हणजे कफाचा नाश होतो. येणेंप्रमाणें देशी वैद्य आघाडयाचें गुणवर्णन करतात. (पदे – वनौषधि गुणादर्श, वॉटस् कमर्शियल प्राडक्टस )