विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आघारी - ( सं. आघार ) शूद्र लोकांत श्राद्धाच्या दिवशीं पितरांकरितां तूपभाताचा जो होम करतात तो. श्राद्धपक्षाच्या दिवशीं जमीन सारवून त्याजवर अग्नि ठेवून आग्नियी दिशेस तोंड करून त्या अग्नीवर तूपभात घालून सभोवंती पाणी फिरवितात आणि तिला नमस्कार करतात. श्रौत व स्मार्त याज्ञिकांत प्रधानहोमापूर्वीं ''आघार'' नांवाच्या दोन आहुति दिल्या जातात. याचा विद्याकल्पतरूकार समजतात त्याप्रमाणें अग्नौकरणाशीं संबंध नाहीं. श्राद्धकर्मांत अग्नौकरण म्हणून जो होम आहे, त्यांत आपस्तंभ आणि हिरण्यकेशी ब्राह्ण हे तूपभाताची अग्नींत आहुति देतात आणि ॠक्शाखीय ब्राह्ण ही आहुति ब्राह्मणाच्या हातावर देतात.