विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आचमन - आचमनाचे प्रकार तीन आहेत श्रौत, स्मार्त व पौराण. प्रत्यक्ष श्रुतीनें जें विहित तें श्रौताचमन होय स्मृत्युक्त जें आचमन तें स्मार्ताचमन होय आणि केशवादि तीन मंत्रांनीं उदकपान करून दोन मंत्रांनीं हात धुवावेत, वगैरे प्रकारांनीं जें सांगितलें आहे तें पौराणाचमन होय श्रौताचमन तौत्तिरीय आरण्यकांतील दुसऱ्या अध्यायांत सांगितलें आहे व त्या ठिकाणीं तें ब्रह्मयज्ञाचें अंग म्हणून निर्दिष्ट केलेलें आहे. तें आचमन आश्वलायनांनींही केलें पाहिजे स्मार्ताचमन हें संध्यादि कर्मांचें अंग होय आणि पौराणाचमन हें शौचादि कर्मांचे अंग होय. संध्येच्या अंती, भोजनानंतर शिवाशिवी झाली असतां व गमन झालें असतां केशवादि नामांनीं पौराणाचमन करावें. श्रौताचमन दर्शपूर्णमासांचें अंग होय. गायत्रीजपाच्या वेळीं श्रौताचमनपूर्वक प्राणायाम करून गायत्रीजप करणें हा मुख्य पक्ष होय असें कांहींचें म्हणणें आहे. प्रणवांनीं, व्याहृतींनीं अथवा त्रिपाद गायत्रीमंत्रानें आचमन करावें असें व्यासांचें म्हणणें आहे. अशा अर्थाच्या स्मृतिवचनांतहि श्रौताचमनाचा दुसरा एक प्रकार दर्शविला आहे. गौराणाचमनाचा प्रकार स्मृतींत दर्शविला आहे तो येणेप्रमाणें:-
केशवादि तीन नांवांचा उच्चार करून तीन वेळ उदक प्राशन करावें; पुढल्या दोहोंचा उच्चार करून हात धुवावे; नंतर एकाचा उच्चार करून ओठांचे संमार्जन करावे; पुढल्या दोहोंनीं तोंडाला पाणी लावावें; एकानें हात धुवावा; एकाने पादप्रक्षालन करावें; एकानें मस्तकाला पाणी लावावें आणि नंतर संकर्षणप्रभृति बारा नांवांचा येणें प्रमाणें विनियोग करावाः- सर्व अंगुलींच्या मूलानें हनुवटीला स्पर्श करावा; तर्जनी व अंगुष्ठ हीं दोन जुळवून दोन नांवांनीं दोननाकपुडयांनां स्पर्श करावा; नंतर अंगुष्ठ व अनामिका जुळवून चार नांवांनीं डोळे व कान ह्या चोहोंना स्पर्श करावा; कनिष्ठका व अंगुष्ठ जुळवून नाभीला हात लावावा; नंतर एका नांवाचा उच्चार करून तळहात हृदयावर ठेवावा; नंतर एक नांव उच्चारून बोटें मस्तकावर ठेवावीं; व नंतर पांच बोटें जुळविलेल्या हातानें अनुक्रमें उजव्या व डाव्या बाहुमूलाला स्पर्श करावा; ह्याप्रमाणें आचमन करणारा पुरुष साक्षात् नारायण होतो. आचमन केल्याशिवाय केलेलीं कर्में व्यर्थ होत असल्यानें आचमनाची आवश्यकता आहे शौनकांनीं स्मार्ताचमन सांगितलें आहे तें येणें प्रमाणें:-
शिखा, कच्छ व उपवीत ह्यांनीं युक्त असलेल्या पुरुषानें भूमीवर पाय ठेवून पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे तोंड करावें आणि हस्तपाद व मुखप्रक्षालन करून संध्यादि नित्यकर्मांचा अधिकार प्राप्त होण्याकरितां आचमन करावें. आचमनाला उदक त्यांत उडीद बुडेल इतकें असावें. अंगुली जुळविलेल्या हातानें द्विजानें उदक घ्यावें आणि अंगुष्ट व कनिष्ठिका सोडून व मधलीं तीन बोटें जुळविलेलीं ठेवून ब्रह्मतीर्थानें तीन वेळ उदक प्राशन करावें. अंगुष्ठामूलाच्या ठिकाणीं ब्रह्मतीर्थ आहे. तेव्हां ब्रह्मतीर्थानें उदक घ्यावें ह्याचा अर्थ पंज्याच्या मधोमध जी रेघ असते त्या रेघेपासून उदक प्राशन करावें असा साधारण समजावा. ब्रह्मतीर्थानें तीन वेळी उदक प्राशन केल्यानंतर पादप्रक्षालन करावें, आणि ओंठ जुळवून पुसावें, नंतर ओंठ जुळून मूलभागानीं तीन वेळ तोंड पुसावें. हस्तप्रक्षालन करून पायावर व मस्तकावर पाणी शिंपडावें; मधल्या तीन बोटांच्या पृष्ठभागांनीं घ्राणमूलाला स्पर्श करावा; हस्तप्रक्षालन करून अंगुष्ठ व तर्जनी यांनीं नाकपुडयांना स्पर्श करावा; नंतर अंगुष्ठ व अनामिकानीं नेत्र व श्रवण ह्यांना स्पर्श करावा; नंतर नाभीला स्पर्श करावा; तलानें हृदयाला स्पर्श करून अंगुलींनीं मस्तकाला स्पर्श करावा; अंगुलींच्या अग्रांनीं बाहूमूलांना स्पर्श करावा आणि प्रणव मंत्रानें उदक घेऊन हृदयावर सिंचन करावें. अशा प्रकारानें विप्रानें सर्वदां आचमन करावें असें शौनकांचे म्हणणें आहे. आचमनाच्या वेळीं कांहीं नियम सांगितले आहेत ते येणें प्रमाणेः-
आसनावर पाय असतांना आचमन करूं नये; भूमीवर पाय ठेवून आचमन करावें; आचमनाच्या वेळीं आसनमांडी असूं नये; पाय पसलेले नसावे आणि गुडघ्याबाहेर हात नसावे. हातांत पवित्रक असावें किंवा कुश अथवा दर्भ तर असावेत. स्नान, दान, जप, यज्ञ वेदाध्ययन व नित्यकर्म करतांना हातांत पवित्रक अथवा दर्भ असण्याची आवश्यकता आहे. संध्यावंदन हें नित्यकर्म असल्यामुळें तेंहि पवित्रक घालूनच करावें. संध्यावदन व इतर कर्में ह्यावेळीं स्मार्ताचमन करावें; ब्रह्मयज्ञाच्यावेळीं श्रौताचमन करावें. मधल्या बोटाच्या मधल्या पेऱ्यावर अंगटयाचें अग्र संकुचित करून ठेवणें हीं गोकर्णाकृति होय. आचमनासंबंधानें बारीक सारीक गोष्टी आणखीं पुष्कळ आहेत. ( धर्मं मासिक वर्ष १ लें अंक ७ वा) पौराण नांव समजलें जाणारें आचमन केवळ पौराण नसून स्मार्त आहे. त्याचा बौधायनस्मार्तसूत्रांत उल्लेख आहे.