विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आचार्य चिंतामणि रघुनाथ - हे मद्रास येथील ज्योषिशाळेंत १७ वर्षें पहिले अस्सिटंट होते. महाराष्ट्रांत जसे केरूनाना व काशीकडे बापूदेव तसेंच मद्रासकडे चिंतामणि रघुनाथ आचार्य होते. यांचा जन्म १७ मार्च १८२८ सालीं झाला. त्यांची जन्मभाषा व जन्मदेश तामिळ (द्रविड) असावा असें दिसतें, यांस संस्कृत भाषा येत नव्हती तरी यूरोपीय गणिताचे आणि ज्योतिषाचें ज्ञान यांस उत्तम होतें व त्यामुळें भारतीय ज्योतिषाचें ज्ञान साहजिक झालें होतें, पुष्कळ वर्षे ते स्वतः वेध घेत असत. सन १८४७ त त्यांनीं मद्रास वेधशाळेंत नोकरी पत्करिली. शेवटपर्यंत ते तेथेंच होते. वयाच्या बावन्नव्या वर्षीं ते मृत्यु पावले, त्यांचे घराणें ज्योतिष्यांचे आहे, त्यांचे वडील वेधशाळेंत असिस्टंट होते.
'ज्योतिष चिंतामणी' नांवाचा ग्रंथ यांच्या वडिलांनीं केला. हा ग्रंथ मूळचा द्राविडी भाषेंत आहे. त्याचें संस्कृत भाषांतर करून तें तामिळ, तेलंगी देवनागरी लिपींत छापावयाचें म्हणून १८७४ सालीं सभा वगैरे झाल्या होत्या. परंतु अखेर काहीं झालें नाहीं, ( दीक्षित कृत भा. ज्योतिःशास्त्र )