विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आंजणा (कुणबी) - संस्थान बडोदे. लो.सं. ३०, ९२० (१९११) ही जात मुख्यतः कडी प्रांतांत आढळून येते. हे लोक कुणब्यांपेक्षां रजपुतांप्रमाणें व जास्त दिसतात कांहीं लोकांच्या नांवाशेवटीं सिंग असें उपपद असतें; उदा० दानसिंग, हरिसिंग इत्यादि. एकमेकांत रोटीबेटीव्यव्हार होतात अशीं एकंदर २३ गोत्रें ( घराणीं ) आंजणांत आढळतात. त्यांचीं कांहीं नांवें म्हणजे राठोड, सोंळकी, चोहान व परमार आंजणा हे शेळयामेंढया, रानडक्करें व ससे यांचें मांस खातात; इतर कुणबी तें खात नाहींत. हे लोक अफू व मद्य यांचें सेवन करितात; बहुतेक पुरुष कल्ले राखतात. आंजणा मूळचे नवसरी प्रांतांतील वन्यधर्मीं व चोध्रावंशाचे असावेत. उत्तर गुजराथें तील रजपूत राजांनीं या जातींतील कांहीं लोक गाडी हांकण्यांस ठेविले होते. व आंजणा हे त्यांचे वंशज असें मानण्यांत येतें. अजूनहि ते आपणाला चोध्रा म्हणविताता. जातकर्म करितात; व त्यांच्याप्रमाणेंच मृतांसाठीं रडणाऱ्या बायकांनां शिजविलेलें गहूं किंवा ज्वारी देतात. या जातींतील बायका पुरुषांनां कृषिकर्मांत मदत करितात. यांचा पंथ पाहतां, हे रामानुजी शैव, आणि स्वामीनारायणपंथी आढळतील. यांचे उपाध्याय औदिच, मेवाढ, मोढ आणि बिसनगर नागर ब्राह्मण होत, मुलींची लग्ने त्यांच्या अकराव्या वर्षांपूर्वीं करण्यांत येतात. यांच्यांत विधवाविवाह व घटस्फोट रूढ आहेत. घटस्फोटाचे व इतर ज्ञातिविषयक तंटे गांवचा पुढारी ज्ञांतींतील कांहीं शिष्ट मंडळीच्या विचारानें मिटवितो.
आं ज णा लो कां चा ल ग्न वि धी. - या लोकांत एकाद्यांस मुलगा होऊन पंधरा एक दिवस होतात न होतात तोंच त्या मुलाच्या लग्नासंबंधीं वाटाघाट सुरू होते. ज्याची या मुलाच्या बेताची मुलगी असेल त्याला दुसऱ्याकडून वरपिता विचारितो. रुकार मिळतांच वराकडील मंडळी एक रुपया व गूळखोबऱ्याची वाटी घेऊन मुलींच्या घरीं जातात, व वाटाघाटींअंती पक्कें ठरलें म्हणजे वरपिता तो रुपया व गूळखोबरें कन्यापक्षांस देऊन घरीं परततो.
याप्रमाणें सगाई झाल्यावर गांवकरी लोक सांगतील तेव्हां वधूराचें लग्न होतें. जोशास बोलावून त्याच्या व पंचांच्या संमतीने मुहूर्त ठरतो. नंतर निदान पांचमाणसांबरोबर वधूपिता वरपित्याकडे कुंकुममंडित लग्नपत्रिका धाडतो. यांची गणपतिस्थापना म्हणजे पाण्याच्या तांब्याला कुंकवाची पांच बोटें लावून त्यावर नारळ ठेवून कलशाची पाटावर स्थापना करणें. नंतर माणेकस्तंभारोपण (केडवा कुणब्यांप्रमाणें ) होतें. लग्नापूर्वीं एक दिवस वराचा मामा त्यास अंगरखा, उपरणें, पायजमा वैगेरे पौषाख व एक रुपया देतो. नंतर वरास हळद लावून स्नान घालतात. मग मामानें दिलेला पोशाख देऊन हातीं रुपया देतात. वरपिता त्यास पागोटें बांधतो व मामा हातीं कटयार अगर तरवार देतो, नंतर त्यास घोडयावर बसवून स्त्रीपुरुषासह गावांतून मिरवितात. वरासह सर्व स्त्री-पुरुष वाजत गाजत वधूमंडपाजवळ दाखल झाल्यावर वधूमाता वरास कुंकू लावून त्याच्या हातीं अक्षता व नारळ देऊन त्याचा पूजासत्कार करते. नवरीला हळद लावून नंतर तिच्या मामानें आणलेलीं वस्त्रें तिला नेसवितात. मग मामा तिला बहुल्यावर आणून बसवितो. कन्येकडील उपाध्याय एका ताटांत कुंकू, अक्षता, नाडे ( लालरंगाचीं सुतें ) तीळ, जव, तूप व पाण्यानें भरलेलें भांडें घेऊन येतो, नाडे चौपट करून त्यांच्या 'वरमाळा' करितो, व त्या वधूवरांच्य गळयांत घालतो. नंतर मातीच्या कुंडांत अग्नि प्रदीप्त करून होम व प्रदक्षिणा हीं कृत्यें केडवा कुणब्याप्रमाणें करण्यातं येतात. मग कन्येची आई कंसार (शिरा) व तूप घेऊन 'चोरीं' (बहुलें) त येते. वधूवरापुढें ठेविते. वर त्यास फक्त स्पर्श करून हात धूवुन सासूचा पदर धरतो, व कांहीं देणगी देण्याचें कबूल करून घेतल्याखेरीज सोडीत नाहीं. यानंतर वरमाता वधूवरांवर अक्षत टाकते. मुलीकडील पोक्त मनुष्य मुलीला घेऊन मुलाकडील पोक्त मनुष्याच्या ओटींत घालतो-म्हणजे अर्थांत त्याच्या मांडीवर बसवितो. यासमयीं जमलेल्या मंडळींतून प्रत्येक जण मुलीच्या हातीं एक एक रुपया देतो. वधू मोठी असल्यास तिला त्यावेळींच सासरीं नेतात; लहान असल्यास नेत नाहींत. कन्या बारा वर्षांची झाली म्हणजे तिचा पिता उपाध्यायाबरोबर तिला घेऊन जाण्याविषयीं निरोप पाठवितो. मग वरपिता वर व इतर स्नेही यांसह कन्येच्या घरीं जातो. यावेळी त्यास वधूकरितां दागिने न्यावे लागतात. मुलींच्या पाठवणीच्या वेळीं तिचा बाप जावयास कर्णभूषणें, धोतरें, चांदीची आंगठी, बनात, वगैरे देतो. इतर मंडळीस प्रत्येकीं एक एक धोतर देण्याची चाल आहे. मुलीला यथाशक्ति दागिने व संसारोपयोगी वस्तू देतात. लग्नसमयीं मुलगी मोठी असल्यास या वस्तू तिला एक मूल झाल्यावर देतात.
पु न र्वि वा ह - केडवा कुणब्यांप्रमाणें यांच्यांतहि 'नात्रुं' म्हणजे पुर्नलग्न करण्याची चाल आहे. पहिला नवरा विद्यमान असतांहि असा पाट लावितां येतो. नवरा ह्यात असतां कांहीं कारणानें त्याचा संबंध सोडावा वाटल्यास मुलीचा बाप जावयास कांहीं रकम देतो, म्हणजे तसें करितां येतें. व पुन्हां लग्न करण्याचा अधिकार मुलीच्या आईबापांस अगर भावास वगैरे असतो. रविवारीं अगर मंगळवारीं पाट लागतो. (सेन्सस रिपोर्ट- बडोदें; अलोनीं-लग्नविधि व सोहाळें. )