विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आटकोट - भादर नदीच्या पश्चिम तीरावर व राजकोटपासून तीस मैलावर असलेलें एक शहर (काठेवाड) लोकसंख्या २०६७ (१८८१), जसदनच्या काठी घराण्यांतील लोकांपासून जाम साहेबानें हें मिळविलें. प्रसिद्ध लाखो फुलानी, यांनें हें शहर वसविलें अशी स्थानिक दंतकथा आहे, लाखो, मोठा झाल्यावर तो इतका हट्टी व धाडशी बनला कीं, बापाच्या हुकमांत राहणं त्याला न आवडून त्यानें लाखांमांचीं नांवाचें खेडें वसविले. यानेंच प्रथम काठेवाडांत बाजरी परदेशांत लुटालूट करतांना आणली असें म्हणतात. लाखोच्यानंतर अहीर, खेरडीचे खुमान, सोरठचे मुसुलमान व लखानी खाचर या लोकांनीं येथें राज्य केलें. १८ व्या शतकाच्या अखेरीस जामनें तें काबीज केल्याचें वर दिलेंच आहे. येथें रुग्णालय, शाळा आणि न्यायधीशाचें ऑफिस आहे. जसदन संस्थान पहा (बाँ. गॅ. ८).