विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आडगांवची लढाई - ही २९ नोव्हेंबर १८०३ रोजीं एका बाजूस इंग्रज आणि दुसऱ्या बाजूस नागपूरकर भोसले व शिंदे यांच्या फौजा यांच्या दरम्यान झाली (इंग्रज मराठे युद्ध, दुसरें पहा) आडगांवची लढाई होण्याच्या पूर्वी रघूजी भोसल्याच्या सैन्याची छावणी गाविलगडानजीक आडगांव येथें पडली असून शिंद्याची फौज त्यांच्या छावणीपासून पांच मैलांच्या आंतच सिरसोली येथें होती. रघूजीच्या सैन्याचें आधिपत्य त्याचा भाऊ वेंकाजी उर्फ, मन्याबापू याजकडे असून त्याजवळ या वेळीं रघूजीचें सर्व पायदळ, कांहीं फौज व बऱ्याचशा तोफा होत्या. स्टीव्हन्सन यास जनरल वेलस्लीचा गाविलगडास वेढा देण्याचा हुकुम झाला असल्यामुळें तो तेथून जवळच येऊन पोहचला असून जनरल वेलस्ली हा त्याला मदत करण्याकरितां दक्षिणेकडून येत होता. तारीख २३ नोव्हेंबर रोजीं शिंद्याच्या वकीलानें वेलस्लीशीं युद्धतहकुबीचा ठराव केला. परंतु भोसल्यानें अद्याप इंग्रजाकडे आपला वकील पाठविला नसल्यामुळें स्टीव्हन्सन हा भोंसल्यांशीं लढाई देण्याच्या तयारींत होता शिंद्याच्या वकीलानें इंग्रजांनीं भोसल्याशीं लढाई करूं नये म्हणून वेलस्लीपाशीं पुष्कळ रदबदली केली, परंतु वेलस्लीनें त्यास साफ सांगितलें कीं, युद्धतहकुबीचा ठराव भोंसल्याशीं झाला नसून तो फक्त तुमच्या आमच्यामध्यें आहे, एवढेंच नव्हे तर तुम्ही कबूल केलेल्या सर्व अटी पूर्ण केल्याशिवाय तुमच्याशीं चाललेलें युद्ध देखील तहकूब झालें असें समजण्यांत येणार नाहीं. तारीख २८ नोव्हेंबर रोजी स्टीव्हन्सन हा मराठयांशी व्हावयाच्या लढाईत आपणांस वेलस्लीची मदत मिळावी म्हणून त्याच्या येण्याची वाट पाहत मुक्काम करून राहिला. परंतु इकडे मराठे आपली छावणी हालवून तेथून निघून गेले. स्टीव्हन्सनच्या अपेक्षेप्रमाणें त्याला वेलस्ली येऊन मिळाल्यावर दुसऱ्या दिवशीं ते दोघेहि मराठ्यांच्या पाठलागास निघाले. दिवसभर प्रावस करून जरनल वेलस्ली हा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आला तेव्हां शत्रुपक्षाची थोडीशी बिनीची फौज पुढें ओलेली त्याच्या दृष्टीस पडली. त्या दिवशीं त्यानें बरीच मोठी मजल केली असल्यामुळें तिचा पाठलाग करण्याच्या भानगडींत न पडतां त्यानें म्हैसुरच्या फौजेस तिच्या तोंडावर पाठवून तो छावणी देण्याच्या तयारीस लागला. परंतु इतक्यांत मराठयांची आणखी बरीच फौज मागून आल्यामुळें ह्मैसूरच्या फौजेच्या मदतीस जाणें अवश्य झालें. जनरल वेलस्ली थोडी फौज घेऊन पुढें जातो तोंच त्याच्या असें नसरेज पडलें कीं, आडगांवच्या पुढील विस्तीर्ण मैदानांत मराठयांचें सैन्य फरा धरून उभें राहिलें आहे. हें पाहून तो लागलीच आपलें सैन्य घेऊन शत्रूवर हल्ला करण्याकरितां निघाला. शत्रूच्या जवळ येऊन पोंहचतांच त्यानें आपल्या सैन्याच्या दोन रांगा करून पुढें पायदळ व मागें फौज अशी मांडणी केली. रांगा बनवींत असतां इंग्रजांच्या सैन्यांत जरा घोंटाळा उडाला. तो पाहून मराठयांनी त्यांच्यावर तोफा रोंखून त्यांनां सरबत्ती दिली. परंतु रांगा तयार होतांच इंग्रजांचे सैन्य व्यवस्थित रीतीनें व धिमेपणानें पुढें जाऊं लागलें. तें पाहून मराठयांच्या सैन्यातून एक पांचशें पायदळाची तुकडी इंग्रजांच्या ७४ व्या व ७८ व्या पलटणींवर मोठया त्वेषानें चालून आली, व इकडे शिंद्यांच्या फौजेनेंहि त्याच वेळीं त्यांच्या पहिल्या पलटणीवर व मद्रासी शिापयांच्या सहाव्या रेजिमेंटावर हल्ला केला. शत्रूवर चालून आलेल्या मराठयांच्या पायदळाच्या तुकडींतील तर पांचशेंव्या पांचशे लोक ठार झाले. शिंद्याच्या फौजेनें केलेला हल्लाहि परतवून लावण्यांत आला, व तिजवरील अंमलदार गोपाळराव भाऊ हा जखमी झाला. त्यामुळें मराठयांच्या सैन्यांत गोंधळ उडून ते मागें परतले. व इंग्रजांची, म्हैसुरकराची व निजामाची फौज त्यांचा पाठलाग करीत त्यांच्यामागें गेली. या लढाईत ब्रिटिश सैन्यांतील ठार, जखमी व चुकलेल्या माणसांची संख्या ३४६ होती. मराठयांच्या सैन्यांत किती प्राणहानि झाली याचा कोठें उल्लेख नाहीं. पण ती बरीच असावी असा ग्रांटडफ अंदाज करतो.