विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आडनांव - समाजांत एकाच नांवाच्या अनेक व्यक्ती सांपडतात त्या अर्थी व्यक्तीचा निर्देंश अधिक निश्चितपणें करतां यावा म्हणून जे कांहीं उपाय योजण्यांत येतात ते आडनांवाच्या उत्पत्तीस कारण होतात. जेव्हां एकच नांवाच्या व्यक्ती भिन्न वंशांतील किंवा कुळांतील असतील तेव्हां त्यांना कुलनामासहित संबोधिल्यास कोण कोणता हें ओळखण्यास सोपें जातें. या दृष्टीनें आडनांवें प्रचारांत आली असावींत. तीं बहुतेक सर्व समाजांतून दृष्टीस पडतात. आडनावांचें महत्त्व इंग्रजी राज्यांतच वाढलें. पेशवाईंत व्यक्तीचें नांव व बापाचें बापाचें नांव एवढाच नामनिर्देशाचा प्रकार असे. आडनावें जीं पडतात. तीं कांहीं कारणामुळे पडत असतात. आडनांवें अनेक कारणांनीं बदलतात. एका आडनांवाच्या जागीं दुसरें आडनांव जें येतें त्याचाहि कांहीं इतिहास असतोच. उदाहरणार्थ, इचलकरंजीकर ब्राह्मणवंशाला घोरपडे हें मराठा जातीचें नांव पडणें. मराठे जातीच्या धन्यांचीं आडनांवें घेतलेलीं या सारखीं पुष्कळ ब्राह्मणकुळें सांपडतील; बागळ, पोळ, सांवत, थोरात वगैरे आडनांवें मराठयांप्रमाणें ब्राह्मणांचींहि आहेत. इंग्रज धन्याचें आडनांव घेणारे ब्राह्मण व परभू नोकर महाराष्ट्रीयांत आहेत. तसे पारशी पुष्कळच आहेत कांहीं प्रांतांतून कुलवाचक जुनीं आडनांवें नसतात पण आडनावांचें महत्त्व असतें. तेव्हां आडनांवाप्रमाणेंच कांहीं विशिष्ट आळींचीं गावांचीं किंवा दुसरीं नांवें, वैयक्ति नामाच्या पुढें किंवा मागें जोडून देऊन आडनांवांचे कार्य भागवितात. कांहीं कृतीमुळें आडनांवें बदललीं अशा उदाहरणांत रास्ते, ढमढेरे हीं नांवें येतील.
आ ड नां वां चे पु रा त न त्व. - मराठ्यांतील बरींच आडनांवें फार जुनीं असावींत. शिलाहारांपासून शेलारे, प्रमारांपासून पवार, मौर्यांपासून मोरे, चालुक्यांपासून चाळके, पल्लवांपासून पालव, कादंबापासून कदम अशीं मांडणी करण्यांत आली आहे. महारांचीं कांहीं आडनांवें पौराणिक कालांपासून असणें शक्य आहे. ती नागकुलांच्या नांवावरून ती निघालीं आहेत असें दाखविण्याचा प्रयत्न राजवाडे यांनीं इतिहाससंग्रहांतील, कोंकण व नागलोक या लेखांत केला आहे. राजांचीं कुलनामें जशीं जुनीं तशीं ब्राह्मणांचीहि जुनीं असावींत. राडवाडे यांनीं ज्यांस गोत्रें म्हणून म्हटलें आहे आणि ज्यांपासून आजचीं आडनांवें व्युत्पादिली आहेत असे, शब्द अनेक आहेत. राजवाडयांच्या मतांचा स्वीकार करतांना आमचा जो थोडा अभिप्रायभेद आहे तो आम्हीं पुढें व्यक्त केला आहे. कित्येकांनीं देवकांची नांवें ही आपली आज आडनांवें बनविली आहते. ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रांतच नसून सर्व हिंदुस्थानभर आहे. ज्या ब्राह्मणांस आडनांवें नसतात त्यांनीं गोत्रांची नांवें आडनांवें म्हणून घेतली आहेत. कांहीं अलीकडील आडनांनांची उत्पत्ति निश्चितपणें बारव्या शतकापर्यंत भिडविण्यांत आली आहे. शके ११७१,११८१ व ११८२ यांमधील यादव व चालुक्य यांचे जे ताम्रपट संशोधिले गेले आहेत, त्यांत पुढील आडनांवें आढळतात..प्रभू देसाई, धैशास, पट्टवर्धन, भानु, उपाध्याय, पाठक व घळशे (भा. इ.सं.मं.- तृतीय संमेलन वृत्त).
म हा रा ष्ट्री ये त र आ ड नां वें. - शास्त्री, आचार्य, भट, भट्टाचार्य, उपाध्याय, मुखोपाध्याय (मुकर्जी) हीं बंगाल्यांतील मूळचीं उपाध्याय पेशाचीं ब्राह्मणीं नांवे होत. बोस आणि घोस, दत्त आणि मित्र, सेन आणि गुप्त यांसारखीं नांवें जातिबोधक आहेत. गुप्त हें नांव वैद्यांत व दास हें नांव कायस्थांत आहे. बंगाल प्रांतांत आडनांवें फार थोडीं आहेत. मद्रास-म्हैसूरकडे ब्राह्मणांत अय्यर, अयंगार हीं पंथदर्शक आडनांवें असतात व शूद्रांत नायडू, मुदलियार, पिल्ले यासारखीं विशिष्ट अधिकारदर्शक नांवें सांपडतात. शिखांत व रजपुतांत तर आडनावें नाहींत; नांवापुढें सिंग (सिंह) लावितात. कांहीं देवकांची नांवें घेऊन आडनांवें करतात, कित्येक नांवांचा उत्तरभाग आडनांव करतात. पंजाबी काश्मिरी हिंदूंत अशीं कांहीं नांवें दिसतात.
मलबारांत नायर व मेनन या महत्त्वाच्या जातिवाचक पदव्या आडनांवाप्रमाणें योजतात. उत्तरहिंदुस्थानांत राम, प्रसाद, दास, लाल, चंद, मल्ल, नंद हीं नांवें व्यक्तिनामांत अंतर्भुत असतात. तेव्हां इंग्रजींत लिहितांनां उत्तरभाग आडनांव बनतो. मुसुलमानांत आडनावें क्वचितच दिसतात, बक्ष, दीन गुलाम, ख्वाजे, फकीर, काझी, मुनशी, शेख, सय्यद वैगेरे नांवें आडनांवाप्रमाणें आतां उपयोगूं लागले आहेत. हीं बहुधां पंथवाचक किंवा ऐतिहासिक किंवा पदवीदर्शक असतात. पारश्यांचीं नांवें हिंदूप्रमाणें राहण्याच्या ठिकाणांवरून किंवा धंद्यांवरून पडलेलीं असतात. उदाहरणार्थ, बाटलीवाला, रेडीमनी, कॉन्ट्रॉक्टर, सकलातवाला, एडनवाला, पंथकी, जोशी, संजाना इ.
म हा रा ष्ट्री य आ ड नां वां चे व र्गी क र ण. - हें शिक्षक मासिकात पुढील प्रमाणें दिले आहे.
[ अ ] धंद्यावरून किंवा पदवीवरू पडलेली नांवें:- कारखानीस, देशमुख, देशपांडे, कुळकर्णी, जोशी, पाटील, पोतदार, सुतार, माळी, पुराणीक, फडणीस, भट, वैद्य, स्सयंपाकी इत्यादि. वागळे यांची उत्पत्ति राजवाडे 'वाग्गुलिकः म्हणजे तांबूलकरंकवाही: अशी देतात दतोत व वागळे मंडळी वागुर म्हणजे विद्वान अशी देतात.
[ आ ] गांवांवरून पडलेलीं नांवें: - पुणेंकर, नागपुरकर, चिपळूणकर, गोरेगांवकर, म्हैसूरकर, राजापुरकर इ.
[ इ ] रंगांवरून तयार झालेली नांवें: - काळे, गोरे, हिरवे, पांढरे, पिवळे, करडे इत्यादि
[ ई ] प्राणिवाचक नांवें: - रेडे, घोडे, तट्टू, ढेंकणे, वाघ, आस्वल, मांजरे, एडके, बगळे, कोल्हे, गाढवे, कावळे, हंस, राजहंस, कोकीळ, मत्से, ढोर, टोळ इ०
[ उ ] नात्यांवरून पडलेलीं नांवें: - पोरे, नातू, पित्रे, सातपुते, पुत्रे, अष्टपुत्रे, नवरे, ई०
[ ऊ ] वृक्षवनस्पतींवरून निघालेली नांवें: - पिंपळे, मोगरे, फुले, पळशे, उंबरे, बदरे, खैर, कळके, मुळये भेंडे इत्यादि.
[ऋ] पदार्थांवरून पडलेलीं नांवें: - मुसळे, साखरे, तेले उखळे, कस्तुरे, पितळे, सोने, तांबे, खडके, पर्वते, गंगावने इ०
[ ॠ ] निंदाव्यंजक नांवें: - आगलावे, घोडमुखे, नकटे, ननवरे, दहीभाते, बोंबले [ महाशब्दे ] खुळे, विध्बंस, बाताडे, बावळे, कोळसे इ०
[ ए ] गुणांवरून दिलेलीं नांवें: - धैर्यवान्, अजिंक्य दाते, टि [ति] लक, पूर्णपात्रे, सहस्त्रबुद्धे पंडित, महाबळ, मनोहर, रास्ते, विनोद, कोटीभास्कर, जयवंत इ०
[ ऐ ] प्राचीन ॠषींवरून पडलेलीं नांवें: - वैशंपायन, व्यास, अत्रे, गर्गे, पराशर, गौतम, विश्वामित्र, जमदग्नि इ.
[ ओ ] शरीरावयवांवरून बनलेली नांवें: - पोटे, डोळे, [ एक ] बोटे, माने, काणे इ०
[ औ ] अश्लील शब्दांवरून दिलेलीं नांवें:- हगवणे, लवडे, नलवडे, गांडेकर, झवकिरे, डोंगणे इ०
याप्रमाणें आडनावांची आणखीहि वर्गवारी पाडतां येईल. शिवाय वर वर्गीकृत केलेलीं आडनांवें त्या त्या वर्गांत ठाम बसतीलच असें नाहीं. नांवांचा इतिहास लक्षात न घेतां सामान्य मनुष्यास त्यांवरून जो बोध होतो तोच या वर्गीकरणांत उपयोजिला आहे. तेव्हां आडनांवाचे वर्ग चुकण्याचाहि संभव आहे. फक्त वर्गीकरणाची एक दिशा दाखविण्याचा या ठिकाणीं प्रयत्न केला आहे.
रा. वि. का. राजवाडे यांनीं अनेक आडनांवांच्या पौराण व श्रौतसूत्री गोत्रांवरून व्युत्पत्ती लाविल्या आहेत; पण आडनांवें व पौराण शब्द यांस संयोजक मध्यकालीन प्रामाण्यें सांपडत नसल्यानें त्या काल्पनिक वाटतात. फाण्टाः पासून फाटक, कौरव्यापासून कर्वे, आकशायेयाः पासून आगाशे, श्वानेयाः पासून साने, आश्मरथ्याः पासून मराठे गौधिलिपासूनः गोंधळे, कानिष्रि = कानिटकर, पिंडिकाक्षाः = पेंडसे, कौमंडा = गोंवडये गाधरायणाः = गद्रे, इ० (भा.इ.सं. मंडळ, प्रथम –संमेलन-वृत्त) यांत दोष येतो तो असा. कर्वे यांचे गोत्र कौरव्य असें नसून गार्ग्य आहे. आगाशे यांचे गोत्र आकशायेय नसून कौशिक आहे, मराठे यांचें कपि आहे, पेंडसे यांचें जामदग्न्य आहे, गोवंडे यांचें वसिष्ठ आहे गद्रे यांचे कौशिक आहे इ० तेव्हां रा. राजवाडे यांनीं जें मत दिले आहे त्याच्या ग्राह्यतेविषयीं अनुकूल बोलावयाचे झाल्यास फारतर असें म्हणतां येईल कीं, गोत्र हा शब्द दोन अर्थानीं वापरीत असावेत, एक प्रचलित अर्थ व एक आडनांवाच्या वाचक अर्थ.
आ ड नां वे लि हि ण्या त अ र्वा ची न त ऱ्हा. - आतां कांहींचीं आडनांवें लिहिण्याची विचित्र पद्धति आहे. कांही तळवळकर याबद्दल 'टी. वाकर' असें इंग्रजी नांवाशीं साम्य जोडण्याकरितां लिहितात. दुसरे कांहीं, ठाकरे हें नांव 'थॅकरे' या इंग्रजी आडनांवाप्रमाणें इंग्रजींत लिहितात. एका व्यक्तींने सहस्त्रबुद्धे हें लांबलचक नांव आटपशीर करण्याकरितां 'एस्. बुधे' असें लिहून त्याला नावीन्य आणिल्याचें अवलोकिलें आहे. मागें डॉ. रघुनाथ 'परांजप्ये' हे परांजपे असें न लिहि परांजप्ये असें का लिहितात याविषयीं जाहीर चर्चा झाली. (ज्ञानांजन) आडनावांचें इंग्रजी स्पेलिंग कसें करावें याविषयीं तर धरबंदच नाहीं. असें करण्यांत काहींच सद्धेतूहि असतो. कारण 'मुळे' हें नांव इंग्रजींत लिहिलें तर महाराष्ट्रीयेतर इसमाला तें 'म्यूल' (खेंचर) असें वाटेल व आपला अपमान होईल या हेतूनें मुळ्यें असें लिहिण्यांत येतें. महाराष्ट्रीयांची जी शाखा कर्नाटक व तंजावर इकडे गेली त्यांतील लोक प्रथम बापाचें नांव, मग आडनांवें ही आद्याक्षरांत लिहून शेवटीं आपलें सर्व नांव लिहितात; जसे; व्ही.पी. माधवराम ( माजी म्हैसूर दिवाण ) = माधवराव विश्वनाथ पाटणकर; त्याचप्रमाणें टी. माधवराव (माजी बढोदेसरकराचे दिवाण ), आर. रघुनाथराव इ. ही चाल आपल्याकडील कांहीं लोकांनीं, उचललेली दिसते. याचें कारण मूळ नांवाने ओळखण्यांत कमीपणा येतो किंवा महाराष्ट्रीय नांवानें धंदा चालणार नाहीं अशी भीति वाटते म्हणून असावें. पंडित टी. गोपाळराव (= गोपाळराव टोकेकर ); व्ही. किसनराव (= कृष्णराव वैशंपायन) इत्यादि या प्रकारातलीं उदाहरणे देतां येतील. (चिं.ग. कर्वे शिक्षक मासिक वर्ष ३ अंक ६).
हिंदुस्थानांत आडनांवें बदलण्यासंबंधीं निषेधक कायदा नाहीं. त्यामुळें ब्राह्मण जातींचीं आडनांवें घेण्याची पद्धत कांहीं ब्राह्मणेतरांत दिसून येते. मद्रास इलाख्यांत 'सौराष्ट्र', जातीची मंडळी अय्यर व अय्यंगार अशीं आडनांवें लावूं लागल्यामुळें पुष्कळ ब्राह्मणांस त्यामुळें दुःख होतें.
आ ड नां वां ची पा श्चा त्य प द्ध त – आडनांवासंबंधानें सार्वत्रिक चाल अशी आहे कीं, मनुष्य बापाच्या नांवावरून ओळखला जावा. पण इंग्लंड आणि युनायटेड स्टेट्समध्यें हें कायद्याने बंधकारक नाहीं. मनुष्याला आपल्या मर्जीप्रमाणें वाटेल ते नांव धारण करण्यास कायद्याची मनाई नाहीं. आणि नवें नांव धारण करतांना कोणताहि विशिष्ट विधि करावा लागत नाहीं. उलटपक्षी एखादा मनुष्य बापाच्या नांवावरून किंवा दुसऱ्या एका नांवावरून सुप्रसिद्ध झालेला असला आणि पुढें त्याला तें नांव बदलावेसें वाटेल तर या नवीन नांवानें लोकांनीं त्याला संबोधावें अशी सक्ती लोकांवर त्याला करतां येत नाहीं, तसेंच एकाचें नांव दुसऱ्यानें घेतां कामा नये असा सक्तीचा प्रतिबंध इंग्रजी कायद्यानें घातलेला नाहीं. तथापि जर एखाद्या माणसानें नवें नांव धारण केलें, व तें जाहीर व्हावें व सरकारदरबारीं मान्य केलें जावें अशी इच्छा असली तर त्याला सरकारचा परवाना मिळविणें जरूर असतें. त्याकरितां इंग्लंडमध्यें हेरलडच्या ऑफिसमार्फत अर्ज करावा लागतो. हा अर्ज मंजूर झाल्यास राजाच्या शिक्याचा व होमसेक्रेटरीच्या सहीचा परवाना देण्यांत येतो. मृत्युपत्र वैगेर करून जेव्हां एखादी इस्टेट दुसऱ्याला देण्यांत येते, तेव्हां मृत्युपत्र करणारा किंवा इस्टेट देणारा इसम इस्टेट घेणाऱ्यानें आपलें (इस्टेट देणाराचें) नांव लावावें अशी अट घालतो. नांव बदलल्याबद्दल प्रसिद्धी व्हावी व पुरावा देतां यावा ह्मणून केलेला बदल वर्तमानपत्रद्वारें जाहीर करण्याचा मार्ग व सुप्रीम कोर्टाच्या मध्यवर्ती ऑफिसांत तें नोंदवण्याचा मार्ग अवलंबण्यात येतो.
फ्रान्स व जर्मनीमध्यें नांव बदलावयाचें असल्यास त्याला सरकारी मान्यता मिळवावी लागते. १९०० चें जर्मन कोड कलम १२ प्रमाणें नवीन नांव धारण करण्याला कोणाचा प्रतिबंध असेल किंवा त्यामुळें कोणाचें नुकसान होण्यासारखें असेल तर नवें नांव घेणाऱ्या इसमास तें सोडून देण्यास भाग पाडतां येतें. इंग्लंडमध्यें स्त्रीचें लग्न झाल्यावर नवऱ्याचें आडनांव तिला धारण करावें लागतें. स्कॉटलंडमध्यें कुमारपणांतलेंच नांव विवाहोत्तर चालू ठेवण्याची व त्यापुढें ‘उर्फ’ घालून नवर्याचें नांव जोडण्याची पद्धत आहे. पुनर्विवाह झाल्यावर पुन्हा नव्या नवऱ्याचें नांव धारण करावें असा नियम आहे. पण त्याला एक अपवाद असा आहे कीं, एखादा मोठा किताब धारण करणाऱ्या स्त्रीने सामान्य मनुष्याबरोबर पुनर्विवाह लावल्यास पूर्वीचा किताब कायम ठेवण्याची तिला परवागनी असते. ( ए.ब्रि. नेम या लेखांतील उतारा).