विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आडी - हा अंधकासुराचा पुत्र. यानें, उग्र तप करून देवास प्रसन्न केलें, आणि अमरत्व मागीतलें. तेव्हां त्यांनीं तें दुर्लभ आहे असें सांगितल्यावर, मी रूपांतर पावल्यावाचून मरूं नये येवढें मला द्या असें मागितलें; तें त्यास त्यानीं तथास्तु वचनानें देऊन, स्वर्लोकीं गमन केल्यावर, आपल्या पित्यास मारणाऱ्या शिवाचें वैर उगवावें म्हणून, हा कैलासास गेला, आणि तेथें द्वारावर वरिक नांवाचा शिवगण होता त्यानें आपल्यास अडवूं नये या हेतूनें सर्परूप धारण करून गुप्तरूपानें आंत शिरला. नंतर सर्परूप टाकून पार्वतीचें रूप धारण करून शिवासमोर जात आहे तोंच शिवानीं तें कपट जाणलें व त्यास त्यानेंच संपादिलेल्या वरप्रदानाप्रमाणें तत्काल वधिलें (मत्स्य पुराण. १५५).