विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आडवी आंझून - डी रूयीटर मायकेल (१६०७-७६) याचा जन्म फ्लशींग शहरीं २४ मार्च १६०७ रोजीं झाला. हा एक डच आरमारी अधिकारी होता. हा आपल्या वयांच्या ११ व्या वर्षीं जहाजावरील हलक्या प्रतीचा नोकर झाला व याच वेळेपासून त्याच्या दर्यावर्दी आयुष्यक्रमास सुरवात झाली. १६४० त हा सरकारी नोकर होऊन स्पेनविरुद्ध पोर्च्युगालच्या मदतीस पाठविलेल्या आरमारावरील तिसऱ्या दर्जाच्या अधिकाऱ्याच्या जागी याची नेमणूक झाली व पुढें ३ नोव्हेंबर १६४१ रोजीं केप सेंटव्हिनसेंट येथें झालेल्या चकमकींत हा प्रसिद्धीस आला. यानंतर १६५२ पर्यंत हा एका व्यापारी जहाजाचा कप्तान होता. इ.स. १६५३ मध्यें डच लोकांनीं इंग्लंड देशावर केलेल्या स्वारीत हा असून इंग्रजांशीं झालेल्या तीन सामन्यांत यानें अप्रतिम शौर्य व कौशल्य दाखविलें १६५९ त स्वीडिश लोकांविरूद्ध डेनमार्कच्या राजास मदत करण्याबद्दल बक्षीस म्हणून याला सरदार केलें. १६६५ त याला इंग्लंडवर पाठविलेल्या एका मोठया आरमाराचा सेनापति नेमलें. या युद्धांत यानें इंग्रज लोकांस थेम्स नदीचा आश्रय घ्यावयास लाविलें. १६७६ त याची फ्रान्स विरुद्ध स्पेनला मदत करण्याकरितां भूमध्यसमुद्रांकडे रवानगी झाली. याच युद्धांत यास ता. २१ एप्रिल रोजीं प्राणघातक जखम होऊन ता. २९ रोजीं मृत्यु आला. याचा दफनविधि अॅमस्टरडॅम शहरीं होऊन येथेंच त्याच्या स्मरणार्थ एक भव्य स्मारक उभारण्यांत आलें.