विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आतिथ्य - हा मनुष्यविषयीं परोपकाराबुद्धि दखविण्याचा एक प्रकार आहे हा गुण अगर ही परोपकारबुद्धि जीवनकलह तीव्र नसलेल्या समाजांत फार आढळून येते. होमरच्या वेळी यसाली नांवाचा मागासलेला प्रांतच अतिथ्याच्या बाबतींत नावांजलेला होता. पण ग्रीसच्या इतर भागांमध्ये अशा प्रकारची परोपकारबुद्धिचीं उदाहरणें क्वचित् अढळत. रानटी लोकांमध्यें आतिथ्याचें महत्व मनुष्याला येणाऱ्या अडचणींमुळे फार दिसून येतें. पण सुधारलेल्या समाजामध्यें आतिथ्य हें एक भूषण समजलें जातें. अॅरिस्टॉटलनें आतिथ्य हा गुण चैनीच्या अगर औदार्याच्या सदरांत घातलेला आहे. श्रीमंत मनुष्याच्या अनेक लक्षणांपैकीं आतिथ्य हें एक प्रमुख लक्षण मानलें जात असे. सार्वजनिक महत्त्व प्राप्त करून घेऊं इच्छिणाऱ्या मनुष्यानें या आतिथ्यसांबंधीं नेहमीं खबरदारी घेण्यास शिकलें पाहिजे व तें शास्त्र अवगत करून घेतलें पाहिजे असें प्लेटोच्या 'मेनो' ग्रंथांत म्हटलें आहे.
हिं दु स्था नां ती ल आ ति थ्य. - हिंदूंचे जे आचारधर्म सांगितले आहेत त्या धर्मान्वयें, अतिथिसत्कराचे महत्त्व आहे. आतिथ्य हाच यज्ञ होय असें अथर्ववेद सांगतो. तथापि हिंदूधर्मामध्यें चातुर्वर्ण्यव्यवस्था अंमलांत असल्यानें व जातिभेदाचे निर्बंध कडक रीतीने पाळले जात असल्यानें भलत्याच जातीच्या मनुष्याल भोजनामध्यें भाग घेतां येत नाहीं. सहभोजनाची एवढी बाब सोडून दिली तर इतरबाबितींत आतिथ्यसत्काराची कल्पना हिंदुलोकांमध्यें पूर्णपणें दृष्टोत्पत्तीस येते. कदाचित् असेंहि म्हणतां येईल कीं, जगांतील इतर कोणत्याहि लोकांपेक्षां हिंदु लोकांमध्यें अतिथीला विन्मुख न पाठविण्याची जास्त खबरदारी घेण्यांत येतें. अतिथिसत्कार हें धार्मिक कर्तव्य म्हणून मानिलें जातें. आतिथ्यासंबंधीं स्मृतीमध्यें मुद्दाम नियम घालण्यांत आलेले आहेत. ब्राह्मण अतिथीविषयीं जरी अधिक उदार धोरण ठेवण्यांत आलेलें आहे तरी पण इतर कोणत्याहि वर्णांच्या अतिथीविषयीं अनादरबुद्धि दाखविण्यांत आलेली नाहीं. मात्र क्षत्रियाला ब्राह्मणानंतर व वैश्यशूद्रांनां नोकराबरोबर जेऊं घालावें असें मनुस्मृतींत म्हटलेलें आहे. (मनु. अ. ३ श्लो. १११-१२)
यदि त्वतिथिधर्मेण क्षत्रियोगृहमाद्रजेत्
भुक्तवत्सूक्त विशेषु कामं तमपि भोजयेत्
वैश्यशूद्रृवपि प्राप्तौ कुटुंम्बेतिथिधर्मिणौ
भोजयेत्सह भृत्यैस्तावानृशंस्यंप्रयोजयन्
इतर कोणत्याहि जातीचा अतिथि आला तरी त्याला यथाशक्ति जेवण घालावें व त्याचा सत्कार करावा. अतिथि हा कोणत्याहि वेळीं आला तरी त्याला परत पाठवितां कामा नये असेंहि स्मृतिवचन आहे.
अतिथिपूजन हें गृहस्थाश्रमीयाचें प्रमुख कर्तव्य आहे. गृहस्थाश्रमीयानें तें व्रत न पाळलें तर त्याला पाप लागतें व 'तो जिवंत असून मेल्याप्रमाणेंच आहे' असें स्मृतींमध्यें म्हटलेले आहे. अतिथीच्या पूजनानें स्वर्गप्राप्ति व धनधान्य समृद्धि होते. (मनु. ३.३०६) अतिथि शब्दाचा अर्थ
एकरात्रं तु निवसन्नतिथिब्राह्मणः स्मृतः
अनित्य हि स्थिती यस्मात्तस्मादतिथिरुच्यते
म्हणजे एक दिवस राहाणारा अतिथि असा मनुस्मृतींत (३.१०२ दिला) आहे. याज्ञवल्यक्यस्मृतींत 'अध्वनीतोऽतिथिर्ज्ञेयः' अशी अतिथिशब्दाचे व्याख्या केली आहे. हा विशेष अर्थ जरी स्मृतींत रूढ असला तरी व्यापकदृष्टया 'घरीं येणारा पाहुणा' म्हणजे अतिथि असाहि करतां येईल. आपले आप्त, इष्टमित्र घरीं आले तर त्यांचें मोठया प्रेमानें स्वागत करावें असेंहि स्मृतींमध्ये म्हटलेलें आहे.
इतरानपि सख्यादीन्संप्रीत्या गृहमागतान्
सत्कृत्यान्नं यथाशक्ति भोजयेत्सह भार्यया
(मनु. ३. ११३)
भोजनयेच्चागतान्काले सखिसंबंधिवान्धवान् ॥
(याज्ञवल्क्य प्र. ५ श्लो. १०८)
अतिथि, आप्तइष्ट व घरचे नोकर यांचीं जेवणें झाल्यावर नंतर मग यजमानानें आपल्या पत्नीसह अविशष्ट अन्नाचें ग्रहण करावें असें सांगितलेलें आहे.
भुक्तवत्वथ विप्रेषु स्वेषु भृत्येंषु चैत्र हि ।
भुब्जीयातां ततः पश्चादवशिष्टन्तुदम्बती
देवानृषीन्मनुष्यांश्च पितृन्गृह्यांश्र्च देवताः ।
पूजयित्वा ततः पश्चात्गृहस्थः शेषग्भेवत् ॥ ११७ ॥
(मनु अ. ३)
अशा प्रकारची अतिथिसत्काराची कल्पना हिंदू लोकांमध्यें आढळून येते. हीच कल्पना वेदांतून, ब्राह्मणांतून व उपनिषदांतूनहि सांपडते. कठोपनिषदांत, व ऐतरेय ब्राह्मणांत अतिथिपूजनाचे उल्लेख आलेले आहेत. पुराणामध्यें व पुराणोत्तर वाङयामध्यें तर अतिथिसत्काराचें महत्त्व पावलोंपावलीं वर्णिलेलें आढळून येतें. शिवलीलामृतांतील श्रियाळचांगुणाकथा हें याचें उत्कृष्ट उदाहरण आहे. अर्वाचीन हिंदु लोकांमध्यें पाहुण्यांचें आदरानें स्वागत करण्याची बुद्धि नेहमीं आढळून येतें; पूर्वींप्रमाणें जरी अतिथिसत्कार केला जात नाहीं तरी सामान्य जनतेमध्यें उदार बुद्धि अद्यापिहि कायम आहे असेंच दिसून येते. त्याचप्रमाणें अतिथिपूजनाला धार्मिक स्वरूप देऊन हिंदुग्रंथांनीं अतिथिपूजनाचें महत्त्व अधिक स्पष्ट तऱ्हेनें लोकांच्या नजरेस आणलेलें आहे.
बौ द्ध. - यांच्या आतिथ्याचें संबंधीं विवेचन तीन भागामध्ये करणें श्रेयस्कर होईल. (१) सामान्य अथवा अशिक्षित लोकांत आपाआपसांत असलेली आतिथ्यतत्त्परता, (२) धर्म संप्रदायांतील लोकांशीं वागतांना सामान्य लोकांची आतिथ्य तत्परता, व (३) धर्मसंप्रदायांतील लोकांमध्यें असलेली आपापसांतील आतिथ्यतत्परता.
( १ ) सामान्य जनांची परस्पराविषयीं आदर बुद्धिः-यासंबंधींचे उल्लेख सूत्रग्रंथामध्यें सामान्य नीतितत्वाचें विवरण करतांना आढळून येतात. 'दीर्घ’ मध्यें (३.१९०) असें म्हटलेलें आहे कीं उत्तम बायको ही आपल्या पतीच्या घरच्या माणसांशी फार लीनतेनें वागते; (१.११७) मध्ये असें म्हटलें आहे कीं उत्तम नागरिकाचें कर्तव्य म्हणजे पाहुण्यांना सन्मानानें व आदरानें वागविणें हें होय. जातकग्रंथामध्यें (३.३२) एका गोष्टींतील नायक आपल्या आतिथ्यतत्परतेचे गोडवे गात असलेला आढळून येतो. त्याच ग्रंथामध्यें एका ठिकाणीं असें म्हटलें आहे कीं, जो गृहस्थ अतिथीला भोजन घालीत नाहीं त्याचा यज्ञ फुकट आहे. हे वर दिलेले विचार बौद्धधर्मांतीलच आहेत असें मात्र नव्हे. वरील विचारांपैकीं कांहीं विचार बुद्धधर्मीय नसलेल्या कांहीं चांगल्या माणसांनीं काढलेले आहेत. सारांश बौद्धग्रंथांतील वरील विचार हे तत्कालीन समाजांमधील आतिथ्याविषयीची कल्पना प्रकट करतात असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं.
(२) धर्म संप्रदायांतील लोकांशीं वागतांना सामान्य लोकांची आतिथ्यतत्परता-बौद्धधर्माच्या उदयकाळीं धर्म प्रसार करणारे पुष्कळसे प्रव्रजित असत. त्यांपैकीं पुष्कळसे कुलीन असले तरी इतर अनेक वर्णांचे व जातींचे होते. या प्रव्रजितांना अन्नवस्त्रादिक देणें हें धर्मकार्य मानिलें जात असे. या प्रव्रजितांचे मोठमोठे संघ असत; व प्रत्येक संघ आपापल्या मुख्यानें घालून दिलेल्या नियमाप्रमाणें वागत असे या सर्वच संघानां लोकांकडून यथाशक्ति मदत होत असे. बौद्धधर्मीयांनीं आपल्याच धर्माच्या लोकांनां तेवढें अन्नवस्त्र द्यावें व इतरांना देऊं नये अशा प्रकारचा उपदेश कधींहि केलां नाहीं. उदाहरणार्थ सिंह नांवाचा एक कुलीन तरुण प्रथमतः जैन धर्माचा असतांना नंतर बौद्धधर्मीय झाला तरी पण बुद्धदेवानें जैनधर्मीयांशींहि आदरबुद्धि दाखविण्याच त्याला आग्रहपूर्वक उपदेश केला होता. तसेंच भिन्न धर्माच्या उपदेशकांसहि उदारबुद्धीनें व प्रेमानें वागविण्याविषयींचे उल्लेख अशोकाच्या शिलालेखांमध्ये आढळून येतात.
(३) धर्मसांप्रदायांमध्यें परस्पराविषयींची आदरबुद्धि - बुद्ध प्रव्रजित हे नेहमीं हिंडत असल्याकारणानें ते इतर प्रव्रजितांच्याकडेहि प्रवासामध्यें वास्तव्य करीत असत; व अशावेळीं एका प्रव्रजितानें दुसऱ्या प्रव्रजिताशीं कशा तऱ्हेनें वागावें यासंबंधीं विनयग्रंथाच्या तिसऱ्या भागामध्यें नियम सांगितलेले आहेत. इतर राष्ट्रांतील आतिथ्याचे प्रकार पुढील प्रमाणें आहेत.
इ रा णी. - अवेस्ता आणि पल्लवी ग्रंथांमध्यें आतिथ्यसत्कार करणें ही गोष्ट गृहीतच धरलेली असल्यामुळें त्यांमध्यें आतिथ्यवाचक शब्द देखील आढळून येत नाहीं; पण त्या ग्रांथामध्यें 'जेव्हां एक मित्र दुसऱ्या मित्राच्या घरीं जात असे त्या वेळीं तो कांहीं तरी नजर म्हणून नेत असे' अशा व इतर कांहीं उल्लेखांवरून या विषयींचा निर्देश केला जातो. पुरुसिश्नीहा ३९ मध्यें असें म्हटलेलें आहे कीं, सद्गुणी मनुष्याला समाधान अगर बक्षीस देऊन न थांबतां त्याचें अगत्यपूर्वक स्वागत करावें. कारण सद्गुणी मनुष्याचें स्वागत करणें हें आहुरमझ्दाला आवडणाऱ्या तीन कर्तव्यांपैकीं एक कर्तव्य मानिलें आहे.
फारसी लोकांच्या आतिथ्याविषयींचे कांहीं प्रकार यस्त २४, ६२-६४ मध्यें आढळून येतात. ज्या वेळीं सद्गुणी मनुष्याचा आत्मा 'अनंत तेजा' च्या स्वार्गामध्यें जातो, तेव्हां तेथें त्याला इतर मृतात्मे, देवदूत भेटतात व त्याला निरनिराळे प्रश्न विचारूं लागतात; पण आहुरमझ्द त्यांनां तसें न करण्याविषयीं व त्या आत्म्याला उत्तम आसन, अन्न व विश्रांति देण्यास सांगतो. नरकामध्यें सुद्धां मृतात्म्याला त्याच्या पूर्वीं आलेले मृतात्मे प्रश्न विचारूं लागण्यापूर्वीं त्याला तेथील घाणीचें अन्न देण्यांत येतें. त्याचप्रमाणें अर्ताईवीराफमध्यें असें म्हटलें आहे कीं, तृषाकुल झालेल्याला व भुकेल्याला पाणी व अन्न देणें, हें पहिलें कर्तव्य होय. नंतर वाटेल तर त्याची चौकशी व त्याच्या कामासंबंधीं माहिती विचारावी.
पारशी लोकांच्या आतिथ्याविषयीं चांगली माहिती करून देणारा ग्रंथ म्हणजे फिर्दोसीचा शाहनामा हा होय. त्यामध्यें जरी राजे लोक परराष्ट्रींय वकिलाचें कसें स्वागत करीत, या विषयींचेच फार उल्लेख असले तरी पण कांहीं उदाहरणांवरून खालच्या वर्गांमध्यें आतिथ्याचा कोणता प्रकार होता यासंबंधींहि थोडी फार माहिती मिळते.
दैलाममध्यें अशी चाल होती कीं, पाहुण्यांचे स्वागत कुटुंबांतल्या एकटया मनुष्यानेंच करावयाचें व बाकी सर्वांनीं पाहुण्याच्या नजरेस देखील पडावयाचें नाहीं. त्याचप्रमाणें दैलाममध्यें अन्न विकण्याची वहिवाट नसे, वाटेल त्याच्या घरीं शिरलें असतां त्याला अन्न मिळत असे, असें अलमकडिसी म्हणतो. अर्वाचीन इराण हें इतकें पूर्णांशानें मुसुलमानीं बनलें आहे कीं, इराण व इस्लाम यांमधील भेद काढणें मोठें कठिण काम झालें आहे. तथापि पूर्ण मुसुलमानी बनण्याच्या किंचित् पूर्वींच्या इराणी लोकांची म्हणजे कुर्द लोकांच्या आतिथ्यांसंबंधींची कांहींशीं कल्पना सोनच्या, 'वेषांतरांत मेसॉपोटेमिया व कुर्दिस्तान येथील प्रवास' नांवाच्या पुस्तकावरून कळण्यासारखी आहे.
अ र ब - या लोकांत आतिथ्य करणें म्हणजे अतिथीला भोजन देणें असा अर्त होतो. 'आदरसत्कार करणें' व अन्न देणें हे कुराणामध्यें समानार्थी शब्द मानतात. ही आतिथ्याची पद्धत अब्राहामनें प्रथमतः शोधून काढली असें समजतात. ''मध्यरात्रीं देखील आम्ही पाहुण्याचें, मग तो शत्रू असला तीर स्वागत करतों'' वगैरे अभिमानापूर्वक केलेलें वर्णन अरब भाटांच्या काव्यांमधून आढळतें. कुराणांमध्यें (११.८०) लोट हा पाहुण्यांच्या बाबतींत आपल्याला बट्टा न लावूं देण्याविषयीं सोडोमच्या लोकांनीं विनंति करतो, महंमदाच्या चरित्रामध्यें कित्येक प्रसंगीं शत्रूंचें आगतस्वागत करण्याचें नाकारलेलें, अगर स्वागत करणें न करणें सेनापतीच्या मर्जींवर अवलंबून ठेवलेलें आढळून येतें.
आतिथ्यमूलक विश्वासाचा दुरुपयोगः - पुष्कळदां इतर देशाप्रमाणेंच अरबस्थानामध्येंहि शत्रूला अतिथि म्हणून जेवण्यास बोलावून त्याला पकडावयाचें असे प्रकार होत असत मादिनामधील ज्यू हे अरब लोकांचे आश्रित कसे झाले यासंबंधींच्या कथांमधून दोनदां वरील प्रकार वर्णन केलेला आहे. १८११ मामलुक लोकांच्या बरोबर वागतांनाहि अशाच प्रकारचें वर्तन महंमदअल्लीनें केलें होतें. विषाच्या योगानें शत्रूचा कांटा काढण्याची पद्धत खलिफांच्या अमदानींत सरसहा चालूं होती. कुरणामध्यें 'न्याय दिनी अतिथींच्यासाठीं केलेल्या खर्चाचा जाब विचारावयाची परमेश्वराला देखील लाज वाटेल' (कुतअल कुलूब १३१०-१८२) असें म्हटलें आहे.
तथापि सेमाइट वंशाच्या लोकांमध्यें आणि सामान्यतः सर्वच पौरस्त्य लोकांमध्यें आतिथ्य हे धार्मिक कर्तव्य म्हणून मानलें जाते. ख्रिस्तपूर्वकाली अतिथीस आगतस्वागत, मेजवानी, त्याच्या जनावरास अन्न घालणें हें होई व वेळप्रसंगींमागितल्यास मुलगीहि अर्पण करण्यांत येत असे! ग्रीक व रोमन लोकांतील आतिथ्याचे खासगी व सार्वजनिक असे दोन प्रकार असत. यजमान व अतिथि हे परस्परांनां कांहीं वस्तू नजर करीत व अशा प्रकारें जुळलेला संबंध पिढयानुपिढया चालत असते.
ख्रै स्त्या ग म पू र्व यू रो पी य. - अतिथीला ठार मारण्याची पद्धत केल्टिक लोकांमध्यें होती अरों डिडोरेसनें म्हटलें आहे पण तें साफ खोटें आहे. गॉल लोक पाहुण्यांचे उत्तम प्रकारें आतिथ्य करीत. आयरिश लोकांमध्यें आतिथ्य करणें हा एक प्रकारचा फायदाच होता. 'त्यांचीं घरें मोठीं असून तेथें अतिथींनां कधींहि मज्जाव होत नसे असें आडोनोव्हननें आयरिश लोकांचें वर्णन केलें आहे. आतिथ्याची व्यवस्था पाहण्याकरितां नेमलेल्या खास अधिकाऱ्याच्या ताब्यांत आतिथ्याच्या खर्चासाठीं जमीनी दिलेल्या असत. आयर्लंडमधील लोकांप्रमाणेंच वेल्समध्येंहि राजाला अतिथींचा यथायोग्य सत्कार करावा लागत असे. व त्यांच्यासाठीं अथितिगृहें व आतिथ्याध्यक्ष नेमावे लागत.
ख्रि स्ती. - या लोकांनी आतिथ्याच्या चालीला सार्वजनिक स्वरूप दिलें. त्यांनीं सुरू केलेल्या अतिथिगृहांचेच परिणत स्वरूप म्हणजे हल्लींची हॉस्पिटलें होत. धर्माध्यक्षानें अतिथितत्पर असलेंच पाहिजे अशी सेंट पॉलची आज्ञा होती. विधवागृहें, अनाथालयें, वृद्धशुश्रूषागृहें, बालसंगोपनगृहें, वगैरे संस्थांच्या कल्पनेचा उगमहि यापासूनच आहे. अशा प्रकारचें पाहिलें गृह फ्रान्समध्यें लीयां येथें ५४२ त चाईल्डबर्ट या राजानें स्थापन केलें. पोप ग्रेगरीनें ६ व्या शतकामध्यें अतिथिगृहें बांधिली. रोग्यांची शुश्रूषा स्त्रियांकडून केलीं जाणारें गृहें आगस्टाइन सिस्टर्स (पॅरिस), सिस्टर्स ऑफ सेंट थॉमस, सिटर्स्स ऑफ चॅरिटी हीं होत.
चि नी व ज पा नी. - चिनी लोक जात्याच आतिथ्यतत्पर आहेत. त्याप्रमाणेंच किंबहुना त्याहीपेक्षां जपानी लोक अधिक आतिथ्यशील आहेत. फार प्राचीन काळीं जपानी लोकांत अशी चाल होती कीं, पाहुण्याला जे पदार्थ खावयास द्यावयाचे ते, पाहुण्याला त्रास पडूं नये म्हणून अगोदर यजमान चावून ठेवीत असे ! खुद्द जपानी देवांनीं देखील परकीय देवांचें आगतस्वागत केलें अशी कथा आहे. अशा प्रकारचें आदरातिथ्य जपानी लोकांनीं केलें ह्मणूनच जपानी राष्ट्र सहज ख्रिस्ती करून टाकूं, अशी आशा झेव्हियरच्या मनांत उद्भवली. कोरियामध्यें मात्र परधर्मीयांचा पूर्णपणें छळ व कापाकापी करण्यांत येत असे. सोळाव्या शतकांतील जपानाशीं १९ व्या शतकांतील कोरियाची तुलना केल्यास या दोन संस्कृतींमधील अंतर दिसून येईल. (''दान'' सामाजिक सुधारणा'' हे शब्द पहा).
[ सं द र्भ ग्रं थ. - मनु व याज्ञवल्क्य स्मृति शिवलीलामृत विनयपिटक एन्शन्ट लॉज ऑफ आयर्लंड कुरी-मॅनर्स अँड कस्टम्सऑफदि एन्शन्ट. आयरिश.कीटिंग-हिस्ट्री ऑफ आयर्लंड. डूलिटिल.सोशल लाईफ दि जायनीज ग्रे. –चायना. उल्हहॉर्न-ख्रिश्चन चॅरिटी इन दि एन्शट चर्च. बर्डेट-हॉस्पिटल्स अँड असायलम्स ऑफ दि वर्ल्ड. अवेस्ता ग्रंथ. निहोंगी गुबिन्स-रिव्ह्यु ऑफ दि इन्ट्रोडक्शन ऑफ ख्रिश्चॅनिटी इंटु चायना अँड जपान. केन्नी – अकाउंट ऑफ ए सीक्रेट ट्रिप इन दि इंटीरियर ऑफ कोरिया. बज-बुक ऑफ दि डेड. हॉल-एन्शंट हिस्टरी ऑफ नियर ईस्ट. साईस-पॅट्रिआर्कल पॅलेस्टाइन. डे-सोशल लाइफ ऑफ दि हिब्रूज एन्सायक्लो. रिलिजन अँड एथिक्स ( हॉस्पिटॅलिटी) ]