विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आत्मा - निसर्गांतील जडाहून भिन्न असें जें तत्त्व तो आत्मा होय अशा अर्थानें हा शब्द भाषेंत उपयोजिला जातो. हा फरक देह व आत्मा या मनुष्यांतील दोन घटकांनी दर्शविला जातो. आत्म्याची कल्पना अगदीं प्राथमिक अवस्थेतील मनुष्याला असते; ती मनुष्याच्या देहाला चलनवलन करण्याचें सामर्थ्य देणारी शरीरान्तर्गत शक्ति या अर्थानें असते, आणि तीच कल्पना सर्वत्र लागू करून सर्व वस्तूंत आत्मा किंवा ईश्वरीतत्त्व आहे अशा प्रकारचा सर्वसजीवत्त्ववाद (अॅनि मिझम) प्राथमिक अवस्थेतील लोकांच्या धर्मकल्पनांत आढळतो. पण आत्मा म्हणजे जीव, जीवनरस हृदय, श्वास, प्राणज्योति, किंवा भूतपिशाच अशीं अनेक प्रकारचीं स्वरूपें कल्पिलेली आढळतात. आत्म्यासंबंधाची कल्पना अधिक प्रगत झाल्यावर त्याचीं जीवात्मा, भूतपिशाचस्वरूपा आत्मा आणि मुक्तात्मा किंवा ईश्वरस्वरूपी आत्मा किंवा परमात्मा अशी अवस्थांतरें मानिलीं जाऊं लागतात.
सध्यांचा भारतीय सुशिक्षित वर्ग आत्मा जीवापासून भिन्न न मानतां आत्म्याचें कार्य देह जिवंत ठेवणें हें होय असें मानतो. शरीरांतील जीव म्हणजेच आत्मा अशी कल्पना फार रूढ असलेली आढळते. तसेंच आत्म्याला सुख अनुभविणें असेल व आपल्या शक्तीचा प्रभाव दाखविणें असेल तर त्याला शरीराचा आश्रय केल्याशिवाय गत्यंतर नाहीं, म्हणून आत्मे मनुष्य देहांत शिरून कार्यप्रवृत्त होतात अशी कल्पना सर्वत्र आढळते. युरोपीयांत मात्र 'सोल' आणि 'लाईफ' ही भिन्न समजतात. यांच्या समजुताप्रमाणें सोल माणसांस असतो, पशूंस नसतो आणि तो बायकांस आहे किंवा नाहीं याविषयींहि चर्चा होई. उदाहरणार्थ 'माकाँच्या दुसऱ्या सिनॉड ' नामक सभेंत याविषयीं चर्चा झाली होती. लाकडी पुतळे किंवा दगडी मूर्ती यांमध्यें ईश्वरी आत्मे अधिष्ठान देऊन राहातात ही कल्पना सर्व मूर्तिपूजक धर्मांत मूलभूत असते. आज जगांत जे चार प्रमुख पारमार्थिक विचार संप्रदाय आहेत त्यांत आत्म्यासंबंधी काय कल्पना आहेत तें पाहू.
हिं दु. - वेद व ब्राह्मणे या प्राचीन भारतीय ग्रंथांत आत्म्यासंबंधींच्या कल्पना काय आहेत याची माहिती 'वेदविद्या' या भागांत दिली आहे (प्र. १४ वें पु. ३९०) तीवरून दिसू येतें कीं, वैदिक लोक हिंदुस्थानांत आले त्या वेळींच; देहाहून आत्मा निराळा असून तो मरणोत्तरहि कायम असतो या कल्पना त्यांच्यांत रूड होत्या. मृतपूर्वजांचें श्राद्ध वगैरे करून पिंड देणें या विधीवरून हेंच दिसतें. मनुष्यांचे आत्मे मरणोत्तर देवलोकीं जाऊन राहतात ही कल्पना प्रथम उद्भवून नंतर आत्मा अविनाशी असतो हें तत्त्व प्रस्थापित झालें असावें. यानंतरची पायरी पुनर्जन्मवाद व कर्मवाद ही होय. याचा अर्थ असा कीं, मनुष्याचा आत्मा पृथ्वीवर पुन्हां पुन्हां जन्माला येतो व मागील जन्मींच्या कर्मांचें फळ चालू जन्मीं भोगीत असतो. तसेंच चालू जन्मांतील कर्माचें फळ भोगण्याकरितां त्याला पुनर्जन्म येतो. याप्रमाणें जन्ममरणाचें गाडें सारखें निरंतर चालूं असतें. अर्थांत् फक्त देह मरणसमयी नष्ट होतो व आत्मा कायम राहून पुनर्जन्म घेतो. आत्मा अमर व शाश्वत आहे. याच कर्मवादांतील आणखी एक तत्त्व असें आहे कीं, मनुष्यानें एका जन्मांत फार चांगली कृत्यें केल्यास पुढल्या जन्मीं तो राजा किंवा देव होतो, पण वाईट कृत्यें केल्यास समाजांतील हलक्य जातींत किंवा पशुपक्ष्यांच्या योनींत किंवा वनस्पतींच्या जातींत, किंवा भूतपिशाचयोनींत जन्मास येतो. यावरूनच हें सिद्ध होतें की, मनुष्य, देव, प्राणी, वनस्पती, किंवा भूतपिशाच या सर्वांतील जे आत्मे ते सर्व एकाच प्रकारचे असतात व त्यांनां केवळ देहभिन्नत्वामुळें भिन्नता प्राप्त होत असते. आत्म्यासंबंधींचा हिंदु पारमार्थिक विचारांतील हा दुसरा महत्त्वाचा सिद्धांत होय. याच सिद्धन्तांत हिंदूंचे दैवतबाहुल्याचें मत प्रतिबिंबित झालेलें दिसतें.
याशिवाय आत्म्यांसबंधी आणखी एक महत्त्वाची कल्पना म्हणजे ब्रह्मात्मा किंवा परमात्मा ही होय. ही कल्पना अशी आहे कीं, दृश्य व अदृश्य अशा संपूर्ण विश्वाला आंत, बाहेर सर्व बाजूंनी व्यापून राहिलेलें असें उच्च तत्त्व आहे तें ब्रह्म होय. या ब्रह्मापासून सर्व देव, माणसें व विश्व निर्माण झालें. वेदान्तत्त्वज्ञानाचें मूलबीज यांतच आहे. त्यानंतर विचारी माणसांना असा प्रश्न पडला कीं, जन्ममरणाच्या फेऱ्यांतून कायमची सुटका होण्यास कांही मार्ग आहे कीं नाहीं? या प्रश्नाला अस्तिपक्षीं उत्तर देऊन अशी सुटका किंवा मुक्तता होण्याचे निरनिराळे मार्ग सुचविणारे अनेक तत्त्वज्ञानी पंथ निघाले. मनुष्याच्या शरीरांतील आत्मा आणि ब्रह्म किंवा परमात्मा दोन्हीं एकच आहेच हें ज्ञान ज्यास होते तो मुक्त होतो असा सिद्धांत पुढें मांडण्यांत आला. वेदान्त नामक तत्वज्ञानपंथाचें हेंच मूळ असून त्याचें विवेचन अगदी प्राचीन उपनिषदांत केलेलें आढळतें.
यानंतर सांख्य, वैशेषिक, अद्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैत, वगैरे निरनिराळे तत्वज्ञानाचे पंथ निघून त्यांनी जीवात्मा व परमात्मा यांच्या स्वरूपाबद्दल व जीवात्म्याला मुक्ति प्राप्त करून घेण्याच्या साधनांबद्दल निरनिराळ्या प्रकारचे प्रतिपादन केलें. (वेदान्त वैशेषिक संख्या. इ.पहा.) आत्मा मुक्त झाल्यावर तो सर्वव्यापी व सर्वज्ञानी बनतो असेंच या बहुतेक पंथांचें मत आहे. वैशेषिक दर्शन प्राण व आत्मा निराळे मानतें.
इस्लामी. - कुराणांत असें सांगितलें आहे की, अल्लानें प्रथम मनुष्य उत्पन्न केला, तेव्हां त्यानें मनुष्याच्या शरीरांत स्वतांचा निश्वास सोडून आत्मा किंवा जीव उत्पन्न केला. आणि याप्रमाणें उत्पन्न झालेल्या आदामाच्या आत्म्यापासून त्याच्या सर्व वंशजांचे आत्मे उत्पन्न झाले. गर्भावस्थेंतील देहामध्यें उत्पन्न होणारा आत्मा ही आत्म्याची द्वितीय उत्पत्ति होय. आत्मा हृदयामध्यें स्थित असतो व म्हणूनच धर्मज्ञान, धर्म बुद्धि व धर्मश्रद्धा किंवा अश्रद्धा हींहि माणसाच्या हदयांत असतात. म्हणूनच अश्रद्धावान माणसांचे हृदय अल्ला आकुंचित करतो व श्रद्धावानाचें हृदय मोठें करतो, असें करुाणांत सांगितलें आहे. बाह्य गोष्टीचें ज्ञान डोळे व कान यांच्याद्वारें हृदयास मिळते, म्हणून हीं दोन ज्ञानेंद्रियें कुराणांत विशेष महत्त्वाची मानली आहेत. महंमदाला अल्लानें प्रकटीकरणद्वारां आपली साक्ष जी पटविली ती श्रोत्रेंद्रियामार्गें होय, अशी इस्लामी दंतकथा आहे.
अल्लानें आत्त्मा प्रथम उत्पन्न केला त्याच वेळीं त्याच्यामध्यें दोन प्रवृत्ती, ( एक सत्प्रवृत्ति व दुसरी असत्प्रवृत्ति) उत्पन्न केल्या, आणि मनुष्यांतील या सत्प्रवृत्तीला उद्देशून महंमदानें आपला उपदेश करावा अशी मूळ कल्पना होती. पण महंमदानें पुढें मनुष्याला प्रवृत्तिस्वातंत्र्य असतें. ही गोष्ट नाकारून त्यानें सर्वस्वी अल्लाच्या शब्दाप्रमाणें म्हणजे कुराणांतील वचनांप्रमाणें चाललें पाहिजे असा उपदेश केला.
दुसरी गोष्टी ही कीं, अल्लानें बाहेरू आत्म शरीरांत घातला त्याप्रमाणे निद्रावस्थेंत किंवा मरणोत्तर त्याला हा आत्मा शरीरापासून निराळ करतां येतो. मरणानंतर शरीरापासून निराळा झालेला आत्मा कशा स्थितींत असतो याबाबद्दल कुराणांत जें वर्णन आहे त्यापैकीं थोडयाचाच निश्चित अर्थ करतां येतो. पुण्यशील लोक मरण पावले म्हणजे त्यांचे आत्मे आपल्या सन्निध ठेवतो आणि अंतिमन्यायदिनानंतर (डे ऑफ जजमेंट) शरीरें उत्थान पावलीं म्हणजे त्यांमध्ये ते आत्मे तो पुन्हां प्रस्थापित करतो.
अल्ला मनुष्यांचे आत्मे त्यांच्या जन्माची वेळ आली म्हणजे आपल्या स्वर्गीय राज्यांतून पाठवून देतो. त्याचप्रमाणें प्राणी, राक्षस, भूत पिशाच, देवदूत यांचे आत्मेहि देव उत्पन्न करतो. मृत्यू येतो तेव्हां आत्मा मुखाच्या मार्गानें बाहेर पडतो असें, आणि डोक्याच्या मागच्या भागांतून बाहेर पडतो असें कोणी म्हणतात. दुसरी अशी एक समजूत आहे कीं, मृत्यु आल्यावर आत्मा स्वर्गांत जातो, पण देव त्याला पुन्हा परत पाठवितो व तो आत्मा आपल्या थडग्यांतील शरीराभोंवतीं काहीं काळ फिरत राहतों. तेथें मुनकिर व नकीर नांवाचे देवदूत त्याची परीक्षा घेतात, आणि त्यानें इस्लामी धर्मावर श्रद्धा दाखविली तर त्याला स्वर्गात नेऊन देवाच्या सिंहासनानजीक एका मेणबत्तीवर ठेवतात. पण जों आत्मा पापी असतो व अल्लाला मानीत नाहीं त्याचा ते देवदूत तेथेंच छळ करतात व नंतर नरकांतहि छळ करतात. जे लोक धर्मश्रद्धावान असतात पण पापकर्म करतात त्यांना शुद्धिलोकामध्यें ठेवतात, परंतु सर्वसामान्य समजूत अशी आहे की अन्तिमन्यायदिनापर्यंत आत्मा पक्ष्याच्या स्वरूपांत-धर्मश्रद्धावंताचा आत्मा हिरव्या पक्ष्याच्या स्वरूपांत-राहतो ज्या माणसांचे खून झालेले असतात त्यांचे आत्मे घुबडाच्या स्वरूपांत थडग्याच्या बाजूस बसून सूड घेण्याकरितां ओरडत असतात.
बौ द्ध - बौद्ध धर्मग्रंथांत जीव, अत्तन, सुत्त, पुग्गल वेदगू, वगैरे अनेक शब्द आत्मा या अर्थीं आलेले दिसतात. जीव म्हणजे जिवंत असलेली वस्तु असा शब्दार्थ आहे. पण बौद्धग्रंथांत आत्मा या अर्थीं जीव हा शब्द बहुधा न वापरतां अत्तां, सुत्त पुग्गल यांपैकी कोणता तरी शब्द वापरतात, सुत्त.वाङ्मयांत 'अत्ता' हाच शब्द आत्मा या अर्थी जागजागीं वापरलेला आढळतो. वोदान्ती लोक आत्मा याचा जो अर्थ किंवा जे वर्णन करतात त्याच संबंधांत बौद्धांनीं त्यांच्याबरोबर मोठा वाद केलेला आहे. बौद्ध धर्मवेत्त्यांनीं देह व आत्मा हें हिंदूंचें द्वैतमत अमान्य केलें असून त्यांनीं शरीरांतील व्यापारांचें रूप, वेदना, विज्ञान, संज्ञा व संस्कार असे पांच खंध (स्कंध) कल्पिले आहेत; आणि विनाशी, विकारी व दुःखस्थान असलेल्या शरीरांत अविकारी, शाश्वत, आनंदमय असा आत्मा असणें शक्य नाहीं, असें त्याचें म्हणणें आहे. शरीरांत जीवात्मा म्हणून जो मानतात तो नसतो असें जरी त्यांचे मत आहे तरी मृत्यु येतांच शरीर व मन सर्वस्वी नाश पावतें असें मात्र ते मानीत नाहींत. सस्सतवाद, उच्छेदवाद अनिक्कवाद आणि कर्मवाद असे त्याचे चार प्रसिद्ध सिद्धांत आहेत. हिदूंचा कर्मवाद त्यांनीं मान्य करून असें म्हटलें आहे कीं मृत्यूनंतर मनुष्य कृतकर्मामुळे उत्पन्न झालेल्या एक प्रकारच्या शारिरिक व मानसिक शक्तीच्या रूपानें अस्तित्त्वांत राहतो व त्याला पुनर्जन्महि असतो. जीवात्म्यासंबंधाचें वेदान्त्यांचे म्हणणें अमान्य करून त्याऐवजीं मरणोत्तर स्थितीसंबंधानें स्वतःचे स्वतंत्र सिद्धांत नीटपणें पुढें मांडले नसल्यामुळे बौद्ध धर्माला एक प्रकारचा कायमचा दुर्बलपणा आलेला आहे. पुनर्जन्मावर विश्वास आणि आत्म्यावर अविश्वास यांची जुळणी करणें बौद्धांना नेहमी कठिण जात असे हे दाखविण्याकरितां एक प्राचीन संवाद येथे उदधृत करतें.
मिलिंदपन्द ग्रंथांत आत्म्यासंबंधीं विवेचनात्मक कथा आहेः-मिलिंद राजाकडे एकदां एक साधु आला असतां त्यांने त्याचें नांव विचारिलें. तेव्हां त्या साधूनें उत्तर दिलें कीं, ''मला नागसेन म्हणतात; परंतु तें केवळ नांव आहे, तो कांहीं आत्त्मा नव्हे अथवा त्या नांवाला कोणतेहि शरीर चिकटलेलें नाहीं.'' या गोष्टीबद्दल तो राजा आणि साधु यांच्यामध्यें एक अत्युत्कृष्ट संप्रादात्मक प्रवचन झालें. बौद्धधर्माचें जे आद्य तत्त्व कीं, आत्मा म्हणून कोणी वस्तु नाहीं, जीवात्म्याचें अस्तित्व वास्तविक नसून सृष्टीमध्यें फक्त पदार्थ विषयक व मानसिक क्रियांमध्यें सतत बदल होत असतात. या तत्त्वाची आणि बौद्धांनें स्वतः घेतलेल्या पुनर्जन्मपरंपरेची जुळणी करणें फार मुष्किलीचें आहे. यापेक्षांहि कर्मवादाचें तत्त्व, म्हणजे कर्मांनी फल असतें, हें जें सर्व बौद्धनीतिशास्त्रामध्यें अतिशय महत्त्वाचें तत्त्व, त्याची वरील तत्त्वाशीं संगति लावणे फारच कठिण आहे. या दोन प्रश्नांपैकीं पहिल्या प्रश्नासंबंधीं झालेला संवाद पुढें दिला आहेः-
राजा म्हणतो, ''आर्य नागसेन, जो पुन्हा जन्मास येतो तो तोच असतो किंवा दुसरा कोणी असतो ?''
थेर म्हणतो, ''तो तोच नसतो किंवा दुसराहि नसतो.''
''याला दृष्टांत सांगा.''
''राजा, तुला काय वाटतें ? तूं लहानपणीं पाय हलवणारें असें लहान मूल होतास, तसाच आतां मोठा झाल्यावरहि आहेस काय ?”
“नाहीं. महाराज, तो लहान मुलगाः तें पाय हलविणारें लहान मूल दुसरें होतें व मी आतां मोठा झाल्यावर दुसराच आहे.''
''असें जर असेल तर तुला कोणी माता नाहीं, पिता नाहीं. तुला कोणी शिक्षण दिलें नाहीं, तूं दहा नियमांचा केव्हांहि अभ्यास केला नाहींस व तुला केव्हांहि शहाणपण आलें नाहीं, तर मग हे राजा, निरनिराळ्या गर्भाच्या चार अवस्थांमध्यें त्याची आई प्रत्येक वेळीं निराळी होती काय ? त्याचेंच पुढें लहान मूल झाल्यावर त्याची आई दुसरी कोणी होती काय? व तो मोठा झाल्यावर त्याची तिसरीच कोणी आई असते काय ? ज्याला विद्या शिकविली जाते तो आणि ज्याला विद्या येते तो, हे निराळे असतात काय ? जो गुन्हा करतो तो निराळा आणि ज्याचे हातपाय तोडिले जातात तो निराळा, असें असतें काय ?''
''नाहीं महाराज, परंतु या गोष्टीला तुम्ही काय उत्तर द्याल ?''
''हे राजा, मी स्वतः लहान अर्भक, हातपाय हालवणारें मूल होतों व आतां मोठा मनुष्य आहें. एकाच शरीरामध्यें हीं सर्व एकत्र एकत्वानें वास करीत आहेत.''
''याला दृष्टांत सांगा.''
''हे राजा, जर एखाद्या मनुष्यानें दिवा लावला तर तो सर्व रात्र जळेल किंवा नाहीं ?''
''होय तो जळेल.''
''तर मग हे राजा. रात्रीच्या पहिल्या प्रहरांतील ज्योत आणि दुसऱ्या प्रहरांतील ज्योत, या एकच असतील काय?''
''नाहीं महाराज.''
''तर मग हे राजा, रात्रीच्या पहिल्या प्रहरांतील दिवा निराळा आणि शेवटच्या प्रहरांतील दिवा निराळा असें असूं शकेल काय ?''
''नाहीं, महाराज एकाच गोष्टीमुळें दिव्याचा सर्व रात्रभर प्रकाश पडत होता.''
''त्याप्रमाणेंच हे राजा, अशाच रीतीनें क्रियांची परंपरा अस्तित्त्वांत येते. जो उत्पन्न होतो तो निराळा, जो नाहीसा होतो तो निराळा; परंतु त्या दोहोंचा संबंध जोडणारें असें कांहीं तरी एक आहे आणि त्यामुळें मनुष्य जेव्हा अखेरीस निर्वाणामध्यें विलीन होतो तेव्हां तो तोच नसतो किंवा निराळाहि नसतो.''
जरी चिरकालीन आत्म्याचें अस्तित्व नसतें तरी सुद्धां मनुष्याला त्याच्या कर्माचें फल मिळतें. या गोष्टीच्या स्पष्टीकरणार्थ या ठिकाणीं एक दृष्टांतांची मालिकाच दिली आहे. त्यांपैकीं एक दृष्टांत दिला आहे.
''एका मनुष्यानें दुसऱ्याचें आंबे चोरले आहेत, अशी गोष्ट घ्या. आंब्यांच्या मालकांनें त्या मनुष्यास धरून राजापुढें नेलें आणि म्हटलें कीं, महाराज, यानें माझे आंबे चोरले आहेत. आतां जर तो चोर म्हणूं लागला कीं, महाराज मी या मनुष्याचे आंबे चोरले नाहींत. त्यानें जे आंबे लाविले ते निराळे होते व मी जे नेले ते निराळेच होते. तेव्हां मला क्षिक्षा करणें योग्य नाहीं, तर मग हे राजा, या मनुष्याला शिक्षा मिळेल काय?''
''होय, महाराज त्याला शिक्षा मिळाली पाहिजे.''
''कां बरें ?''
''ते मनुष्य कांहींहि म्हणाला, तरी त्यानें जे आंबे नेले, त्यांबद्दल त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. कारण पहिले आंबे जर नसते तर हे आंबे अस्तित्त्वांतच आले नसते.''
यापुढें राजाने नागसेनाला प्रश्न विचारिला कीं, सर्व दुःखांचा शेवट केवळ या जन्मींच संसारत्याग केल्यानें होत नाहीं, तर पूर्वजन्मींहि त्याकरितां प्रयत्न करणें अवश्य आहे, असें आपण म्हणतां हें कसें ? तेव्हां नागसेनानें राजास पुढील प्रश्नांत उत्तर दिलें आहे. ''तूं तहान लागल्यानंतरच विहीर खोदण्यास आरंभ करशील काय ?'' अथवा भूक लागल्यावरच तूं नांगरणी, पेरणी, कापणी यांचें शिक्षण घेशील काय ? अथवा शत्रू दरवाजाजवळ येऊन उभा राहिल्यावर तूं खंदक खोदण्यास, तट उभारण्यास व किल्ले बांधण्यास सुरुवात करशील काय ? ''
ख्रि स्ती. - जुन्या करारांत मानवी रचनेमध्यें द्वैत कल्पिलें नाहीं. देहा आणि आत्मा यांच्यांत मुळींच विरोध नाहीं इतकेंच नव्हें, तर ह्या शास्त्रांत देहाला वेगळा असा शब्द मुळींच सांपडत नाहीं. मनुष्य घटकद्वयानें बनला आहे. एक घटक म्हणजे निश्वास-आत्मा व दुसरा, त्यानें अचेतन केलेल्या शारीरिक इंद्रियांचे जाळें. हे दोन घटक वेगवेगळे केले तर मनुष्यच जाग्यावर उरत नाहीं. नव्या करारांत हीच कल्पना आधाराला घेतली आहे व मृत्यूनंतरहि मानवी तत्त्व शिल्लक राहतें हा नवा सिद्धांत तिला जोडला आहे. याशिवाय पवित्र आत्त्म्याचें तत्व ख्रिस्ती संप्रदायांत शिरून आत्त्म्याचें ईश्वराशीं नातें जोडण्यांत आलें. आत्त्म्याच्या रणभूमीवर पापरूपीं दैत्यांशीं पवित्र आत्मा लढतो व विजयी होतो ही कल्पना सेंटपालनें प्रसृत केली.
ज्यू वातावरणांतून निघून रोमन साम्राज्यभूमीवर जेव्हां ख्रिस्तीसंप्रदायानें पाय ठेवला तेव्हां आत्म्याविषयीच्या हिब्रृ कल्पनेला नवीन ग्रीक वळण लागलें. आत्मा ही विश्वांतील एक सृष्टवस्तु असून विश्वसंकल्पित साध्याचें ते एक साधन आहे. असें ग्रीक पंडित मानीत. ही ग्रीक कल्पना उघडपणें मूळच्या ख्रिस्ती कल्पनेच्या विरुद्ध होती. तथापि आत्म्याची ग्रीक कल्पना उचलतांना ख्रिस्त्यांनीं मृतदेह पुनरुत्थापित होतो ही मूळची ज्यू कल्पना टाकिली नाहीं हें विशेष आहे.
रेनायसन्स आणइ रेफॉर्मेशन यांपुढील काळीं आत्मतत्त्वाविषयीं अनेक प्रकारचे शोध झालें. त्या सर्वांत आत्म्याचे धर्मिक महत्त्व ख्रिस्ती लोकांना पटलेलें दिसतें.
आजच्या भारतीयांत आत्मा म्हणजे जीव समजतात. यूरोपीयांत जीवाशिवाय सोल म्हणून कांहीं चीज आहे असें म्हणणाऱ्या लोकांचे विचार अस्पष्ट आहेत. (संदर्भप्रंथ-सर्व देशांतील धार्मिक व तात्त्विक वाङ्मय).