विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आदमखान - (१५६१) याचे मूळ नांव अधमखान असें बीलचें म्हणणें आहे. हा हुमायूनचा राखीपुत्र असावा असें म्हणतात. अकबराची दाई (अनग) माहूम ही हुशार व खटपटी बाई होती. हरएक कारभारांत ढवळाढवळ करण्याची तिला हौस असे. ती स्वभावानेंहि दृष्टच होती. बहिराम खानास काढून टाकण्यात हिचे अंग हातें असें दिसतें. आपला मुलगा आदमखान यास योग्यतेस चढविण्यासाठीं तिनें नाहीं नाहीं त्या खटपटी केल्या. बाझबहादुर (प्रख्यात हिंदी कवियित्री राणी रुपमती हिचा पति) म्हणून एक पठाण सरदार माळवा प्रांतांतील कांहीं भाग बळकावून तेथील बादशहा बनला होता. त्याजवर अकबरानें ह्या आदमखानास पाठविलें. आदमखान हा अकबराचा विश्वासू कामदार होता. त्यानें बाझ-हादुरचा पराजय करून त्याचा सर्व मुलूख काबीज केला. तेव्हां बाझबहादुर बऱ्हाणपुराकडे पळून गेला. पुढें आदमखानानें बहादुरच्या राज्यात अधमपणाचें वर्तन चालविलें. सर्व लूट त्यानें स्वतःकडे ठेविली आणि बाझबहादुरचा जनानखानाहि आपल्याजवळ अडकवून ठेविला. त्यात बाझबहादुरची एक सुंदर स्त्री होती. ( ही रूपमतीच असावी). तिचा अभिलाष धरूल आदमखानानें तिच्या भेटीस जाण्याची वेळ नेमिली. तिला नाहीं म्हणतां येईना. ती सुंदर पोशाख करून आदमखान येण्याच्या वेळेस पलंगावर निजून राहिली. खान आल्यावर पाहतो तों ती मेलेली दिसली. आदमखानाकडून अप्रतिष्ठा न व्हावी म्हणून त्या पतिव्रतेने विष खाऊन आत्महत्या केली होती. बाझबहादुरच्या दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया जनानखान्यात होत्या. त्या अकरबरास चहाडया सागतील म्हणून माहूम अनगेनें सर्वांस ठार मारविलें. आदमखानानें हें अधिकाराबाहेर जें काम केलें तें अकबरास खपले नाहीं. तो एकदम फौज घेऊन आग्ऱ्याहून आला, आणि आदमखानास बरोबर घेऊन परत गेला. पुढें त्याजपासून सर्व लूट परत घेऊन त्यास कामावरून काढिलें, आणि त्याच्या जागीं आपला गुरु पीरमहंमदखान यास नेमिलें स्वतः बादशहा आपणावर रागावला आहे असें आदमखानास वाटलें नाहीं. महंमदखान उर्फ शम्सुद्दीन नांवाचा एक अकबराचा वजीर (व त्याच्या एका आवडत्या दाईचा नवरा) होता. बहरामखानाचा बंदोबस्त करण्यांत ह्यानेंच पुढाकार घेतला असून माहूम अनगेचें प्रस्थहि यानेंच मोडिलें म्हणून आदमखानाचा त्याजवर डोळा होता. तेव्हां हाच आपला नाश करूं पाहत आहे, असें समजून वजीर वाडयांत काम करीत बसला असतां त्याजकडे जाऊन त्याचा आदमनें प्राण घेतला (मे १५६२). हें वर्तमान ऐकून अकबर त्या ठिकाणीं आला; आदमखान त्याच गच्चीवर दिसला. अकबराचा हात तलवारीकडे गेला; पण झटकन आत्मसंयमन करून त्यानें आदमखानास गच्चीवरून खालीं लोटून देण्याचा हुकूम केला, तेणेंकरून त्याचा अंत झाला. अकबराचा चरित्रकार कर्नल मॅलेसन म्हणतो कीं, याप्रसंगीं आदमखांनानें जनान्याचा आश्रय घेतला असतांहि अकबरानें त्याचें राईराई एवढें तुकडे करून गच्चीवरून खंदकांत फेंकून दिले. मुलाच्या दुःखानें माहूम अनगा पुढें चाळीस दिवसांनी मरण पावली. [ सरदेसाई - मु. रियासत. बील-ओरियंटल बायॉग्राफिकल डिक्शनरी. इतिहाससंग्रह १.७ मॅलेसन-अकबर ]