विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आदाम - ख्रिस्ती संप्रदायदृष्टया हें जगांत प्रथम उत्पन्न केलेल्या माणसाचें नांव आहे. आदाम हा शब्द जातिवाचक आहे, म्हणजे यापासून मनुष्यजातीचा बोध होतो. परंतु याचा उपयोग फार प्राचीन काळापासून विशेषनामासारखा केला जात आहे.
आ दा म ची उ त्प त्ति. - बायबलमध्यें दिलेली कथा अशी आहे की ईश्वरानें एकंदर विश्वोत्पत्ति सहा दिवसांत केली. प्रारंभीं देवानें आकाश व पृथ्वी हीं उत्पन्न केली. प्रथम सर्वत्र अंधार पसरलेला होता व देवाचा आत्मा जलावर तरंगत होता. नंतर देवानें प्रकाश उत्पन्न केला. ही पहिल्या दिवंशीची कामगिरी होय. दुसऱ्या दिवशीं आकाश व जल निरनिराळें केलें; तिसर्या दिवशीं कोरडी जमीन व तीवर निरनिराळें झाडें, झडपें; चवथ्या दिवशीं ग्रहतारे; पांचव्या दिवशीं जीवजंतु व पक्षी; साहव्या दिवशीं अनेक जातींचे वनपशू व ग्राम्यपशू, यांप्रमाणें उत्पन्न केलें; व या सर्वांवर धनीपणा चालविणारें स्त्रीपुरुष असें एक जोडपें आपल्या प्रतिच्छायेपासून उत्पन्न केलें. भूमींतील मातीचा त्यानें मनुष्य करून त्याच्या नाकपुडयात प्राणवायु पुंकला. या मनुष्याकरितां एदनांत एक सुंदर बाग देवानें केली, व या आद्यपुरष आदाम याला सहकारिणी पाहिजे म्हणून त्याच्याच शरीराची एक फांसळी काढून त्यांत मांस भरून ईव्ह नांवाची स्त्री निर्माण केली. ही दोघे एदन येथील बागेंत प्रथम नग्नस्थितींतच राहूं लागलीं. या बागेंतील ज्ञानवृक्ष म्हणून जें झाड होतें त्याचें फळ खाऊं नका बाकी सर्व झाडाचीं फळें खा, असें देवानें सांगितले. पण एके दिवशी एक सर्प तेथें येऊन त्याने ईव्हचें मन वळवून त्या दोघांना ज्ञानवृक्षाचें फळ खाण्यास लावलें. त्याबरोबर ज्ञान होऊन त्यांनां नग्नस्थितींत राहण्याची लाज वाटूं लागली. तेव्हां त्यांनी अंजिरांचीं पानें शिवून स्वतःकरितां वस्त्रें केलीं. पण परमेश्वरानें ज्ञानवृक्षाचें फळ खाण्याच्या अपराधाबद्दल शाप देऊन त्या दोघांनां त्या बागेंतून बाहेर हांकून लाविलें. तेव्हांपासून मनुष्य मरणाधीन झाला. आदाम-ईव्हला एबेल, केन आणि सेथ. हे तीन मुलगे झाले. एबेलला केननें ठार मारलें केन व सेथ यांच्यापासून मानववंश विस्तारला
या कथेचें थोडक्यांत परीक्षण म्हणजे असें:- (१ ) ही गोष्ट वाचली असतां असें सहज मनांत येतें कीं, या कथेच्या लेखकास मानवी संस्कृतीचें व बौद्धिक उन्नतीचें फार भय वाटत असावें. (२) हिब्रू धर्मशास्त्रांतली ही आदाम-कथा फार साधी व सरळ आहे. (३) आदामास बोलतां कसें येऊं लागलें ? त्यास परीक्षणशक्ति व अंतर्ज्ञान कसें व कोठून प्राप्त झालें? सर्पानें आदामाचा नाश कां केला व तो कोण होता? यासारख्या प्रश्नांचीं उत्तरें देणें कठिण पडतें. (४) कित्येक ग्रंथकारांनी या कथेस रूपक मानून त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (५) ख्रिस्ती धर्मशास्त्रांत फार क्वचित प्रसंगीं या कथेचा उल्लेख केलेला आहे. यावरून असें वाटतें कीं ही कथा हिब्रूलोकांमध्यें दुसऱ्या कोणाकडून आली असावी. (६) या कथेच्या उगमाबद्दल बराच मतभेद आहे. ही कथा खालीं लिहिलेल्या बाबीलोनी गोष्टींवरून काहीं अंशी रचली असावी असें वाटतें.
बेरोससमध्यें सांगितलेल्या बाबिलोनियांतील बेल देवतेचा उपासक आणि बाबिलोनियन ज्योतिषशास्त्रावरील ग्रीक भाषांतर करणारा आपल्या ग्रंथांत असें म्हणतो कीं, देवगणांपैकीं एकानें ''बेल'' च्या हुकूमानें बेलचें रक्त व चिखल एकत्र करून मनुष्यास उत्पन्न केलें.
प्रा ची न बा बि लो न म ध्यें प्र च लि त अ स ले ली आ दा पा ची गो ष्ट. - तींत असें सांगितलें आहे की, देवानें आदाम किंवा आदापा यास उत्पन्न केलें, त्यास ज्ञानशक्ति दिली पण त्यास अमर केलें नाहीं. त्यास तसें होता आले असतें पण स्वर्गीय बापाच्या लबाडीमुळें तो मर्त्य झाला.
ए आ बा नी ची गो ष्ट. - यास आरुसु ह्या देवीनें चिखलांतून उत्पन्न केलें. याचे केस लांब होते. हा फार कामुक होता. रानटी अवस्थेंतून एका वेश्येंने त्याची सुटका केली.
ए ट ना ची गो ष्ट. - एटना इष्टार देवीपासून वर मिळविण्याकरितां स्वर्गात जाऊं लागला पण त्यास भीति वाटून तो पृथ्वीवर पडला. बायबलेतर ख्रिस्ती धर्मवाङ्मयांत व ज्यू वाङ्मयांत आदाम ही व्यक्ति जगदारंभीं कल्पिली आहे.
मुसुलमानांनीं आदामची कथा काहीं फेरफार करून ख्रिस्ती धर्मग्रंथांतूनच घेतली आहे, शिवाय बऱ्याचशा हिब्रूकथाहि आपल्याशा केल्या आहेत. त्यांच्या धर्मसंप्रदायांत आदाम ही महत्त्वाची व्यक्ति दिसते. त्याला त्यांनीं आपल्यातील दंतकथांनीं चांगलें सजविलें आहे.
आपल्या अष्टादशपुराणांत समाविष्ट केलेल्या भविष्य पुराणांत आदामची कथा आली आहे. (प्रतिसर्गपर्व. अ.४), तींत विष्णूनें आपल्या मळापासून आदम व हव्यवती या आदिमानव जोडप्याला उत्पन्न केलें असें म्हटलें आहे.