विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आदामाईट - ख्रिस्ती पाखंडयांचा एक पंथ. हा ख्रि.श. दुसऱ्या तिसऱ्या शतकांत उत्तर आफ्रिकेंत चांगला अस्तित्वांत होता. ख्रिस्ती संप्रदायाच्या बाल्यावस्थेंत उत्पन्न झालेलीं कांहीं 'ग्नॉस्टिक' मतें व कांहींशीं साधुवृत्ति धारण करून या पंथाचे लोक आपणांला अगदीं मूळच्या निर्दोषी आदामासारखे समजत. विवाहबंधन पापमूलक मानून तें विवाहाची पद्धत वर्ज करीत व विधिविरहित वाटेल तें आचरण करती व असें दिमाखानें सांगत कीं, आमचें कोणतेंहि कृत्य चांगलें किंवा वाईट ठरत नाहीं; म्हणजे कोणताच कलंक आम्हांला लागत नाहीं. हा पंथ फार दिवस टिकला नाहीं. पण मध्ययुगांत यूरोपखंडांत फ्री स्पिरिटच्या अनुयायांनी या पंथांची मतें पुन्हा एकवार पुढें आणिलीं.