विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आदिपुराण, का ल व क र्ता. - जैन लेखक जिनसेन व गुणभ्रदाचार्य यांनीं रचलेल्या महापुराण नामक ग्रंथाचा पूर्वार्ध. महापुराण हा ग्रंथ जिनसेनाच्या मनांत आपण स्वतःच सर्व लिहून संपवायचा होता. परंतु अर्धा अधिक ग्रंथ रचल्यावर जिनसेनास मृत्यु आल्यामुळें जिनसेनाचा शिष्य गुणभद्र यानें उरलेला ग्रंथ संपविला. या ग्रंथाचें संकल्पित नांव वस्तुतः महापुरणा असेंच आहे.
परंतु पहिल्या ४८ पर्वांत पहिल्या तीर्थंकाराचें चरित्र असल्यानें व तो एकंदर ग्रंथाचा पूर्वार्ध आहे म्हणून लौकिकांत त्याला आदिपुराण व उत्तरार्धास उत्तरपुराण असें म्हणतात. या आदिपुराणापैकीं जिनसेन स्वामीनें फक्त ४२ पर्व पूर्ण व ४३ व्या पर्वाचे ३ श्लोक केले असून बाकीचा भाग (१६२० श्लोक) गुणभद्रानें रचिला आहे. जिससेनकृत आदिपुराणाच भाग. इ.स. ८४३ च्या सुमारास पूर्ण झालेला दिसतो. त्याचें बहुतके आयुष्य राष्ट्रकूटांच्या राज्यांत म्हणजे महाराष्ट्र व कर्नाटक या भागांत गेलें असल्यामुळें महाराष्ट्रास त्यावर व त्याच्या ग्रंथावर बराच हक्क सांगता येण्यासारखा आहे.
स्व रू प. - एकंदर महापुरणांत २४ तीर्थंथर, १२ चक्रवतीं, ९ नारायण, ९ प्रतिनारायण व ९ बलभद्र या ६३ महापुरुषांचीं चरित्रें आलीं आहेत. यांपैकीं आदिपुराणांत मुख्यत्वेकरून प्रथम तीर्थंकर व प्रथम चक्रवती याच्यांच चरित्राचा समावेश होतो. जिगंबर संप्रदायांतील प्रथमानुयुगाचा हा प्रधानग्रंथ असून जैनवाङ्मयामध्यें हा एक परमोत्तम ग्रंथ समजला जातो आदिपुराण हे केवल पुराणच नसून कवीनें यांत आपल्या रचनाकौशल्यानें जैन लोकांच्या एकूण एक कथांचा, चरित्रांचा व भूगोलादि माहितीचा संग्रह केला आहे. जैन संप्रदायांची जेवढी म्हणून सर्वमान्यतत्त्वें आहेत ती सर्व या ग्रंथांत कोठेनां कोठें कांहीं तरी गोष्टींचा संबंध आणून कोणत्यानां कोणत्यातरी रूपानें निवेदन केलीं आहेत. या ग्रंथाचें प्रामाण्यहि बरेंच समजलें जात असून मागील ग्रंथकारांनी या ग्रंथातील आधार आर्ष म्हणून मोठया आदरानें उद्धृत केलेले सांपडतात.
कवीमध्येंहि ह्या ग्रंथाला काव्य म्हणून मान्यता आहे. यांत महाकाव्याची बहुतेक सगळीं लक्षणें आढळून येतात हा ग्रंथ श्रृंगारादि नवरसांनीं ओतप्रोत भरलेला असून यांतील काव्यहि सामन्यतः उच्च प्रतीचें आहे. पदालालित्य, अर्थसौष्ठव प्रासादिकपणा; गांभीर्य, कोमलता इत्यादि काव्याच्या सर्व गुणांनीं तो युक्त असून यांतील सृष्टिवर्णनें व मानसिक विचारांचे चित्र रेखाटण्याचें कामहि बरेंच साधलेलें आहे. जैन पंडितांच्य मतें यांतील काव्य वाचकांचें मनोरंजन करिते इतकेंच नव्हें, तर सुखाचा मार्ग दाखवून संसारांतील कष्टापासून स्वतःस मुक्त करून घेण्याचा प्रयत्न करण्यास वाचकांस उत्तेजन देतें. आधुनिक वाचकांस या ग्रंथांत कांहीं दोष आढळत असल्यास तो हा कीं, शृंगारादि रसांत वाचकांस तन्मय करून कवि तेथेंच थांबत नाहीं, तर लागलीच तो ते सर्व असार कसे आहेत हें दाखविण्याकरितां तत्त्वज्ञानांत शिरतो. पुराणांतील सर्व विषय ज्या एका गोष्टींच्या सूत्रांत गोविलेले आहेत ती पर्ववार पुढें दिल्याप्रमाणें आहे.
आ दि पु रा णां ती ल क था, प हि लें प र्वः - यांत मंगला. चरण, प्रतिज्ञा व महापुराण नांवाची सार्थकता, ग्रंथकाराचें लघुत्व प्राचीन कवींचें स्मरण, काव्य व कवि सज्जन व दुर्जन धर्मकथांचें महत्त्व, कथा, वक्ता व श्रोता यांचीं लक्षणें, कथा सांगण्याचा प्रसंग, पुराणाच्या श्रवणपठणाचें फल, हे विषय आहेत.
दुसरें पर्वः - श्रेणिक राजानें वर्द्धमान स्वामीजवळ येऊन पृच्छा केल्यावरून गौतम गणधर जमलेल्या मंडळींस पुराण सांगूं लागले, असा उपोद्धात करून यांत पुढें गणधरस्वामीची स्तुति व श्रुतस्कंधाच्या चार अनुयोगाचें वर्णन केलें आहे.
तिसरें पर्वः - यांत कालाचें लक्षण, वृषभदेवापूर्वींच्या तीन युगांचें वर्णन, वृषभदेवाच्या १४ पूर्वजांचें (कुलकाराचें) वर्णन व त्यांच्या काळची माहिती आहे.
चौथें पर्वः - यांत प्रथम देशवर्णन व सृष्टिकर्त्यांचा निषेध, जंबुद्वीप, गांधिला देश व आलकानगरी यांचे वर्णन येऊन मग अलका नगरीच्या अतिबलाच्या राज्याची हकीकत व त्याचें तपश्चरणार्थ गमन कथन केलें आहे, यापुढें अतिबलपुत्र महाबल याच्या कथेस आरंभ होतो.
पाचंवें पर्वः - महाबल एकदां राजसभेंत बसला असता महाबलाच्या मंत्र्यांनीं आंपल्या स्वामीपुढें धर्मनिरूपण केलें; व जीवतत्वाच्या विषयावर त्याच्या निरनिराळ्या मंत्र्यांमध्यें वादविवाद होऊन त्याच्यासमोर निरनिराळ्या मताचें मंडन व खंडन झालें. त्यापैकीं अरविंद, मणिमाली, शतबल व सहस्त्रबल यांच्या गोष्टी दृष्टांतादाखल कथन करून राजाच्या मनावर छाप बसविली. पुढें स्वयंबुद्ध एकदां मेरू पर्वतावर गेला असतां तेथें दोन गगनविहारी मुनींकडून स्वयंबुद्धास महाबलाच्या पूर्वजन्माची हकीकत कळली. त्या कीकतीच्या साहाय्यानें स्वयंबुद्धानें महाबलास पडलेल्या स्वप्नांचें स्पष्टीकरण करून त्यास तपश्चरणार्थ पाठविलें. महाबल मृत्यु पावल्यावर त्याचें ललितांग नामक देवांत रूपांतर होऊन तो स्वर्गास केला.
सहावें पर्वः - ललितांगाचा पुण्यक्षय होतांच त्याची स्वर्गांतून च्युति होऊन विदेह देशांतील उत्पल खेटक नगरच्या राजाच्या घरीं त्यानें वज्राजंघ नांवानें पुनर्जन्म घेतला व ललितांगदेवाची स्वर्गांतील आवडती राणी स्वयंप्रभा हिनें विदेहदेशांतील पुंडरीकिणी नगरीच्या वज्रदंत राजाच्या घरी श्रीमती नांवानें जन्म घेतला. श्रीमतीस एकदां पूर्वजन्माची आठवण होऊन ललितांगाशीं पुन्हां संयुक्त होण्याची तीस उत्कष्ट वासना झाली.
सातवें पर्वः - तेव्हां तिच्या पित्याने तिचें समाधान करून तीस आपल्या, तिच्या व वज्राबंधाच्या पूर्वजन्माची हकीकत सांगितली. यानंतर श्रीमतीच्या सखानें महापूत चैत्यालयांत जाऊन तेथे श्रीमतीच्या पूर्वजन्मींच्या कृत्यांचे चित्र अडकवून ठेविलें. वज्रजंघ चैत्यालयांत आला, तेव्हां त्यास चित्रांतील पूर्वजन्मीच्या गोष्टींची ओळख पटली व त्यावरून हाच ललितांग अशी सर्वांची खात्री होऊन वज्रजंघाचा श्रीमतीशीं म्हणजे त्याच्या मामेबहिणीशीं विवाह झाला.
आठवें पर्वः - वज्रजंघ हा श्रीमतीसह क्रीडा करीत व अनेक सुखांचा उपभोग घेत बरेच दिवसापर्यंत पुंडरीकिणी नगरींत आपल्या श्वशुरगृहीं राहून शेवटीं हत्ती, घोडे, रत्नभूषणें इत्यादि श्वशुराकडून मिळालेली विदागी घेऊन आपल्या उत्पलखेटक नगरीस परत आला. पुढें काहीं काळानें वज्रजंघाचा पिता वज्रबाहु यास शरत्कालचे क्षणभंगुर मेघ पाहून वैराग्य उत्पन्न झालें व त्यानें आपल्या पुत्राकडे राज्यकारभार सोंपवून जैनेश्वरी दीक्षा घेतली. इकडे वज्रजंघाचा सासरा वज्रदंत यासहि सगंधलोलुपतेनें कमलांत अडकून मरण पावलेल्या भ्रमराची स्थिति पाहून विषय सुखाचा वीट आला. त्यानें आपला पुत्र व वज्रजंघाचा भगिनीपति अमिततेजा यास राज्यकारभाराचा भार स्वतःच्या शिरावर घेण्याविषयी म्हटलें; पण त्यानें संसारांत पडण्याचें नाकारून आपल्या पित्याबरोबरच दीक्षा घेतली. वज्रजंघाला हें वर्तमान समजतांच तो ताबडतोब पुंडरीकिणी नगरीस जावयास निघाला. वाटेंत त्यानें आपल्या सैन्यांसहवर्तमान शष्प सरोवरीं मुक्काम केला असतां तेथे दोन दिगंबर चारणमुनींनीं येऊन त्यास त्याच्या पूर्वजन्माची हकीकत सांगितली, व पुढें आठव्या जन्मीं तुम्ही वृषभदेव तीर्थंकर व्हाल असें भविष्य कथन केलें. यानंतर वज्रजंघानें पंडरीकिणी नगरीस जाऊन आपली बहीण अतुंधरी हिचें समाधान केलें. व आपल्या अल्पवयस्क पुंडरीक नामक भाज्याच्या पुंडरीकिणी नगरीच्या राज्याचा बंदोबस्त करून तो स्वनगरास परत आला.
नववें पर्वः - वज्रजंघ व श्रीमती मरण पावल्यावर त्यांनां शष्पसरोवराच्या तीरीं दिगंबर मुनींनां केलेल्या अन्नदानामुळें उत्तरकुरूंच्या योगभूमींत जन्म प्राप्त झाला. तेथें त्यांच्या जीवास दोन मुनींच्या (यापैकी एक मुनि पूर्वजन्मीं वज्रजंघ महाबल नामक राजा असतांना त्याचा स्वयंबुद्ध नामक मंत्री होता) उपदेशामुळें सम्यग्दर्शन झालें व पुढें मृत्यु आल्यानंतर ते दोघे अनुक्रमें श्रीधर व स्वयंप्रभ देव होऊन दुसऱ्या ऐशान स्वर्गांत गेले.
दहावें पर्वः - श्रीधरदेव एकदां आपले गुरू श्रीप्रभ पर्वतावर आलेले ऐकून त्यांच्या भेटीस गेला असतां त्यानें आपण महाबल राजाच्या जन्मीं असतांना आपले जे तीन मिथ्यादृष्टि मंत्री हेते, त्यांची गति काय झाली. म्हणून विचारिलें व त्या प्रसंगानें श्रीधरदेवाच्या गुरूंने त्यास नरकांतील दुःखें सविस्तर वर्णन करून सांगितलीं. स्वर्गांतून च्युत झाल्यावर श्रीधरदेव पूर्वविदेहक्षेत्रांतल्या महावत्स देशींच्या सुसीमा नगरच्या राजाच्या घरीं सुविधि नामक पुत्र होऊन जन्मास आला व त्याच्या पूर्वजन्मीच्या श्रीमती राणीनें सुविधीच्या राणीच्या पोटीं मुलाचा जन्म घेतला. आयुष्याच्या अंती सुविधीनें निर्ग्रंथ दीक्षा धारण करून मोक्षमार्गाचें आराधन केलें व शरीरत्याग करून तो अच्युत स्वर्गाचा इंद्र झाला.
अकरावें पर्वः - हा अच्युतेंद्र नंतर पूर्वविदेहक्षेत्रांतल्या पुष्कलावती देशच्या पुंडरीकिणी नगरतींतील वज्रसेन राजाचा वज्रनाभि नामक पुत्र झाला व पूर्वी एका जन्मीं जे केवळ व्याघ्रादि जीव होते ते आपल्या पुण्यप्रभावेंकरून या वज्रानाभि राजपात्राचे बंधू झाले. वज्रनाभि राजा झाल्यावर त्यानें आपल्या आयुष्याच्या अंतीं मुलास राज्य देऊन आपण स्वतः दीक्षा घेतली व ध्यान, तपश्चरणादि करून मरणानंतर 'सर्वार्थसिद्धींत' अहमिंद्र पद मिळविलें.
बारावें पर्व: - अहमिंद्ररूपीं वज्रानाभीचें स्वर्गांतील आयुष्य संपल्यावर तो अयोध्यानगरींत इक्ष्वाकु कुलामध्यें चौदावा कुलकर जो क्षत्रियश्रेष्ठ नाभिराजा त्याची स्त्री मरुदेवी हिच्या पोटीं वृषभदेव तीर्थंकराचा जन्म घेण्यास उद्युक्त झाला. येथें वृषभदेव जन्मास येणार म्हणून या अयोध्या नगरीची रचना इंद्राच्या आज्ञेनें खास देवांनींच केली होती. अहमिंद्र मरूदेवीच्या गर्भांत प्रविष्ट होते वेळीं देवांनी त्या नगरीवर रत्नांचा वर्षाव केला. मरुदेवीला सोळा स्वप्नें पडून वृषभदेवाच्या जन्माच्या सूचक अशा शुभ्र गजादि सोळा शुभ वस्तू दिसल्या. इंद्रादि देवांनीं भूलोकावर येऊन उत्सव केला व इंद्राच्या आज्ञेनें दिक्कुमारी देवी मरुदेवीची सेवा करूं लागल्या.
तेरावें पर्वः - नऊ मास पूर्ण झाल्यावर वृषभदेवाचा जन्म झाला. तेव्हा सौधर्म स्वर्गांच इंद्र हा इंद्राणी व देवगण यांच्यासहित अयोध्येस आला व मरुदेवीस मोहनिद्रा आणून इंद्राणीमार्फत एक मायावी मूल मरुदेवीजवळ ठेवून तो वृषभदेवास घेऊन मेरुपर्वतावर गेला. तेथें वृषभदेवास अभिषेक करण्यंत येऊन त्याची पोडशोंपचारें पूजा करण्यांत आली.
चौदावें पर्वः - मग इंद्राणीनें वृषभदेवास नानाविध अलंकारांनी भूषित केल्यावर इंद्रानें त्याची स्तुति केली व नंतर तो त्यास पुन्हां अयोध्येस घेऊन आला. तेथें आल्यावर त्यानें मरुदेवीची मोहनिद्रा दूर केली व तिची व नाभिराजाची अतिशय स्तुति करून तो आनंदानें नृत्य करूं लागला. यानंतर त्या बालकाचा नामकरणविधी होऊन त्याचें उपर्युक्त वृषभदेव हें नांव ठेवण्यात आलें. या बालकाचें संगोपण करण्याकरितां निरनिराळ्या देवता दायी होऊन अयोध्येस राहिल्या होत्या.
पंधरावें पर्वः - वृषभदेवास यौवनावस्था प्राप्त झाल्यावर नाभिराजानें त्याचा कच्छमहाकच्छाच्या भगिनी यशस्वती व सुनंदा या सुरूप कन्यकांशीं विवाह लावून दिला. पुढें यशस्वतीस गर्भ राहून यथाकालीं चक्रवतींच्या लक्षणांनी युक्त असा भरत नामक पुत्र झाला.
सोळावें पर्वः - भरतानंतर वृषभदेवास यशस्वीतपासून आणखी ९९ पुत्र व ब्राह्मी नांवाची एक कन्या आणि दुसऱ्या सुनदा राणीपासून त्यास बाहुलली नामक पुत्र व सुंदरी नांवाची कन्या झाली. ही सुंदरी वृषभदेव जेव्हां वज्रजंघाच्य जन्मी होता तेव्हां त्याची अतुंधरी नामक धाकटी बहीण होती व त्याचे दुसरे कांहीं पुत्रहि असेच त्याचे पूर्वजन्मीचे ॠणानुबंधी मनुष्य किंवा प्राणी असून आपल्या कर्मानुसार निरनिराळे जन्म घेऊन व स्वर्गवास करून ते आतां वृषभदेवाचे पुत्र झाले होते. वृषभदेवानें आपल्या दोन कन्यांनां व्यकारण, छंद व अलंकार हीं शास्त्रें शिकविलीं व आपल्या १०१ पुत्रांकडून विनयादि शास्त्रांचें अध्ययन करविलें. वृषभदेवाचा वीस (पूर्व?) लक्षांचा कुमारकाल संपण्याच्या सुमारास या पृथ्वीवरील सर्व कल्पवृक्ष नष्ट होऊन औषधी शक्तिहीन झाल्यामुळें व प्रजा रोगांनीं व्याप्त होऊन तौ नाभिराजाकडे आली. नाभिरजानें या लोकांस आपली दुःखें वृषभदेवाकडे जाऊन कळविण्याविषयी सांगितलें. तेव्हां वृषभदेवानें स्मरणमात्रें करून इंद्रास बोलाविलें व त्याच्याकडून जशी विदेहक्षेत्रांत पृथक घरें व गांव इत्यादिकांची रचना होती तशी या भरतक्षेत्रांतहि करविली, व सहा कर्मांचा उपदेश करून क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे तीन वर्ण प्रगट केले. येणेंप्रमाणें प्रजेस सुस्थिति प्राप्त झाली तेव्हां खुद्द देवांनीं येऊन वृषभदेवास राज्याभिषेक केला. वृषभदेवानें प्रथमतः प्रजा उत्पन्न केली व त्यानंतर प्रजेच्या आजीविकेचे नियम तयार करून त्यांनीं आपआपल्या मर्यादांचें उल्लंघन करूं नये म्हणून नियम घालून देऊन राज्यकारभार करण्यास सुरुवात केली.
सतरावें पर्वः - इंद्रानें नीलांजना नामक देवांगनेचें नृत्य चाललें असतां मृत्यु घडवून आणल्यामुळें वृषभदेवांस वैराग्य प्राप्त झाले व तो भरतास राज्यपदीं व बाहुबलीस युवराज पदीं स्थापून दीक्षा घेण्यास सिद्ध झाला. तेव्हां इंद्रादि देवांनी मोठया हर्षानें येऊन वृषभदेवास पालखींत घालून वनांत नेलें. शोकपूर्ण अंतःकरणानें त्याच्या सर्व राण्या व मात-पिता त्याचा दीक्षाग्रहण समारंभ पाहण्यासाठी सिद्धार्थक वनांत त्याच्या मागोमाग गेले. वृषभदेवानें दीक्षा घेतली तेव्हा इंद्रानें त्याची स्तुति केली.
अठरावें व एकोणिसावें पर्वः - वृषभदेवानें सहा महिने उपवास करण्याची प्रतिज्ञा करून तपश्चरण करण्यास प्रारंभ केला. अनशनादि सहा बाह्यतपें, प्रायश्चितादि सहा अंतरंग तपें, अहिंसादि पांच महाव्रतें इत्यादिकांनीं वृषभदेवाचें शरीर अत्यंत देदीप्यमान झालें. वृषभदेवाची तपश्चर्या चालू असतां कच्छ व महाकच्छ राजांचे पुत्र नमि व विनमि हे तेथें आले व ते वृषभदेवाच्या पायीं लागून राज्याचा कांहीं भाग आपणांसहि द्यावा म्हणून आर्जव करूं लागले. वृषभदेवाच्या तपश्चर्येंत हें विघ्न उद्भवलेलें जाणून फणीश्वर धरणेंद्र हा तेथें आला व निमि व विनिमि यांची समजूत घालून त्यांनां विजयार्द्ध पर्वतावर घेऊन आला; व या अत्यंत शोभायमान विजयार्द्ध पर्वताच्या उत्तर व दक्षिण श्रेणींचें राज्य त्या राजपुत्रांस देऊन धरणेंद्रानें त्याचें समाधान केलें.
विसावें व एकविसावें पर्वः - शरीरधारणा करण्यासाठीं आहार ग्रहण करण्याचा मार्ग दाखविण्यासाठीं वृषभदेव संचारार्थ निघाला व सहा महिन्यांनी हस्तिनापुरीं सोमप्रभराच्या मंदिरांत प्रवेश करून त्याच्या श्रेयांस नामक भावानें केलेलें आहारदान ग्रहाण करता झाला. मौनव्रतधारी वृषभदेवानें श्रेयांसाकडून आहारदान घेतल्याचें समजतांच वृषभदेवपुत्र भरतानें श्रेयांसाकडून आहारदानविधीची माहिती करून घेतली. यानंतर वृषभदेव एकदां पुरिमताल नगराच्या एका उद्यानांत ध्यान लावून बसले असतां त्यास केवलज्ञानाची प्राप्ति झाली.
बाविसावें व तेविसावें पर्वः - वृषभदेवास केवलज्ञानाची प्राप्ति होऊन त्याच्या कर्मांचा नाश होतांच तीनहि लोकांत मोठी खळबळ उडाली. इंद्रादि देवांस मोठा आनंद होऊन ते स्वार्गांतून वृषभदेवाच्या दर्शनास आले, व इंद्र आणि इंद्राणी यांनीं वृषभदेवाची पूजा करून त्याची स्तुति केली.
चोविसावें पर्वः - इकडे भरतास कंचुकीकडून पुत्रजन्माची वार्ता, आयुधपालाकडून चक्रोत्पत्तीची हकीकत व मुनिजनांकडून पित्यास कैवल्यप्राप्तीची बातमी या एकदमच कळल्या असतां त्यानें इतर सर्व गोष्टीं बाजूस ठेवून प्रथम पित्याकडे जाऊन त्याची पूजा केल व अष्टोत्तरशत नामावलीनें त्याची स्तुति केली. यानंतर भरतानें विचारल्यावरून वृषभदेवानें त्यास जीवादी तत्त्वांचे स्वरूप समजावून सांगितलें. भरताच्या बंधूनें वृषभसेनापासून दीक्षा घेऊन तो पहिला गणधर झाला; व वृषभसेनाच्या कन्या ब्राह्मी आणि सुंदरी त्याचप्रमाणें सोम, श्रेयास इत्यादिकांनींहि दीक्षा घेतल्या.
पंचविसावें पर्वः - भरत गेल्यानंतर इंद्रानें सहस्त्रनामावलियुक्त अशी वृषभदेवांची स्तुति केली व मग वृषभदेव भूतलावरील लोकांवर अनुग्रह करण्याकरितां पुन्हा संचारार्थ निघाला.
सव्विसावें, सत्ताविसावें व अट्ठाविसावें पर्वः - पितृपूजा करून आल्यावर भरतानें प्रथम चक्राची पूजा करून नंतर पुत्रजन्माबद्दल उत्सव केला. पुढें शरदृतु प्राप्त झाल्यावर तो सैन्य घेऊन दिग्विजयार्थ निघाला. प्रथम पूर्व दिशेच्या रोखे निघून त्यानें गंगाकाठीं आपला तळ दिला, व पुढें गंगेच्या किनाऱ्याकिनाऱ्यानें भिल्लादि राजांनां अंकित करीत तो समुद्रकिनाऱ्यावर येऊन पोहोंचला, पण त्या समुद्रास गाईच्या खुरांतील डबक्याप्रमाणें तुच्छ लेखून तो रथांत बसून त्यांत प्रवेश करता झाला, व इच्छितस्थळीं पोंचल्यावर त्यानें बाणाच्या टोंकास 'हा वृषभदेवाचा पुत्र चक्रवर्ती भरत याचा बाण असून त्याच्या टप्प्यांत राहणारे तुह्मी सर्व त्याचे अंकित आहांत' असें लिहून तो पूर्व दिशेस झाडला. हा बाण मगध देशांत जाऊन पडला तेव्हां मगध देवास अत्यंत क्रोध आला; पण मगध-देवाच्या निकटवर्तीदेवांनी त्याची समजूत केल्यामुळें तो भरतास येऊन भेटला व त्यास कारभार देता झाला.
एकोणतिसावें व तिसावें पर्वः - यानंतर भरत पूर्वेकडील देश पादाक्रांत करीत समुद्राच्या किनाऱ्याकिनाऱ्यानें दक्षिणेस गेला व त्याहि भागांतील राजे अंकित करून त्यानें दक्षिण समुद्राच्या किनाऱ्यावर आपला तळ दिला. तेथें त्यानें हत्तींची क्रीडा अवलोकन केली. पुढें दक्षिणसमुद्राचा स्वामी वरतनुदेवस यास जिंकून तो पश्चिमेकडील देश पादाक्रांत करीत नर्मदातीरी आला, व गिरनारच्या तराईंतून निघून त्यानें सिंधु नदीच्या संगमावर मुक्काम केला. यानंतर त्यानें पश्चिम समुद्राचा स्वामी प्रभासदेव याचा पराभव केला.
एकतीसावें पर्वः - पुढें तो सिंधुनदाच्या किनाऱ्याकिनाऱ्याने उत्तर दिशेस कूच करीत विजयार्द्ध पर्वतानजीक येऊन पोहोंचला. तेथें विजयार्द्धपर्वताच्या स्वामीनें भरताच्या भेटीस येऊन त्यास करभार देतांच सर्व दक्षिण भारत पादाक्रांत करण्याचें काम संपूर्ण झाल्यामुळें भरतानें गधपुष्पादिकांनीं चक्राची पूजा केली. नंतर तेथेंच मुक्काम करून भरत उत्तर दिशेस जाण्याची तयारी करीत असतां कृतमाल नामक देवानें येऊन त्यास विजयार्द्ध पर्वतांतील घांट वगैरेंचीं माहिती सांगितली. भरतानें मग आपल्या सेनापतीस पाठवून दंडनीतीनें विजयार्द्धपर्वताच्या समीपवर्ती सर्व राजांस आपलें अंकित केलें.
बत्तिसावें पर्वः - यानंतर भरत विजयार्द्ध पर्वतांतील तमिस्त्रा नामक घांटानें आपल्या सैन्यासह बाहेर पडला व चिलात व आवर्त नांवांच्या म्लेच्छ राजांबरोबर युद्ध करून त्यानें त्यांस जिंकून घेतलें. व मग तो जेथून सिंधु नद हिमालयांतून पडतो. त्या ठिकाणीं आला. येथील हिमालय पर्वताची शोभा पाहिल्यावर तो वृषभाचल पर्वत पहावयास गेला व तेथें एका शिलेवर आपली प्रशस्ति लिहून तो जेथें गंगानदी हिमालयांतून पडते त्या स्थळीं आला. आपल्या सेनापतीस पूर्वखंड पादाक्रांत करण्यास पाठवून भरत स्वस्थ विश्रांति घेत पडला असतां, त्या भागांतील विद्याधराचे स्वामी नमि व विनमि यांनीं भरताच्या भेटीस येऊन त्यास आपली सुभद्रा नामक भगिनी अर्पण केली. म्लेच्छ राजांनां पादाक्रांत करून सेनापति परत आल्यावर भरत कांडकप्रपात नामक घाटानें दक्षिणेकडे आला.
तेहेतीसावें पर्वः - अशा रीतीनें पर्वत ओलांडीत येत असतां भरत कैलासपर्वतापाशीं आला, तेव्हां त्यानें त्या पर्वतावर जाऊन जिनेंद्रदेवाची पूजा व स्तुति केली, व नंतर तो ठिकठिकाणीं मुक्काम करीत दिग्विजयास निघाल्यापासून साठ हजार वर्षांनीं अयोध्येस परत आला.
चौतिसावें पर्वः - परंतु चारहि दिशाचा दिग्विजय करीत असतांना कोठेहि न अडलेलें भरताचें चक्र अयोध्येच्या बाहेर थबकून राहिलें. याचें कारण अद्यापर्यंत स्वतः भरताचे बंधू परस्परांतील मत्सरभाव सोडून त्याचे अंकित झाले नव्हते, असें सांगण्यांत आल्यावरून भरतानें आपल्या बंधूस आपणांस शरण येण्याविषयीं निरोप पाठविला. 'आमचा पिता जिवंत असतांना आम्ही त्याशिवाय इतरास प्रणाम कसा करावा' असें म्हणून भरताचें बंधू वृषभदेवाकडे सल्ला विचारण्यास गेले. वृषभदेवाच्या उपदेशानें त्या सर्वांनी दीक्षा घेऊन तपश्चरणास सुरुवात केली.
पसतीतावें, छतीसावें व सदतीसावें पर्वः - भरताचा सापत्नबंधु बाहुबली यानें दीक्षा घेतली नाहीं, किंवा भरताच्या निरोपाप्रमाणें तो त्याच्या आज्ञेनुसार वागण्यासहि तयार झाला नाहीं. यामुळें भरतास त्याशीं युद्ध करणें प्राप्त झालें बाहुबलीनें दृष्टियुद्ध, जलयुद्ध व मलयुद्ध या तहीतहि आपल्या वडील बंधूस पराभूत केलें. परंतु साम्राज्यलक्ष्मीची ही चंचलता पाहून त्यास वैराग्य आलें व त्यानें दीक्षा घेऊन तपश्चरण आरंभिले, व केवलज्ञान प्राप्त करून घेतले. भरत आपल्या राजधानींत आल्यावर मोठमोठ्या राजांनीं येऊन त्याचा राज्याभिषेक पार पाडला.
अडतीसावें, एकोणचाळीसावें व चाळीसावें पर्वः - नंतर भरतास धनदान करून लोकांस संतुष्ट करण्यासाठीं महोदय यज्ञ करण्याची इच्छा; झाली व त्यानें सदाचरणी लोक निवडून ब्राह्मणवर्णाची स्थापना केली, व त्यांनां पूजा, जीविका, दान इत्यादिकांचा उपदेश केला, व गर्भान्वय दीक्षान्वय, कर्त्रन्वय, वगैरे क्रिया त्यांस सांगून भूमी शुद्ध करण्याचे मंत्र, सात प्रकारचे पीठिकामंत्र, गर्भाधानादि क्रियांचे विशेष मंत्र इत्यादि गोष्टी त्यांस पढविल्या.
एकेचाळीसावें पर्वः - पुढें कालांतरानें भरतास एकदां दुःस्वप्न पडल्यावरून त्यानें वृषभदेवाकडे जाऊन आपल्या ब्राह्मणवर्णाच्या स्थापनेंत कांहीं दोष राहिले आहेत कीं काय म्हणून विचारिलें. तेव्हा वृषभदेवानें सांगितलें कीं तूं केलेली ही वर्णस्थापना चौथ्या कालाच्या अंतापर्यंत ठीक चालेल, परंतु पुढें कलियुगांत या ब्राह्मणांनां अहंकार उत्पन्न होऊन ते लोकांस मिथ्याशास्त्रें पढवूं लागतील. हें ऐकून भरतानें घरीं आल्यावर अनिष्टशांत्यर्थ्य भगवंताला अभिषेक, दान वगैरे कृत्यें केली.
बेचाळीसावें पर्वः - पुढें एके दिवशीं राजेलोकांच्या सभेमध्यें भरत सिंहासनावर अधिष्ठित झाला असतांना त्याने क्षत्रियमर्धाचा उपदेश केला.
त्रेचाळीसावें पर्वः - येथून पुराणाचा पुढील भाग गुणभद्रानें केला असल्यामुळें तो आरंभीं जिनसेनापेक्षां आपलें लघुत्व कबूल करतो, नंतर श्रेणिक राजानें गौतमगणधरास, स्वयंवरप्रवर्तक भरतपुत्र अर्ककीर्तीस जिंकणारा, व वृषभदेवाच्या ८४ गणधरांपैकीं ७१ वा गणधार जो जयकुमार त्याचें चरित्र विचारल्यावरून गौतम तें कथन करतो, अशा प्रस्तावनेनें पुढील कथेस आरंभ होतो. जयकुमार हा हस्तिनापुरच्या सोमप्रभ राजाचा वडील पुत्र असून सोमप्रभानें दीक्षा घेतल्यावर तो राजा झाला. वारणसी नगरीच्या अकंपन राजानें आपली सुस्वरूप कन्या सुलोचना हिचें स्वयंवर मांडल्यावरून त्यासाठीं इतर राजांप्रमाणें जयकुमारहि गेला असतां. सुलोचनेनें त्यास वरमाळ घातली.
चव्वेचाळीसावें पर्वः - हें पाहून भरताचा मुलगा अर्ककीर्ति यानें मत्सरप्रेरित होऊन युद्धची तयारी केली. अकंपन राजानें त्याची समजूत घालण्याचा आपल्याकडून प्रयत्न केला, पण तो निष्फळ झाला. तेव्हां जयकुमार क्रोधाविष्ट होऊन अर्ककीर्तीशीं लढण्यास आला. अर्ककीर्ति व जय कुमार या दोहोंत झालेल्या युद्धमध्यें जयकुमारास पूर्वोपकृत अशा एका नागदेवाकडून नागपाश व बाण मिळाल्यामुळें जयकुमारानें अर्ककीर्तीचा पराभव करून त्यास कैद केलें. युद्धंतील प्राणहाणि पाहून जयकुमारास वाईट वाटलें व त्यानें घरी आल्यावर भगवन्ताची स्तुति केली.
पंचेचाळीसावें पर्वः - अकंपनानें आपल्या मंत्र्याच्या सल्ल्यानें अर्ककीर्तीची क्षमा मागून त्याचा जयकुमाराशीं सलोखा करून दिला, व त्यास आपली धाकटी कन्या देऊन त्याची रवानगी केली. इकडे जयकुमाराचाहि सुलोचनेशीं विवाह झाला. अकंपनानें भरत चक्रवतींकडे आपला दूत पाठवून त्यास सुप्रसन्न करून घेतलें व मागून श्वशुरगृहाहून घरी जात असतां जयकुमारहि भरताच्या भेटीस जाऊन आला. अकंपनास पुढें वैराग्य उत्पन्न होऊन त्यानें दीक्षा घेतली व त्यास केवलज्ञानाची प्राप्ति झाली.
शेचाळीसावें व सत्तेचाळीसावें पर्वः - एके दिवशीं एका विद्याधरविद्याधरींच्या जोडप्यास पाहून पूर्वजन्माचें स्मरण होऊन जयकुमाराच्या तोंडून 'हे प्रभावती' व सुलोचनेच्या तोंडून 'हे रतिवर' असे शब्द बाहेर पडले. त्यामुळें लोकांनीं उगीच संदेहांत राहून शंका कुशंका काढूं नये म्हणून जयकुमारानें सुलोचनेकडून आपल्या पूर्वजन्माची हकीकत सर्वांस सांगितली. पुढें जयकुमार आपल्या भावास राज्य देऊन देशपर्यटन करून आला व नंतर आपल्या मुलास गादीवर बसवूत त्यानें दीक्षा घेतली. तेव्हां सुलोचनेस अत्यंत दुःख होऊन तिनेंहि दीक्षा घेतली. पुढें एके प्रसंगीं भरतानें पृच्छा केल्यावरून वृषभदेवानें त्यास धर्मनिरूपण केलें व यानंतर कांहीं काळानें वृषभदेव मोक्षाप्रत जाते झाले. वृषभसेन गणधरानें भरताचें शांतवन केल्यावर तो स्वनगरीं परत आला. शेवटीं भरतहि विरक्त होऊन त्यानें दीक्षा घेतली व त्यास केवलज्ञान होऊन तो मुक्त झाला. यथाकालानें सर्व गणधरहि मुक्त झाले.
प र्या लो च न - आदिपुराणांतील कथासूत्र वर दिल्याप्रमाणें आहे. या कथासूत्राच्या अनुषंगानें कवीनें ठिकठिकाणीं वनश्रीचें वर्णन, नगरांचें वर्णन, स्त्रियांच्या सौंदर्याचें वर्णन, ॠतुंचें वर्णन, कामलीलांचे वर्णन, सेनेचें वर्णन, युद्धाचें वर्णन इत्यादि अनेक गोष्टींचा आपल्या ग्रंथांत समावेश करून काव्याचा परिपोष करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याबराबेरच या ग्रंथांत आपल्या सर्व धर्णतत्त्वांचा समावेश करून आपल्या पंथाचा तो एक आदर्शभूत धर्मग्रंथ करण्याचें ध्येयहि कवीनें आपल्यापुढें ठेवलेलें आहे. यामुळें पुष्कळ ठिकाणीं पंथाबाहेरील वाचकांस अगदींच तो नीरस होईल. जेथें जेथें म्हणून वृषभदेवाशीं संबंध आला आहे तेथें तेथें कवीनें त्याचें एक स्तोत्र रचून ठेविलेलें असून एक दोन ठिकाणीं तर त्याची मजल अष्टोत्तरशत नामावलि किंवा सहस्त्रनाम यासारख्या अगदींच रुक्ष याद्या देण्यापर्यंत आली आहे. वृषभदेवाच्या ध्यानाचें वर्णन करण्याकरितां सबंध एकविसावें पर्व ( अडीचशेंहून अधिक श्लोक) खर्ची घातले असून ३८-४२ हीं पांच पर्वें केवळ सांप्रदायिक तत्त्वें व विधी यांच्या हकीकतींनींच भरली आहेत. पुराण जैन सांप्रदायिक आहे, तरी त्यावर ठिकठिकाणीं हिंदू पुराणांची छाप पडलेली दिसून येते. वृषभदेवास जैन लोक ईश्वरी अवताराप्रमाणें मानीत असल्याप्रमाणें त्याच्या गर्भप्रवेशाच्यावेळीं किंवा जन्माच्यावेळीं इंद्रादि देव आनंदोत्सव करतात व तो राज्योपभोगांत निमग्न झालेला पाहून त्यास अवतारकार्याची आठवण देतात. असलीं वर्णनें जरी कांहीं अंशीं साहजिक वाटलीं, तरी इंद्र प्रत्येक वेळेस मर्त्यलोकीं येऊन वृषभदेवापुढें चाकराप्रमाणें वर्तत असल्याचें दाविण्यांत कवीनें बराचसा अतिरेक केलेला दिसतो. असल्या ग्रंथावर संस्कृत वाङ्मयाचें किंवा कवीचें वर्चस्व पडणें अगदीं अपरिहार्य होतें. उदाहरणार्थ, नवव्या पर्वांतील वज्रजंघ व श्रीमती यांच्या सहा ॠतुंतील भोगांचे वर्णन साधारणतः ॠतुसंहाराच्या धर्तीवर लिहिलेले आहे. अकराव्या पर्वांतील वज्रनाभि राजाच्या व त्याच्या दीक्षागृहीत वज्रसेन पित्याच्या वैभवाच्या तुलनेचे ४९-५५ श्लोक वाचून कोणासहि रघुवंशांतील अज राजाच्या व त्याच्या संन्यस्त पित्याच्या तुलनेची आठवण झाल्याशिवाय राहणार नाहीं. 'स्वपूर्वापरकोटिभ्यां विगाह्य लवणार्णवं । मध्यें भारतवर्षस्य स्थितं तन्मानदंडवत्' (पर्व १८) यासारख्या कांहीं उपमांतून तर कालिदासाचीच शब्दरचना थोडासा फेरफार करून उसनी घेतलेली दिसते ('पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थित- पृथिव्या इव मानदण्डः' हा श्लोकार्ध पहा). एकंदर संस्कृत कवींत या पुराणाच्या कर्त्याचा कालिदासाच्या ग्रंथांशींच निकट परिचय होता हे त्याच्या 'पार्श्वाभ्युदय' नांवाच्या काव्यावरून तर स्पष्टच दिसतें. या काव्यांत मेघदूतांतील प्रत्येक ओळ समस्यापूर्तींसाठीं घेऊन सबंध पार्श्वचरित्र लिहिलें आहे. कथानकाच्या दृष्टीनें या ग्रंथातील विशेष म्हटला म्हणजे त्यांतील पुनर्जन्मविषयक भाग होय. कथानकांत वृषभदेवाबरोबर जेवढया म्हणून व्यक्ती आल्या त्यौपैकीं जवळ जवळ बहुतेकांच्या पूर्वजन्माची हकीकत वृषभदेवाच्या पूर्वजन्मांबरोबरच दिलेली पहावयास सापडते. एकंदर कथानकाचे अवलोकन केलें असतां असें दिसतें कीं, पहिल्या पिढीच्या कथानकांतीलच सर्व पात्रें आपल्या पापपुण्यानुसार पुनर्जन्म घेऊन दुसऱ्या पिढीच्या कथानकांत अवतरत आहेत. या बाबतींतील कवीची चिकाटी पाहून त्यानें पुनर्जन्मवादतत्त्वाच्या स्पष्टीकरणाच्या दृष्टीनेंच आपलें सर्व कथानक बसविलें आहे कीं काय, अशी कोणासहि शंका आल्याशिवाय राहणार नाहीं.
कानडींत जें आदिपुराण आहे तें या संस्कृत आदिपुराणाच्या धर्तीवरच आहे. त्याची रचना व भाषाशैली इतकी उत्कृष्ट आहे कीं, कानडी वाङ्मयांत त्याला फार वरचा दर्जा दिला जातो. पंपकवीनें तें इ.स. ९४१ च्या सुमारास रचिलें.