विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आदिबुद्ध - नेपाळांतील एक 'ऐश्वरिक' बौद्ध पंथ. यांत ध्यानी बुद्ध आहेत व इतर पूर्वकालीन विचारपद्धतींचा समावेश आहे. या पंथाच्या स्वरूपाचें यथार्थ ज्ञान व्हावें यासाठीं नोपाळांतील एकंदर पारमार्थिक परिस्थिति लक्षांत घेतली पाहिजे. धार्मिक व लौकिक अशा दोन्ही प्रकारच्या मध्ययुगीन बौद्ध वाङ्मयाचें नेपाळ हें एक आगरच आहे. या ठिकाणीं स्तूप व इतर प्राचीन पवित्र गोष्टी जागजागीं आढळतात. येथील ब्राह्मणानुयायी लोकहि महायानपंथांतील बोधिसत्व आणि बुद्ध यांची उपासना करितात व आपल्यांतील जुने विधि आचरतात; पण बौद्धसंप्रदायस्वरूपामध्यें पुष्कळच बदल झाला आहे व ''संघ'' कधींच नाहींसा झाला आहे. ब्रह्मचारी, भिक्षू व विवाहित वज्राजार्य यांच्यामध्यें काहीं फरक जर असेल तर तो केवळ नांवाचाच आहे. स्वाभाविक, ऐश्वरिक, कार्मिक आणि यात्निक हे जे चार तत्त्वज्ञानांतील पंथ नेपाळांत विशेष रुजले आहेत, यांच्या ठिकाणीं बोद्धसंप्रदायाचा फरच थोडा अंश उतरला आहे. हे सर्व नांवापुरते त्रिरत्नाला मानतात. त्यांच्या मतें 'बुद्ध' म्हणजे मन 'धर्म' म्हणजे जड द्रव्य आणि 'संघ' म्हणजे गोचर सृष्टींत या दोघांना जोडणारा. दुवा होय. वास्तविक, स्वाभाविक हे केवळ चार्वक आहेत. ऐश्वरिक हे नैय्यायिक आणि ईश्वरवादी मीमांसक यांच्याशीं बरेचसें सदृश वाटतात. कार्मिक आणि यात्निक लोक, दैव आणि पुरुषाकार यांसंबंधी भारतीयांत सर्वमान्य असणारीं मतें प्रतिपादितात. हे सर्व पंथ प्राचीन आहेत; पण त्यांचा बौद्ध त्रिमूर्तींशीं वर वर असणारा संबंध व संघ शब्दाला आलेला विलक्षण अर्थ याचमुलें कदाचित हल्लीं नेपाळांत दिसणारें स्वरूप त्यांना प्राप्त झालें असेल.
सूतसंस्कृतींतील अवतारकल्पना, आणि वेदांतांतील सर्व जग ब्रह्ममय आहे, हा विचार, व त्यांच्यायोगानें देशांतील अनेक उपासना, व अनेक ऐतिहासिक पुरुषांचें अनुयायित्व यांचें एकीकरण इतिहासपुराणवाङ्याच्या मार्फत झालें व तें वेदांतामार्फत वेदपरंपरेशीं जोडण्यांत आलें. व ज्या क्रियेनें हिंदुस्थानांतील अनेक जातींस वंशांस एका पद्धतीखालीं आणलें ती क्रिया हिंदुस्थानाबाहेर बौद्धांमार्फत झाली. ब्रह्म आत्मा यासंबंधीं मतें गौतमास मान्य नव्हतीं. पण गौतमाच्या अनुयायांत, चोहोंकडे धर्मप्रसार करण्याची इच्छा उत्पन्न झाली, तेव्हां त्यांच्यापुढेंहि स्थानिकं उपासना व मतें यांची बौद्धसंप्रदायांशीं संगति उत्पन्न करुन देण्याचा प्रश्न आला व तो त्यांनीं भारतीय विचारपद्धतींनेच सोडविला. भारतीय जननेंत रुढ असलेल्या विचारक्रमाचा म्हणजे कर्मवाद, पुनर्जन्म, अवतारकल्पना, 'सर्व जगाचें एक आदिकरण' या तऱ्हेच्या कल्पनांचा तत्कालीन विद्येचा अभ्यास करणाऱ्यांच्यावर परिणाम झाला नसणें अशक्य होतें. खुद्द गौतमावर तो झाला होता, पण गौतमास आपल्या विचाराची पद्धतशीर मांडणी करण्याची आवश्यकता पडली नाहीं. त्यामुळें तो त्याच्याकडून मांडलाहि गेला नाहीं. पद्धतशीर मांडणींची जरुर पुढें अनुयायांस भासली. वेदांत त्यांनी जरी उघडपणें घेतला नाही तरी प्रच्छन्नपणें त्यांनीं वेदांतित्व पत्करले, ज्या तऱ्हेचीं मतें वेदांतानें प्रतिपादिलीं त्या तऱ्हेचीं मतें ब्राह्मणजातिसंबद्ध ब्रह्मशब्दास वगळणाऱ्या व बुद्ध शब्दाचें महत्व वाढवू इच्छिणाऱ्या त्यांनां अन्यरुपांत मांडावीं लागलीं. 'ब्रह्म' शब्दाच्याऐवजीं 'बुद्ध' शब्द सोंवळा केलेला, तर सर्व व्यापक तत्व ब्रह्म म्हणण्याच्या ऐवजी बुद्धत्व म्हटलें म्हणजे झालें. या प्रसारकांनीं ऐतिहासिक बुद्धास पुसटून टाकलें नाहीं, पण त्याच्या चरित्राच्या मांडणींत फरक केला, ऐवढेंच नव्हे तर ''ऐतिहासित बुद्ध'' म्हणून अनेक होऊन गेले अले दाखविलें व त्याच्यापेक्षांहि जबरदस्त बुद्ध उत्पन्न केले. निर्वाणप्राप्ति म्हणजे बुद्धीभवन होय. किंवा अति मानुष श्रेयस्कर अशा अनेक स्थितींच्या सोपानपरंपरेनें एकसारखें वर चढत जाणें हें आयुष्याचें आदिकर्तव्य होय जेणेंकरून गोतम ज्या स्थितीला पोंचला त्या स्थितीला आपण पोचूं इत्यादी गोष्टी प्रसारकांनीं प्रतिपादिल्या आहेत, किंवा जगाचें आद्यकारणतत्व त्यासच बुद्ध म्हटलें आहे.
या तऱ्हेची विचारपरंपरा महायानाच्या अनेक संप्रदायांत ( मग तो संप्रदाय नेपाळांत, चीनमध्यें, किंवा जपानांत निघो ) प्रगट होऊन तिनें स्थानिक दैवतें, विश्वोत्पत्तिकल्पना व बुद्धाचें नांव यांत संबंध उत्पन्न करुन बौद्धसंप्रदायाचे अनेक पंथ निर्माण केले. त्यांतच प्रस्तुत लेखाचा विषय असलेले न आदिबौद्ध नांवाखाली चालू असलेले संप्रदाय येतात.
सं शो ध कां चें या पं था क डे ल क्ष - महायानपंथांतील अनेक संप्रदाय जरी संशोधकांस बरेच परिचित आहेत तरी आदिबुद्धपंताकडे लक्ष नवीनच गेलें आहे. हॉडसन याच्या लेखांवरून यूरेपीय पंडितांस आदिबुद्धाचें नांव प्रथम माहीत झालें असें 'अबेल रेमुसत' यानें इ.स. १८३१ मध्यें जें म्हटलें तें निःसंशय खरें आहे. हॉडंसन यानें आपल्या निबंधांत नेपाळांतील ऐश्वरिक बौद्धांच्या दर्शनाची ज्याप्रमाणें सोपपत्तिक व संपूर्ण माहिती दिली आहे त्याप्रमाणें ती इतरत्र कोठेंहि सांपडत नाहीं. पाश्चात्य पंडित एकेश्वरी व ऐश्वरिक बौद्धदर्शनांचें जरी प्रथम फार काळजीपूर्वक अध्यायन करीत असत तरी पुढें स्पेन्सहाडीं व बर्नाफ यांच्या ग्रंथांमुळें लोकाचें लक्ष फिरून त्या प्राथमिक अथवा प्राचीन बौद्धदर्शनाकडे वळलें. गेल्या कांहीं वर्षांत जे प्रतिमालेखांचे शोध लागले आहेत व तिबटी वाङ्मयाच्या अध्यायनाकडें जें लक्ष लागलें आहे. त्यामुळें ऐश्वरिक बौद्धमतास फिरून प्राधान्य प्राप्त झालें आहे. सदरह दर्शनांत महायानाच्या तात्विक, गूढ व दैवतेतिहासात्मक विचारांचें जें एकीकरण झालें आहे. त्यामुळें त्याचें अध्ययन करणें महत्त्वाचें आहे. इतर बौद्धदर्शनांत जें ऐश्वरिक मत दृष्टीस पडत नाहीं तें यांत प्रामुख्यानें दृष्टीस पडतें हा दर्शनाचा विशेष आहे. महायानाच्या विचाराची परिणति जास्त व्यापक अशा ईश्वरकल्पनेंत व जगत्कल्पनेंत झाली. ऐश्वरिकदर्शन हें अर्धवट नैय्यायिक (ह्म० ईश्वरास्तित्ववादी) व अर्धवट शैव (ह्म०सर्वेश्वरत्ववादी) आहे असें दिसून येतें. तथापि ऐश्वरिदर्शन महायान यांत अगदीं स्पष्ट फरक असल्यामुळें हा आदिबुद्धपंथ एक निराळाच स्वतंत्र तिसरा किंवा चौथा बौद्धपंथ होता असें बर्नाफ यानें प्रतिपादन केलें आहे; हा संप्रदायभेद केवळ विचारभेद न राहतां, नवीन पाठभेद उत्पन्न करण्यापर्यंत पोंचला आहे. ''कारणापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व गोष्टींचें कारण तथागतानें स्पष्ट करून सांगितले आहे.'' या सूत्राच्या जागीं ''कारणापासून उत्पन्न होणाऱ्या गोष्टींचे तथागत हेंच कारण आहे'' असा पाठभेद आदिबौद्धांनीं घेतला आहे असें हाडसन म्हणतो. हॉडसननें विवेचिलेल्या ऐश्वरिकांचा दुसरा एक हा विशेष होता कीं, त्यांच्या दर्शनांत स्त्रीविषयक, तांत्रिक व ऐन्द्रजालिक भाग मुळींच नव्हता. पण ऐश्वरिकांत हा भाग पुष्कळच आहे. हाडसनची शोधपद्धति सदोष होती. हॉडसन यानें या विषयाची माहिती जुन्या शास्त्रीमंडळीकडून मिळविली होती. तो त्यांच्या शब्दांस देववाणीप्रमाणें प्रमाण मानीत असे. शिवाय तुमच्या म्हणण्यास आधार काय असें त्यानें त्या शास्त्रीलोकांस विचारलें तर ते त्यास कुठल्यातरी ग्रंथांतील भागाचा आधार दाखवून त्याचें समाधान करीत असत, व हाडसन त्यांची पूर्ण तपासणी करण्यास समर्थ नव्हता अशी शंका येते. हाडसननें यूरोपीय कल्पनांनीं प्रश्न विचारावे, व पंडितानीं अनुरूप उत्तरें द्यावीं असे झाल्यानें धर्मकल्पना जरा अर्वाचीन विचारांस साजतील अशाच मिळावयाच्या.
स्वयंभू पुराण - हा एक ग्रंथ आधारार्थ हाडसननें घेतला. ज्यांत विशेष तांत्रिक भाग नाहीं अशा या पुराणावरून पंथस्वरूप ठरविणें योग्य नाहीं. नेपाळी ऐश्वरिक वाङ्मयांत जरी दैवतकथासंग्रहाचा बराच मोठा भाग होता, तरी तो पंथ शैव विचारांच्या संसर्गापासून अगदींच अलिप्त नव्हता.
आदिबुद्धदर्शनाचा यथार्थबौद्धधर्माशीं व हिंदूंच्या सामान्य विचारपद्धतींशीं काय संबंध होता ह्यांचें संशोधन करणें यांतच आदिबुद्धदर्शनाचें महत्त्व आहे. याचा पुढील तीन रीतीनीं थोडा विचार केला असतां सोईस्कर होईलः- (१) साधारण प्रसिद्ध असलेल्या आदिबुद्ध दर्शनांची संक्षिप्त माहिती, (२) आदिबुद्ध दर्शनांच्या पूर्वगामी पद्धतींचें संशोधन; व (३) आदिबुद्धदर्शनांचें स्थान व त्यांचें तात्विक व ऐतिहासिक विवेचन.
आ दि बु द्ध द र्श न. - बुद्ध हें ब्रह्माप्रमाणें आदितत्त्व आहे पण तें तत्त्वज्ञान सामन्यांस गोचर कसें होणार. सामान्य वर्ग गंधाक्षता टाकून मोकळें होऊं पहाणारा! तेव्हां त्या अव्यक्तासहि व्यक्तत्व देणें भाग पडले. आदिबुद्ध किंवा परमादिबुद्ध हा ब्रह्माप्रमाणें स्वयंभू असून त्या नांवानेंच काठमांडु येथील देवालयांत एक मूर्तींची पूजाअर्चा करण्यांत येतें. आदिबुद्धास कोणी कधीं पाहिलें नाहीं, तो निर्वाणस्थितीत आहे, तो शुद्ध तेजःस्वरूपी आहे.तो शुन्यतेमधून प्रगट होतो व तो अनेक नांवांनीं प्रसिद्ध आहे. त्याला उद्देशून कोणी प्रार्थना करीत नाहींत, असें म्हणतात. तथापि त्याच्या देवळांत त्याची पूजा करण्यांत येतें. ज्याला एकनिष्ठभवन म्हणतात अशा उच्च प्रदेशांत तो राहतो. त्या उच्च प्रदेशाला चैत्याचा कळस आहे असें म्हणतात. अनेक निराकार स्वर्ग आहेत असें जें बौद्धविश्वरचनाशास्त्रांत म्हटलें आहे त्याचें विस्मरण झालेलें दिसतें. प्रत्येक देवतेप्रमाणे त्याला एक मंडल किंवा गूढवलय असतें.
अव्यक्तास व्यक्त स्वरूपांत आणणाऱ्या, म्हणजे ब्रह्मस्वरूपी तत्त्वाचा ऐतिहासिक बुद्धंशीं संबंध उत्पन्न करणाऱ्या अनेक मांडण्या आहेत. एकींत आदिबुद्ध, ध्यानीबुद्ध, मानुषी बुद्ध या परंपरेनें अव्यक्त तत्त्व आणि गौतम यांत संबंध उत्पन्न केला आहे.
हा आदिबुद्ध किंवा महाबुद्ध आपल्या पांच ध्यानकर्मांनीं पांच ध्यानीबुद्ध निर्माण करितो. ते येणें प्रमाणें:- (१) वैरोचन, (२) अक्षोभ्य, (३) रत्नसंभव, (४) अमिताभ, आणि (५) अमोघसिद्ध. हे प्रवृत्तिजगांत आहेत, त्यांची प्रार्थना करीत नाहींत. आदिबुद्धाप्रमाणें त्यांचीं चैत्य नांवाचीं देवालयें आहेत. ज्यांच्या योगानें ते उत्पन्न होतात त्या ज्ञान व ध्यान या शक्तीनीं ते ध्यानी बोधिसत्व उत्पन्न करितात. उदा. संमतभद्र, वज्रपाणि, रत्नपाणि, अवलोकित अथवा पद्मपाणि व विश्वपाणि. ते जड विश्व निर्माण करणारे आहेत. परंतु ते जीं विश्वें निर्माण करितात तीं नश्वर असतात. आणि अशा प्रकारचीं तीन विश्वें आतांपर्यंत नष्ट झालीं आहेत. ज्यांत सध्यां आपण आहोंत तें अशा प्रकारचें चौथें विश्व आहे. ते चौथ्या बोधिसत्त्वाचें म्हणजे अवलोकितेश्वराचें कार्य आहे. तोच हल्लींच्या विश्वाचा ईश्वर आहे. नाथ व जिन ( जेता ) असा अमिताभ हा त्याचा विशिष्ट बुद्ध आहे. चौथा मानवी बुद्ध जो शाक्यमुनि तो त्याचा उपदेष्टा आहे. एकंदर पांच मानुषी बुद्ध आहेत. हे पांच मानुषीबुद्ध पांच ध्यानीबुद्धाचे संवादी आहेत. याचा अर्थ ते ध्यानीबुद्धापासून उत्पन्न झाले आहेत, म्हणजे जे त्यांचे अवतार आहेत, असें नसून ते केवळ ध्यानीबुद्धाचें प्रतिबिंब किंवा निर्माणकाय आहेत.
कारंडव्यूह, श्रीकालचक्रतंत्र, नामसंगीति व तांत्रिक ग्रंथ हॉडसन यानें ज्या ग्रंथाचा आधार घेतला होता त्या 'कारंडव्यूहांत' मांडणी निराळीच आहे. या ग्रंथाचा काळ ठरविणें हें कठिण आहे. काव्यस्वरूपांत असलेल्या कारण्डव्यूहासंबंधानोंहि तीच अडचण उत्पन्न होते. परंतु त्या कारण्डव्यूहाच्या गद्यस्वरूपी ग्रंथाचें जें तिबेटी भाषांतर आहे त्यावरून त्याची अखेरची कालमर्यादा ठरवितां येते. सदरहू गद्यात्मक कारण्डव्यूहांत पद्यात्मक कारंडव्यूहांत दृष्टीस पडणारा पुढील भाग गाळलेला आहे: 'आदिबुद्ध स्वयंभू, आदिनाथ हा ज्योतिरूपांत प्रथम उत्पन्न झाला' तो प्रथम विश्वोत्पत्तीसंबंधी ध्यान करितो व सृष्टीचें काम पुढें चालविण्याकरितां अवलोकितेश्वरास उत्पन्न करितो (अवलोकितेश्वर पहा). तें त्यानें बुद्ध उत्पन्न केले असें म्हटलें नसून फक्त पांच बुद्धांच्या अंशांनी तो बनला आहे. असें मानण्यांत येतें.
आदिबुद्ध अथवा परमादिबुद्ध हें नांव प्राचीन लेखांतून दृष्टीस पडतें. हें नांव त्याच्याशीं संलग्न असलेलें दर्शन यांचा आणि श्री कालचक्रतंत्र याचा अत्यंत निकट संबंध आहे. श्रीकालचक्रतंत्र हें शैवसंप्रदायाच्या स्पूंर्तीनें उत्पन्न झालेंलें असून त्याची माहिती हिंदुस्थानांत १० व्या शतकांत व तिबेटांत ११ व्या शतकांत झाली.
महायान तांत्रिक व आदिबुद्धदर्शन.- '' तांत्रिक बौद्ध मत '' हें महायानापासून थोडेसें निराळें आहे. हें वेदांताशीं सदृश आहे. आणि यांत आदिबौद्धमत प्रतिबिंबित झालें आहे. चौथ्या शतकांतील तांत्रिक ग्रंथकार (''असंग'' पहा) हा आदिबुद्धाचा उल्लेख करतो. तंत्रें हीं ज्या काळांत होता ह्मणून समज होता त्यापेक्षां तीं अधिक प्राचीन आहे ही गोष्ट आतां सर्वांस विदित झाली आहे. नामसंगीतिग्रंथांत मंजुश्रीस आदिबुद्ध म्हटलें आहे हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. मंजुश्रीचे नेपाळी स्वरूप निर्मींत झालें तें हिंदुस्थानांतील स्वरूपास चीनमध्यें चिनीसंस्कार होऊन मग तें नेपाळांत आलें असें ड. ला. ब्हाल्ली पूसीं आपल्या ( एन. रि. एथिक्स मधील) मंजुश्रीवरील लेखांत म्हणतात. मंजुश्रीला नेपाळी तिबेटी व चिनी बौद्धसंप्रदायांत मनूप्रमाणें संस्कृतीचा संस्थापक बनविलें आहे. चंद्रकीतींचा ( ७ वें शतक ) समकालीन चन्द्रगोमिन् यानें नामसंगीतीवर टीका लिहिली आहे, असें जें तारानाथानें प्रतिपादन केलें आहे तें जर खरें असेल तर नामसंगीति हा ग्रंथ दहाव्या शतकाच्या पूर्वीं लिहिला असावा असें निश्चयानें म्हणतां येईल. नामसंगीति व अनेक तांत्रिक ग्रंथ यांच्या टीकेमध्यें जे अर्थ केले आहेत ते ग्रंथोत्पत्तीच्यावेळीं ग्राह्य मानीत असत किंवा नाहीं याची येथें मीमांसा करण्याचें कारण नाहीं. आपण मांडणी तेवढी पाहूं ज्यापासून बुद्धांची उत्पत्ति होते तें ज्ञान तो मूर्तिमंत असल्यामुळे, व तो बोधिसत्त्व (म्हणजे ज्ञानसत्व) यापेक्षां अधिक असल्यामुळें आणि धर्मकाय अथवा धर्मधातुवागीश्वर असा असल्यामुळें मंजुश्रीला आदिबुद्ध ह्मणण्यास चांगलीं कारणें होतीं असें ह्मणावें लागतें. त्याच्या मूर्तींत अज्ञानाचा नाश करणारें खड्ग व प्रज्ञापारमितेचा महाग्रंथ हीं त्याचीं दोन आयुधें दाखविलेलीं असतात. ज्याप्रमाणें प्रज्ञापारमितेला ( जिला पुढें आदिप्रज्ञा ह्मणूं लागले) पुराणमताभिमानीग्रंथात बुद्धमाता म्हणतात त्याप्रमाणें मंजुश्री हा वादीराज व वागीश्वर असल्यामुळें त्यालाच लक्षणेनें त्रिकाल आदिबुद्ध म्हणण्याचा प्रघात पडला होता. तो तथागताच्या अंशापासून उत्पन्न झाला, किंवा त्याच्या उलट त्यच्या शरीरांतून पांच बुद्ध उत्पन्न झाले असें ग्रंथांतरीं म्हटलेलें आहे. मस्तकावर पाच बुद्ध आहेत असा त्याच्या मूर्ती आहेत किंवा ते पाच बुद्ध त्याच्या शीर्षाभोंवतालच्या तेजोवलयात प्रतिष्ठित झालेले दाखविण्यांत येतात. तो चतुर्मुख असून सरस्वतीपति होता व त्यामुळें त्याच्यांत व ब्रह्मदेवात विलक्षण साम्य दाखविण्यांत येतें. शिवाय कधीं कधीं त्याचें कामदेव किंवा शिव यांच्याशींहि तादात्म्य करण्यात येतें हें सर्व जरी खरें असलें तरी मंजुश्री हा प्रज्ञेचा राजा होता ह्मणून त्यास आदिबुद्ध ह्मणत असत ही गोष्ट खरी आहे. (मंजुश्री पहा.).
कांहीं लेखांतून जरी मंजुश्रीला तात्रिक आदिबुद्ध म्हटलेलें आहे तरी तात्त्विक विवेचनापासून त्याचा उद्गम झाला होता ही गोष्ट निर्विवाद आहे. तंत्रातील आदिबुद्ध निराळ्या स्वरूपाचा होता व तो आणि ब्रह्मा किंवा विष्णू यांच्यापेक्षां तो व शिवब्रह्मा (हा वज्रसत्त्व-वज्रधर) याच्यांत अधिक साद्यृश्य होतें.
आ दि बु द्ध द र्श ना च्या पू र्व गा मी प द्ध तीः - हीनयानापासून वर दाखविलेल्या बुद्धधर्माच्या स्वरूपापर्यंत कसकसा विकास होत गेला हें कळण्यासारखें आहे (महायान पहा). आतां निर्वाणस्थितींतील बुद्ध, बोधिसत्त्व, बुद्ध व बोधिसत्त्व यांच्याविषयीं घोंटाळा, या तीन देहांचा वाद व ध्यानीबुद्ध यांचा विशेषतः वैभाज्यवादी स्थविर चेतुल्यक या मताप्रमाणें विचार करावयाचा आहे.
अर्धवट निर्वाणस्थितींत असलेले बुध्दः - वैभाज्यवादी व स्थविर यांच्या मतानें निर्वाण म्हणजे विनाश, याहून दुसरें कांहीं नाहीं. विधिविषयक ग्रंथांत याविषयीं कांहीं निश्चित विधान केलेलें नाहीं. ज्याप्रमाणें सागरांतील उदकाची मोजदाद करणें शक्य नाहीं. त्याप्रमाणेंच निर्वाणस्थितींतींल बुद्ध ज्ञानगम्य नाहीत. कारण ते अनंत आहेत असें त्यांत प्रतिपादन केलेलें आहे. यावरून असेंहि अनुमान काढिलें आहे कीं, निर्वाण ही जरी अनिर्वचनीय अवस्था आहे तरी ती शून्यतेहून भिन्न आहे.
सुखावती, महावस्तु, सद्धर्मपुंडरीक, धर्मसंगीतिसूत्रें, लंकावतार व बोधिचर्यावतार. -निर्वाणाबद्दल अधिक मीमांसा करण्याचा स्वर्गांत दैवी बुद्धंची त्रसति आहे हें दाखविण्याकरितां ब्राह्मणी पद्धतीनें त्या प्रश्नाची वाटाघाट करण्याची आवश्यकता नाहीं. कारण कल्पातांपर्यंत आपलें आयुष्य वाढविण्याचें सामर्थ्य शाक्यमुनीमध्ये आहे असे पहिल्या वर्गांतील सुत्तात म्हटलें आहे. देवास व मानवास अदृश्य असला तरी तो जिवन्तंच होता असें मानण्यांत येत होतें यात शकां नाहीं. आणि या कामीं जुन्या ग्रंथांप्रमाणेंच नवे ग्रंथकारहि वरील कल्पनेवर विश्वास ठेवण्याला तयार होते. शरीरसौदर्याचा यत्किचिंत ऱ्हास न होता तो बुद्ध कोटयानुकोटि कल्पें जिवंत राहतो असें 'सुखावतींत' म्हटलें आहे. परंतु शाक्यमुनि तर पुरी ऐशीं वर्षेंहि जगला नाहीं. त्याचें दीर्घायुष्यत्व एक त्या तथागतासच माहीत ।
शाक्यमुनि, कोणताहि बुद्ध, फार काय पण होणाराहि बुद्ध (बोधिसत्त्व) हा आपल्या अंतकाळीं साधारण माणसाप्रमाणें घाबरलेला, काळजींत असलेला, बडबड करीत असलेला, हातपाय हालवीत असलेला, किंवा यातना सोशीत असलेला दृष्टिस पडतो असें महावस्तूंत सांगितलें आहे. परंतु हें केवळ तो आपल्या समजुतीकरितां करितो; वास्तविक पाहूं गेलें तर तो विलक्षण असून वर निर्दिष्ट केलेल्या सर्व विकारांच्या पलीकडचा व त्यापासून अलिप्त असा आहे. यांच्याविरुद्ध मत प्रतिपादन करणें म्हणजे पाखंडवाद करणें होय असें मानण्यांत येतें. पुढील बुद्धाचा देह अमूर्त असल्याची समजूत आहे. त्यात ऐहिक भाग नाहीं. बोधिसत्त्वास वास्तविक, माता, पिता, पुत्र इत्यादि कांही नाहींत असी कल्पना आहे. हा लोकोत्तरवाद वेतुल्यक पंथाच्या वाङ्मयांत विशेष स्पष्ट रीतीनें सांगितला आहे. त्यांच्या मतानें शाक्यमुनीनें ह्या जगांत प्रत्यक्ष अवतार कधीं घेतलाच नाहीं. परंतु आपला संदेश जगाला देण्याचें काम त्यानें एका मूर्तींकडे सोंपविले.
पुष्कळ युगांच्या पूर्वीं शाक्यमुनींने दुसऱ्या एका प्राचीन शाक्यमुनीच्या समक्ष बोधिव्रत घेतलें असें महावस्तूंत सांगितले आहे. आठ हजार दीपंकर नांवाच्या बुद्धंचा, तीन अब्ज शाक्यमुनींचा त्याच पुस्तकांत उल्लेख आहे. हा प्राचीन बुद्ध व प्रचलित बुद्ध हे दोघे एकच होते असें जर आपण मानलें, सर्व दीपंकर, सर्व शाक्यमुनि सर्व ध्वजोत्तम, यांच्या जागीं तर आपण एक दीपंकर व एक शाक्यमुनि समजलों, आणि वेतुल्यकांप्रमाणें शाक्यमुनींने भौतिक देह धारण केलाच नाहीं असें धरून चाललों तर आपणांस सद्धर्मपुण्डरीकपद्धति म्हणजे काय होती याचीं कल्पना येईल. अनेक युगांपूर्वीं म्हणजे सुरवातीस शाक्यमुनि बुद्ध झाला, त्याचे ह्या लोकींचे अवतार म्हणजे ज्यांत तो बुद्ध झालेला दिसतो व शेवटीं निर्वाण अवस्थेप्रत जातो ती सर्व माया आहे. महावस्तूस अखेरचें स्वरूप जरी फार उशीरां प्राप्त झालें तरी वर सांगितलेल्या त्यांतील कल्पना फार प्राचीन असल्याचें दिसून येतें. सद्धर्मपुंडरीकाचा काल इ.स. २६५ हा आहे. शाक्यमुनीनें भौतिक देह धारण केलाच नाहीं या कल्पनेचा पाटलिपुत्राच्या राजसभेंत (सुमारें ख्रि.पू.२४६) धिक्कार केला. ऐतिहासिकदृष्ट्या जरी राजसभेची गोष्ट संशयास्पद असली तरी बौद्धलोकांमध्यें पुढील कल्पना फार प्राचीन काळीं प्रचलित होत्या हें निर्विवाद आहे. (अ) शाक्यमुनि हा आपल्या ऐहिक परिनिर्वाणानंतर ध्यानस्थथितीमध्यें आहे. तो बुद्ध झाल्यावेळेपासून त्या अवस्थेंतून बाहेर पडलाच नाहीं. तो खरोखर निर्वाणास केव्हा प्राप्त होईल हें शोधून काढण्याचें कारण नाहीं. ''ज्ञान व गुण यांनीं मंडित, दया व परोपकार यांचे केवळ पुतळे, अनेक जीवांचे आधार, नित्यसमाधीमध्यें राहणारे असे ते भाग्यशाली बुद्ध संसारामध्येंहि नाहींत व निर्वाणांतहि गेले नाहींत'' असें धर्मसंगीतिसूत्रांत सांगितलें आहे. (आ) वैभाज्यवाद्यांच्या (पुराणमतवाद्यांच्या) मतानें शाक्यमुनीनें बुद्ध झाल्यावर कांहीं अवशिष्ट भाग मागें ठेवून निर्वाणांत प्रवेश केला. तो अवशिष्ट भाग म्हणजे प्रेरणा करणारा जो आत्मा किंवा विचार करणारी जी बुद्धि त्यांच्या व्यतिरिक्त देह. त्या देहांत जिवंत राहण्याचे व बोलण्याचे व्यापार शिल्लक राहिले आहेत. परंतु ध्यानावस्थेंत बोलण्याचा व्यापार चालूं असणें शक्य नाहीं म्हणून त्या देहास माया देह असें म्हणतात.
दिव्य बोधिसत्वः - महायानपंथामध्यें एक असा सिद्धांत आहे कीं बोधिसत्व ह्या अतिशय कृपाळू व मानव प्राण्यांच्या संरक्षणाकरितां निर्वाण न पावलेल्या विभूती होत. वस्तुतः विभूतिमत्त्वानें बोधिसत्त्वापेक्षां बुद्ध हे श्रेष्ठ आहेत, परंतु अधिकाराच्या दृष्टीनें बोधिसत्व जास्त आहेत. प्रत्येक बुद्ध, बुद्धस्थिति प्राप्त होण्यापूर्वीं बोधिसत्व असल्यामुळें व दिव्य बोधिसत्वापासूनच त्यास बुद्ध होण्याचा आदेश मिळत असल्यामुळें बुद्धाचा उगम बोधिसत्वापासून मानण्यांत येतो. परंतु याच्या उलट बोधिसत्वा यासहि 'जिनपुत्र' म्हणण्यांत येतें, कारण त्याचें बौद्धतत्त्वाचें ज्ञान बुद्धाच्या शिकवणुकीपासूनच प्राप्त झालेलें असतें. हीनयानपंथामध्यें देखील भविष्यकालीन बुद्धास बुद्ध होण्याचा अगाऊ आदेश अगोदरच्या बुद्धापासूनच मिळतो. 'लंकावतार' ग्रंथामध्यें बोधिसत्वास बुद्धापासून नुसता आदेशच नव्हे तर अभिषेकहि होत असतो असें म्हटलें आहे. याच्या उलट गांधार शिल्पामध्यें कांहीं बोधिसत्त्वांच्या हातीं अभिषेककलश असलेले दाखविले आहेत. प्राचीन बौद्ध उत्पत्तिमताप्रमाणें प्रत्येक बुद्ध असंख्य बोधिसत्त्वामध्यें आध्यात्मिक जीवन उत्पन्न करतो. परंतु शिल्पामध्यें बुद्धाबरोबर आढळून येणारे हे बोधिसत्व, बुद्धाच्या पुत्रांप्रमाणें दि त नसून धाकट्या भावाप्रमाणें दिसतात.
बुद्ध आणि बोधिसत्व यांच्या कल्पनेंतील घोटाळाः- या वरील विवेचनावरून हें स्पष्ट दिसून येईल कीं, बुद्ध व बोधिसत्व यांच्या स्पष्ट कल्पनांमध्यें बराच घोंटाळा असल्यामुळें त्यांची बरोबर व्याख्या करणें अशक्य आहे. महावस्तु बोधिचर्यावतार, कारंडव्यूह इत्यादि ग्रंथामधील घोंटाळ्याचा उलगडा होत नाहीं. वर म्हटलेंच आहे कीं, अध्यात्मदृष्ट्या बुद्ध हे बोधिसत्त्वांचे एकाच वेळीं पिता व पुत्र मानण्यांत येतात. बुद्ध व बोधिसत्त्व यांमधील या गूढ स्वरूपाच्या संबंधाबद्दल अद्यात्मदृष्ट्या मेळ घालतां येईल; परंतु या बाबतींतील महत्त्वाचा पुरावा गांधार, मागध शिल्पावरून व प्रतिमाशिल्पावरील ग्रंथांवरून मिळणार आहे.
'त्रिकाय' सिद्धांतः - वर उल्लेखिलेला परस्परविरोधी पुरावा बौद्ध दैवतविज्ञानांत एकत्रित झाला असून त्या ठिकाणीं सर्व प्रकारचा विरोध नाहींसा होतो. महायान पंथामध्यें 'त्रिकाय' सिद्धांतांत प्रमुखपणें हाच विषय विवेचन केला आहे. ह्या सिद्धांतांत बुद्धाला (१) धर्मकाय, (२)संभोगकाय व (३) निर्माणकाय अशीं तीन शरीरें असल्याचें सांगितलें आहे. बुद्ध किंवा दुसरी कोणतीहि व्यक्ति निर्वाणस्थितींत जेव्हां प्रवेश करते तेव्हां तिला 'धर्मकाय' (शून्यत्व) याची प्राप्ति होते, असेम महायान पंथापैकीं माध्यमिकांचें म्हणणें आहे; परंतु योगाचार याचाच अर्थ रूपशून्यत्व म्हणजे सद्वस्तुमात्रत्व असा करितात. बुद्धाचें खरें शरीर ''संभोगकाय'' हेंच होय. कारण धर्मकाय म्हणजे वस्तुतः शून्यत्वच होय. संभोगकाय हें अतिमानुष असून त्यामध्यें आनंद, सद्गुण ज्ञान इत्यादिकांची स्थिति असते. उदाहरणार्थ, श्रीकृष्णांनीं भगवद्गीतेमध्यें अर्जुनास दाखविलेलें विश्वस्वरूप हें संभोगकायच होय. शाक्यमुनि ज्या शरीरानें या जगतांत बुद्धस्वरूपांत अवतार घेतो. तें शरीर 'निर्माणकाय' होय.
ध्यानी बुद्धः - वरील सिद्धांताच्या अनुरोधानें अमिताभ वगैरे जे मूळचे बुद्ध म्हणून मानले जातात, तेच कालांतरानें बोधिसत्व, वज्रधर वगैरे झालेले दिसतात. प्रत्येक बुद्धास आपल्या 'संभोगकाय' शरीरांत असतांना एक स्त्री असे व तीपासून बोधिसत्त्व उत्पन्न होतो.
प र्या लो च न. - अशा रीतींने ह्या घोंटाळ्याच्या दैवतविज्ञानांत कांहीं तरी सुसंबद्धता आणण्याकरितां पांच बुद्धांपैकीं एखाद्या वैरोचनासारख्या बुद्धास बरचें महत्त्वाचें स्थान दिलें असावें किंवा मंजुश्री, वज्रधर किंवा आदिबुद्ध यांसारखी एक नवीन सहावी देवता आणली असावी.
वज्रधर, वज्रसत्व, वज्रपाणी ही नांवें दिसण्यांत सारखीं असलीं तरी वज्रधर हें 'धर्मकाय' असून वज्रसत्व हें निर्माणकाय आहे व वज्जपाणि हा एक बोधिसत्त्व असून ग्रन्वेटेल आदिकरून संशोधकांनीं तो मूळांत वेदकालीन इंद्र असावा असें म्हटलें आहे.
वस्तुतः आदिबुद्धपंथाचा एक मुख्य विशेष असा आहे कीं, त्यामध्यें सहाहि बुद्धांच्या वरच्या दर्जाची एक 'स्यमंतभद्र' नांवाची 'धर्मकाय' रूपांत असलेली देवता मानिली आहे व तिच्या ठिकाणीं सर्व बुद्ध व अनेक साधू यांच्या ठिकाणच्या बत्तीस गुणांचा अद्यारोप केला आहे. इतर सामान्यबुद्ध केवळ त्याचीं प्रतिबिंबें नसून कांहीं ठराविक कालांतरानें ते या आदिबुद्धापासून निर्माण होतात असें म्हटलें आहे. हें उत्पत्तितत्व जरी मूळांत सामान्य हिंदु विचारांतील असलें तरी बौद्ध तत्त्वज्ञानांत याची परमावाधि झालेली दिसते व त्यामध्यें शाक्यमुनि, अवलोकितेश्वर, वैरोचन वगैरेस 'योगीश्वर' ही संज्ञा लाविली आहे.
'महायान' व 'आदिबुद्ध' यांतील मुख्य फरक. - जुन्या महायान पंथांतील सिद्धांतामध्यें व या नवीन आदिबुद्ध सिद्धांतामध्यें भेद काय याचा विचार करूं लागलो तर आपणांस असें दिसून येईल कीं, महायानापंथांत संसार हा अनादि मानला असून संसार व निर्वाण यांमध्यें शून्यस्वरूपानें कांहींच भेद नाहीं असें म्हटलें आहे; परंतु या नवीन आदिबुद्धपंथांत 'तथागतमगर्भ' जो समंतभद्र त्यापासून सर्व जगाची उत्पत्ति झाल्याचें मानिलें आहे.
आदिबौद्ध ग्रंथ तांत्रिक ग्रंथांपासून निश्चितपणें भिन्न करतां येणार नाहींत असे आम्हांस वाटतें. असंग हा तांत्रिक बौद्ध मताचा जर जवळ जवळ आद्यपुरुष होता, तर तोच आदिबुद्धास प्रथम ग्रांथिक महत्त्व देणारा आदिबुद्ध संप्रदायावरील ज्ञान अजून अंधुक स्थितींत आहे असें म्हटलें पाहिजे. ए.रि.ए. मधील आदिबुद्धविषयक लेख लिहिणारे लुई डीला. व्हाल्ली पूसीं (बेलजममधील 'गांड' येथील युनिव्हर्सिटीचे संस्कृतचे प्रोफेसर) यांची या संप्रदायाच्या स्वरूपाविषयीं व इहिासाविषयीं कांहीं मतें तो लेख लिहिल्यानंतर बदललीं असें त्यांच्या त्याच ज्ञानकोशांतील ''महायान'' या लेखावरून दिसते.
[ संदर्भग्रंथः-'महायान' या लेखांत महायान पंथांतील महत्त्वाच्या ग्रंथाची यादी सांपडेल. ''आदिबुद्ध '' संप्रदायाचे मुख्य ग्रंथ वर उल्लेखिलेलेच आहेत. संशोधकांच्या लेखांपैकीं महत्त्वाचे लेक येणेंप्रमाणें. हॉडसन-एसेज ऑन दि लँग्वेजस, लिटरेचर अँड रिलिजन ऑफ नेपाळ अँड तिबेट. कर्न-मॅन्युअल ऑफ बुद्धिझम. श्लागिंटवेट बुद्धिझम इन तिबेट. वॅडेल- दि बुद्धिझम ऑफ तिबेट. ग्रुंडवेल - बुद्धिस्ट आर्ट इन इंडिया. मॉनियर विल्यम्स-बुद्धिझम. रॉकहिललाइफ ऑफ बुद्ध. एन. सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स आदिबुद्ध, अवलोकितेश्वर, असंग, मंजुश्री, महायान लेख ]