प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका

आदिमसंघ (प्रोटोझोआ) - गोडें व खारें पाणी, पाणथळ जमीन आणि ओला अगर कुजका पाला, यांत मुख्यतः सांपडणार्‍या अति सूक्ष्म-नुसत्या डोळ्यांनां न दिसणाऱ्या प्राण्यांचा संग्रह या संघांत होतो. या सूक्ष्म जंतूंच्या (अ‍ॅनिमलक्यूल) शरीरांचे अस्थिचर्मादि भाग पडत नाहींत; सर्व जीवांमध्यें-प्राणी व वनस्पति मिळून सांपडणारें व जीविताचें अनन्यसाधारण स्थान असें जें चैतन्यद्रव्य अगर पिंडद्रव्य (प्रोटोप्लॅझम) त्याच्या असंस्कृत अगर अविशिष्ट स्थितींतील बारीक बारीक पिंडें म्हणजे या संघांतील प्राणी होत. या असंस्कृत चैतन्यद्रव्याच्या पिंडांनां इतर प्राण्यांप्रमाणें. 'आहारनिद्राभयमैथुनानि' इत्यादि व्यापार करतां येतात, व या संघांतील अशा अनंत प्राण्यांमध्यें पुष्कळ निरनिराळे आकार व तऱ्हेतऱ्हेचे जीवन व्यापाराचे प्रकार आढळतात. तसेंच या सूक्ष्म जंतूंतील आकारवैचित्र्य व कर्मवैचित्र्य आनुवंशिक असतात. या आनुवंशिक भेदांमुळें यांच्या उपजाति ( स्पीशीज) ओळखितां येतात. नंतर निरनिराळ्या उपजातींतील साधर्म्य व वैधर्म्य लक्षांत घेऊन या प्राणिजाताचे जाति, गण, वर्ग इत्यादि उत्तरोत्तरव्यापी भागांमध्यें वर्गीकरण करतां येतें; परंतु या विश्वरूपदर्शनाला सूक्ष्मदर्शकयंत्ररूपी सप्तम दर्शनाची किंवा दिव्यचक्षूची आवश्यकता आहे.

परंतु निरनिराळ्या उपजाति,  जाति, गण व वर्ग यांच्या विशिष्ट लक्षणांनी युक्त असा या अनंत प्राण्यांच्या घोंटाळयांत एकच पाया अगर मूलरचना स्पष्ट होत असल्यामुळें या समूहाला संघ (फायलम) ही संज्ञा देतात. विकासवादाच्या तत्त्वाप्रमाणें सृष्टीच्या आरंभीं जे पहिले प्राणी उत्पन्न झाले त्यांच्या या सूक्ष्म जंतूंच्या शरीररचनेंत व जीवनक्रमांत बरेंच साम्य असल्यामुळें या प्राण्यांच्या संघाला आदिमसंघ म्हणतां येईल. या सूक्ष्म जंतूंच्या जीवनयात्रेचें कोडें उकलण्यासाठीं यांच्यांमधील आगदीं प्राथमिक स्थितींत असलेला व म्हणून सुबोध अशा आमीबाचें सूक्ष्मावलोकन करूं.

आ मी बा. - सांचीव पाण्याच्या डबक्यांतील तळची बुळबुळीत मळी सूक्ष्मकाखालीं पाहिली तर त्यांत बरेच वेळां हा आळशी प्राणी आढळतो. सकृद्दर्शनीं एक पारदर्शक रांध्याचा मलीन विषमाकार तुकडा आपण पहात आहों असें वाटतें. बेदाण्यासारख्या बीजरहित फळामध्यें जसा मध्यवर्ती चिकट गीर व त्याच्या सभोंवार तशाच रंगाची साल असते, त्याप्रमाणें या प्राण्याच्या शरीराचें पिंडमध्ये (एंडोप्लॅझम) व पिंडावरण (एक्टोप्लॅझम) असे दोन भाग करतां येतात. पिंडमध्यांत वाळूसारखे पुष्कळ कण पसरलेले असल्यामुळें तो भाग किंचित् अपारदर्शक व खरबरीतहि दिसतो. सभोंवतालच्या पातळ पिंडावरणांत रेती नसते व तें पारदर्शक असलयामुळें बाहेरील पाण्यापासून वेगळे करतां येत नाहीं.

वर वर पाहणाराला हा प्राणी निश्चिताकार असावा व हालचाल करीत नसावा असें वाटतें; परंतु त्याच्याकडे सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्यानें कांहीं वेळ निरखून पाहिल्यावर अगर थोडया वेळाच्या अंतरानें याचीं रेखाचित्रें काढिली म्हणजे याचा आकार स्थिर नसून हळू हळू सारखा बदलत असतो असें लक्षांत येईल. कमळाच्या पाकळ्यांसारख्या सर्व बाजूंनी पसरलेल्या या प्राण्याच्या भागांनां आपण छद्यपाद  (स्यूडोपॉड) म्हणूं; कारण त्यांच्यायोगानें हा स्थलांतर करितो. यांच्या पायांचा आकार कायम नसून क्षणोक्षणीं बदलतो; एवढेंच नव्हे तर त्यांचें अस्तित्वहि याच्या इच्छेवर अवलंबून असतें. ज्या वेळीं शरीराच्या एखाद्या जागीं पाय फुटावयाचा असतो, तेव्हां त्या ठिकाणीं पिंडावरणावर एक टेंगूळ येतें. पहिल्यानें तें पिंडावरंणाचेंच बनलेलें असतें. क्रमाक्रमानें त्याचा आकार वाढत जातो व त्यांत पिंडमध्याचा भाग शिरतो. कांहीं कालानें त्याला करांगुलीचें रूप येतें. पाय नाहींसा होत असला म्हणजे वरील फरक विरुद्ध क्रमानें होतात. वरील तऱ्हेचीं स्थित्यंतरें नेहमीं होत असल्यामुळें याचा अकार सदोदित बदलतो; व हा फेरबदल त्याच्या इच्छेवर अवलंबून असल्यामुळें त्याला आपण कालिदासाच्या मेघाप्रमाणें कामरूप म्हणूं.

ज्या वेळीं या प्राण्याला एका विवक्षित दिशेनें जावयाचें असतें, तेव्हां त्या बाजूचे पाय वाढत जातात व इतर बाजूंचे पाय आंत ओढले जातात. अशा तऱ्हेनें एका बाजूची वाढ होऊन सर्वच पिंडमध्ये त्या पायांत शिरतो व त्याच दिशेनें पुन्हां पुन्हां पाय फुटून हा प्राणी त्या दिशेनें पुढें पुढें सरकतो. याच्या आसपास रेतीचे कण पाण्यांत पडले असले व त्यांचा स्पर्श याच्या पायांनां झाला तर त्या कणांनां चुकवून हा प्राणी स्थलांतर करतो, असें या जातीच्या प्राण्यांच्या हालचाली बऱ्याच वेळां लक्षपूर्वक पाहाणाऱ्याच्या नजरेस आल्याशिवाय राहात नाहीं.

वरील तऱ्हेच्या या प्राण्याच्या हालचाली, वेळोवेळीं होणारें त्याचें रूपांतर व नेहमीं स्पष्ट दिसणारी त्याची आकृति यांचा विचार करतां या प्राण्यातील चैतन्यद्रव्य मऊ व पाण्यांत न मिसळणारें आहे असें लक्षांत येतें.

वर आपण या प्राण्याचे स्थूलमानानें दोन भाग केले आहेत. आतां आपण पिंडमध्याकडे सूक्ष्मदर्शकाच्या प्रबलकांचे (लेन्स) च्या साह्यानें पाहूं अशा रीतीनें अतिविस्तारित पिंडमध्यांत एक चैतन्य-केन्द्र व एक संकोचीविवर दृष्टीस पडेल. चैतन्य केन्द्र (न्यूक्लिअस) हा चैतन्यद्रव्याचा एक दाट, वाटोळा विशिष्ट भाग असून त्याचा आकार बदलत नाहीं. त्याच्यामध्यें असलेल्या कांहीं द्रव्यामुळें त्याच्यावर पिंडमध्यापेक्षां रंग लवकर खुलतात व प्रकाशकिरणांचेंहि त्याच्यामध्यें जास्त वक्रीभवन होतें. संकोचीविवर (काँट्रॅक्टाईलबॅक्यूओले) म्हणजे सूक्ष्मदर्शकाच्या प्रबल कांचेखालीं पिंडमध्यांत दिसणारी वाटोळी स्वच्छ जागा अगर पोकळी होय. हिचा आकार हळू हळू वाढतो व पूर्ण वाढ झाल्यावर याच्यायोगें पिंडमध्याची एकपंचमांश जागा व्यापिली जाते. वाढ पूर्ण झाल्यावर विवर एकदम संकोच पावून अदृश्य होतें व पुन्हां कांहीं कालानें त्याच ठिकाणीं वरील तऱ्हेच्या संकोचीविवराची वाढ होते. याशिवाय पिंडमध्यांत संकोच न पावणारीं पुष्कळ विवरें असतात.

 

या प्राण्याची जी नेहमी हळु हळु हालचाल चालू असते, ती केवळ फेरफटका करण्याच्या हेतूनें नसते. याचें पोट या हालचालींवर अवलंबून असतें. इतर जातीच्या आपल्यापेक्षां लहान अशा सूक्ष्म भागांवर अगर इतर जीवांच्या सूक्ष्म भांगावर हा प्राणी आपली उपजीविका करतो. अशा एखाद्या अन्नकणाला त्याचा पाय लागला म्हणजे तो कण त्याच्या पिंडावरणांत खेंचला जातो, नंतर त्याचा प्रवेश पिंडमध्यांत होतो. या ठिकाणीं त्या अन्नकणासभोंवार थोडी निर्मळ जागा दिसूं लागते, त्यालाच 'अन्नविवर' (फूड-वॅक्युओले ) म्हणतात. वरील अन्नकणाचा जेवढा भाग याला पचवितां येतो तेवढा अन्नविवरांत नाहींसा होतो व अवशिष्ट भाग बाहेर सारला जातो. अन्नविवरांत वरील जीवजन्य ( ऑर्ग्यानिक ) अन्नकणाचा जो भाग नाहींसा होतो त्याचें पचन होऊन तो चैतन्यद्रव्यांत मिसळला जातो व चैतन्यद्रव्याची वाढ होते. अर्धवट पचलेले अगर पचन होऊन अवशेष राहिलेले रंगीबेरंगी भाग पिंडमध्यांत पुष्कळ आढळतात. अन्नविवरांतील अन्नकणासभोंवतालच्या द्रवांत पाचनशक्ति असावी, असें या संघांतील इतर प्राण्यांच्या सदरील द्रवाच्या रासायनिक पृथक्करणावरुन वाटतें.

येथपर्यंत कामरुप आमीबाचें स्थूल व सूक्ष्म अवलोकन आणि चलनवलन, अन्नग्रहण व अन्नपचन इत्यादि व्यापारांचा विचार झाला. आतां त्याच्या इतर व्यापाराकडे म्हणजे श्वसन, उत्सर्जन व अपत्यांत्पादन या व्यापाराकडे वळू.

चैतन्यद्रव्यांत अतिसंमिश्र रासायनिक द्रव्यें असल्यामुळें त्यांत पुष्कळ संचित (पोटेन्शिअल) शक्ति असते  व या द्रव्यांच्या रासायनिक पृथक्करणापासून वरील संचित शक्तिचें रुपांतर होऊन उत्पन्न झालेली चालक ( कायनेटिक ) शक्ति खर्चीं पडून आमीबाच्या वरील स्वयंप्रेरीत हालचाली होत असल्या पाहिजेत. ह्या प्रकारच्या हालचाली एका बाजूनें चालू राहिल्या व दुसऱ्या   बाजूनें चैतन्यद्रव्यांतील संचित शक्तींत भर पडली नाहीं तर मृत्यु ठेवलेला आहेंच; परंतु अन्नरुपानें ज्या जीवजन्य वस्तूंचें पचन होतें त्या वस्तुंतील संचित शक्तीची भर चैतन्याद्रव्यांत पडल्यामुळें श्वसनोच्छ्वसन, उत्सर्जन व चलनवलन इत्यादि नित्य व नैमित्तिक व्यापाराकरितां लागणाऱ्या शक्तीच्या जमाखर्चाची तोंडमिळवणी होते. चैतन्यद्रव्यांत संचितशक्तींचें जे चालक शक्तींत रुपांतर होतें त्याला व्यवच्छेदजीवनक्रिया ( कॅटॅबोलिझम) म्हणतात व अन्नग्रहणापासून अन्नांतील ग्रह्यांशाचें चैतन्यद्रव्यांत रुपांतर होऊन संचित शाक्तिंत भर पडते त्याला निमार्णजीवनक्रिया (अ‍ॅनॅबोलिझम ) म्हणतात. निर्माणजीवनक्रिया म्हणजे जमा होय अणि व्यवच्छेदजीवन क्रिया म्हणजे खर्च होय.

ज्या ज्या ठिकाणीं व्यवच्छेदजीवनक्रिया चालू असते त्या त्या ठिकाणीं चैतन्यद्रव्याकडून प्राणवायु आंत घेऊन कार्बान्क आम्ल वायु  (कार्बानिक ऑसिड गॅस ) बाहेर टाकिला जातो, असें अनुभवान्तीं सिद्ध झालें आहे. या क्रियेला श्वसोच्छवास किंवा श्वसनोच्छवसन म्हणतात, व ही घडामोड सर्वजीवांत आढळते; तेव्हां ती आमीबांतहि होत असावी. त्यांचे क्षेत्र शरीराचा सर्व पृठभाग असतें. उच्छ्वसन किंवा कार्बानिक आम्लवायुचें विसर्जन हें एक उत्सर्जनाचें अंग आहे. याशिवाय इतर उत्सृष्ट पदार्थ आहेत व मूत्राम्ल हा त्यांपैकीं एक आहे. मूत्राम्ल आमीबासारख्या सूक्ष्मजंतूंच्या संकोचोविवरांतील द्रवांत असल्याचें सिद्ध झालें आहे.

आमीबाला अन्नाचा पुरवठा भरपूर झाला म्हणजे त्याची वाढ झपाट्यानें होते व वाढ पूर्ण  झाल्यावर त्याच्या पृष्ठभागावर एक खांच दिसूं लागते. खांचणीची वाढ आंत होऊन एकापासून दोन जीव निरनिराळे होतात. पृष्ठभागावरची खांचणी वाढून आमीबाच्या पिंडावरण व पिंडमध्य यांचे दोन भाग होत असतां चैतन्य केद्राचेहि द्विधाकरण होतें व दोनहि शकलांमध्ये एकेक केंद्र स्थापित होऊन दोन सूक्ष्मजंतू तयार होतात. आमीबासारख्या सूक्ष्मजंतूंचे तुकडे केले तर ज्या भागांत चैतन्यकेंद्राचा अंश असतो त्या भागाची अनुकूल परिस्थितींत वाढ होऊन त्यापासून एक स्वतंत्र आमीबा तयार होतो. उलटपक्षीं ज्या भांगात केंद्राचा अंश मुळींच नसतो त्याच्याकडून अन्नग्रहणाहि कार्यें न होतां त्याचा शेवट लवकरच होतो. तसेंच एखाद्या आमीबाचें केंद्र पिंडमध्यापासून वेगळें केलें तरी केंद्रला आपली जीवनयात्रा लवकरच संपवावी लागते. यांवरुन सहज लक्षांत येईल कीं पिंडमध्य व केंद्र यांचें परस्पर साहाय्य व साहचर्य असल्याशिवाय जीवनव्यापार होत नाहींत.

प्रतिकूल परिस्थितींत आपलें सर्व पाय आंवरुन घेऊन आपल्या शरीरावर एक पातळ पटल (सिस्ट) उत्पन्न करुन आमीबा आपलें संरक्षण करितो. या संरक्षित अगर  पटलयुत स्थितींला गुलिकावस्था (एन्सिस्टेशन) म्हणतात. या परिस्थितींत या प्राण्याचा प्रवेश धुळीबरोबर वाऱ्यानें कोठेंहि होतो व अनुकूल परिस्थिति प्राप्त झाली म्हणजे हा आपल्या कवचाबाहेर पडून पूर्ववत आयुष्यक्रम चालू करतो. चैतन्य द्रव्याच्या खालोखाल जीविताला आवश्यक असें जें जल त्याचा आभाव किंवा सभोंवतालच्या उष्णतामानांत होणारा कांहीं अंशाचा फरक इत्यादि कारणांनीं उत्पन्न होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितींत कांहीं ठराविक कालापर्यंत वरील तऱ्हेनें या प्रण्याला आपलें रक्षण करतां येतें.

एखाद्या भांडयांत कांहीं जीवजन्य वस्तु भिजत घातली तर त्या पाण्यांत एक दोन दिवसांनीं निरनिराळे सूक्ष्मजीव आपोआप उत्पन्न होतात व आपापला संसार थाटतात, असे सूक्ष्मदर्शनाच्या योगानें दिसतें. हे जीव-प्राणी वनस्पति-तेथें आपोआप उत्पन्न झाले असें एकदम वाटतें. परंतु वरील पदार्थांत धूळ जाऊं दिली नाहीं व पूर्वीं हजर असलेल्या त्यांतील जीवांनां अगर जीवांच्या अंडयांनां उष्णतेनें अगाऊच मारुन टाकिलें तर त्यांत सूक्ष्मजीव उत्पन्न होंत नाहींत व पदार्थहि कुजत नाहीं असे बऱ्याच शोधाअंती सिद्ध झालें आहे; व त्याबरोबरं  ''जीवो जीवस्य कारणम् ।'' हे तत्वहि प्रस्थापित झालें आहे.

हा  प्राणी निसर्गतः अमर आहे व आकस्मिक कारणानींच फक्त याला मृत्यु येतों हें वरील विवेचनावरून लक्षांत येईलच. अन्नपचन करून चैतन्यद्रव्याची वाढ, चलनवलन, अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थित्यनुरूप स्वतःच्या हालचालींत किंवा शरीराच्या आकारांत स्वसंरक्षणार्थ योग्य तो फरक करण्याची शक्ति अथवा सचेतनत्व (इरिटॅबिलिट), श्वसनोच्छ्वसन, उत्सर्जन अपत्योत्पादन इत्यादि आमीबाचे व्यापार सर्वजीवांत आढळतात, म्हणून वरील क्रियांनां जीवधर्म म्हणूं. आतां वनस्पती व प्राणी यांच्यामध्यें मुख्य फरक म्हणजे प्राणिजातींतील सर्वंसामान्य चलनवलनक्रिया, अन्यत्र तयार झालेल्या जीवजन्य पदार्थांवर होणारी उपजीविका आणि पेशींत सामान्यतः दिसून येणारा पर्णरंजन (क्लोरोफिल) व सत्त्वांश (सेल्युलोज) यांचा अभाव हे होत.

स्थू ल वि क्षे प क ग ण - (लोबोसा) आतां या संघांतील इतर प्राण्यांचा विचार करूं आमीबाबरोबर संघांतील डिफ्लुजिया व आसेंल या प्राण्यांचा समावेश स्थूलविक्षेपक गणांत होतो व त्यांच्या आकारांतील सादृश्य त्यांच्या छद्मपादांत आहे. या गणांतील सूक्ष्म जंतूचे पाय बोथट व स्थूल असतात. आमीबाप्रमाणें हे दुसरे दोन जातींचे प्राणी सांचीव पाण्याच्या गाळांत सांपडतात. डिफ्लुजियाच्या शरीरापासून एक चिकट पदार्थ तयार होऊन व त्याला रेतीचे कण चिकटून या जीवाभोंवतीं एक कोश तयार होतो. या कोशाला एक तोंड असतें व त्यांतूनच या प्राण्याचें छद्मपाद बाहेर पडतात. आर्सेलाचा कोश शार्ङ्गी (किटिन) द्रव्याचा झालेला असतो बऱ्याच कीटकांच्या अंगावर असलेलीं कवचें याच द्रव्याचीं बनलेलीं असतात.

स छि द्र व च क ग ण. - (फोरॅमिनिफेरा) या गणांतील प्राण्याचा कोश विरल असून त्याला अनंत छिद्रें असतात. कोश खडूचा बनलेला असतो. या गणांतील आदिमजंतूचे (प्रोटोझून) तंतूसारखे बारीक व लांब छद्मपाद एकमेकांत गुंतून त्यांचें जाळें बनतें. या प्राण्यांचें चैतन्यद्रव्य कोशांत न मावतां त्याचा एक पातळ थर कोणावर पसरतो व त्या थरापासूनच याचे छद्मपाद फुटतात. एखादा अन्नकण याच्या पायांच्या जाळ्यांत सांपडला म्हणजे आजूबाजूचे पाय त्याला चिकटून त्याच्या सभोंवती चैतन्यद्रव्याचें मंडल तयार होतें, व तेथेंच त्यांचें पचन होतें. पचनीं पडलेला भाग पायातून कोशांत जातो.

ज्यांचे कोश गोलाकार असून त्यांत एक अखंड पोकळी आहे. असे प्राणी या गणांत फारच थोडे आढळतात. बहुत करून बऱ्याच  'सछिद्रकवचक' प्राण्यांच्या बाल्यावस्थेंत वरील एकपदरी कवच असावें; नंतर जशी वाढ होत जाते तसें आरंभीच्या कोशाबाहेरील चैतन्यद्रव्याचा थर वाढून या थराच्या बाहेर परंतु पूर्वीच्या कोषांशीं सांधलेला असा नवीन कोष तयार होतो व याप्रमाणें दुपदरी कवच तयार होतें. हा क्रम असाच पुढें चालू राहून संकीर्ण व विविधाकार कवचें तयार होतात. नवीन नवीन होणार्‍या पदरांच्या लहानमोटया प्रमाणांवर व पूर्वीच्या कोषांशीं होणाऱ्या पुष्कळ प्रकारच्या सांध्यामुळें एकापेक्षां अधिक खण असलेल्या संकीर्ण कवचांचे पुष्कळ निररिाळे नमुने या प्राण्यांत पाहण्यास मिळतात. चैतन्यद्रव्याची वाढ होऊन अशा रीतीनें अनेकखणी कवच तयार झालें म्हणजे पुष्कळ केन्द्रेंहि त्याबरोबर तयार होतात.

या गणांतील बहुतेक उपजाती समुद्राच्या पृष्ठभागावर असतात व त्याठिकाणीं त्यांची वसती इतकी दाट असते कीं, त्यांच्या कवचरूपीं सांगाडयाचे थरच्याथर समुद्राच्या तळावर सांचतात. इंग्लंडांत जे खडूचे डोंगर आहेत. त्यांतील खडूचे प्रस्तर असेच कांहीं युगांपूर्वीं समुद्राच्या तळाशीं यांच्या सांगाडयांच्या थरांनींच बनलेले आहेत असें भूगर्भशास्त्र सांगते.

या गणांत द्विधाकरणाशिवाय बीजकणोत्पत्ति (स्पोरुलेशन) मार्गानेंहि अपत्योत्पादन होतें. या दुसऱ्या मार्गानें प्रजावृद्धि व्हावयाची असली म्हणजे कोषांतील चैतन्यद्रव्याचे बारीक बारिक वाटोळे तुकडे पडतात; नंतर प्रत्येकाला एका बाजूला केसासारख्या कशा (प्लॅगेलम) फुटतात. कशांचा उपयोग या गोलाकार तुकडयांनां किंवा बीजकणांनां वल्ह्यांसारखा होतो. कशांच्या हालचालीवर बीजकण कांहीं काल कोषांत पोहतांत व नंतर मुखांतून बाहेर पडतात. समुद्रांत स्वतंत्रपणें पोहत असतां त्यांपैकीं दोघांदोघांचा संयोग होऊन संयुक्त बीजकण तयार होतो. पुढें संयुक्तबीजकणाची वाढ होऊन व त्यावर कोष तयार होऊन त्याचें रूपांतर सच्छिद्रकवचप्राण्यांत होतें.

द्वि क व च क ग ण. - (रॅडिओलॅरिया) या गणांतील सूक्ष्म जंतूंची रचना व जीवनक्रमहि सछिद्रकवच जंतूंप्रमाणेंच असतात. परंतु कवचांत दोन एकमध्य कोष असतात. व ते गारगोटीचे झालेले असतात. एक कोष प्राण्यांच्या पृष्ठभागावर असतो व दुसरा मधोमध असतो. बाहेरील कोषावर निरनिराळ्या आकाराचे कांटे असतात. हे प्राणी समुद्रांतच राहतात. खोल समुद्रांत अथवा महासागरांत तळाशीं याच प्राण्यांच्या कवचांचे थर सांचतात; कारण यांच्याबरोबर पाण्याच्या पृष्ठभागावर असलेल्या सछिद्रकवचक जंतूचे खडूचे सांगाडे खोल पाण्यांतील कार्बोनिक आम्लवायूनें विरघळून जातात.

वरील तीनहि गणांचा समावेश कामरूप अगर छद्मपाद आदिमजतूंत होतो. यांशिवाय कामरूप (रिझोपोडा) वर्गांत तारकितविक्षेपक (हेलिओझोआ) गणाचा समावेश होतों. या गणांतील प्राण्यांचे छद्मपाद सरळ, कठीण व कृश असतात व प्राणी प्रकाशकिरणयुक्त ताऱ्यासारखे दिसतात.

स्थू ल रू प आ दि म जं तु (मायक्टोझोआ) - या वर्गांतील प्राणी भूचर असून कुजणाऱ्या पानांवर वगैरे आढळतात. कांहीं इंच लांबीरुंदीचे चैतन्यद्रव्याचे पातळ पांढुरके अगर पिंवळट थर म्हणजेच या वर्गांतील प्राणी. हे हळूहळू पुढें सरकतात व राक्षसी आमीबाप्रमाणें दिसतात. यांच्या वसतिस्थानांत सांपडणाऱ्या सरलसूक्ष्म वनस्पतीं (बॅसिली) वर यांचा निर्वाह होतो. यांच्या शरीरांत पुष्कळ केंद्रें असतात. कांहीं वेळ अशा रीतीनें कालक्रमणा करून हा राक्षसी आमीबा आपल्या सभोंवती एक कोश तयार करतो. कोशाच्या आंत चैतन्यद्रव्याचे पुष्कळ लहान लहान भाग पडून बीजकण तयार होतात व त्या प्रत्येकांत एकेक केंद्र असतें. आरंभीं या सकेंद्रबीजकणावर एकपेशीय द्रव्यांचें आवरणहि तयार होतें. कांहीं कालानें हे बीजकण कोषाबाहेर पडून कांहीं काल कामरूप स्थितींत घालवितात. नंतर त्यांना एकेक कशा फुटतें. या सकश व सकेंद्र प्राण्यांत संकोचीविवरहि असतें. व हा आपली कशा मागें पुढें हालवून इकडून तिकडे हिंडतो, सरलसूक्ष्म वनस्पतींवर उपजीविका करतो व द्विधाकरणानें या स्थितींत याच्यापासून प्रजावृद्धीहि होते.  काहीं कालानें कशा अंतर्धात पावतात, आकृति विषम होते, व असे बरेच विषमकार प्राणी संयोग पावून त्यांच्यापासून नुसत्या डोळयांना दिसणारा एक राक्षसी आमीबा तयार होतो.

स प्र तो द  व र्ग. - (मॅस्टिगोफोरा) या वर्गांतील प्राण्यांना एक अगर अनेक कशा असतात, व या वर्गांत आकार व व्यवसाय यासंबंधीं वैचित्र्य फार आढळतें. या वर्गाचें प्रतिरूप हरितयुग्लीना (युग्लीना व्हिरिडिस) हें आहे.

ह रि त यु ग्ली ना. - ज्या तळयांत हे प्राणी असतात त्यांतील पाणी हिरवें दिसतें. या सूक्ष्म प्राण्यांचा अकार सुतानें भरलेल्या चातीसारखा असतो; या लांबट प्राण्यांचा मध्यभाग फुगलेला असतो. एक टोंक चपटें असतें व त्यांत एक खळगा असतो;  या  खळग्याच्या तळापासून एक कशा फुगलेली असते व या खळग्याबाहेर अथवा गलविवराबाहेर ती पाण्यांत हालत असते. या टोंकाला पूर्वभाग म्हणतात. मोराच्या पिसाच्या प्रत्येक शाखेला जसे बारीक बारीक आंखूड तंतू सर्व अंगभर फुटलेले असतात त्याप्रमाणें याच्या कशेवर आंखूड पक्ष्य (सिलिया) असतात. आपल्या कक्षेला हिसके देऊन हा प्राणी इतस्ततः फिरतो. याला छद्मपाद केव्हांहि फुटत नाहींत. या प्राण्याच्या शरीरावर एक पातळ पापुद्रा असतो; त्याच्य आंतल्या बाजूला चैतन्यद्रव्याच्या थरांत तिरकस व अन्वायाम (लॉजिटयुडिनट) रेघा दिसतात. यावरून आकुंचनशील चैतन्य द्रव्यमय तंतूंचा हा थर झालेला असावा असें कांहीं म्हणतात. याच्या फुगीर मध्यभागीं यांचें केंद्र असतें व पूर्वभागीं गलविवराच्या तळाशीं चैतन्यद्रव्यांत याचें संकोचीविवर असतें. या प्राण्याचा सर्व भाग हिरवा असून शरीरांत पर्णरंजनहि सांपडतें. संकोचीविवराशेजारी एक रक्ततिलक असतो व हा त्याचा अविकासित नेत्र असावा. या प्राण्याची उपजीविका जलस्थ वनस्पतींप्रमाणें पाण्यांत विरलेल्या कार्बानिक आम्ल वायूवर व खनिज पदार्थांवर होते. याला इतर प्राणी अथवा वनस्पती भक्षण कराव्या लागत नाहींत. परंतु हा प्राणी अपालें अन्न वनस्पतींप्रमाणें निसर्गजन्य ( इन ऑरग्यानिक) पदार्थांपासून आपल्या शरीरांत पर्णरंजनाच्या मदतीनें तयार कारतो व त्यावर त्याची उपजीविका होते.

याच्या कशेच्या चलनवळनानें पाण्यांत खळबळ उडून या पाण्याच्या गलविवरांत जलप्रवाहाबरोबर जीवजन्य अन्नकण शिरतात, व त्यांचा प्रवेश चैतन्यद्रव्यांतहि झालेला कधीं कधीं आढळतो. यावरून इतर पाण्यांप्रमाणें या जंतूंनां जीवजन्य व घन अन्नकण पचवितां येतात असें वाटतें. अशा तऱ्हेंनें या सूक्ष्मजीवाची उपजीविका कांहीं अंशीं वनस्पतीं प्रमाणें व कांहीं अंशी प्राण्यांप्रमाणें होत असल्यामुळें, वनस्पतिशास्त्रज्ञ याला वनस्पतींच्या कोटींत टाकितात, व प्राणी शास्त्रवेत्ते हा प्राणी आहे असें मानितात. असाच मतभेद या गणांतील बऱ्याच जंतूसंबंधीं होतो. कधीं कधीं हालचाल बंद करून आपल्या सभोंवतीं पेशीय सत्त्वांशाचा कार्बो हायड्रेट कोश उत्पन्न कारतो. कोशांतरर्गत चैतन्यद्रव्यांत द्विधाकरणानें अगर अनेकधाकरणानें पुष्कळ सकश जंतू तयार होतात व ते कांहीं काल कामरूप राहून वर वर्णिलेल्या पूर्णावस्थेप्रत पोंहोचतात.

स क श ग ण. - वरील सूक्ष्म जंतूला या वर्गांतील सकशगणांत स्थान मिळतें. सकशप्राण्यांनां एक ते चार पर्यंत कशा असतात. यांतील कांहींची वाढ अंकुरोप्तत्तीनेंहि होते व जन्मद व सद्योजात जंतूंची ताटातूट न होतां बहुशाख वृक्षाप्रमाणें यांचा पुंज तयार होतो. हॉलवाक्स वगैरे प्राण्यांचा पुंज गोल असून आंतून पोकळ असतो. पुंजांतील प्रत्येक जंतूला दोन कशा असतात व पुंजांत श्रमविभाग होऊन कांहीं जंतू अपत्योत्पादनच कारतात. अशा जंतूंच्या अनेक द्विधाकरणांनीं पुष्कळ सकश जंतू तयार होतात व ते रिक्तगर्भ गोलाप्रमाणें आपली रचना करून व प्रत्येकाच्या दोन दोन कशा बाहेरच्या बाजूस पसरून त्यांच्या हालचालीवर आपल्या जन्मद पुंजाच्या पोकळींत संचार करितात.

द्विधाकरण (बायनरी फिशन), अनेकधाकरण व अंकुरोत्त्पत्ति हे निर्द्वेद्वोपत्ती (अ‍ॅसेक्शुअल मल्टिप्लिकेशन) चे प्रकार आहेत. द्विधाकरणांत जन्मद प्राण्यापासून दोन सारख्या आकाराचे जीव तयार होतात. अनेकधाकरणांत चैतन्यद्रव्याचे अनेक तुकडे पडून एका जीवापासून पुष्कळ जीव तयार होतात. आणि अंकुरोत्त्पत्तीमध्यें नवीन होणारा जीव जन्मद जीवापेक्षां लहान असतो. या गणांतील कांहीं प्राण्यांत द्वंन्द्वोत्पत्तीहि होते. या प्रकारांत दोन संयोगी बीजकण (गॅमेटं) एकत्र होऊन त्यांच्यापासून एक संयुक्तबीजकण तयार होतो. नंतर संयुक्तकणापासून अनेक अनेक धाकरणांनीं पुष्कळ बीजकण तयार होतात. संयुक्त प्राण्यांचें अनेकधाकरण होण्यापूर्वी त्यावर एक संरक्षक पटल उत्पन्न होतें व यां पटलाबाहेर शेवटीं बीजकण पडतात ब कशा फुटून इकडे तिकडे स्वतंत्रपणें संचार करितात. व्हॉलवाक्स पुंजांतील संयोगीकण लहान मोठे असतात. यांचे बृहत्संयोगी कण व सुविकासित किंवा अत्युत्क्रांत प्राण्याचें अंडपेशीं यांच्यांत फार साम्य आहे. तसेंच या पुंजाचे लघुसंयोगी कण लांबट असतात व त्यांच्या एका टोंकाला दोन कशा असतात. म्हणून हे लघुसंयोगीकण इतर प्राण्यांच्या शुक्रबीजा (स्पर्म) सारखे दिसतात.

स प्र णा ल ग ण (चोअ‍ॅनोफ्लेगेलाटा). - सप्रणालगणांतील सूक्ष्म जंतूंनां एकके कशा अथवा प्रतोद असून तो ज्या जागी फुटलेला असतो त्याठिकाणीं एक चैतन्यद्रव्याचा पेला झालेला असतो; त्यालाच प्रणाल म्हणतात. प्रतोद अगर कशा पेल्याच्या मध्यभागीं व बरीच लांब असल्यामुळें ही एक फुलझाडाची कुंडीच असावी असें वाटतें. प्रणाल आकुंचनशील असून त्याच्या हालचालींनीं पाण्यांत खळबळ उडाली म्हणजे बारिक सारिक अन्नकण बाहेरच्या अंगास चिकटतात व हळूहळू खाली सरकून चैतन्यद्रव्यांत खेंचले जातात व त्यांसभोंवती तेथें अन्नविवर तयार होतें.

शरीरांत केंद्राशिवाय एकदोन संकोचीविवरें असतात. या गणांतील कवचयुक्त प्राण्यांनां खालीं देंठ किंवा नाल असतें. यांची वाढ अन्वायामद्विधाकरणानें होऊन व उत्पन्न झालेल्या व्यक्तीं एकमेकांनां सांधलेल्या राहून त्यांच्यापासून वृक्षासारखे पुंज तयार होतात. कांहीं जंतू गुलिकावस्थेंत जाऊन अनेकधाकरणानें अपत्यवृद्धि करून बारिक बारिक सप्रतोद जंतुकांनां जन्म देतात, व त्यांची वाढ होऊन त्यांचें रूपान्तर पूर्णावस्थेंतील सप्रणाल जंतूंत होतें.

या गणाशिवाय या वर्गांत द्विकश (डायनोफ्लॅगेलाटा) व गोल कणांचा (सिस्टो फ्लेगेलाटा) समावेश होतो. द्विकशजंतूंनां दोन कशा असतात. व त्यांची कवचें विचित्र व दर्शनीय असतात. बहुतेक प्राणी समुद्रांत राहतात. या गणांतील कांहीं जातिविशेषामुळें समुद्राचें पाणी मंदप्रभ (फॉस्फॉरेसेंट) होतें. व रात्रीं काजव्याप्रमाणें चकाकतें. गोलगणांतील प्राणी वरी एवढे मोठे असतात व त्यांच्यामुळें समुद्राला मंदप्रभत्वहि येतें.

प रा न्न पु ष्ट व र्ग. - (स्पोरोझोआ) या वर्गाचें प्रतिरूप चंचल एकपटली ( मोनोसिस्टिस अ‍ॅगिलिस) नांवाचा जंतु आहे. हा भृकृमीच्या [ अर्थवर्म ] शुक्राशयांत आढळतो. हा लांबट व चपटा प्राणी कृमीसारखा दिसतो. याची दोनहि टोकें निमुळतीं झालेलीं असतात. अनुक्रमानें शरीराचें आकुंचन व प्रसारण करून हा स्थलांतर करतो. पूर्णावस्थेंत याच्या शरीरावर एक पटल असतें. शरीरांतील द्रव्याचे दोन भाग पडतात, बाहेरचा थर दाट असतो, व मधली कोर पातळ असते. याचें केंद्र मोठें असून त्यांत केंद्रमध्यहि असतें. संकोचीविवर व पृष्ठभागावर कशा किंवा छद्मपाद नसतात. हा प्राणी परोपजीवीं असल्यामुळें याला अन्नरस तयारच मिळतो व पृष्ठभागानें अन्नरस शोषून त्यावर निर्वाह करणें एवढीच कामगिरी त्याला करावी लागते.

अपत्योत्यादनासाठीं दोन दोन जंतू एकत्र होऊन त्यांचा एक गोल बनतो; त्यावर एक पटल तयार होतें अशा गोलांतील प्रत्येक जंतूच्या केंद्राचे अनेक द्विधाकरणांनीं पुष्कळ भाग पडतात. नंतर त्या प्रत्येक केंद्रशकलासभोवतीं चैतन्य द्रव्याचें मंडल तयार होतें. अशा रीतीनें पुष्कळ संयोगीकण तयार हेतात. या सुमारास गोलांतील दोन प्राण्यांचीं मधलीं पटले नाहीशीं होऊन चैतन्यद्रव्याचा एकजीव होतो व त्यांत वरील संयोगीकण फिरूं लागतात. नंतर दोनदोन संयोगीकणांचा संयोग होऊन संयुक्तकण तयार होतो. संयुक्तकण मध्यें फुगीर असतो. व त्यावर एक शार्ङगीद्रव्याचें पटल तयार होतें. या प्रत्येक संयुक्तकणापासून अन्वायामद्विधारकरणांनीं चंद्राच्या कोरेसारखीं बीजशकलें तयार होतात. हीं शकलें पटलाबाहेर पडून आपल्या निमुळत्या टोंकाच्या चलनवलनानें इकडे तिकडे स्वतंत्रपणें फिरूं लागतात. ही या जंतूची डिंबावस्था (लेराइड स्टेज) झाली. भूकृमीच्या वाढत असलेल्या शुक्रपेशींत हीं बीजशकलें शिरतात व पेशीस्थ जीवनाचा काहीं काल उपभोग घेऊन बाहेर शुक्राशयाच्या पोकळींत येतात व तेथें पूर्णावस्थेला पोंचतात.

स्वै र ग ति क ग ण. - (ग्रेगॅरिनिडा) हा जंतु स्वरैगतिक गणांतला आहे. या गणांतील इतर सूक्ष्मजंतू झुरळ, शेऊळ, (लॉबस्टर), शतपदी (घोण इत्यादि प्राण्यांच्या अन्ननलिकेंत राहून त्यांच्या अन्नरसावर पोसतात. यांपैकीं कांहींच्या देहाचे दोन अगर तीन भाग स्थूलमानानें पडतात. दोन ठिकाणीं चिंबून ज्याचे तीन भाग पडले आहेत अशा प्राण्याच्या पूर्वभागाच्या पूर्वटोंकाला आंकडयासारखे वक्रप्रसर असतात व ते खुपसून यजमानाच्या अन्ननलिकेला चिकटून राहतात. पूर्णावस्थेंत पूर्वभागापासून सुटून उदरांत स्वतंत्रपणें इकडे तिकडे वावरतात.

पे शी स्थ ग ण. - (कॉस्सिडिइडिया) पेशीस्थ गणांतील जंतू सर्व प्राण्यांच्या शरीरांत आढळतात, व कोणत्याहि इंद्रियाच्या पेशींत सांपडतात; परंतु मुख्यतः अन्ननलिकेच्या अंतर्कलेंत (एपिथेलियम) मध्यें यांचे वास्तव्य असतें. या गणांतील जंतू रुधिरपेशींत कधींहि आढळत नाहींत. कांहीं जंतू पेशींच्या केंद्रांतहि शिरतात.

रु धि र स्थ ग ण. - (हेमोस्पोरिडिया) रुधिरस्थगणांतील जंतू रुधिरांतील रक्तपेशींत (रेड कॉर्पस्कल्स) आपलें बहुतेक आयुष्य घालवितात. हे जंतू पृष्ठवंश प्राण्यांच्या रुधिरांत सांपडतात. मनुष्यें, इतर सस्तन प्राणी, व कांहीं पक्षी यांच्या रुधिरपेशींत या गणांतील जंतू शिरले व तेथे त्यांची वाढ झाली म्हणजे निरनिराळे ताप वरील प्राण्यांत उद्भवतात, असें बऱ्याच अवलोकनांनी सिद्ध झालें आहे. या गणांतील कांहीं उपजातींचा प्रवेश मनुष्याच्या रुधिरपेशींत झाला म्हणजे हिंवतापाचे निरनिराळे प्रकार त्यांच्यात उद्भवतात असें आतां सिद्ध झालें आहे.

हिंवतापाचे जंतू रोग्याच्या रक्तपेशीत कामरूपस्थितींत आपली कालक्रमणा करितात. या स्थितींत त्याची अनेकधाकरणांनी वाढ होते व उत्पन्न झालेले जंतू आसपासच्या दुसऱ्या पेशीत शिरतात. यांपैकीं कांहीं गोल असतात व कांहीं चंद्रकोरीसारखे दिसतात. यांपैकीं कांहीं पुंसंयोगीकणांचे कोष बनतात व कांहींपासून प्रत्येकीं एकेक स्त्रीसंयोगीकण तयार होतो. या स्थिथींत एका प्राण्याच्या शरीरांतून दुसऱ्या यजमानाच्या शरीरांत या जंतूनां प्रवेश करावा लागतो. हिंवतापाच्या जंतूंचा दुसरा यजमान अनाफिलीस जातीचा मच्छर आहे. वरील स्थितींत दुसरा यजमान मिळाला नाहीं तर अकालमृत्यु येतो. तापकरी मनुष्याला या जातीचा मच्छर चावला म्हणजे  शोषून घेतलेल्या रक्ताबरोबर या जंतूंचा प्रवेश त्याच्या जठरांत होतो. रक्ताच्या प्रत्येक बिंदूंत असे जंतू पुष्कळ असल्यामुळें वरील तऱ्हेनें प्रत्येक अवस्थेंतींल जंतूंचा प्रवेश मच्छराच्या जठरांत होतो. प्ररंतु कोषस्थसंयोगीकणांशिवाय बाकी सर्व या नवीन यजमानाच्या जाठरद्रव्यानें नाश पावतात. प्रत्येक पुंसयोगीकणांच्या कोषांतून पुष्कळ तंतूसारखे पुंसंगोयीकण बाहेर पडतात व स्त्रीसंयोगीकण स्त्रीकोषांतून बाहेर पडतो. नंतर या स्त्रीसंयोगीकणांच्या केंद्राचें दोन वेळां द्विधाकरण होऊन व ते दोन भाग बाहेर पडून स्त्रीकणांत केंद्राचा चवथा भाग शिल्लक राहिला म्हणजे स्त्रीकण गर्भधारणेला योग्य होतो. नंतर या तयार झालेल्या गर्भपात्र स्त्रींकणांत स्वेच्छाविहारी पुंकण शिरून गर्भधारणा होते. पुढें वाढ होऊन मध्यें फुगीर व दोनहि टोंकांनां निमुळता असा गर्भ होतो व कांहीं कालानें अन्ननलीकेच्या भिंतींत शिरून भिंतींच्या स्नायूंत आपलें ठाणें देतो. तो तेथें आपल्यावर एक पटल उत्पन्न करितो. त्याच्या आंत त्याची खूप वाढ होते व अन्ननलीकेच्या बहिरंगावर एक पुळी आली आहे असें वाटतें. वरील पटलस्थ स्थितींत एका गर्भापासून अनेक तंतूसारखे जंतू तयार होतात व कोष फाडून त्यांचा संचार मच्छराच्या शरींराच्या पोकळींत किंवा रुधिरगुहेंत (होमोसेले) होतो. या ठिकाणीं भटकत असतां त्यांचा प्रवेश लालापिंडांत (सॅलिव्हरी ग्लँड) होतो व असा या मच्छराच्या चावण्याबरोबर ते मनुष्याच्या रक्तांत शिरतात व तेथें त्यांची पूर्ण वाढ होते. अशा रीतीनें त्यांचा फैलाव व त्याच्याबरोबर हिंवतापाचा फैलाव होतो.

नि र्या स ज व र्ग. - ( इन्फुसोरिआ ) पदुकाकार जंतु (स्लिप्ड अ‍ॅनिमलक्यूल, पॅरॅमॅसियुम ) हा या वर्गाचे प्रतिरूप आहे. ज्यांत गवत दोन तीन दिवस कुजत पडलें आहे अशा पाण्यांत उत्पन्न होणाऱ्या बारिक बारिक जीवांत हे सांपडतात. हे डोळयांनां दिसण्याइतकें मोठे असून त्यांचा रंग पांढुरंका असतो. या जंतूंचा पूर्वभाग बोंथट असून पश्चिम भाग निमुळता असतो. या प्राण्यास अधरतल (व्हेंट्रल) व ऊर्ध्वतल (डॉर्सल) असें दोन पृष्ठभाग आहेत. अधरतलभागीं एक तिरकस खांचणी असून त्यांतच गलविराचें मुख असतें. गलविवराचा शेवट मध्यभागीं मऊ चैतन्यद्रव्यांत होतो. सर्व पृष्ठभागावर आंखूड पक्ष्यांच्या अथवा लोमांच्या अन्वायाम रांगा असतात. कक्षविवरांतहि पक्ष्म असतात. शरीरांतील मध्यभागीं द्रव्य पातळ असतें. व बाह्यभागीं दाट थर अशतो. पृष्ठभागावर एक विरल पटल असतें. व तें गलविवरांतील पृष्टभागावरहि पसरलेलें असतें. या पटलः ( क्युटिकल ) पासून पक्ष्म उद्भवतात. बाह्यभागांत एके ठिकाणीं दोन केंद्रें असतात व त्यांनां आकारावरून महा व लघु केंद्र म्हणतात. महाकेंद्राचें द्विधाकरण फार सोपें आहे;परंतु लघुकेंद्राचें द्विधाकरण गूढ व चमत्कारिक आहे.

संकोचीविवरें दोन असतात व सूक्ष्मदर्शकाखालीं बिनचूक सहज ओळखितां येतात. प्रत्येक विवरासभोंवतीं सात आठ, लांबट व विपुलमध्य अशा विवरशाखा असतात. या शाखायुक्त संकोचीविवराचीं आकुंचनें व प्रसारणें पुढीलप्रमाणें होतात. आसपाच्या चैतन्यद्रव्यांतील त्याज्य पाणी झिरपून पहिल्यानें विवरशाखांची वाढ होते. त्यांची पूर्ण वाढ झाल्यावर त्या एकदम आकुंचन पावून अदृश्य होतात व त्याबरोबर मध्यवर्तींविवर फार झपाट्यानें वाढतें पूर्णवाढ होऊन तें संकोच पावलें म्हणजे त्यांतील द्रव या सूक्ष्मजंतू्च्या शरीराबाहेर पडतो व पुन्हां पूर्ववत विवरशाखा वाढतात. हा क्रम आमरण चालतो.

या जंतूच्या बाह्यभागांत लहान शल्यकोषं ( ट्रायकोसिस्टस) प्रकाशकिरणांसारखे विकीर्ण झालेले असतात. या जंतूला कोणत्याहि प्रकारची उपाधि पोंचली म्हणजे या कोशांतून लांब व बारिक सुईसारखीं शल्यें बाहेर पडतात व सर्व पृष्ठभाग सकंटक होतो. सूक्ष्मदर्शनाखालीं या प्राण्याला आयोडिनद्रव्यानें मारिलें, तर सर्व शरीरावर हीं शल्यें उभीं राहतात.

गलविवरांतील पक्ष्मांच्या हालचालींनीं पाण्यांत खलबळ उडून लहान लहान जंतू यांच्या गलविवरांत शिरतात व पुढें चैतन्यद्रव्यांत शिरतात. अन्नकण व एक पारदर्शकद्रव्य असलेलीं अन्नविवरें याच्य शरीरांत सारखीं पिरत असतात व अन्नाचें पचन होऊन त्यांतील अन्नकण कमी कमी होतो. सत्व (स्टार्च) व ओजस (प्रोटिइड) असलेले पदार्थ त्याला पचवितां येतात. पचन होऊन अवशिष्ट राहिलेला भाग एका विवक्षित ठिकाणीं गलविवरांतून बाहेर पडतो. या भागाला गुदभाग म्हणतात. या ठिकाणीं गलविवरासारखें कायमचें मुख अथवा द्वार नसतें.

अनुविस्तर (ट्रॅन्सव्हर्स) द्विधाकरणानें त्याची वाढ होते. पहिल्यानें केंद्रांचे दोन दोन भाग पडतात व नंतर शरीराचे दोन आडवे भाग पडतात व दोनहि भागांत एकेक लघु व महाकेंद्र असतें. अशा तऱ्हेची प्रजावृद्धि पिढयानुपिढया बिनतक्रार चालत नाहीं. मधून मधून दोन दोन प्राण्यांचा संयोग होऊन केंद्रद्रव्याचा अंशतः विनिमय व्हावा लागतो. यासाठीं दोन दोन प्राणी अधरतलानें एकमेकांस चिकटतात. प्रत्येकाच्या महाकेंद्राचे बारिक बारिक भाग पडून चैतन्यद्रव्यांत अदृश्य होतात. याच सुमारास दोन द्विदाकरणांनीं लघुकेंद्राचे चार भाग पडतात. यापैकीं दोन नष्ट होतात व शिल्लक राहिल्यांपैकीं एक स्थिर असतो व दुसरा भाग चंचल असतो. नंतर दोगांची चंचल प्रकेंद्रे ( प्रोन्यूक्लिअस ) एकमेकांच्या चैतन्यद्रव्यांत शिरून त्यांचा व या नवीन स्थिर प्रकेंद्राचा एकजीव होतो. अशा रीतीनें दोनहि प्राण्यांत एकेक केंद्र तयार होतें व प्राणी अलग होतात. नंतर प्रत्येकाच्या केंद्राचे दोन भाग पडतात व त्यांपासून लघु व महाकेंद्र तयार होतात. या केंद्रद्रव्याच्या विनिमयानें प्रत्येक जंतु जोमदार होऊन पूर्ववत् द्विधाकरणानें अपत्यवृद्धि करितो.

निर्यासजजंतूच्या अंगावर नेहमीं बाल्यावस्थेंत पक्ष्म असतात व या भेदावरून त्याचे पुढी दोन गण पडतात.

लामेपाद (सिलि आटा) - या गणांतील जंतूंच्या अंगावर पक्ष्म सदोदित असतात, परंतु ते एकसारखेच नसतात. कांहीं जंतूंच्या कांहीं ठिकाणीं ते आंखूड तर कांहीं ठिकाणीं लांब असतात. व शरीराच्या काहीं भागांवर मुळींच नसतात. या गणांत आकारवैचित्र्य फार आढळतें. कांही अंडाकृति, तर कांहीं वृक्काकार (किडने) किंवा पेल्यासारखे अगर कर्ण्यासारखे दिसतात. कांहीनां दोन वल्हीं आहेत असें वाटतें; काहींचें शरीर लांबट असून विकसित प्राण्यांप्रमाणें यांच्या देहाच्या स्थूलमानानें अन्वायाम भाग पाडतां येतात. कांहीं स्वेच्छाविहारी आहेत, कांहीनां देंठ फुटून देंठानें कोणत्यांना कोणत्यातरी जलस्थ वस्तूला ते जन्मभर चिकटून राहतात.

घंटाकार जंतु (व्हॉटिसेला): - हे वरील दुसऱ्या प्रकारांत येतात. जलस्थ वनस्पतींच्या अंगावर असलेल्या मळींत हे बऱ्याच वेळां सांपडतात. नांवाप्रमाणें घंटाकार असून आपल्या देंठानें कोणत्याना कोणत्यातरी वस्तूला चिकटून राहतात. घंटेसारखा दिसणार भाग आंतून पोकळ नसतो. व त्याच्या वाटोळ्या कडेवर पक्ष्मांची रांग असते. पक्ष्मांच्या आंतल्या बाजूला तशीच एक वर्तुलाकार खांचणी असते. या खाचणींत गलविवराचें मुख असतें. खाचणीच्या आंत मध्यवर्तुलाच्या कडेलाहि पक्ष्म असतात. पदुकाकार जंतूप्रमाणें याचें गलविवर पक्ष्मल असतें. व त्यांत एक चैतन्यद्रव्याचा पातळ व गुंडाळलेला पापुद्रा असतो व त्यावर लोम अथवा पक्ष्म असतात. या लोमांच्या संगतवार मागें पुढें होण्यामुळें गलविवरांत जलप्रवाहाबरोबर अन्नकण शिरतात. नंतर मधल्या पातळ द्रव्यांत शिरून त्याच्या सभोंवती द्रव्ययुक्त अन्नविवर तयार होतें व अशीं विवरें या सोंगटीसारख्या प्राण्यांत फिरतांना आढळतांत. पचन होऊन अवशिष्ट राहिलेले कण एका विशिष्ट ठिकाणाहून गलविवरांत सोडले जातात. या ठिकाणी कायमचे गुदद्वार असावें असें वाटते.

संकोचीविवर एकच असतें. महाकेंद्र अश्वनालासारखें असून त्याचीं टोंकें निरनिराळ्या समभूपृष्ठभागपातळींत असतात. त्याच्या शरीराच्या बाह्यभागीं चैतन्यद्रव्यांत स्नायु पेशींच्या सारख्या अनुविस्तर अथवा आडव्या रेघा असतात. याच भागाचा देंठ झालेला असतो व तो नेहमी ताठ न राहतां त्याचीं व्यवर्तिमंडलें (स्पायरल) पडून प्राणी मागें ओढला जातो.

अपत्योत्पादनाच्या वेळीं मध्यमंडलाच्या मधोमध खांचणी पडून व ती देंठापर्यंत वाढत जाऊन कांहीं वेळ एका देंठाला दोन प्राणी चिटकलले दिसतात. त्यांतील एकाची वर्तुलाकार खांचणी नाहींशीं होऊन केंसहि जातात. नंतर देंठाजवळच्या भागांत एक नवीन लोमांची रांग फुटते व प्राणी देंठापासून सुटून पाण्यांत पोहूं लागतो. कांहीं कालानें एकाजागीं चिटकून त्याला एक देंठ फुटतो व नवीन घंटाकार प्राणी तयार होतो.

अंकुरोप्तत्तीचाहि प्रकार या प्राण्यांत आढळतो व सद्योजात व जन्मदतंतूची ताटातूट न होता प्रत्येकापासून पुन्हां वाढ झाल्यामुळें सुक्ष्मदर्शनाखाली आपण एखादें पुष्कळ बेंचारलेलें झाड पहात आहों असें वाटतें.

मधून मधून निरनिराळ्या वंशांतील जंतू संयोग पावतात व पदुकाकार जंतूंप्रमाणें यांचीं महाकेंद्रें नाहींशीं होतात व लघुकेंन्द्रापासून प्रकेंन्द्रें उत्पन होऊन केंन्द्रद्रव्याचा परस्पर विनिमय होतो व नंतर दोन्ही निराळे होतात. संयोग पावणारे प्राणी लहानमोठें असले तर लहान प्राण्याचें चैतन्य द्रव्यहि मोठ्या प्राण्यांत मिसळून जातें व त्याचें अपत्योत्पादन जोरानं चालूं होतें. एकाच वंशांतील प्राणी वरील तऱ्हेनें संयोग पावले तर पुढें उत्पन्न झालेलीं अपत्यें अनुकूलस्थितींतहि आपोआप मरतात असें आढळून आलें आहे.

शू ल ध र ग ण. - ( टेंटॅकूलिफेरा ) शूलधर जंतूहि निरनिराळ्या विचित्र अकाराचे असून त्यांच्यांतील विशेष म्हणजे त्यांचीं शूलासारखीं इंद्रियें होत. शूल बारिक वाटोळे व लांब तंतूसारखे असून त्यांच्यामधील चैतन्यद्रव्याची कोर मऊ असते व बाहेरचा भाग कठिण असतो. टोंक पसरट असून त्याच्या योगानें त्याला दुसऱ्या पदार्थांनां चिकटतां येतें. शूलाचीं पसरट टोंकें एखाद्या निर्यासजजंतूला चिकटलीं म्हणजे या नवीन प्राण्याचें तेवढया जागेवरचें पटल विरघळून जातें, व त्याचें चैतन्यद्रव्य शूलाच्या मधल्या मऊभागांतून शूलधर प्राण्याच्या शरीरांत शिरतांना दिसतें. कांहीं जंतू आपल्या सभोंवती सनाल कवचें तयार करितात; व कांहीं एकमेकांस देंठांनीं चिकटलेले राहून सूक्ष्म वनस्पती प्रमाणें दिसतात.

आतांपर्यंत या संघातील कांहीं मुख्य मुख्य परिचित प्राण्यांचें वर्णन झालें. कामरूपवर्गांत अमीबासारखे आळशी व गृहहीन कांहीं प्राणी आहेत, व कांहीं विकसित प्राणी अपालें छद्मपाद आसपास दूरवर पसरून अन्नाचा शोध करणारे व स्वसंरक्षणार्त खडूचें किंवा शार्ङ्गीय द्रव्याचें आपल्या शरीरावर घ बांधणारेहि आहेत. स्थूलरूपवर्गांतील प्राणी या संघांतले राक्षसच असून त्यांची प्रजावृद्धीहि राक्षसीच आहे. सप्रतोदवर्गांतील जंतू स्वैरविहारी असून त्यांचीं चलनेंद्रियें अथवा प्रतोद लांब  व थोडेच असतात. या वर्गांतील कांहीं एकाकी प्राण्यांत चित्रभानु अथवा नेत्रहि असतो; कांहीं पुंज करून अपाली माणुसकी अथवा समाजप्रियता दाखवितात. निर्यासज वर्गांतील प्राण्यांची चलनेंद्रियें अथवा लोम आखूड परंतु सर्व पृष्ठभागांवर असतात; किंवा या वर्गांत कांहीं प्राण्यांना निरनिराळ्या आकाराचे शूल असतात. याच्या उलट परान्नपुष्टवर्गांतील प्राणी सर्वांत लहान असून त्यांनां चलनेंद्रियें नसतात व ते प्रतिकूल परिस्थितींत आपले रक्षण आपल्या शरीरावर पटल उत्पन्न करून करितात. या वरून या संघांतील निरनिराळ्या प्राण्यांच्या परिस्थित्यनुरूप शरीररचनेची व निरनिराळ्या जीवनक्रमाची ठोकळ कल्पना येईल.

बहुतेक सर्व आदिमजतूं खाऱ्या किंवा गोडया पाण्यांत असतात व महासागराच्या तळापासून पर्वताच्या शिखरापर्यंत कोठेहि सांपडतात. हे प्राणी फार लहान व हलके असल्यामुळें या संघांतील बऱ्याच जातींचा संचार पृथ्वीवर सर्वत्र होतो. ह्या संघांतील बऱ्याच जातीचे प्राणी परोपजीवी आहेत व कांहीं मनुष्यांस रोगकारक असे आहेत.

या संघांतील व्होलवाक्स वगैरे जाती एकपेशीय व्यक्तींचे प्राणी पुंज नसून अनेकपेशीय व्यक्ती आहेत असें सकृद्दर्शनीं वाटतें. इतर संघांतील प्राणी जसे अनेक परस्परावलंबी आदिमजंतूंचे किंवा पेशींचे झालेले असतात, तद्वत् या प्राणिवृंदांतील व्यक्ती परतंत्र आहेत. कारण जननक्रिाय करणाऱ्या व्यक्तींनां पक्कान्नरसासाठीं इतर व्यक्तीवर अवलंबून रहावें लागतें, त्याप्रमाणेंच अन्नरस तयार करणाऱ्या व्यक्तींना प्रजोत्पादन करिता येत नसून या जीवधर्मांतील एका महत्त्वाच्या कार्यासाठीं पूर्वोक्त व्यक्तींवर अवलंबून रहावें लागतें. म्हणून तत्त्वतः व्होलवाक्सला एकपेशीय प्राणिवृंद न समजतां अनेक पेशीय व्यक्ती समजण्यास कांहीं हरकत नाहीं. तथापि इतर संघांतील प्राण्यांच्या शरीरांत श्रमविभाग बऱ्याच बाबतींत होत असल्यामुळें अशा प्राण्यांतील पेशीनां फारच पारतंत्र्य भोगावें लागतें. म्हणून व्होलवाक्स हा प्राणिवृंद आहे असें मानण्याचा प्रघात पडला आहे.

वेदकालीन व पुराणकालीन आर्य लोकांनां अतिसूक्ष्म डोळयांनां न दिसणारे अगणित जीव आपल्या सभोंवतीं हवेंत, पाण्यांत अथवा जमीनीत आहेत हें माहीत होतें हें सिद्ध करण्यास अवतरणें देण्याची जरूरी नाहीं. त्यांनां ही वस्तुस्थिति दैवी शक्तीनें समजली किंवा भौतिक शोधांच्या सहाय्यानें समजली हे ठरविण्याचें काम आपण तज्ज्ञाकडे सोंपवूं

हल्लींच्या जीवनशास्त्राची मुख्यतः आदिमजीवांची माहिती पाश्चात्यांनी गोळा केली. वरील लोकांत जीवनशास्त्र व नास्तिकपणा यांचा प्रसार एकदमच झाला. आरंभीं या दोघांचा एकमेकांपासून फार फायदा झाला. जीवनशास्त्रांत नवीन शोध लावण्यांत नास्तिकमताभिमान्यांनां हुरूप आला व जस जसे या शास्त्रांत शोध लागत गेले तसतसें विश्वाचें कोडें सुटत चाललें असे त्यांनां वाटलें. आनुवंशिक संस्कार अंड्याच्या व शुक्रबीजाच्या मार्फत गर्भांत येत असले पाहिजेत व आमीबा सारखे अकेंद्र प्राणी सर्व जीवधर्म चालवीत असतात हे समजल्याबरोबर विश्वाच्या उभारणीचें व संहारणीचें कोडें सुटलें असें त्यांनां वाटलें. हा त्यांचा हर्ष फार दिवस टिकला नाहीं. कारण वरील शोधांनीं जीविताचें कोडें सुटलें तर नाहींच परंतु ते कांहीं अंशीं जास्त कठिण झालें. कारण आमीबा सारखा अतिसूक्ष्म पदार्थ सर्व जीवधर्म पिढयानुपिढया बिनचूक चालवितो किंवा, आमीबासारख्या लहान गर्भाकडून एखाद्या अजस्त्र प्राण्याचे आनुवंशिक धर्म एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तींत बिनचूक जातात तेव्हां या चैतन्यद्रव्याच्या कणांत शक्ति तरी काय आहे हें नवीनच कोडें उत्पन्न होतें.   [ लेखक एस्. एच्. लेले ].

   

खंड ७ : अर्थशास्त्र ते आफ्रिका  

  अर्थशास्त्र

  अर्देबिल

  अर्धनारीश्वर

  अर्धमागधी
  अर्धशिशी
  अर्धांगवायु
  अर्नेज
  अर्बथनॉट जॉन
  अर्य
  अर्यंकावू
  अर्यमा
  अर्हत्
  अर्‍हेनिअस, स्वान्टे आगस्ट
  अलक
  अलकनंदा
  अलका
  अलंकार
  अलख बुलाखी
  अलखनामी
  अलगरकोविल
  अलताई पर्वत
  अलनम्यो
  अलंप्रभु
  अलफॉन्सो
  अलबा लांगा
  अलकबुकर्क अलफॉन्सो डी
  अलंबुष
  अलमगीर डोंगर
  अलमपूर
  अलमेल
  अलमोद
  अलमोरा
  अलयपूर
  अलवये
  अलवा
  अलवार संस्थान
  अलसानी पेदन्ना
  अलसिअम
  अलाउद्दीन खिलजी
  अलाउद्दिनशहा
  अलायुध
  अलावन
  अलावलपूर
  अलास्का
  अलाहाबाद
  अली आदीलशहा
  अलीखेर
  अलीगंज
  अलीगड जिल्हा (राजपुताना)
  अलीगड जिल्हा (संयुक्त)
  अलीगड तहशील
  अलीपूर
  अलीपुरा
  अलीबहादर
  अलीबाग तालुका
  अली मसजीद
  अली-राजपुर
  अलीवर्दीखान
  अलीवाल
  अलुतीबलुती
  अलुबुखार
  अलेक्झांडर झार
  अलेक्झांडर दि ग्रेट
  अलेक्झाडर पोप सहावा
  अलेक्झान्डर्सबाद
  अलेक्झांड्रिया
  अलेक्झाड्रिया ट्रोआस
  अलेप्पे किंवा अलपुलइ
  अलेप्पो
  अल्क अथवा अल्कली
  अल्कमृत्तिका
  अल्कहल (अल्कोहॉल्स)
  अल्कानेट
  अल्कांतारा
  अल्कोदें
  अल्जीरिया
  अल्जीर्स
  अल्डरशॉट
  अल्निक
  अल्पाका
  अल्बनी
  अल्बिरूनी
  अल्बेरोनि गिथुलिओ
  अल्युमिनियम
  अल्युमिनमब्रांझ
  अल्लूर
  अॅल्सेस्टर
  अल्ह
  अल्हाजन
  अवचितगड
  अवचितसुत काशी
  अवतंसक
  अवतार
  अवंति
  अवंतिवर्मा
  अवदानें
  अवधूत
  अवन
  अवनी
  अवलंबन
  अवलोकितेश्वर
  अवसरी बुद्रुक
  अवसर्पिणी
  अवा जहागीर
  अविधवा नवमी
  अविनाशीश्वर
  अव्वन कवि
  अव्वैयार
  अॅव्हबरी
  अॅव्हरोज
  अॅव्हिग्नॉन
  अॅव्हिसेन्ना
  अॅव्होगड्रो अमेडेव
  अॅशबर्टन
  अॅशबोर्न
  अशांटी
  अशीरगड
  अशोक (राजा)
  अशोक (झाड)
  अश्मदेव
  अश्मा
  अश्रुपात्रें
  अश्वगंधा
  अश्वघोष
  अश्वत्थ
  अश्वपति
  अश्वमूत्राम्ल
  अश्वमेध
  अश्वसेन
  अश्विन, अश्विनकुमार
  अश्विनी
  अष्ट उपद्वीप
  अष्टक
  अष्टका
  अष्टकुलाचल
  अष्टगंध
  अष्टग्राम
  अष्टदिग्गज
  अष्टदिग्पाल
  अष्टधातु
  अष्टनाग
  अष्टनायका
  अष्टपाद
  अष्टप्रधान
  अष्टभाव
  अष्टभैरव
  अष्टमंगल
  अष्टमहारोग
  अष्टमहासिध्दी
  अष्टमर्यादागिरी
  अष्टमांगल्य
  अष्टमी
  अष्टयोगिनी
  अष्टवसु
  अष्टवायन
  अष्टविनायक
  अष्टविवाह
  अष्टागर
  अष्टांग
  अष्टांगहृदय
  अष्टाधिकार
  अष्टाध्यायी
  अष्टान्हिक पर्व
  अष्टावक्र
  अष्टावक्रगीता
  अष्टी
  अष्टें
  असई
  असईची लढाई
  असंग
  असत्प्रतिमा-पेटिका
  असंद
  असदखान
  असदपूर
  असदितुसि
  असनसोल
  असन्शन
  असफ-उद्दौला
  असफखान
  असबस्ट
  अममंजा
  असरळी
  असरूर
  असहकारिता
  असगांव
  असिक
  असिक्नी
  असिटिलीन
  असिटोन
  असींद
  असुंदी
  असुर
  असुरदेश
  असुरजात
  असुर-बनि-पाल
  असुरिया
  असोदा नदी
  अस्करी (मिर्झा)
  अॅस्कालॉन
  अस्थिमार्दवरोग
  अस्पृश्यता
  अस्त्रा
  अस्वल
  अहमद
  अहमद खटू (शेख)
  अहमनखान बंगष
  अहमदनगर (जिल्हा)
  अहमदनगर गांव (काठेवाड)
  अहमद निझामशहा
  अहमदपूर (शरकिया)
  अहमदपूर (लम्मा)
  अहमदशहा
  अहमदशहा अब्दाली
  अहमदशहा वली
  अहमदाबाद
  अहरिमन्
  अहरौरा
  अहर्गण
  अहल्या
  अहल्याबाई
  अहार(१)
  अहांळींव
  अहि
  अहिच्छत्र
  अहिरगांव
  अहिरी
  अहिर्बुध्न्य
  अहिवंत किल्ला
  अहिंसा
  अहीर
  अहुरमझ्द
  अहेरिया
  अहोबिलम्
  अळतें
  अळनावर
  अळंबें
  अळशी
  अळसुंदे
  अळू
  अळें
  अळेगांव
  अक्षय्यतृतिया
  अक्षविचलन
  अक्षक्षेत्र
  अक्षांश
  अक्षोभ्यदीक्षित
  अज्ञान
  अज्ञानदास
  अज्ञानसिध्दनागेश
  अज्ञेयवाद
 
  आकडिया
  आंकडी
  आंकडेशास्त्र
  आकर
  आकलंड
  आकाबाई
  आकाश
  आकाशयान
  आकूति
  आकृति
  आकृति
  आकृतिलेखक
  आक्क
  आक्झम
  ऑक्टरलोनीखोरें
  ऑक्टरलोनी-सर डेव्हिड
  ऑक्सफोर्ड
  आखा
  आखाडे
  आखोभगत
  आगगाडी
  आगपेटया व आगकाडया
  आगबोट
  आगरकर
  आगरवाल
  आगरी
  आंगरे
  ऑगस्टस बादशहा
  ऑगस्टसबाद
  आंगस्ट्राम, अन्डर्स जोनास
  आगळे
  आगाखान
  आगाशी
  आगीमाशी
  आगू
  आगेर
  आग्जबर्ग
  आग्नीध्र
  आग्नेयकोसल
  आग्यादेवी
  आग्रा-विभाग
  आग्रा जिल्हा
  आग्रा तहशील
  आग्रा शहर
  आग्रा कॅनाल
  आंग्लो-इंडियन
  आंग्लो इंडियन वाङमय
  आंग्लो-सॅक्सन
  आघाडा
  आघात
  आघारी
  आचमन
  आचार्य चिंतामणि रघुनाथ
  आंजणा(कुणबी)
  आंजी
  आजीवक
  आज्यप
  आटकोट
  आटनेर
  आटपाडी महाल
  आटपाडी गांव
  आटयापाटया
  आठवडा
  आडगांव
  आडगांवची लढाई
  आडनांव
  आडी
  आडेगांव
  आडेनार्ड
  आडवी आंझून
  आतडीं
  आतपमूर्च्छा
  आतार
  आतिथ्य
  आतीव्र
  आतुरसंन्यास
  आत्महत्या
  आत्मा
  आत्मानंद
  आत्माराम
  आत्माराम स्वामी
  आंत्रपध्दति
  आंत्रावरोध
  आत्रेय
  आदमखान
  आदाम
  आदामचें शिखर
  आदामाईट
  आदिग्रंथ
  आदितियाना
  आदिनारायण
  आदिपुराण
  आदिबुध्द
  आदिमसंघ
  आदिलशाही
  आदिस आबाबा
  आंदोलनलेखक ऑसिलोग्राफ
  आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम)
  आंधळी कोशिबीर
  आंध्र
  आंध्र कालिदास
  आंध्रभृत्य
  आनंद
  आनंद कवि
  आनंदगांव
  आनंदगिरि
  आनंदतनय
  आनंद तालुका
  आनंदनाथ
  आनंदपुर
  आनंदपूर
  आनंदमूर्ति
  आनंदराय मखीन
  आनंदराव गायकवाड
  आनंदराव धुळप
  आनंदराव पवार
  आनंदराव रास्ते
  आनंदवर्धन
  आनंदवल्ली
  आनंदीबाई (डॉ. जोशी)
  आनंदीबाई (पेशवे)
  आनर्त
  आनाम
  आनुवंशिकता (हेरेडिटी)
  आन्वीक्षिकी
  आन्सोदर
  आपग्गा
  आपटा
  आपटे, वामन शिवराम
  आपटे, महादेव चिमणाजी
  आपटे, हरि नारायण
  आपध्दर्म
  आपव
  आपस्तंब
  आपिशली
  ऑप्पर्ट ज्यूलियस
  आप्पाकवि
  आप्पा देसाई निपाणकर
  आप्पा बळवंत
  आप्री
  आप्वन
  आफ्रिका
   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .