विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आद्याक्षरसंयोग (मोनोग्रॅम) - हें मूळ एकाक्षरीं सहीचें चिन्हा असून, सध्यां दोन किंवा अधिक अक्षरें एकमेकांत गुंतवून तयार केलेली आकृति, असा याचा अर्थ होता. हीं एकमेकांत गुंतविलेलीं अक्षरें एखाद्या नांवांतील सर्व अक्षरें किंवा एखाद्या माणसाचें स्वतःचें नांव, कधीं आई बापाचें नांव व आडनांव, यांतील आद्याक्षरें असतात; व हा अक्षरसंयोग ' सीला ' करितां किंवा पत्रांवर शिक्का मारण्यकरितां किंवा अन्य कारणांकरितां केलेला असतो. पुष्कळशां प्राचीन ग्रीक व रोमन नाण्यांवर राज्यकर्त्यांची आद्याक्षरें या पद्धतीनें लिहिलेली आढळतात. यूरोपांत पूर्वेकडील साम्राज्याच्या बादशहांच्या सह्यांतील या पद्धतीनें लिहिलेली अक्षरें उत्तरकाली लॅटिन व ग्रीक लिपींतील असत. फ्रँकिशराज्यांच्या सह्याहि मोनोग्रॅम पद्धतीच्या असत. चार्लस दि बाल्डच्या नाण्यावरील मोनोग्रॅम पूर्णावस्थेस पोंचलेल्या मोनोग्रॅमचा नमुना म्हणतां येईल. मोनोग्रॅममधील अतिशय प्रसिद्ध म्हणजे ''पवित्र मोनोग्रॅम ''; यांत ख्रिस्ताच्या नांवांतील दोन आद्याक्षरें संयुक्त केलेलीं असतात. पूर्वीचे ग्रंथप्रकाशक मोनोग्रॅम किंवा अक्षराकृती आपल्या खुणेकरितां वापरीत व त्या जुनी छापील पुस्तकें ओळखणाच्या कामीं फार महत्त्वाच्या आहेत. चित्रकार व शिल्पकार याच साधनांचा अवलंब करीत. मध्ययुगांत धार्मिक बाब, व्यापार व कलाकुसरी यांच्या उपयोगांकरितां अशा अनेक आकृती तयार केलेल्या आढळतात. प्रत्येक मोठया मनुष्याजवळ, प्रत्येक शोकीन गृहस्थाजवळ, प्रत्येक कारागिराजवळ स्वतःचा मोनोग्रॅम असे. गवंडयाची खूण देखील अशा पद्धतीची असे. व्यापाऱ्यांना सरदारांप्रमाणे कुलचिन्हें वापरण्याचा हक्क नसल्यानें ते साधीं अक्षरें मोनोग्रॅमच्या पद्धतीनें जुळवून तें आपलें चिन्ह म्हणून उपयोगांत आणीत. ही '' व्यापाऱ्यांची चिन्हें '' बहुशः मालकाच्या नांवांतील आद्याक्षरें घेऊन व त्यांनां विशिष्ट वळण देऊन मोनोग्रॅमप्रमाणें तयार केलेलीं असत. यांत बहुतकरून नेहमीं एक '' क्रॉस '' चिन्ह अतंर्भूत करीत; त्याचा हेतु वादळें किंवा अन्य आपत्ती यांपासून संरक्षण व्हावें असा असेल, किंवा पूर्वेकडील महंमदी व्यापाऱ्यांच्या मालांतून आपला माल ओळखून घेतां यावा म्हणून ही ख्रिस्ती खूण घातली असेल. राजेलोक सुद्धा स्वतःसाठीं निरनिराळयां तऱ्हेचे मोनोग्रॅम करवून घेत.