विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आंधळी कोशिबीर - [ लपंडाव ] हा एक मुलांचा खेळ आहे तो असाः - जी मुलें खेळणारीं आहेत त्यांतील एकास पुढें घेऊन बसून त्याचे डोळे भोगी, म्हणजे ज्यास खेळावयाचें नसेल, तो आपल्या दोन्ही हातानीं झांकतो, आणि बाकीचे सोबती एकीकडे जाऊन लपतात. नंतर इकडे भोग्याने त्याचे डोळे सोडतांच तो जाऊन त्या गडयांतून एखाद्यास शोधून काढून शिवतो. ज्यास तो शिवला असेल त्याजवर डाव आला असें होतें परंतु ज्यास शिवणें असेल त्याला; तो भोग्यास शिवण्याच्या पूर्वी शिवलें पाहिजे. ज्या गडयावर डाव आला असेल त्याचे डोळे भोग्याकडून झांकले जाऊन वर लिहिलेल्याप्रमाणें पुन्हां खेळ चालू होतो. या खेळास विद्याकल्पतरूकार आंधळी कोशिंबीर म्हणत. पण आज कोणी तसें म्हणणार नाहीं. आज त्यास केवळ लपंडावच म्हणतील. आज आंधळी कोशिबीर या नांवाने जो खेळ प्रचलित आहे तो असाः- ज्या गडयावर डाव आला असेल त्याचे डोळे इतर सोबत्यांपैकीं एकानें धोतरानें घट्ट बांधून त्याला आतां कांहीं दिसत नाहीं अशी खातरी झाल्यावर बाकीच्या सोबत्यांनीं लांब जावयाचें व डोळे बांधलेल्यानें त्यांपैकीं कोणा एकास शिवावयाचें म्हणजे त्याजवरील डाव गेला. याप्रमाणेंच पुढील डाव आलेल्यांचे डोळे बांधावयाचे व खेळ चालू करावयाचा.