विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आनंद - बुद्धाच्या प्रमुख शिष्यांपैकीं एक. हा शाक्य वंशीय क्षत्रीय असून बुद्धांचा जवळचा भाऊबंद होता. याची बुद्धच्या ठिकाणीं लहान मुलांप्रमाणे भक्ति असून, ''उपठ्ठाक'' किंवा पट्ठशिष्याचा मान याजकडे असे. निर्वाणाच्या पूर्वी बुद्धाच्या तोंडीं आनंदाचा स्तुतिपाठ घातला आहे. (दीघ मधील महापरिनिब्बान सुत्त, २.१४४-१४६.) पण तो त्याच्या बुद्धीविषयीं किंवा अंतर्दृष्टीविषयीं नसून लोकांत त्यांची असलेली मान्यता व धर्मासंबंधीं गोड भाषण या बद्दल आहे. याच ग्रंथांत बुद्धनिर्वाणाच्या वेळीं अनुरुद्धाच्या तोंडी घातलेलें भाषण मननीय आहे, पण तेच आनंदाच्या तोंडचें मानवी दुःखाच्या साध्या उमाळ्यासारखें भासतें जरी सर्व बुद्धशिष्य यापूर्वीच अर्हत्पणाला पोंचले होते तरी अद्यापि आनंद 'सेख' च राहिला होता. बुद्धनिर्वाणानंतर जी सभा भरली तींतील पहिल्या शंभर सदस्यांत आनंद एकटाच काय तो अर्हत् नव्हता ( विनय. २. २८५.) सभा भरण्यापूर्वी तो अर्हत् बनला (विनय २. २८६) व तींत त्यानें प्रमुख भाग घेतला; पण त्याच्या पूर्वीच्या गफलतीबद्दल सभेनें त्याची कानउघाडणी करण्यास कमी केले नाहीं.
बुद्ध आपलें मनोगत आनंदाला सांगत असे. तेव्हां बुद्धानंतर धर्मविषयक वादांत आनंदाचा सल्ला घेऊन वादाचा निकाल लावण्यात येई. बौद्ध भिक्षू स्त्रियांस कधींहि बरें म्हणत नसत; पण आनंद त्यांची तरफदारी करी. त्याच्याच मध्यस्थीमुळे बुद्धनें मोठ्या नाखुषीनें भिक्षुणीसंघ स्थापन करण्याची परवानगी दिली. तरी सुध्दं राजगृह येथें भरलेल्या संगीतीमध्यें त्याला या स्त्रीपक्षपाताबद्दल जाब द्यावा लागलाच (विनयपिटक ११, १, १०).
[ संदर्भग्रंथ. - त्रिपिटक. आपटे-बौद्धपर्व. ए. ब्रि. ए. रिलिजन अँड एथिक्स. बुद्धोत्तर जग-ज्ञानकोश विभाग ४ था. ]