विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आनंदराय मखीन - हा भारद्वाजकुलांतील नृसिंहाचा पुत्र होता. हा शहाजी (१६८७-१७११) व सरफोजी (१७११-२७) या तंजावरच्या राजांच्या पदरीं होता. यानें 'विद्यापरिणयन' नांवाचें एक सप्तांकी नाटक लिहिलें. हें नाटक वेदकवीनें लिहिलें व आनंदरायाच्या नांवें तें प्रसिद्ध होण्याला परवानगी दिली अशी कथा आहे. या नाटकांत प्राकृत भाषणें नाहींत किंवा खरा विदूषकहि नाहीं. हें नाटक सरफोजीच्या कारकीर्दीत लिहिलें. यांत शिवभक्ति, जीव राजाला अविद्या नांवाच्या पत्नीशीं बेइमान होण्याला लावते; नंतर जीव व विद्या यांचें प्रेम जडून लग्न होतें अशी कथा आहे. या कवीचें दुसरें नाटक 'जीवानंदन' हें होय. हें शहाजीच्या कारकीर्दीत लिहिलें हें अन्योक्तिपर आहे. यांत राजा जीव व राजा यक्ष्म (क्षय) यांमधील युद्ध दाखविलें आहे. शिव, जीवाला कांहीं औषधी व योगसिद्धि देतो व त्यामुळें जीव यक्ष्मावर जय मिळवितो. [ स्टनिकनो इंडियन ड्रामा आफ्रेटकोश].