विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आनंदवल्ली - (मुंबई इलाखा नासिक जिल्हा). आनंदवल्ली हें ठिकाणी नासिकच्या पश्चिमेस तीन मैलावर असून तेथून गोदावरीचा रमणीय प्रवाह अगदीं नजिक वहात आहे. आनंदल्ली हें एक लहानसें खेडें असून, त्याचें पूर्वीचे नाव मौजे चावंडस असें होतें. तेथें प्रथमतः रघुनाथराव उर्फ राघोबादादा पेशवे हे इ.स. १७६४ मध्यें आपले पुतणे थोरले माधवराव साहेब पेशवे यांच्याशीं रुसवा करून जाऊन राहिले. त्यावेळी श्रीमंत गोपिकाबाईसाहेब ह्या गंगापुरास रहात होत्या. १७६४ च्या डिसेंबर महिन्यांत केसो गोविंद यांची चावंडस उर्फ आनंदवल्ली येथील कारभारावर नेमणूक झाली. केसो गोविंद यास बंदोबस्तासाठीं पन्नास स्वार व पन्नास प्यादें दिले असून, त्याजकडे कारखाने, इमारतींचेंहि काम सांगितले होते. यावरून इ.स. १७६४ पासून चावंडस हें ठिकाण भरभराटीस आलें असें दिसतें. चावंडस. येथे मोठा तटबंदी वाडा वगैरे तयार होऊन त्यास किल्ल्याचें स्वरूप प्राप्त झालें. येथे तारीख २ ऑगस्ट इ.स. १७६४ रोजी श्री. रघुनाथराव पेशवे यांची स्त्री आनंदीबाई यांस प्रथम पुत्ररत्न प्राप्त झाले. अर्थांत येथील वास आनंदायक झाला, म्हणून त्या किल्ल्यास आनंदीबाईनें 'आनंदीवल्ली' असें नांव दिलें, आशी आख्यायिका प्रसिद्ध आहे, व कागदपत्रावरून पाहिलें असतांहि तीस पुष्टि येते. येथील कारभारी केसो गोविंद यांस दिलेल्या छ ३० जमादिलाखर खंमस सितैन मया व अलफ म्हणजे ता.२४ डिसेंबर इ.स. १७६४ च्या सनदेमध्यें ''तुम्हांस चावंडसेस कारभारास ठेविलें आहे.'' असा उल्लेख आहे; व छ १ जमादिलाखर सीत सितैन मय अलफ म्हणजे ता. १५ नोव्हेंबर इ.स. १७६५ च्या सनदेमध्यें ''आनंदवल्ली'' येथें तुम्हांस नेहमीं ठेविलें आहे. त्यांस तेथील बंदोबस्ताचीं कलमें.'' असा दुसरा उल्लेख आहे. यावरून ए.स. १७६४ नंतर व इ.स. १७६५ मध्यें 'आनंदवल्ली' हें नांव अस्तित्वांत आलें असें दिसून येतें.
आनंवल्ली येथें रघुनाथराव पेशवे हे इ.स. १७६५ पासून इ.स. १७६८ पर्यंत मधून मधून राहिले होते. येथेंच त्यांनी आनंदीबाईच्यां सल्ल्यानें पेशवाईची गादी घेण्याकरितां अनेक राजकारस्थानें केलीं, आणि १५००० सैन्य जमवून घोडपपर्यंत चाल केली. परंतु थोरले माधवराव पेशवे यांनीं घोडपवर स्वारी करून त्यांच्या सैन्याचा पराभव केला व त्यांनां कैद करून पुण्यास नेलें. इ.स. १७६८ च्या जून महिन्यांत चावंडस उर्फ आनंदवल्ली येथील ठाणें श्री. दादासाहेब यांच्याकडे दिल्याचा उल्लेख सांपडतो. दादासाहेब वारल्यानंतर पुढें आनंदीबाईंची प्रकृति नादुरुस्त झाली, तेव्हा तिनें नाना फडणीस यांजकडे, आनंवल्लीस हवा बदल करण्यासाठीं पाठवावें म्हणून लक्ष्मणभट उपाध्यें यांच्या मार्फत पुष्कळ खटपट केली. नाना फडणीस यांनीं आनंदीबाईच्या विनंतीस मान देऊन, तिला सर्व खटल्यासह इ.स. १७९२ मध्यें कोंपरगांवाहून आनंदवल्ली येथें पाठविलें. परंतु तिचा वास तेथें फार दिवस झाला नाही. सुमारें दोन वर्षांनीं म्हणजे इ.स. १७९४ मध्यें तिचा आनंदवल्ली येथें शेवट झाला. ती मृत्यु पावल्यानंतर बाजीराव, चिमणाजीआपा व अमृतराव इ.स. १७९५ पर्यंत आनंदवल्ली येथेंच बंदिवासांत होते. परुंतु त्यांनी गुप्त राजकारणें केल्यावरून नाना फडणिसांनी त्यांस इ.स. १७९५ मध्यें जुन्नरच्या किल्ल्यांत नेऊन कैदेंत ठेविलें. यानंतर आनंदवल्लीचें सर्व वैभव व महत्त्व नष्ट होत जाऊन तेथील भव्य राजवाडा व किल्ला आजमित्तीस रसातळास गेला आहे. तेथील पडक्या भिंती व तोफांचा मार सहन केलेला एक प्रचंड दरवाजा मात्र अद्यापि अस्तित्वांस आहे [ इतिहास संग्रह पु. ६. मुं.गॅ.पु.१६. ग्रांटडफचा इतिहास ] .