विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आनंदीबाई (पेशवे) - राघोबादादा उर्फ रघुनाथराव पेशवे यांचें सुप्रसिद्ध द्वितीय कुटुंब. ही राघो महादेव ओक मळणकर यांची कन्या असून हिंचे लग्न तारीख १७ डिसेंबर १७५५ रोजीं कृष्णातीरीं गलगलें येथें स्वारींत झालें. ही मराठयांच्या इतिहासांत कारस्थानी स्त्री म्हणून प्रसिद्ध आहे. तिचें राघोबावर बरेंच वजन असून तो राजकारणांतहि तिच्या सल्ल्याप्रमाणें चालत होता असें दिसतें. थोरला माधवराव मरण पावल्यावर सातारच्या महाराजपासून नारायणरावाकरितां पेशवाईचीं वस्त्रें आणण्यास नारायणरावाबरोबर जातेवेळीं राघोबादादा पंचवीस लक्षांच्या सरंजामाकरितां अडून बसला होता पण आनंदीबाईनें 'संरजाम घेण्याऐवजी नारायणराव म्हणतो त्याप्रमाणें स्वतःच वडीलपणानें कारभार करावा' असा राघोबास सल्ला दिल्यावरून तो हट्ट सोडून नारायणरावाबरोबर गेला (ऐ.ले.सं.ग भाग ४. पृ. १९६८). तथापि आनंदीबाई मोठी कारस्थानी स्त्री आहे असा नारायणरावाचा पक्का ग्रह झालेला असून तिच्या हालचालीवर त्यांनें करडी नजर ठेविली होती असें दिसतें. नागपूरकर भोंसल्यांच्या बखरींत (पृ.९३) तर असें म्हटलें आहे कीं, 'नारायणरावानें तिची लुगडयांत फंदाचे कागद लपविलें म्हणून लुगडे फेडून छळणा करावी.' नारायणरावाचा वध 'ध' चा 'मा' करून हिनेंच केला असा तत्कालीनांचा दृढ समज होता असें पांडुरंग नामक कवीचें नारायणरावाच्या वधावरील काव्य इतिहाससंग्रहांत (मार्च १९१०) प्रसिद्ध झालें आहे त्यावरून स्पष्ट होतें. आपल्यावरील हा आरोप स्वतः आनंदीबाईहि जाणून होती असें इतिहासंग्रहांत छापलेल्या (पु.६, अं. ४, ५, ६) मेणवली दफ्तरांतील एका पत्रावरून कळतें. तथापि त्याच पत्रावरून नाना फडणीस आदिकरून मंडळीस तिच्या अपराधाचें माप तिच्या पदरांत घालण्याइतका स्पष्ट पुरावा मिळाल नव्हता अशीहि शंका उत्पन्न होते. राघोबादादाचें अस्सल पत्र रामशास्त्र्यांच्या हातीं पडलें (ग्रांटडफ) त्यावरून 'ध' चा 'मा' झाला होता हें जरी सिद्ध झाले असलें तरी तो कोणीं केला हें त्यास गूढच राहिलें असावें.
नाना फडणिसानें तुळ्या पवाराची जबानी घेतली तींतहि आनंदीबाईंचें नांव पुढें आलें नव्हतें (इ.स. वर्ष १ अं. ९). नारायणरावाच्या वधानंतर गंगाबाई सती जाऊं लागली तेव्हां आनंदबीईनें 'जातीस कुठें तुझी पाळी चुकली आहे' असे म्हटले असल्याचा हरिवंशाच्या बखरींत (कलम ७३) उल्लेख आहे. पण ज्या आनंदीबाईंने गंगाबाई गरोदर आहे असें जाणूनहि तिच्या सहगमनास हरकत केली तीच पुढें गंगाबाईचा गर्भपात करण्याचा प्रयत्न करीत आहे अशी नाना फडणिसा व्या पक्षाच्या मंडळीस शंका येऊं लागली. ही शंका परशुरामभाऊनें वामरावास लिहिलेल्या एका पत्रांत व्यक्त केलेली सांपडते ( अधिकारयोग प्र.१०). बारभाईनी कारस्थान करून राघोबादादाविरुद्ध कट केला तरी आनंदीबाईची नाना फडणीस व सखारामबापू यांस साळसूदपणें पत्रें जात होतींच १७७४ च्या एप्रिलांत बऱ्हाणपूर मुक्कामाहून आनंदीबाईंनें नानास जें पत्र लिहिलें त्यांत तर 'पुरंदरची सर्द हवा लेकरास मानवणार नाही' अशी सवाई माधवरावाबद्दल काळजी व्यक्त केली आहे. आनंदीबाई गरोदर असल्यामुळें १७७५ मध्यें राघोबादाद तीस मागें धार येथें ठेवून इंग्रजांची कुमक घेण्यास गेला तेव्हां हि आनंदीबाईचें राघोबादादाच्या राजकारणांत लक्ष होतेंच १७७५ च्या फेब्रुवारीत लिहिलेल्या एका पत्रांत तिनें फितुरी लोकांबद्दल काळजी घेण्याविषयीं सखाराम हरि वगैरे मंडळीस बजावलें आहे. त्याचप्रमाणें पुढें चार महिन्यांनी सखाराम हरि तिच्या नवऱ्याप्रीत्यर्थ लढतांना जखमी झाला तेव्हा त्यास तिनें ममतापूर्वक उत्तेजनपर लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे (इ.सं. पु.१, अं.१२). पुढें १७७५ मध्यें आनंदीबाईस धारच्या किल्ल्यांतच अटकेंत ठेवण्यांत आलें. येथून इ.स. १७७८ च्या सपटंबर महिन्यांत तिनें नानाफडणिसास लिहिलेल्या पत्रांतील ''हल्लीं यवनाक्रांत ब्राह्मणी दौलत फितुरांनीं होऊं पाहते. तुमच्या चित्तांतील उगीच आटी जात नाहीं....आम्ही येथे तुमच्या स्वाधीन. पावणेदोन वर्षे जाहाली. कार्यसिद्धि तुमची कांहींच न जाहाली. नुकसान पांच हजार फौजेचें, सरंजामी गुंतलें, ही झाली. विशेष कांहींच न झालें. तुमची फौज गुंतून आमचा धन्याचे पायासीं वियोग.'' या वाक्यावरून तिचा मुत्सुद्दीपणा चांगला ध्यानांत येतो (इ.सं.पु.१, अंक ४). आनंदीबाईच्या पत्रांत खोंचदारपणाहि बराच आढळतो. त्याच दिवशीं लिहिलेल्या सखाराम भगवंताच्या पत्रांत ती नाना फडणिसाच्या नवीन लग्नास उद्देशून लिहितें. ''नवी भाजवय लाडकी केली तिचें नांव काय ठेविलें व दुसरी करावयाची कधी?'' तथापि वरील उपरोधिक वाक्यें लिहिणाऱ्या स्वत: आनंदीबाईच्याच यजमानांनी सुरतेस येऊन राहिल्यावर तिच्या जिवंतपणींच भिकाजीपंत पेंडशांच्या मथुराबाई नामक कन्यंशीं लग्न केलें होतें हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. पुढें इंग्रजांशीं तह होऊन राघोबादादा मराठ्यांकडे आला. तथापि बाजीरावास पेशवाई प्राप्त होईपर्यंत आनंदीबाईस स्वांतत्र्य प्राप्त झालें नाहीं. राघोबादादाच्या मृत्यूपर्येंत ती त्याजबरोबर कोंपरगावास नाना फडणिसाच्या प्रतिबंधांत होती. कारभारी मंडळीतें तिच्याशीं वर्तन एकंदरींत बरेच निष्ठुरपणाचें होतेंसें दिसतें. काव्येतिहास-संग्रहांतील (पृ. ४९६) एका पत्रांत राघोबादादा मृत्यु पावल्यावर आनंदीबाईच्या अंगावरील सौभाग्यालंकार काढून आणण्यास नानानें ताबडतोब आपला हस्तक कोंपरगावीं पाठविला होता असा उल्लेख आहे. आनंदीबाईस शके १७१५ प्रमादी सवंत्सर फाल्गुन वद्य ११ स(भा.इ.सं.मं.वार्षिक इतिवृत शके १८३५ धडफळे यादी) म्हणजे ता. २७ मार्च १७९४ रोंजी आनंदवल्ली येथें देवाज्ञा झाली. तीस दुर्गाबाई उर्फ गोदूबाई नांवाची कन्या (महाराष्ट्रंसाहित्यपत्रिका, वर्ष ८, पृ. १५९ पहा) आणि बाजीराव व चिमणाजीअप्पा असे दोन पुत्र होतें.