विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आपटा - यास संस्कृतांत अश्मंतक, मराठींत आपटा, गुजराथींत अशोदरो किंवा आशेत्री वगैरे नांवें आहेत. हें जंगलीं झाड आहे. याचीं पानें कांचनाच्या पानासारखींच परंतु त्यापेक्षां जाड व मोठीं असतात. यास लांबट शेंगा येतात. याची पानें तंबाखूच्या विडया करण्याकडे उपयोगी पडतात. ह्या झाडाच्या अंतरसालीचीं मजबूत व टिकाऊ दोरखंडें होतात. विजयादशमी किंवा दसरा या दिवशीं शमीवृक्ष नसेल तर अश्मंतक वृक्षाची पूजा करावी असें निर्णयसिंधूत सांगितलें आहे. त्या दिवशीं एकमेकांस आपट्याचीं पानें स्नेहवृद्धीकरितां वाटावीं असा हिंदुलोकांत रिवाज आहे यामुळें आपट्याच्या पानांचा खप त्या दिवशीं फार होतो. आपट्याचीं झाडें औषधी कामाकरितां सुद्धा फार उपयुक्त आहेत. उदाहरणार्थ वातगुल्म व पोटशूळ यांवर आपट्याच्या पाल्याच्या रसांत मिऱ्याची पूड व तिळाचें तेल सात थेंब टाकून पितात [ पदे-वन. गुणादर्श भा.१]
आपटे, घ रा णें. - कोंकणस्थ, कौशिक गोत्रीं. या घराण्याचें मूळ गांव रत्नागिरी जिल्ह्यांतील वेगुंर्ले तालुक्यांत असलेलें आजगांव नांवाचें खेडें हाय. आपटे घराण्याचे मुळ पुरुष आजगांव येथील विश्वनाथभट हे होत. त्यास पुत्र दोन; महादेवभट व कृष्णंभट. महादेवभटाचा वंश आजगांव येथें हल्लीं आहे; आणि कृष्णभंटाचा वंश मालवणनजीक त्रिंबक येथें आहे, असा सर्व आपट्यांची ज्या एका पुरुषापासून उत्पत्ति झाली असणें शक्य आहे त्या पुरुषाचा पत्ता गोविंदराव आपटे पुरावा दिल्याशिवाय लावतात!
ग्वालेरः- आजगांव येथील वंशापैकी विष्णुभट आपटे हे शके १७०० मध्यें मिरज येथें गेले. त्यांचा दुसरा मुलगा नारायण उर्फ नारो विष्णु यांनीं दुसरे बाजीराव पेशवे याचें सेनापतित्व मिळविलें व ते १८१७ मध्यें कोरेगांवच्या लढाईंत लढले; व पेशवाई बुडाल्यानंतर ग्वालेर येथें शिंदे सरकारच्या पदरीं सरदारकी केली. याच घराण्यांतील रावसाहेब यांनां शेवटचे बाशीराव पेशवे यांची कन्या बयाबाई ही दिली होती. ( 'बयाबाई' लेख पहा ) हें आपट्यांचे सरदार घराणें अद्याप ग्वालेरास आहे.
पुणेः - केशव व त्याचे बंधु विठ्ठल आपटे हे दोघे दशग्रंथी वैदिक थोरले बाजीराव पेशवे यांचे कारकीर्दीत पुण्यात आले व त्यांनीं सोमयाग केला. म्हणून त्यांच्या वंशजांनां दीक्षित हें उपनांव प्राप्त झालें. या आपटेदीक्षितांचे वंशज पुण्यांत अद्याप आहेत. या घराण्यांतील एक रामदीक्षित यांचा पुण्यांत दयानंदसरस्वतीबरोबर वाद झाला.
याशिवाय देवास, आजरें (रत्नागिरी), लिंबगोवें (सातार), जमखिंडी, सायगांव (सातारा), मालपें (संस्थान गगनबावडा), गोळप (रत्नागिरी), धुळें कोल्हापूर, आक्षी-नागांव (कुलाब), वगैरे ठिकाणीं या घराण्याच्या शाखा आहेत [ गो. वि. आपटेकृत आपटे घराण्यांचा इतिहास पाहा. ]