विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आपटे, महादेव चिमणाजी (१८४५-१८९४) - यांचा जन्म शके १७६७ च्या फाल्गुन महिन्यांत झाला. हे लहानपणापासून मोठे बुद्धिमान् व अभ्यासी असत. घरची स्थिति फार गरिबीची असतांहि इ.स. १८६८ त ते बी.ए. झाले, आणि इ.स. १८७१ त एल्एल्. बी. झाले ह्या दोन्ही परीक्षांत ते पहिले आले होते. ते एलएल्. बी. झाले तेव्हां मुंबईतल्या नानाशंकरशेटच्या शाळेवर हेडमास्तर होते; हे फार चांगले शिक्षक होते असें सांगतात. त्यांनां भाषाविषय फार आवडत असे; यांची योग्यता जाणून यांनां सरकारनें युनिव्हर्सिटीचे फेलो नेमिलें होते. हे हायकोर्टांत वकिली करूं लागले, व यांना पैसा चांगला मिळूं लागला. यांच्या मनांत आपल्याकडून आपल्या देशाचें कांहींतरी हित व्हावें, असें आलें. आपल्या देशांत कलाकौशल्याची वृद्धि व्हावी, म्हणून यांनीं एका गृहस्थास, कलाकौशल्य शिकून येण्याकरितां विलायतेस आणि अमेरिकेस पाठविलें. त्यांत यांचे पुष्कळ रुपये खर्च झाले. तसेचं पुण्यासहि चाकूकात्र्यांचा कारखाना काढण्याचा विचार करून कोणा एका गृहस्थास त्यांनी हाताशीं धरलें होतें; त्यांतहि त्यांचा पुष्कळ पैसा खर्च झाला. परंतु दोन्ही कृत्यांत पैसा खर्च होऊन उपयोग कांहींच झाला नाहीं. याशिवाय उत्तर हिंदुस्तानांत कानपुरास एका देशी कातड्याच्या कारखान्यांत ह्यांनीं पांच-पन्नास हजार रुपये घातले. या सर्व गोष्टींवरून एवढें स्पष्ट होतें कीं, यांना आपल्य देशाचें मुख्य व्यंग चांगलें कळलें होतें, आणि तें नाहींसें करण्याचा प्रयत्न करण्याची इच्छा प्रबल होती. महादेवरावांनीं लाख दीडलाख रुपये खर्च करून प्राचीन संस्कृत ग्रंथांच्या जीर्णोद्धारार्थ ''आनंदाश्रम'' म्हणून पुणें शहरांत कायमची संस्था करून ठेविली आहे; या संस्थेमध्यें नुसत्या प्राचीन ग्रंथांचाच जीर्णोद्धार व्हावयाचा आहे असें नाहीं; तर प्राचीन संस्कृत विद्येचा अभ्यास करणाऱ्या १०।१२ विद्यार्थ्यांची जेवणाची व रहाण्याची वगैरे सर्व प्रकारची सोय व्हावी, आणि प्रत्यही पांच संन्याशांस तरी पुडी मिळेल अशी व्यवस्था करून ठेविली आहे. हे आपल्या वकिलीच्या कामांत फार प्रवीण होते. कोठेंहि एखादा बिकट खटला आला कीं, मोठमोठ्या देणग्या कबूल करून लोक यांनां नेत असत. यांच्या मृत्युचें वर्तमान कळल्यावर मुंबईहायकोर्टांत चीफजस्टिस वेली हे महादेवरावांविषयीं म्हणालें कीं, ''बुद्धीचे विशदत्त्व, न्यायाच्या कामांत जे कायदे लागतात त्या सर्वांचें मार्मिक ज्ञान आणि न्यायाधिशाशीं अत्यंत सभ्यपणाचें वर्तन या गुणात महादेवराव आपटे वकील यांनां दुसऱ्या कोणत्याहि वकिलाच्यानें मागें टाकवलें नाहीं.'' महादेवरावांचें मराठी लेखनहि चांगलें असे 'मौजेच्या चार घटिका' म्हणून ह्यांनीं शाकुंतल नाटकाचें भाषांतर लिहून बरेच वर्षांपूर्वी छापून प्रसिद्ध केलें आहे. (चित्रासाठीं ''वेदविद्या'' पहा).
आपण शेवटीं संन्यस्त होऊन म्हणजे 'नारायण नारायण' म्हणतच समाधिस्त व्हावयाचें असा निश्चय महादेवरावांनीं कितीएक वर्षांपासून केला होता, आणि आपणाकरितां आनंदाश्रमामध्यें समाधीं बांधूनहि ठेविली होती. ह्यांच्या इच्छेप्रमाणें संन्यास घेऊन 'आनंद सरस्वती' हें नाम धारण केल्यावर शांत चित्तानें कांही वेळानें ते इ.स. १८९४ च्या आक्टोबर महिन्याचे बावीसावे तारखेस मुंबई येथें समाधिस्त झाले. आनंदसरस्वतीचें शव पुण्यास नेऊन, त्यांच्या इच्छेनुरूप सिद्ध केलेल्या समाधींत स्थित केलें. माधवरावांनां पुत्र नसल्यामुळें त्यानीं स्थापन केलेल्या 'आनंदाश्रम' संस्थेची सर्व व्यवस्था त्यांनीं ट्रस्टी नेमून त्यांचे स्वाधीन केली. त्यांच्या मागें त्यांचे पुतणे सुप्रसिद्ध हरिभाऊ आपटे (पहा) हे आनंदाश्रमाचें काम पहात असत. हल्लीं प्रि. विनायकराव आपटे हे पाहतात.