विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आपटे, हरि नारायण (१८६४-१९१९). - हरिभाऊंचा जन्म ८ मार्च १८६४ रोजीं मुंबईस झाला. त्यांचे वडील नारायणराव हे लहान नोकरीपासून चढत चढत पोस्टल सुपरिंटेंडेंट झाले व दीडशें रुपये पेन्शन बसल्यावर पुण्यास घर बांधून राहिले. त्यांनां हरि, रामचंद्र, दत्तात्रय, गणेश व केशव असे पांच पुत्र होते. हीरभाऊंच्या वयाचीं पहिलीं चवदा वर्षे मुंबईस गेलीं. त्यानंतर ते पुण्यास आले. या वेळेस ते इंग्रजी चवथ्या इयत्तेंत होते. वाङ्मयांतील हरिभाऊंचा अगदीं पहिला प्रयत्न म्हणजे ते इंग्रजी चवथ्या इयत्तेंत होते तेव्हांचा होय. त्यावेळी मेडोज टेलरच्या एका कादंबरीचें त्यांनीं भाषांतर केलें. कोणत्याहि भाषेंत हरिभाऊंची स्वाभाविकच विशेष गति होत असे. फ्रेंच, जर्मन, बंगाली वगैरे भाषा त्यांनां अगदीं अल्पावकाशांत व अल्पायासांत शिकतां आल्या.
हरिभाऊ १८७८ सालीं पुण्यास आल्यानंतर सुमारें दोन वर्षांनीं न्यू इंग्लिश स्कूल स्थापन झालें. या शाळेंतील अगदीं आरंभींच्या विद्यार्थ्यापैकीं हे एक होते. हरिभाऊ हे न्यू इंग्लिश स्कूलमध्यें गेले तेव्हां त्यांचे वय अल्प होते; पण त्या वेळेपासून त्यांनां वाचनाचा अतिशय नाद असे. यामुळें त्यांचे सहाध्यायी व त्यांचा शिक्षकवर्ग यांनां त्यांच्या बद्दल फार आदर वाटे. यावेळी ''निबंधमाले'' नें सर्व समाजांत खळबळ उडवून दिली होती, ही गोष्ट सुप्रसिद्धच आहे. विष्णुशास्त्री यांनीं मराठी भाषेला नवीन प्रकारचें व श्रेयस्कर वळण लावलें, याबद्दल त्यांची सर्वतोमुखीं प्रशंसा होत असे. हरिभाऊ हेहि निबंधमालेचे कट्टे भक्त होते; पण ते मालेची आणि तिच्या कर्त्याची नुसती प्रशंसाच करून राहिले नाहींत, तर विष्णुशास्त्र्यांचा आदर्श पुढें ठेवून आपणहि वाङ्मयमंदिराची शोभा वाढविण्याचा प्रयत्न करावा, अशी त्यांनी आकांक्षा बाळगली व ज्या वाचनाच्या जोरावर विष्णुशास्त्र्यांनी मराठी भाषेवर प्रभुत्त्व मिळविलें त्याच वाचनाचा आश्रय करून त्यांनीं ही आपली आकांक्षा फलद्रूपहि केली, ही गोष्ट आजमित्तीस सर्वांच्या प्रत्ययास आली आहे. विष्णुशास्त्री रेनॉल्डसच्या कादंबऱ्या वाचीत असत, ही गोष्टी कानीं आल्याबरोबर हरिभाऊंनीहि त्याच कादंबऱ्या वाचण्याचा सपाटा लावला, यामुळें त्यांच्या डोळ्यांवर परिणाम झाला तो त्यांनां पुढें जन्मभर भोगावा लागला.
हरिभाऊंच्या लेखनक्रियेला त्यांच्या वयाच्या चवदाव्या वर्षीच प्रारंभ झाला, हें वर सांगितलेंच आहे. गोपाळराव आगरकर यांनीं केलेलें हॅम्लेटचें भाषांतर 'विकारविलसित' या नांवानें प्रसिद्ध झालें, त्यावर निबंधचंद्रिका मासिकांत हरिभाऊंनीं सन १८८२ त एक टीकात्मक लेख लिहिला, या वेळी हरिभाऊ हे विद्यार्थाच होते. आपल्या विद्यार्थ्यानें आपल्या पुस्तकावर ७२ पृष्ठांचा एक टीकात्मक लेख लिहिला हें पाहून प्रि. आगरकर यांना अर्थातच परमावधीचें कौतुक वाटलें. यानंतर निबंधचंद्रिकेंत त्यांचे आणखीहि कित्येक निबंध प्रसिद्ध झाले. हरीभाऊंचा शेक्सपीअरचा व्यासंग विशेष असे आणि त्या व्यासंगाला सतरा अठरा वर्षांच्या अल्पवयांतच साधारण प्रगल्म स्वरूप आलें. हा त्यांचा व्यासंग त्यांनीं आजन्म चालू ठेवला होता. शेक्सपीअरचीं नाटकें व त्यांवरील विद्वान ग्रंथकारांची परीक्षणें यांचा त्यांनीं फारच चांगला अभ्यास केला होता. शेक्सपीअरचें एक विस्तृत परीक्षण करावें, असा विचार ठरवून त्यांनीं जे थोडे लेख लिहिले ते 'चित्रमयजगतां' त प्रसिद्धहि झाले आहेत; पण पुडें तें काम तसेंच अपुरें राहिलें. शेक्सपीअरच्या सॉनेट्सचेंहि भाषांतर त्यांनीं सुरू केलें होतें. त्याचा सरासरी तृतीयांश भाग लिहूनहि तयार झाला आहे. शेक्सपीअर, कालिदासप्रभृति महाकवींच्या ग्रंथांचें हृद्गत उकलण्याची हरीभाऊंची हातोटी वाखाणण्यासारखी होती. हरीभाऊंचा इंग्रजीप्रमाणेंच संस्कृतचा व्यासंग चांगला असे. संस्कृत कवींमध्यें हीरभाऊंची कालिदासावर विशेष भक्ति असे. 'कालिदास, शेक्सपीअर व भवभूति' या मथळ्याखालीं प्रि. आगरकर यांनी स. १८८१ सालीं एक लेख लिहिला होता. त्यांत त्यांनीं 'कवि' या दृष्टीनें भवमूतीची योग्यता कालिदासाहूनहि अधिक आहे, असें विधान केलें होतें. ते हरीभाऊंनां अर्थातच न आवडून त्यांनीं 'बिचारा' या सहीनें केसरीकडे एक पत्रव्यवहार पाठविला व तो त्या पत्राच्या याच सालच्या ता. २९ मार्चच्या अंकांत प्रसिद्धहि झाला आहे. या लेखांत भवभूतीहून कालिदास हा कसा अधिक सरस व मनोज्ञ कवि आहे हें त्याच्या ग्रंथांतील अनेक उदाहरणें देऊन हरीभाऊंनी दाखविलें आहे.
हरीभाऊंची प्रवेशपरीक्षा १८८३ सालीं झाली. त्यानंतर ते डेक्कन कॉलेजमध्यें शिकावंयास गेले. त्यांचा बहुतेक वेळ अवांतर पुस्तकें वाचण्यांत जावयाचा. १८८४ सालीं पी.ई. च्या परीक्षेंत अर्थातच नापास झाले, व दुसऱ्या वर्षी म्हणजे १८८५ शालीं फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली, त्यावेळेस ते त्या कॉलेजमध्यें गेले. या कॉलेजमध्येंहि हरीभाऊंच्या पी. ई. चा निकाल आदल्या सालाप्रमाणेंच होऊन त्याच्या पुढच्या वर्षी ते डेक्कन कॉलेजमध्यें गेले. प्रो. भानु, प्रो. विजापूरकर, श्रीयुत ना.म. समर्थ, ही मंडळी याच वेळेस या कॉलेजमध्यें होती. याच वर्षी येथें रीडिंगरूम व लायब्ररी स्थापन झाली. या लायब्ररीस घ्यावयाच्या पुस्तकांची निवड करणारांपैकीं हरीभाऊ हे एक होते. त्यांनीं या लायब्ररींतील बहुतेक पुस्तकें एक वर्षांत वाचली; पण इंग्लिश व संस्कृत यांशिवाय बाकीच्या विषयाचें याहि वर्षी त्यांनां दर्शन न घडल्यामुळें परीक्षेचा निकाल त्यांच्या उलट झाला! यानंतर एक दोन वर्षे घरच्या मंडळींच्या आग्रहावरूनच ते परीक्षेच्या नादांत होते; पण त्यांत यश न येतां त्यांनां हा नाद सोडून द्यावा लागला. यापुढें हरीभाऊ कादंबरीलेखनाकडे वळले. हरीभाऊंची पहिली कादंबरी 'मधली स्थिती' या कादंबरींत मद्यपानाचे व तदनुषंगिक इतर व्यसनें यांचे दुष्परिणाम दाखविले आहेत. दुसरी कादंबरी मनोरंजन व निबंधचंद्रिका यांत प्रसिद्ध झालेली 'गणपतराव' ही होय. यांतील प्रतिपाद्य विषय ''पुनर्विवाह'' हा आहे. तिसरी ''पण लक्ष्यांत कोण घेतो'' ही होय. यांत केशवपनाच्या हिडिस चालीचा निषेध केला आहे. चवथी ''यशवंतराव'' या कादंबरीचा पूर्वार्धच प्रसिद्ध झाला आहे. सामाजिक व राजकीय बाबतींत भलतें शिक्षण मिळाल्यामुळें कसे दुष्परिणाम होतात याचें विवेचन या कादंबरींत केलें आहे. ''मी'' या पांचव्या कादंबरींत देशसेवेसाठीं संन्यस्तवृत्ति स्वीकारण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. सहावी ''भयंकर दिव्य'' हिच्यांत सोनेरी टोळीचीं दुष्कृत्यें, विचित्र संशयीपणाचा परिणाम वगैरेचें वर्णन आहे. कालानुरोधानें, ''मायेचा बाजार'' या कादंबरीचा नंबर सातवा लागतो. दुष्ट पतीमुळें स्त्रियांच्या होणाऱ्या दुस्थितीचें शब्दचित्र या कादंबरींत रेखाटलें आहे. आठवी ''आजच'' व नववी 'कर्मयोग' यांत 'पतित स्त्रियांचा उद्धर' हा संकल्पित विषय आहे. दहावी 'जग हें असें आहें' ही कादंबरी होय.
या सर्व कादंबऱ्यांत एकंदर तीन पिढयांचा इतिहास आहे. 'गणपतराव' या कादंबरींतील गणपतरावाचा मुलगा चंद्रशेखर हा कर्मयोगाचा नायक आहे. 'मी' या कादंबरींतील ताईचा मठ, हा ''भयंकर दिव्यांत, '' ''आजच'' मध्यें व ''कर्मयोगांतहि'' अधिष्ठित झालेला दिसतो. ''यशवंतरावां'' तील व ''भयंकर दिव्यां''तील पात्रें ''आजच'' मध्यें आणि ''कर्मयोगात'' हि आलेली आहेत. वर दिलेल्या दहा कादंबऱ्यांपैकीं ''गणपतराव'' ''आजच'' व ''कर्मयोग'' या अपूर्ण आहेत.
हरीभाऊंच्या ऐतिहासिक कादंबऱ्या पुढें दिल्याप्रमाणें आहेतः - पहिली ''म्हैसूरचा वाघ'': दुसरी ''उषःकाल'' यांत शिवाजीचा उदयकाल वर्णन केला आहे. तिसरी ''सूर्योदय''; यांत अफजलखानाच्या वधाचें कथानक वर्णन केलें आहे. चवथी ''सूर्यग्रहण;'' या कादंबरींत शिवाजी औरंगजेबाच्या कैदेंत पडलेला आहे, त्या काळची स्थिति आलेली आहे. पाचंवी ऐतिहासिक गोष्टीची म्हणजे ''गड आला पण सिंह गेला'' ही होय. सहावी ''मध्यान्ह''; ही सवाई माधवरावांच्या काळची आहे. सातवी ''चंद्रगुप्त''; आठवी ''कालकूट;'' या कादंबरींत पृथ्वीराज चव्हाणाचें कथानक आहे. नववी ''वज्राघात;'' हींत विजयानगरच्या विनाशकालाची परिस्थिति वर्णन केली आहे, व दहावी ''रूपनगरची राजकन्या'' ही होय. या कादंबऱ्यांपैकी ''सूर्यग्रहण,'' ''मध्यान्ह,'' व ''कालकूट'' या अपूर्ण स्थितींतच आहेत. हरीभाऊंच्या सामाजिक तीन व ऐतिहासिक तीन अशा एकंदर सहा कादंबऱ्या अपूर्ण राहिल्या आहेत. यांतील बहुतेक कादंबऱ्या त्यांनीं १८८९ साली सुरू केलेल्या ''करमणूक'' पत्रांत प्रसिद्ध झाल्या आहेत.
''कथानकांचा संकल्प ठरवून त्याची सुसंगत रीतीनें रचना करणें, त्यांतील पात्रांचा कथानकांतील प्रसंगानुरूप उठाव करणें, स्थलवर्णनांची हुबेहुब मांडणी करणें, पात्रांच्या स्वभावाचें यथार्थ दिग्दर्शन करणें, कथानकांतील निरनिराळ्या घटकांचा परिपोष यथाक्रम व यथाप्रमाण होईल अशी तरतूद करणें वगैरे संबंधांत हरीभाऊंचा हातखंडा असे. कल्पनेनें निर्मित अशा कृत्रिम सृष्टीची स्वाभाविक सृष्टीप्रमाणें बेमालुम बनावट करणें हा जो उत्कृष्ट कादंबरीकाराचा गुण तो हरीभाऊंना सहजसाध्य होता. 'महाराष्ट्र वाङ्मयांतील ते सर वॉल्टर स्कॉट होते' असें जें त्यांच्याविषयीं म्हणत तें अगदीं यथार्थ होतें, हें त्यांच्या कादंबऱ्यांतील उठावदार प्रसंग वाचणाराला सर्वस्वी मान्य होईल, '' असें जें त्यांचे चरित्रकार रा. पाबेकर लिहितात त्यासंबंधीं कोणाचेंहि दुमत असणार नाहीं.
हरीभाऊंचे बहुविध विषयांचे वाचन असल्यामुळें त्यांचा बहुश्रुतपणा चौरस असें. मिल, मोर्ले, स्पेन्सर वगैरे ग्रंथकार; टेनिसन, बर्डस्वर्थ, बायरन, ब्राऊनिंग आदिकरून कवी; ग्रीन गिबनप्रभृति इतिहासकार; डिकन्स, स्कॉट, जेन आस्टेन, जॉर्ज ईलियट, थँकरे वगैरे कादंबरीकरा यांचे ग्रंथ त्यांनां विशेष अवगत असत. या ग्रंथकारांपैकीं कोणाच्या ग्रंथांतील विशेष महत्त्वाचा किंवा मनोहर भाग त्यांच्या वाचण्यांत आला तर पुष्कळ वेळां त्यावर एखादा सुंदर निबंध लिहून ते एखाद्या संस्थेपुढें वाचीत व तो पुष्कळ वेळां तज्ज्ञ माणसांनांहि विशेष पसंत पडे. त्यांच्या 'करमणुकी'नें तर महाराष्ट्राला चटका लावून सोडला होता. त्यांत ललितवाङ्मयाखेरीज इतर उपचुक्त व शास्त्रीय माहितीहि असे. हरीभाऊंनी 'संतसखुबाई' व 'सती पिंगला' हीं दोन भक्तिपर नाटकें लिहिलीं आहेत.
पुणें म्युनिसिंपालटीचे हरीभाऊ हे वीस वर्षे सभासद होते, व तीन वर्षे अध्यक्ष होते. हरीभाऊंची वृत्ति शांत व स्वभाव मनमिळाऊ असल्यामुळें म्युनिसिपालिटींत कित्येक वर्षे प्रतिकूल परिस्थिति असतांहि त्यांनां पुष्कळ महत्त्वाची कामें करतां आलीं. म्युनिसिपल बाबतींत जेव्हां जेव्हां सरकारशीं दोन हात करण्याचा प्रसंग येई तेव्हां तेव्हां हरीभाऊ मोठ्या धैर्यानें आणि निर्भिडपमें पुढें सरसावत. म्युनिसिपालिटींत ते स्कूलबोर्डाचे चेअरमन असतां त्यांनीं पुणे येथील अजबखान्यांत शिक्षण या विषयावर शिक्षकांपुढें व्याखानें दिलीं ती फारच महत्त्वाचीं व अध्यापनानचें काम करणारांनां अत्यंत उपयोगी अशीं हीतीं. लोकलबोर्डाचे कित्येक वर्षे ते व्हाइस प्रेसिडेंट होते. पुणें येथील मद्यपान निषधक मंडळीचे ते अस्थेवाईक सभासद होते. पुणें जिल्ह्याकरितां प्रथम आबकारी कमिटी नेमली तेव्हां तींत ते म्युनिसिपालिटीतर्फे सभासद असून लोकपक्षाची बाजू कमिटीपुढें मांडण्यांचें काम त्यांनीं अनेक वेळां चांगल्या रीतींनें केलेलें आहे. पुणें येथील सेंट जॉन अॅब्युलन्स कमिटीचे ते सभासद होते. त्याचप्रमाणें फीमेल हायस्कूलच्या कौन्सिलचेहि ते सभासद होते. नूतन मराठीविद्यालयकारितां स्वार्थत्यागपूर्वक प्रयत्न करणारांचे तर ते अग्रणी होते. ते सुधारक व प्रागतिक म्हणून गणले जात. त्यांनां एकच मुलगी होती पण ती लहान वयांतच वारली. तिच्या मृत्युमुळें हरिभाऊंनां फार दुःख झालें. पुढें त्यांना जलोदराची भावना होऊन शेवटचे काहीं महिने कष्टांत गेले. [(आंबेकरकृत चरित्र. मासिक मनोरंजन पु. २४ वें). काशीबाई कानिटकर यांनीं महाराष्ट्रसाहित्यपांत्रकेंत ( वर्ष ९, अं. १) लिहिलेलें चरित्र मोठ हृदयसंगम आहे. वाग्भट नारायण देशपांडे यांनीं हरिभाऊंच्या सामाजिक कादंबरऱ्यांचे सुंदर परिशीलन विविधज्ञानविस्तारांत (पु.५१) केलें आहे.]