विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आपद्धर्म - आपद्धर्म हा विषय धर्मशास्त्रांत बराच महत्त्व पावला आहे. याच्या अस्तित्वाचें कारण श्रमविभागमृलक चातुर्वर्ण्य व सांस्कारिक चातुर्वर्ण्य यांतील असंगति होय. मनुष्याचें उपजीविकेचें साधन हें त्याच्या योग्यतेवर अवलंबून असतें जन्मावर नसतें, आणि श्रमविभागावर चातुर्वर्ण्य अस्तित्वांत असलें तरी संस्कारदृष्ट चातुर्वर्ण्य अगदीं निराळें असतें. संस्कारदृष्ट चातुर्वर्ण्याप्रमाणें वैश्य कोण? जो वैश्याचा धंदा करतो नव्हे पण वैश्याचे संस्कार ज्याला असतील तो संस्कार कर्मावर अवलंबून नसून जन्मावर अवंलबून असतात, ते व्यक्तीचा लहानपणी होतात आणि कर्म तर तरुणपणीं ठरतें. या परिस्थितीमुळें कर्माप्रमाणें संस्कार राहिले नाहींत. कर्माप्रमाणें संस्कार करावे व मान्यता द्यावी हा उपदेश अशक्य झाल्यामुळें संस्कार झाले असतील तदनुरूप कर्म करावें असा उपदेश धर्मशास्त्रकार व नीतिशास्त्रकार करूं लागले. संस्कारानुरूप कर्म शक्य नसेल तर काय करावे? याला तोडगा काढला तो असा. जें कर्म करावे लागेल तें आपद्धर्म म्हणून करण्यास हरकत नाहीं. अशी त्यास पुस्ती जोडण्यात आली. आपद्धर्मावर विवेचन करतांना धर्मशास्त्रकार पहात की, उच्च वर्णांचे संस्कार पावलेल्यानें अगदीं हलकीं कामें न करता जरा बऱ्या दर्जाची कामें करावीं.
ब्रा ह्म णा चा आ प द्ध र्म. - 'ब्राह्मणाला प्रतिग्रह, याजन व अध्यापन हीं वृत्तिसाधनें आहेत, ' या वचनानें सांगितलेल्या याजनादि मुख्यवृत्तीचा असंभव झाल्यास दुसरा जीवनोपाय याज्ञवल्क्य असा सांगतोः-ब्राह्मणानें, कुटुंब मोठें असल्यामुळें आपल्या वृत्तीवर निर्वाह होणें अशक्य झाल्यास तसल्या अपत्तींत शस्त्रग्रहण इत्यादि क्षत्रियाच्या कर्मानें निर्वाह करावा. आणि त्यावरहि निर्वाह होईनासा झाल्यास वैश्याच्या वाणिज्यादि ( व्यापार वगैरे) वृत्तीवर निर्वाह करावा. परंतु शुद्रवृत्तीचा केव्हाहि आश्रय करूं नये. त्याचप्रमाणें आपत्तीतहि हीनवर्णाच्या पुरुषानें ब्राह्मणादि उत्तम वर्णाच्या वृत्तीचा आश्रय करूं नये; तर ब्राह्मणानें क्षत्रियाची वृत्ति, क्षत्रियानें वैश्याची व वैश्यानें शूद्राची असा आत्पकालीं आपल्या खालच्या वर्णांच्या वृत्तीचा अवलंब करावा; सर्वांत श्रेष्ठ जी ब्राह्मणवृत्ति तिचा अवलंब करूं नये. असे वसिष्ठानें (अ.२ सूत्र २२-२३) सांगितले आहे. शूद्राला उत्कृष्ट कर्म (ब्राह्मकर्म) व ब्राह्मणाला अपकृष्ट कर्म (शूद्रकर्म) करणें प्रशस्त नाहीं. पण मधल्या दोन वर्णांचें कर्म (क्षत्रियाचें शस्त्रधारण व वैश्याचें वाणिज्य ) सर्वांस सारखेंच हितकारक, आहे. आपत्तींत सापडलेल्या शूद्रानें वैश्यवृत्तीवर अथवा शिल्पावर निर्वाह करावा. मनूनें (अ.१० श्लो.१००) या संबंधी विशेष सांगितला आहे तो असा की, 'ज्या कर्मानें द्विजांची शुश्रूषा केल्यासारखें होतें ती कारागिरांची कर्मे व विविध शिल्पे यांवर निर्वाह करावा.' याच न्यायानें अनुलोम संततींतील लोकांनीही अपात्तीत आपल्यापेक्षां हीन जातीच्या वृत्तीचा आश्रय करावा. याप्रमाणें आपल्यापेक्षा किंचित हीन जातीच्या वृत्तीनें आपत्तीत उपजीविका केल्यावर आपत्ति संपल्यानंतर प्रायश्चितानें आपल्याला पवित्र करून घेऊन स्वतःच्या वृत्तीत पुनःस्थित व्हावें (म्हणजे पुनः आपल्या वृत्तीचा आश्रय करावा) किंवा निंद्यवृत्तीनें संपादन केलेलें धन योग्य मार्गांत खर्च करावें. कारण, मनूनें (अ.१० श्लो.१११) जप, होम, याजन, अध्यापन यांच्या योगानें आपत्तींत केलेलें पाप नाहींसे होतें आणि प्रतिग्रनिमित्तक पाप त्यामानें व तपानेंच जातें असें म्हटलें आहे.
आता वैश्यवृत्तीनें जिवंत राहणाऱ्या ब्रह्मणानें कोणत्या वस्तूंचा विक्रय करुं नये तें संगितलें आहे. बोरें व रिठे ही सोडून केळीं इत्यादि फळें ब्रह्मणानें विकूं नयेत. पण नारदानें (अ.१श्र्लो.६५) 'आपोआप गळून पडलेली पाने; फळांपैकीं बोरें व रिठे; दोऱ्या, कापसाची वस्त्रे, इत्यादी विकार न पोवलेल्या वस्तू विकाव्यात' असें ह्मणून बोरें व रिठे विकण्याची अनुज्ञा दिलेली आहे. माणिक्यादि सर्व प्रकारचे पाषाण; पट्टवस्त्र; सोमनांवाची लता, कोणत्याहि प्रकारचा (स्त्री,पुरुष,नपुंसक) मनुष्य, मांडे इत्यादि सर्व प्रकारचें कक्ष्य; वेत, गुळवेळ इत्यादि लता, तीळ, सर्व प्रकारचे भोज्य पदार्थ, गूळ, उसाचा रस, साखर इत्यादि रस; सर्व क्षार पदार्थ, दही दुध;तूप;ताक;लोणी इत्यादि सर्व आर्द्रपदार्थ; तलवार वगैरे शस्त्रे; सर्व प्रकारचें मद्य, मध, लाख; उदक; दर्भ, माती, अजिन (कृष्णाजिन),पुष्पे, बकऱ्याच्या केंसाची घोंगडी; चमरीप्रभृति वन्य पशूंचे केस; विष; भूमी; रेशमी वस्त्रे; निळीचारस; मीठ; सैधव; मास; घोडे; गाढव; इत्यादि एकशफवाल प्रणी; शिसें व दुसरेही सर्व प्रकाराचे खनिज धातू; सर्व प्रकारची भाजी; ओल्या ओषधी; पेंड;अरण्यातील पशू व चंदन; सुगंधि पदार्थ ह्या सर्व वस्तू वैश्य वृत्तीनेंहि निर्वाह करणाऱ्या ब्रह्मणानें विकूं नयेत. क्षत्रियादि कानी विकल्यास त्यास काही दोष प्रप्त होत नाही. म्हणूनच नारदानें [अ.१.श्लो. ६१] वैश्यवृत्तीनें उपजीविका करणाऱ्या ब्राह्मणास दूध व दहीं अविक्रेय आहे असें सांगितले आहे.
आतां वरील वचनास अपवाद सांगितला तो असाः अगदीं अवश्यक असलेलीं पाक यज्ञादि कर्में, त्यांच्या साधनभूत अशा व्रीहिप्रभृति धान्यांचा अभाव झाल्यामुळें जर होईनाशीं झालीं तर त्या धान्याकरिता तीळ विकावे. पण तें जितकें धान्य घ्यावयाचें असेल तितकेच विकावेत. अधिक किंवा उणे विकूं नयेत. 'शक्ति नसल्यामुळें औषधाकरितां व यज्ञाकरितां जर तीळ अवश्यच विकावयाचे झाले तर ते त्यांच्या भारंभार धान्य घेऊन विकावे' पण दुसऱ्या निमित्तानें अथवा अन्य प्रकारानें तीळ विकल्यास 'तो विकणार ब्राह्मण किडा होऊन पितरांसह श्वविष्ठेंत पडातो' असें मनूनें (अ.१०श्लो ९१) सांगितलें आहे. पूर्वोक्त निषेधाचें उल्लंघन केल्यास पुढील दोष सांगितले आहेत. मेंदी, मीठ, व मांस यांचा विक्रय केल्यास पातित्य येतें. दूध, दहीं व मद्य यांचा विक्रय केल्यास हीनत्व येतें. एखादा निर्धन मनुष्य सर्व कुटुंब उपवासीं मरत असल्यामुळें आपत्तीत असतानांहि क्षक्षियवृत्तींत अथवा वैश्यवृत्तींत पडत नाहीं तो अतिशय हीन पुरुषांपासून प्रतिग्रह घेऊन त्याचें अन्न खात असला तरी पापानें लिप्त होत नाहीं. कारण, त्या आपत्तींत असत्प्रतिग्रह करण्याविषयीं अधिकार दिलेला आहे.
ब्राह्मण व क्षत्रिय यांनां वैश्यवृत्ति व स्वतः केलेली शेती यांची अनुज्ञा दिलेली आहे. त्याचप्रमाणें शिल्पादिकांचीहि अनुज्ञा दिलेली आहे स्वयंपाक करणें इत्यादि शिल्प, सेवा, वेतन घेऊन शिकविणें इत्यादि विद्या, द्रव्य स्वतः व्याजी लावणें व त्या व्याजावर निर्वाह करणें, धान्यादि वाहून नेण्याकरितां भाडयाची गाडी ठेवून तिच्यापासून उत्पन्न झालेल्या भाडयावर निर्वाह करणें, दुसऱ्याचें मनोगत ओळखून त्याप्रमाणें आचरण करणें, जेथें पुष्कळ गवत, वृक्ष व जल आहे अशा ठिकाणीं वास करणें, राजापाशीं याचना करणें, व स्नातक असूनहि भिक्षान्नावर निर्वाह करणें, हीं आपत्तींतील जीवनसाधनें आहेत. मनूनेंहि (अ.१० श्लो. ११६) विद्या, शिल्प इत्यादि दहा प्रकार जीवनोपाय म्हणून सांगितले आहेत.
धान्याचा सर्वतोपरि अभाव झाल्यास काही न खातां तीन दिवस उपाशीं रहावें व नंतर अब्राह्मणापासून म्हणजे शुद्रापासून, त्याच्याअभावीं वैश्यापासून व वैश्याच्याहि अभावीं कर्महीन क्षत्रियापासून एक दिवस पुरेल इतकें धान्य न विचारताच घ्यावें म्हणजे त्याचा अपहार करावा. आणि हरण केल्यावर त्या धान्याच्या मालकानें 'तूं हें माझें धान्य का हरण केलेंस' असे विचारल्यास 'मी हें तुझें अमुक धान्य उपजीविकेकरितां चोरले' असें खरें खरें सांगावें. मनूनेंहि (अ.५१ श्लो.१७) असेंच सांगितलें आहे. जो क्षुधेने व्याकुळ होऊन दुःख भोगीत आहे असा आपद्ग्रस्त ब्राह्मणाचें आचरण, कुल, शील ( आत्मगुण) शास्त्रश्रवण, वेदाघ्ययन, कृच्छ्रचांद्रायणदिपत, याचें चांगलें परीक्षण करून राजाने त्याच्या धर्मवृत्तीची योजना करावी. न केल्यास त्यास दोष लागतो असें मनूनें (अ. ७ श्लो. १३४) सांगितलें आहे. आपत्तीमध्यें ब्राह्मण किंवा क्षत्रिय यांना वैश्यवृत्ति जरी पत्करलेली असली तथापि हिंसाबाहुल्य, व पराधीन असलेल्या कृषिकर्माचा (शेतकीचा) प्रयत्नानें त्याग करावा. जातीनें अधम असणारा पुरुष ज्यावेळीं लोभाविष्ट होऊन उत्कृष्ट जातीच्या वृत्तीचा अवलंब करतो त्यावेळी राजानें त्याला निर्धन करून स्वराष्ट्रांतून घालवून द्यावें [याज्ञवल्क्य व मनुस्मृति] येणें प्रमाणें अनेक प्रकारचें विवेचन निरनिराळ्या ग्रंथकारांनीं केलें आहे.