विभाग आठवा : आफ्रिका ते इक्ष्चाकु
आयोनिया - आशियामायनरच्या पश्चिम किनाऱ्याच्या एजियन समुद्राजवळ असलेल्या एका भागाचें हें प्राचीन नांव आहे. त्याच्या पूर्वेस लीडिया देश आहे. या भूभागांत व लगतच्या बेटांत आयोनिक वंशातले ग्रीक लोक राहिले होते. ट्रोजन युध्दनंतर १४० वर्षांनीं या भागांत वसाहत झाली, अशी दंतकथा आहे. या लहानशा भागांतील निरनिराळया शहरात निरनिराळया लोकांनीं वसाहत केली होतीसें दिसतें. कारण हिरोडोटस या प्राचीन इतिहासकाराच्या काळींहि निरनिराळया शहरातले लोक निरनिराळी भाषा बोलत असत असें त्याच्या इतिहासांत म्हटलें आहे. आयोनियांत बारा प्रसिध्द शहरें असून त्यांचा एक संघ बनविला होता, व एकीची खूण म्हणून एका पॅन-आयोनिक (सर्व आयोनियाच्या) समारंभात संघाचे सर्व घटक भाग घेत असत. तथापि या संघाला धार्मिक स्वरूप होतें, राजकीय नव्हतें; कारण प्रत्येक शहराचा राज्यकारभार स्वतंत्रपणें चालत असे. आयोनिया हा भूप्रदेश फार लहान असून त्याची लांबी अवधी ९० मैल व रुंदी २० ते ३० मैल आहे. शिवाय यापैकीं बराच भाग डोंगरांनीं व्यापला आहे. मात्र येथील हवा विशेष चांगली असून जमीन सुपीक आहे. त्यामुळें येथें सर्व प्रकारचीं फळें विपुल होतात. येथील अंजीर व मनुका (वाळलेलीं द्राक्षें) यूरोपातील बहुतेक बाजारात असतात. येथील शहरापैकीं मिलेटस हें शहर प्राचीन कालीं फार प्रसिध्द होतें व हल्ली स्मर्ना हें शहर फार प्रसिध्द आहे.
इ ति हा स. - आयोनियासंबंधाचीं ज्ञात असलेली पहिली ऐतिहासिक गोष्ट म्हणजे ख्रिस्तपूर्व सातव्या शतकाच्या मध्यास सिमेटी लोकांनीं (सीथिया पहा) केलेली स्वारी होय. लीडियाचे राजेहि वरचेवर स्वाऱ्या करीत असत आणि क्रोसस या लीडियन राजाच्या वेळीं (ख्रि. पू. ५६०-५४५) आयोनियांतील बरींच शहरें लीडियाच्या अमलाखालीं गेलीं. पण इराणच्या सायरस राजानें ती जिंकून इराणच्या अमलाखालीं घेतलीं. ख्रि. पू. ५०० च्या सुमारास या शहरांनीं इराणविरुध्द बंड केलें व तें मोडण्यांत आलें. पण ख्रि. पू. ४७९ मधील मीकेलच्या लढाईंत ग्रीकांनीं आयोनियन लोकांच्या मदतीनें इराणी लोकांचा पराभव केल्यावर आयोनिया पुनः स्वतंत्र झाला, पण तो अथेन्सनें स्थापलेल्या डेलियन संघाचा अंकित होता. ख्रि. पू. ३८७ पासून पुनः इराणची सत्ता येथें स्थापित झाली. ख्रि. पू. ३३४ मध्यें अलेक्झांडर दि ग्रेटनें आयोनिया जिंकून घेतल्यापासून मॅसिडोनियन राजांचा अंमल तेथें सुरू झाला; व नंतर रोमन अमलाखालीं हा देश गेला.
आयोनियानें जगावर मोठे उपकार केले आहेत; ते असे की, आयोनियानें अनेक विद्वान व शास्त्रज्ञ लोक जन्मास घातल; तसेच चित्रकला उत्तम प्रकारें वृध्दिंगत केली. येथूनच पुढें पांचव्या शतकांत अथेन्स येथें या कलेच्या वाढीला उत्तेजन मिळून ती उत्कृष्ट दशेंस पोहोंचली. आयोनियन चित्रकला ख्रिस्तपूर्व ८ व्या, ७ व्या व ६ व्या शतकांत भरभराटींत होती (ग्रीक कला पहा). आयोनियन प्रसिध्द पुरुषांत सॅमॉस येथील थिओडोरस व ऱ्होकस; चिऑसचा ग्लॉकस, मेलास, मिसिआडीस, आर्चेर्मस, बुपालुस व अथेनिस; आणि मॅग्नेशियाचा बॅथीक्वीज, हे प्रमुख होत.
[संदर्भग्रंथ - आशियामायनरवरील ग्रंथांतून या भागाची माहिती सांपडेल. शिवाय ब्यू फोर्ट - आयोनियन अॅटिक्विटीज (१८११) चँडलर - आयोनियन अॅटिक्विटीज (१७६९ पासून पुढें), मुरे वगैरेंनीं प्रसिध्द केलेला ग्रीक पाषाण शिल्पाचा इतिहास. होगार्थ - आयोनिया अॅड दि ईस्ट (१९०९) ए. ब्रि.]