विभाग नववा : ई-अंशुमान
उर्दुबेगी – हिंदुस्थानांत स्त्रियांचें पलटण तयार करण्याचा कसकसा प्रयत्न झाला होता याची माहिती चांगलीशी प्रसिद्ध नाहीं. मुसुलमान बादशहांनीं प्रथमतः आपल्या पडदानशीन राण्यांसाठीं स्त्रियांची फौज तयार करण्याचा प्रयत्न केला होता असें दिसतें. मनुची म्हणतो कीं, औरंगजेबाच्या जनानखान्यावर पाहारा करण्यासाठीं खोजे लोकांच्या ऐवजी स्त्रियांची योजना होऊन त्यांचें एक लष्करहि बनलें होतें. या लष्कराच्या मुख्य स्त्रीकामगाराचें नांव उर्दुबेगी होतें. या बाईचें एक चित्र मनुचीनें दिलें आहे. यावरून मुसुलमानी जनानखान्यावरील लष्करी स्त्रीअंमलदारांच्या पोषाखाची कल्पना येईल (इ. सं. जुन्या ऐ. गोष्टी, पृष्ठ. १७).