विभाग नववा : ई-अंशुमान
उर्मिया, स रो व र. – इराणांत वायव्येस हें एक सरोवर असून उ. अ. ३७० १०’ व ३८० २०’ आणि पू. रे. ४५० १०’ व ४६० यांच्या दरम्यान आहे. पश्चिम किनार्यावरील उर्मिया गांवावरून या सरोवरास हें नांव मिळालें असावें. “दर्या चेशाही” अथवा “शाही गोल” असेंहि या सरोवरास म्हणतात. सरोवराची मर्यादा अजमासें दक्षिणोत्तर ८० ते ९० मैल लांब व पूर्वपश्चिम ३० ते ४५ मैल रुंद आहे. पावसाळ्यांत मात्र ती बरीच विस्तृत होते. पूर्व किनार्यावरील शाही द्वीपकल्प पाणी वाढल्यावर बेट बनतें व कधींकधीं वर्षाकाल संपल्यावरहि, बरेच दिवसपर्यंत उथळ पाण्यानें हें वेष्टिलेलें असतें. सरोवराच्या पाण्याची खोली साधारणतः १५ ते १६ फूट असते. क्षेत्रफळ प्रायः १५४४ ते २३१७ चौरस मैल यांच्या दरम्यान असतें. सरोवराच्या दक्षिणार्धांत जवळजवळ ५० बेटांचा एक समूह असून‘कोयन डघी’ हें सर्वांत मोठें आहे. हें बेट ३ ते ४ मैल लांबीचें आहे तेथें एक गोड्या पाण्याचा झरा असून फिरस्ते कळपवाले बहुधां वस्ती करून राहतात. बाकीच्या बेटांत वस्ती नाहीं. गोड्या पाण्याच्या बर्याच नद्या व ओढे मिळत असले तरी सरोवराचें पाणी खारें असतें. निरनिराळीं क्षारद्रव्यें पाण्यांत तयार होतात.