विभाग नववा : ई-अंशुमान
उलघबेग मिरझा : (१३९४-१४४९). – उलघबेग राजपुत्र अमीर तैमुरचा नातू व मिरझा शहारूख याचा मुलगा असून ज्योतिषशास्त्रांत चांगला पंडित म्हणून प्रसिद्ध आहे. तो इसवी सन १४४७ त समर्कंदच्या गादीवर बसला. आपल्या आयुष्याचा प्रधानभाग यानें ज्ञानार्जनांत खर्च केल्यामुळें सहाजीकच याच्या अंगीं युद्धकला नव्हती. आपल्या राज्यांतील सर्व ज्योतिर्विद एकत्र जमवून “झीज उलघबेग” नांवाचा ज्योतिष गणिताचा ग्रंथ यानें तयार केला. त्याच्याजवळ तार्यांचे वेध घेण्याचीं मोठमोठीं यंत्रें होतीं असें म्हणतात. विशेषतः तार्यांची उंची मोजण्याचें जें सूर्ययंत्र (क्वाड्रंट = तुरीययंत्र) त्याजवळ होतें तें १८० फूट (रोमन) उंच होतें. उलघबेगचा अंत फार वाईट प्रकारें झाला. इ. स. १४४९ मध्यें त्याचा मुलगा मिरझा अबदुल लतीफ यानें त्याला कैद करून ठार मारिलें. उलघबेगचा स्थिर तार्यांचा तक्ता हैडनें ऑस्कफोर्ड येथें १६६५ त टीपांसहित प्रसिद्ध केला. उलघबेगच्या पूर्वींच्या नक्षत्रांच्या यादी अरबांनीं टॉलेमीपासून घेतल्या असल्यामुळें त्यांत बर्याच चुका होत्या. तेव्हां उलघबेगला ९९२ स्थिर नक्षत्रांच्या स्थिती पुन्हां काढाव्या लागल्या. समर्कंदच्या दक्षिणेस, फार अंतरावर असल्यानें तेथून न दिसणारीं अशीं आणखी सत्तावीस नक्षत्रें, अलसूफीच्या यादींतून आपल्या ग्रंथांत त्यानें उतरून घेतलीं [बीलचा कोश].