विभाग नववा : ई-अंशुमान
उलेमा – (अरबी शब्द उलमा म्हणजे ज्ञाते) हे इस्लामी पंडित. धर्मवेत्ते, शास्त्रकर्ते, आचार्य, न्यायशास्त्री, मुफती इत्यादि असून सर्वजण सामान्यपणें मुसलमानी शास्त्रांत तात्त्विक व व्यावहारिक रीतीनें प्रवीण असतात. येथें शास्त्राचा अर्थ, परंपरा, ग्रंथ किंवा लोक यांच्यापासून जें शिकलें जातें तें ज्ञान उद्दिष्ट आहे. संकुचित अर्थानें हा शब्द सरकारी नोकरींत असलेल्या अशा पंडितांच्या मंडळाला योजितात. उलेमा अर्थाच्या विरुद्ध शब्द “आरिफ” हा आहे; त्याचा अर्थ ज्यांना धार्मिक ज्ञान, उलेमांप्रमाणें परंपरा किंवा बुद्धि यांच्या योगें न मिळतां गूढ दृष्टांत होऊन मिळतें ते मुसलमान असा आहे.