विभाग नववा : ई-अंशुमान
उल्का – रात्रीं सहज निरभ्र आकाशाकडे पाहिले असतां एखादी तारा तुटून पडली असें दिसतें, त्या पडलेल्या तारकेस उल्का असें म्हणतात. प्रत्येक तासास मध्यम प्रमाणानें आठ उल्का पडतात. प्रत्येक आगस्ट महिन्याच्या नवच्या व दहाव्या तारखांस व नोव्हेंबर महिन्याच्या १२, १३ व १४ या तारखांस दर तासास २६०० उल्कापात होतात. हे उल्कापात आकाशांतील एकाच बिंदूपासून होतात.
वर्षांतील निरनिराळ्या दिवशीं हा बिंदु आकाशांत कोठकोठें असतो. याचें एक कोष्टक झालेलें आहे.
पूर्वरात्रीपेक्षां उत्तररात्रीं उल्कापात जास्त होतो. उष्ण कटिबंधांत उल्का जशा तेजस्वी दिसतात तशा इतर कटिबंधांत दिसत नाहींत. उल्कांचे रंग तांबडा, पिंवळा, नारिंगी, हिरवा, पांढरा इत्यादि अनेक प्रकारचे आहेत. कांहीं उल्का अगदीं बारीक असतात. त्या पळभर दिसून आकाशांत वरचेवर नाहींशा होतात. कांहीं त्याहून मोठ्या असतात. त्या मोठ्या झपाट्यानें आकाशाचा बराच भाग क्रमून जमिनीवर पडल्याशा दिसतात. त्यांचें तेजहि बरेंच असतें. कांहीं तर खालीं येतां येतां फारच मोठ्या होतात. कधीं कधीं चंद्रा एवढ्या दिसतात. त्यांचा प्रकाशहि पडतो. एखादेवेळीं मोठी गर्जना होऊन त्या देसेनाशा होतात. एखादी उल्का प्रथम मोठी असून पुनः लहान होते. कधीं कधीं एखादी मोठी उल्का फुटून तिच्या निरनिराळ्या उल्का बनून खालीं येतात. एखादेवेळीं ह्या स्फोटाचा कडकडाट इतका होतो कीं, धरणीकंप होत आहे कीं काय असा भास होतो. एखादी मोठी उल्का एखाद्यावेळीं जमीन व पाषाण यांचें विदारण करितें. अथर्ववेदसंहितेंत (१९.९) उल्केचा उल्लेख आहे. वराहमिहीरादिकांनीं उल्केला अशनि असेंहि नांव दिलेलें आहे. उल्कापातासंबंधीं जुन्या उपपत्ती‘विज्ञानेतिहास’ (पान ५९०) या ज्ञानकोशाच्या प्रस्तावनविभागांत दिल्या आहेत. तसेंच धूमकेतु व उल्का यांचा संबंधहि त्या ग्रंथांत दाखविला आहे (पा. ३५७).
उ ल्का पा षा ण – उल्का कधीं कधीं पाषाणरूपानें पृथ्वीवर पडतात. आपल्यास आकाशस्थ गोलांच्या खनिज द्रव्याचें प्रत्यक्षज्ञान होण्याचें साधन काय तें हे उल्कापाषाण होत. बाकी त्यासंबंधीं आपलें सर्व ज्ञान अप्रत्यक्ष आहे. म्हणून हे अशनि फार महत्वाचे असल्यामुळें त्यांचा संग्रह करून त्यांची परीक्षा करण्याचे प्रयत्न सांप्रत चालू आहेत. ब्रिटीश म्यूझियम मध्यें ह्या अशनींचा मोठा व उत्कृष्ट संग्रह आहे. मुंबई येथें व्हिक्टोरिया म्यूझियम मध्यें असे कांहीं पाषाण आहेत. भूस्तरसंशोधन खात्याच्या मार्फत कलकत्ता येथेंहिं अशा पाषाणांचा चांगला संग्रह केला गेला आहे. उल्कापाषाणांचे मुख्यत्वेंकरून तीन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारांत बहुधां निकलशीं मिश्रित असें धातुमय लोखंड असतें. दुसर्या प्रकारच्या उल्कापाषाणांत लोखंडाशीं दगडासारखें द्रव्य संयोग पावलेलें असतें. तिसर्यांत बहुधा दगडच असतो.
अशनींचें पृथक्करण केल्यावरून असें दिसून आलें आहे कीं, त्यांत जरी पृथ्वीवरील तत्त्वांहून निराळीं तत्वें नसतात, तरी त्यांचे संयोग पृथ्वीवर आढळत नाहींत असे असतात; हिंदुस्थान, यूरोप, अमेरिका अशा निरनिराळ्या स्थळीं पडलेल्या अशनींचीं द्रव्यें बहुधा एकसारखीं असतात. अल्युमिनियम, कॅलशियम, कार्बन, लोखंड, मॅग्नेशियम, निकल, ऑक्सिजन, फॉस्फरस, सिलिकॉन आणि गंधक हीं द्रव्यें या पाषाणांतून नेहमीं जास्त प्रमाणांत सांपडतात. अँटिमनी आर्सेनिक, क्लोरिन, क्रोमियम, कोबाल्ट, तांबे, हायड्रोजन, मँगनीज, नैट्रोजन, पोटॅशियम, सोडियम, वगैरे कमी प्रमाणांत आढळतात. सोनें, रुपें, कथील वगैरे द्रव्येंहि क्वचित्प्रसंगीं आढळतात.
अशनी निरनिराळ्या आकाराचे व निरनिराळ्या वजनाचे असतात. इ. स. १८६५ मध्यें ३।। टन वजनाचा एक अशनि ब्रिटीश म्यूझियममध्यें आला. आणि दक्षिण अमेरिकेंत तर १५ टन वजनाचा एक अशनि आढळला आहे. त्याची लांबी ७ फूट आहे.
प्राचीन काळापासून कधीं व कोठें उल्कापात झाले याचें टिपणहि सांपडतें (वि. विस्तार, पु. ११. अं. ११-१२). चिनी, ग्रीक, अरब यांच्या प्राचीन ग्रंथांत उल्कापातांविषयीं पुष्कळ वर्णनें आहेत. इ. स. १५१० मध्यें इटली देशांत लांबर्डी प्रांतांत एके दिवशीं सायंकाळीं ५ वाजतां ११२० दगड आकाशांतून पडले. ते गारेपेक्षां कठिण होते. आणि त्यांस गंधकासारखा वास येत होता. त्यांतील मोठ्या दगडाचें वजन १२० पौंड होतें. इ. स. १६२० मध्यें पंजाबांत जालंदर येथें एक अशनि पडला. त्याचा वृत्तांत जहांगीर बादशहानें स्वतः लिहिला आहे तो असा:- “त्या अशनीचें वजन १६० तोळे होतें. त्याचीं हत्यारें बनविण्याकरितां मी तो एका कारागिराच्या जवळ दिला त्यानें सांगितलें कीं, त्याचें लोखंड घनवर्धनीय नाहीं. म्हणून दुसरें लोखंड मिसळण्यास मी सांगितलें. तेव्हां अशनीचें ३ भाग लोखंड व इतर एक भाग लोखंड असें एकत्र करून त्याच्या दोन तरवारी, एक सुरी व एक खंजीर अशीं हत्यारें केलीं.”
इ. स. १७९० मध्यें नवंबरच्या २४ व्या तारखेस रात्रीं ९ वाजतां फ्रान्स देशांत एक मोठी उल्का दिसली ती चंद्राहून मोठी होती.
इ. स. १७९८ मध्यें डिसेंबरच्या १९ व्या तारखेस रात्रीं आठ वाजतां काशी येथें एक उल्का पडली. ती पूर्णचंद्राप्रमाणें तेजस्वी होती.
इ. स. १८७९ च्या नोव्हेंबर महिन्यांत सातारा जिल्ह्यांत कळंबी गांवीं अशनि पडला होता. (वर्णनाकरितां ता. ३१ जानेवारी १८८० चा टाईम्स ऑफ इंडियाची पुरवणी पहा). शहरें व गांवें यांनीं व्यापिलेला पृथ्वीवरचा भाग अंतरिक्षाशीं तुलना करण्याकरितां फार लहान असल्यानें, एखाद्या शहरांत उल्कावृष्टि होण्याचा संभव फार कमी असतो; माणसांना दुखापत होण्याचा संभव तर त्याहूनहि कमी असणार हें साहजिकच होय. इ. स. १८२७ त महू येथें एक मनुष्य आकाशांतून पडलेल्या दगडाच्या दुखापतीनें मेल्याचा दाखला आडळतो. अशा तर्हेचीं इतर उदाहरणें फारशीं नाहींत.